नाव: सद्गुरू श्री शिवाजी महाराज, विडनी
जन्म: माघ वद्य चतुर्दशी शके १८२९ इ.स १ मार्च १९०८, कसबेवड
गुरू: शंकर महाराज
मृत्यू: अक्षत्रितीया १९७४
भक्तवत्सल सद्गुरु श्री शंकर बाबा महाराजांचे अंतरंगीचे परमशिष्य, त्यांचे पूर्णकृपांकित शिष्य विडणी निवासी श्री सद्गुरु शिवाजी महाराज
सद्गुरु श्री शिवाजी महाराजांचा जन्म कोल्हापूर शहरापासून चार मैलांवर असलेल्या कसबेबावडा या ठिकाणी माघ वद्य चतुर्दशीला शके १८२९ रविवारी दिनांक १ मार्च १९०८ रोजी महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी झाला. श्रीमहाराज जन्मत:च हातपायांनी अपंग होते. त्यातचं त्यांच्या वयाच्या पाचव्या/सहाव्या वर्षी महाराजांचे पित्रु छत्र आणि एक वर्षाने मातृछत्र हरवले. यानंतर महाराजांनी प्राथमिक शिक्षण घेतले पण ते ही त्यांना १/२ वर्षात अर्धवट सोडावे लागले. आईबापा विना असलेल्या या अनाथ अपंग गरिब मुलाकडे त्यावेळी कुणाचे लक्ष जाईल असंही काही नव्हतं. पण ज्याचे कुणीही नसतं त्याचे प्रत्यक्ष श्रीभगवंत असतात. काही काळाने बाल शिवाजी हे १२/१३ वर्षाचे असतांनी त्यांच्या जिवनात कलाटणी देणारी एक अपूर्व घटना घडली. तो प्रसंग असा की बाल शिवाजी हे कसबेबावड्यापासून सुमारे पाच मैल दूर असलेल्या पिशवीकरांच्या वाड्यातील चुपचुप महाराजांच्या समाधी मंदिरात येऊन पोचले. कितीतरी दिवस ते तिथेच पडुन राहिले, लोक भाकरी तुकडा देत त्यावर ते दिवस काढु लागले. अशक्तता इतकी वाढली की दहा-पंधरा फुटांवर असलेल्या चुपचुप महाराजांच्या समाधी दर्शनाला ही त्यांना रांगत-घसरत जावे लागत होते. अशा असहाय स्थितीत काही काळ गेल्यावर त्यांच्या भाग्योदयाचा क्षण जवळ आला. तो मांगल्याचा क्षण या पांगळ्या शिवाजीला सामर्थ्यवान शिवाजीमहाराज बनविनार होता.
अखेर तो क्षण आला प्रत्यक्ष शिव अवतार सद्गुरु श्री शंकर महाराज श्रीचुपचुप महाराजांच्या समाधी मंदिरात आले. शंकर महाराज चुपचुप महाराजांच्या समाधी समोर उभे राहुन महाराजांशी काहीतरी वार्तालाभ करु लागले व नंतर ते कोपर्यात पडून असलेल्या पांगळ्या शिवाजी कडे वळले. ते त्याच्या जवळ गेले व त्यांनी "उठ! असा झोपलास काय?" असे म्हणून त्याला हात धरुन उभे केले. मग सद्गुरु शंकर महाराजांनी शिवाजीच्या बखोटीला धरुन श्री पंतमहाराज बाळेकुंद्री यांच्याकडे त्याला नेले. श्री सद्गुरु शंकर महाराजांनी पंत महाराजांना मिठी मारली व त्यांच्या मधे बालक शिवाजी होते. मिठी मारता क्षणीच अपंग शिवाजी `सरळ' झाले. ही घटना १९२०/२१ ची आहे त्यावेळी महाराज १३/१४ वर्षाचे होते. श्रीशिवाजी महाराजांना घेऊन सद्गुरु शंकर महाराज काही काळ ब्रम्हदेशात आणि परदेशात ही गेले होते. अशा प्रकारे शंकर महाराजांनी या अनाथ मुलाला सनाथ केले त्याला आपल्या कृपा छत्रछायेखाली घेतले. आपले चैतन्य त्याच्या हृदयी प्रस्थापित केले. या हृदयीचे त्या हदयी हा प्रकार बाळ शिवाजींच्या बाबतीत घडला व आता बाल शिवाजीचे ते सद्गुरु श्री शिवाजी महाराज झाले. पुढे ते महाराजांशी इतके एकरुप झाले की `शंकर महाराज आणि मी एकच' असे ते म्हणु लागले.
