मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष|
ओम चिले दत्त

ओम चिले दत्त

दत्त संप्रदायातील सत्पुरूष


जन्म: १५ ऑगस्ट १९२२. पन्हाळा जवळ जेऊर येथे.
कार्यक्षेत्र: पैजारवाडी.
गुरु: गराडे महाराज. पुढे सिद्धेश्वर महाराज.  
विशेष प्रभाव: शंकर महाराज धनकवडी  (याना ते दादा म्हणजे मोठे बंधू मानीत).

प. पू. चिले महाराजांचा जन्म १५ आगस्ट १९२२ ला आजोबा श्री बु-हाण यांचेकडे पन्हाळ्याजवळच्या जेऊर गावी झाला. त्यांचे तिर्थरूप कोल्हापूरला व्यवसायानिमित्त स्थलांतरीत झाले असले तरी त्यांचे गाव पैजारवाडी हे होय. त्यांचे बालपण त्यांच्या गावी पैजारवाडी येथेच गेले. त्यांच्या बालपणी ते अनवाणी वा-याच्या वेगाने पळत असत. पहाणारे अचंबित होत असत. त्याना भैरवनाथ मंदीर, मसाईमंदीर, टेबलाईमातामंदीर व सिध्देश्वर मंदीरात जाण्यात व तेथेच वेळ घालवण्यात जास्त आवडत असे.

ज्या ज्या वेळेस संत महंत लोकांमधे वावरत असताना सभोवतालच्या लोकांना त्यावेळी ते कोणी वेगळे आहेत का? हे जाणवतही नाही. मात्र त्यांचे अवतार कार्य संपल की, सर्वांना त्यांची जाणीव होऊ लागते. त्यावेळी लोक त्यांनी लिहीलेले किंवा त्यांच्याबद्दल लिहिलेल्या लिखाणातुन काही गोष्टी जाणू लागतात. अशांची समाधी असेल तर समाधी दर्शनही घेतात. या पैकी एक आहेत दत्तचिले महाराज!

चिले महाराजांची कर्मभुमी पुणे, पण त्यांची समाधी मात्र रत्नागिरी कोल्हापुर रस्त्यावर पैजारवाडी या लहानशा गावात आहे. त्यांचा जन्मदेखील पैजारवाडी येथेच झाला. पण जन्मानंतर थोड्याच दिवसात त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर ते आपल्या वडिलांसोबत कोल्हापूर येथे मुक्कामी राहीले. सुकुमार वयात त्यांच्या वडीलांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांनी शाळा सोडून भ्रमंती केली. त्यांना काही काळ अन्नपाण्याशिवाय काढला. कधी कधी दहा ते बारा दिवस उपवास घडत असे. त्याही अवस्थेत त्यांनी भ्रमंती सुरुच ठेवली. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची गुढता असे. ते लोकांना ब्रम्ह म्हणजे काय? हे समजावून सांगत. कधी कधी "मीच ब्रम्ह आहे" किंवा "मीच दत्त महाराज आहे" असे लोकांना सांगत. सर्वच भक्तांना ते एकासारखी वागणुक देत असे. १९८५-१९८६ च्या दरम्यान पैजारवाडी येथे समाधिस्थ झाले.
श्री दत्त चिले महाराज, कोल्हापूर
चिली महाराज ओम चिले दत्त

दत्तगुरुंची वाडी पैजार, चिले महाराज तेथ अवलिया थोर
शिवपिंडीचा सुंदर आकार, समाधी आत बैसले गुरुवर
कूर्मपृष्ठाचे तेथ अंबर, कृपाछत्र असे उभविले थोर
कवच टणक अति अपार, प्रारब्धाचा त्यावरी न चले जोर
घ्या आसरा अन आधार, कापेल काळही जणू थरथर
पोशितसे कासवाची नजर, जाता शरण पदकमलांवर
चला चला हो वाडीसी सत्वर, घ्या हो घ्या हो दर्शन सत्वर
कोट टोपी पायी विजार, अवधूतचि हा झाला साकार
दत्तगुरुंची असे किमया थोर, आशीर्वाद तुम्हा त्वरित अपार
कृष्णदास गाठी वाडी पैजार, प्रारब्धा ना उरला थार
महाराजांची कृपा अपार, आनंदा ना पारावार!!
आले आले महाराज चिले, पैजारवाडीसी दर्शन दिले
कोट टोपी पायजमा शोभले, चरणांगुष्ठांसी मी स्पर्शिले
‘असू दे, असू दे’ मृदु बोलिले, मागील द्वारी निघुनि गेले
अस्तित्वाची प्रचित दाविले, घडता आनंदे मन भरले
कृष्णदासे महाराजा प्रार्थिले, तात्काळ दर्शन असे घडले

ॐ दत्त चिले, ॐ दत्त चिले,
मंत्र हा अखंड, जपा तुम्ही भले
नामात प्रेम, वाढेल कले कले,
स्मरणेचि भरतील, नेत्र अश्रुजले
सद्गदित कंठे त्या, स्मरता श्री चिले,
प्रसन्न होऊनी प्रगटतील तुम्हा, सामोरी ते भले
अनन्य भावासी केवळ, असती भुकेले,
सेवाया तोचि घेतला, अवतार धरातले
नयनी ही मूर्ती, ध्या तुम्ही भले,
मुखी हास्य हृदय नेत्र, करुणे ओथंबले
जे जे जीव हृदयी हा, मंत्र गर्जले,
मंत्र न केवळ ठरली ती, कवच कुंडले
इहपर सौख्य सर्व, त्यासी लाधले,
प्रसन्न झाले त्यावरी, महाराज श्री चिले
कृष्णदास जपतो नित्य, ॐ दत्त चिले,
तोषोनि अनंत आशीर्वाद देती, महाराज श्री चिले

ॐ दत्त चिले मंत्र पंचाक्षरी....