सद्गुरु शंकर महाराजांनी शिवाजी महाराजांवर कृपा केली व मग महाराज अखंड नामसाधनेत तल्लिन राहु लागले. ते अगदी निःसंग झाले, मिळेल ते खायचे, नाही तर पाणी प्यायचे. खांद्यावर घोंगडी, डोक्यावर फेटा, धोतर आणि सदरा हा त्यांचा पेहराव असे. महाराज अखंड नामस्मरण करीत. नामस्मरण, भक्ती आणि प्रेम याशिवाय त्यांच्याजवळ कुठल्याही गोष्टीला थारा नव्हता. नामस्मराणाप्रमाणेच महाराज संत तुकाराम महाराज, एकनाथांचे, ज्ञानेश्वर माउलींचे, मिराबाईंचे आणि कबिरांचे अभंग/दोहे ही म्हणत असत.
या काळात महाराज कोल्हापुरातच वास्तव्यास होते आणि त्यावेळी महाराजांची किर्ती बरीच पसरली होती. ही किर्ती छत्रपति राजाराम महाराजांच्या कानी पडली त्यांना महाराजांबद्दल प्रेम वाटू लागले. त्यांनी या तरुण महाराजांना नाममात्र नोकरीवर ठेले व हुकुम दिला की कुणीही त्यांच्यावर कामाची सक्ती करु नये. छत्रपति महाराजांना मान देत पण त्यांचे प्रेम असे होते की महाराज व छत्रपती एकमेकांना अरेतुरेच्या भाषेत बोलायचे. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्युनंतर शिवाजी महाराजांनी नोकरी सोडली ही गोष्ट १९४० च्या सुमारास घडली.
त्यानंतर महाराज "ॐ नमः शिवाय तरणोपाय तारकमंत्र सद्गुरुंचा" या मंत्राचा अहोरात्र जप करीत असतं. याच वेळी महाराज देहातीत अवस्थेला पोहचले आणि त्यामुळे ते कधीकधी वस्त्र ही काढुन फेकुन देत असत.
पुढे १९५० ला महाराज प्रथमच पुण्यात आले. १९२० ला शंकर महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन कृपा केल्यानंतर पन्हा त्यांची भेट घडली नव्हती, व लौकिकदृष्ट्या शंकर महाराजांनी १९४७ ला देह ठेवला होता. यावेळी ते आपल्या गुरु माउलींच्या समाधी दर्शनाला जरुर गेले. त्यावेळी या गुरु-शिष्यांचे काय हितगुज झाले हे तेच जाणोत. पुढे जेव्हा जेव्हा ते पुण्यात येत तेव्हा ते शंकर महाराजांच्या समाधी दर्शनाला जरुर जातं. इ.स.१९५३ ला महाराज कायमचे पुण्याला वास्तव्यास आले आणि इथे येऊन ते आपल्या गुरु माउलींच्या समाधी सेवेत दंग झाले.समाधी आवार झाडलोट करणे, येणार्या भक्तांसाठी पाणी भरुण ठेवणे, पुजा आरतीत भाग घेणे, भजन करणे यांतच महाराज रममाण होऊ लागले.
सद्गुरु शिवाजी महाराज अगदी अवलिया वृत्तित वागु लागले, आपल्याच सहज समाधीत ते नित्य दंग राहु लागले अशात त्यांच्या हातुन अचाट, कल्पनातीत चमत्कार घडतं. महाराजांना दांभिकतेचा, दिखाव्याचा, ढोंगाचा प्रचंड टिटकारा असे. अशा व्यक्तीची महाराज चारचौघात मोठी फजिती करीत. महाराज भक्तीयोगी होते. त्यांनी साधनेच्या जोरावर आपल्या सद्गरुंशी एकात्मत: प्राप्त केली होती. ते प्रत्यक्ष सद्गुरु स्वरुप झाले होते. महाराज अखंड उन्मनी अवस्थेत राहत असत. कधी त्यांचं बालकासारखे आचरण असे तर कधी वेड्यासारखं. पण अशा कृतीतील असलेल्या खर्या अर्थाचे आकलन कुणालीही होतं नसे एव्हाना ते कुणाला होवु देत नसतं.
श्रीशिवाजी महाराजांचा त्याकाळातील अनेक थोर संतांशी जिव्हाळ्याचा संबंध होता. श्रीपंतमहाराज बाळेकुंद्री यांच्या परंपरेतील श्रीभुजंगाचार्य अवधूत महाराज, नाशिकचे नाथपंथी योगी श्रीगजानन महाराज गुप्ते, श्रीआंबेकर महाराज, श्रीसाईनाथ महाराजांचे शिष्य श्रीदासगणु महाराज, नगरचे श्रीअवतार मेहेर बाबा, सातार्यातील धुंडीराम महाराज, पैजारवाडीचे श्री चिले महाराज, अक्कलकोटचे श्रीगजानन महाराज हे सर्व संत सत्पुरुष शिवाजी महाराजांवर प्रेम करीत, त्यांना आदर पूर्वक, प्रेमाने वागवित. साकोरीच्या उपासनी बाबांच्या शिष्या श्रीमती गोदावरी माताजी तर महाराज साकोरीला गेले की आपल्या हातांनी त्यांना जेवू घालित. इ.स. १९५८ ला महाराज पुण्याच्या श्री शिंदे यांच्याघरी स्वत:हुनच गेले हा प्रसंग अगदी विलक्षण आहे पण शब्दमर्यादा असल्यामुळे घेतला नाही.
पुढे शिंदे यांनी आपला कारखाना उभारण्यासाठी स्वारगेटला एक प्लॉट घेतला होता महाराज तिथेच राहु लागले. शिंद्यांनी महाराजांना तिथे पत्र्याची शेड उभारुन दिली व महाराज आता त्याला "आळंदी" असे म्हणु लागले. बडोद्याच्या महाराणी श्री. शांतादेवी यांनीही महाराजांचे दर्शन या "आळंदीतच" जाऊन घेतले. महाराजांनी आळंदीवर एक उंच झेंडा उभारला होता.
अशा श्री सद्गुरु शिवाजी महाराजांनी अनंत लिला केल्या. भक्तांना भक्तीमार्गाला लावले आणि १९७४ साली अक्षय्य तृतियेच्या पावन दिवशी श्रीशिंदे यांच्या घरात ब्राम्हमुहर्तावर आपला देह ठेवला. महाराजांनी देह ठेवण्या आधी याबाबत खुप लोकांना कल्पना दिली होती. "आम्ही आता कपडे बदलणार आहोत", "आता आम्ही भुर्रर्रऽऽ जाणार आहोत", अशें संकेत दिले होते. महाराजांची समाधी फलटण जवळील विडणी येथे आहे.
तिथे आजही महाराजांच्या दिव्य चैतन्याची अनुभूती आल्या वाचुन राहातं नाही. शिवाजी महाराज या दिव्य अवलिया अवधुताची व महाराजांच्या दिव्य चरित्रातील हे काही मोती वेचण्याचा हा बालसुलभ प्रयत्न. या पोस्ट द्वारे महाराजांच्या चरणी माझी प्रेमांजली वाहली आहे. महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर अखंड राहो हीच या पावन दिनी श्रीचरणांशी प्रार्थना करतो.
अक्षय जाधव आळंदी