दुजा कुणा मंत्रा नाही याची सरी
सामर्थ्ये भरला असे अपारी
अनुभव त्याचा घ्या आपुल्या अंतरी
म्हणा मंत्र हा तुम्ही वैखरी
इडा पिडा टळती सर्व क्षणाभीतरी
ॐ असे आदि बीज, दत्त तो मोक्षकारी
प्रगटला श्री चिले रुपे, अंबेच्या कोल्हापुरी
जपा नाम जववरि न, उठे रोमरोमावरी
होता ऐसे पहाल मूर्ती, उभी सामोरी
कृपा असे महाराजांची, कल्पवृक्षापरी
लाभेल ज्या, भाग्या त्याच्या, नाही हो सरी
कृष्णदास जपे नाम, नित्य हृदयांतरी
प्रगटले महाराज अन् कृपा, केली अपारी
म्हणा ॐ दत्त चिले, एकभावे भले
महाराज करतील तुमचे, सर्वचि भले
नाम घेता अंतरी, जे का कळवळले
प्रारब्ध भोग त्यांचे, सर्वचि टळले
नाम मुखी ज्यांच्या, सदा हे रंगले
वाटे जणू त्यांचे, पुण्यचि फळले
महाराज त्यावरी अपार, कृपा हो वर्षले
आत्मानंदे त्यांचे, हृदय हो भरले
कृष्णदास जपतो नित्य ॐ दत्त चिले
म्हणा सवे तुम्ही सर्व ॐ दत्त चिले
भक्तजना अंतरी, दत्तप्रेम दाटले
करवीरी तेचि, प्रेमरुपे प्रगटले
अवतारे अवलिया, रुप घेतले
अवधूत प्रगटले, नामे श्री चिले
उन्मनीत जे, अखंडचि हो रमले
अकल्पित कृपा त्यांची, किती हो लाधले
बाह्यांगे जमदग्नि, रुप जरी धरिले
करुणा अन् प्रेम, अंतरी असे भरले
करुणेने हृदय, जेव्हा जेव्हा ते द्रवले
कृपे त्या अनंत, संकटी हो तरले
ॐ दत्त चिले म्हणता, क्षणातचि तुष्टले
स्मर्तुगामी दत्तासी, कृष्णदासे पाहिले
चिले महाराज समाधी चिले महाराज समाधी

लौकिकार्थाने हे सत्पुरूष पृथ्वीतलावर जन्मल्यानंतर सामान्य माणसाप्रमाणे वर्तन करतात. श्री चिले महाराजांचे पहिले गुरू श्री गराडे महाराज. त्यांचेकडे फुले गंध कापूर यांची अगदी लहानपणी सेवा केली. गराडे महाराज प्रसन्न झाले व म्हणाले,

‘बाळा, कोल्हापूरला माझे गुरू श्री सिध्देश्वर महाराजांकडे जा. सिध्देश्वर महाराज व पाटील महाराज हे माझे गुरू आहेत.’

धनकवडीचे अवलिया संत श्री शंकर महाराज यांना तर ते आपले थोरले बंधू (दादा) मानीत. त्यांची वागणूक पेहराव अत्यंत साधी असे. त्यांनी त्यांच्या श्रीमंतीचा समृध्दीचा देखावा कधीच केला नाही. भक्त लोक तसेच परिचितजन नेहमीच अचंबित होत असत. ते अत्यंत माफक पण अतिशय मुद्देसूद बोलत असत. ते एकाशी बोलत पण इतरांना संदेश मिळत असे. सदगुरूंनी त्यास कृपांकित करून त्यांचे जीवन परिपूर्ण केले.

श्री चिले महाराज हे दत्तावतारी सत्पुरूष. त्यांनी अवतार काळात कोल्हापूर सातारा नाशिक येथे विशेष संचार केला व भक्तांना मार्गदर्शन केले.

त्यांची समाधी पैजारवाडी येथे आहे. हे स्थान पन्हाळ्याच्या पायथ्याशी कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर आहे. त्यांची कासव या प्राण्यावर विशेष प्रिती होती म्हणऊन कासवाच्याच आकाराचे समाधी मंदीराचे बांधकाम केलेले आहे. मंदीर अत्यंत देखणे असून ६०’x८०’ उंची २०’ आहे. आकर्षक मार्बलमध्ये समाधी व मंदीर आहे.

मंदीरात निवासव्यवस्था, भोजनव्यवस्था आहे. मंदीर परिसर अतिशय सुंदर व आध्यात्मिक स्पंदनाने भारलेला आहे.

N/A

References : N/A
Last Updated : May 15, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP