जन्म: अश्विन शुद्ध १, १८९४ - देशस्थ ऋग्वेदी ब्राह्माण
मूळनाव: नरहरी,
मूळगाव: बुवांचे वाठार.
आई/वडील: सौ मुक्ताबाई/श्री वासुदेव दिवाण
कार्यकाळ:
१८९४ - १९२५
१९०७ - घरसोडून नरसिंहवाडी
१९१८ - कृष्णा प्रदक्षिणा
गुरु: मंत्रोपदेश - हरिहर महाराज
समाधी/निर्वाण: फाल्गुन शुद्ध ६, १९२५ - आष्टी येथे समाधी
श्री दत्त महाराज आष्टी श्री दत्तमहाराज अष्टेकर
जन्म व बालपण
जन्म: आश्विन शुद्ध १, शके १८१६ रविवार रात्री १ वा. २१ मि. चित्रा नक्षत्र, कर्क लग्न, तूल राशी. पूर्व आश्रमातील नाव नरहरी; वडिलांचे नाव वासुदेवराव दिवाण. आईचे नाव सौ. मुक्ताबाई. रा. बुवाचे वठार, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर. या नरहरीस पुढे दत्तमहाराज म्हणू लागले. यांची समाधी अष्टे येथे असल्याने श्रीदत्तमहाराज अष्टेकर या सत्पुरुषाची पावनकथा व चमत्कार याच भूमीत झाले.
दिवाण घराणे ॠग्वेदी देशस्थ गौतम गोत्र. बुवाचे वठार येथे श्रीएकनाथ महाराजांचे नातू उद्धवस्वामी यांची समाधी आहे. त्या एकनाथांचे वंशातील सौ. मुक्ताबाई ‘शुचिनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऀSभिजायते |’ अशा पुण्यावंत मातेच्या पोटी नरहरीचा (श्रीदत्तमहाराजांचा) जन्म झाला. मुक्ताबाईंचे हे तिसरे अपत्य. महाराज ११ वर्षांचे असता त्यांचे वडील वासुदेवराव दिवाण मृत्यू पावले. महाराजांचे शिक्षण पुढे शिरोळ येथे मराठी ५ इयत्तेपर्यंत झाले. शके १८२९ साली वयाचे १३ वे वर्षी नोकरीचे निमित्ताने ‘सांगलीस जातो’ म्हणून शिराळ्याहून बाहेर पडले, ते थेट श्रीक्षेत्र नृसिंहवाडीस जाऊन श्रीवासुदेवानंदसरस्वती, टेंबे स्वामींचे दर्शन घेतले. त्या वेळी त्यांचे अंत:करणात काही स्फुरत आहे असे वाटले.
श्री गुरुंचा गाणगापुरी अनुग्रह
टेंबे स्वामींचे दर्शनसुख थोडे दिवस घेतल्यावर महाराजांस श्रीक्षेत्र गाणगापुरास जाण्याची प्रेरणा झाली. त्याप्रमाणे ते गाणगापुरास गेले व तेथे गावा मध्ये माधुकरी मागून सेवा करीत राहिले. तो त्यांना तेथे कॉलरा झाला व पंचप्राण व्याकुळ होऊन मृत्यूचे दारात पडले. तशा स्थितीत त्यांना श्रीदत्तप्रभूंचा दर्शनलाभ घडला. श्री म्हणाले, ‘भिऊ नकोस, हे तीर्थ घे’ असे म्हणून श्रींनी स्वहस्ते महाराजांस तीर्थ पाजले आणि म्हटले, ‘तू बरा झाल्यावर घरी जा’ असे सांगून श्रीदत्तमहाराज अंतर्धान पावले. भगवान् दत्तात्रेयांनी केलेला हा अनुग्रह शरीररक्षणापुरता नसून त्यांनी पूर्ण कृपाच केली व अंत:करणवृत्ती अंतर्मुख केली. दत्तप्रभूंचे आदेशाप्रमाणे महाराज बुवाचे वठार येथे परत येऊन तेथे उद्धवस्वामींच्या समाधीची सेवा करीत राहिले व पुढे ते पंढपुरास गेले; त्या ठिकाणी श्रीहरिहर महाराज या थोर विभूतीची भेट झाली.
श्रीहरिहर महाराज फार तेज:पुंज, ब्रह्मचारी व धिप्पाड होते. त्यांनी दत्तमहाराजांस मंत्रोपदेश दिला. पुढे ही गुरुशिष्य जोडी परळी-वैजनाथ, दौलताबाद, वेरुळ, उज्जयिनी, ॐकारममलेश्वर वगैरे ज्योर्तिलिंगांच्या यात्रेस जाऊन गिरनारास गेली व तेथे त्या दोघांस श्रीदत्तप्रभूंचे दर्शन झाले. पुढे श्रीहरिहरमहाराजांनी दत्तमहाराजांस श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामींकडे प्राणायामादी अष्टांग शिकण्यास पाठविले. तेथेही योगविद्या शिकत असता ते एकनाथी भागवत वाचीत असत. तेथे महाराजांस शास्त्रोक्त व आत्मप्रचीतीची माहिती मिळाली व त्यामुळे परब्रह्म आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला व बह्मनिष्ठता मिळविली.
शके १८४० साली श्रीदत्तमहाराजांना कृष्णा नदीची पायी प्रदक्षिणा करण्याचा आदेश मिळाला. कृष्णानदी सह्याद्री पर्वतावरील महाबळेश्वरावर उगम पावून मच्छलीपट्टणाजवळ बंगालचे उपसागरास मिळते. नित्य कृष्णास्नान करावयाचे व नदीच्या काठापासून फार तर पाच मैलांच्या बाहेर जावयाचे नाही असा निर्बंध आहे. श्रीशैल्यापर्यंत कृष्णाकाठी गावे असून वाट तरी आहे; पण पुढे कित्येक मैल घनदाट अरण्य व भिल्ल व हिंस्र पशूंची वस्ती. दर्याखोर्यांमधून जावे लागते; प्राणसंकटच ते. या प्रवासात मित्र म्हणजे सर्वव्यापी ईश्वर व त्याच्याशी समरस होण्याचा अभ्यास. या प्रवासात महाराजांस अनेक प्रकारे ईश्वरी सहाय्य झाले. उगमापासून निघून परत उगमापर्यंत जावयाचे अशी ही कृष्णा प्रदक्षिणा १६०० मैलांची आहे. ती महाराजांनी केली. ती पुरी झाल्यावर त्यांना कृतार्थता वाटली व ईश्वरी इच्छेचे कौतुक वाटले. पुढे ते पुन्हा गाणगापुरी गेले व तेथे त्यांना श्रीदत्तात्रेयाचे सगुण दर्शन झाले. पुढे ते सात दिवस समाधिसुखात होते.
पुढे श्रीमहाराजांनी दक्षिणेतील यात्रा केल्या. मांधारगुडी (दक्षिण द्वारका), कन्याकुमारी, रामेश्वर, धनुष्यकोटी, जंबुकेश्वर, चिदंबर गिरी, उडुप्पी कार्तिकस्वामी, गोकर्ण वगैरे करुन महाराज कावेरी तटी तंजावरास आले. (शके १८४२) व तेथे संध्या मठात वास्तव्य केले. तेथे त्यांना एक जुनी पोथी वाचताना आत्मानुभवाची प्रचीती येऊ लागली. दशोपनिषदे व तंत्रशास्त्र वाचले. ‘आत्मज्ञान झाले म्हणजे सर्व जाणले’ याची प्रचीती आली. तंजावरास लोक जमू लागले; त्यांना उपासना सांगितली व सन्मार्गास लावले; व त्यांच्या शंका निवारण केल्या. पुढे त्यांची एका विदेही सत्पुरुषाशी भेट झाली. त्यांच्या समागमात महाराजांना वाटले की, आपण आनंदसुखसागरात पोहत आहो. त्यांच्या चित्ताची एकाग्रता इतकी वाढली की, बाह्यवस्तू व कालाचे ज्ञान त्यांना मुळीच राहिले नाही.
श्री दत्ताची पूजा मूर्ती, दत्तमहाराज अष्टेकर श्री दत्तमहाराज आष्टीकर यांचे पूजेतील दत्तमूर्ती
शके १८४५ मध्ये महाराज आपली जन्मभूमी बुवाचे वठार येथे परत आले. देहयष्टी कृश झाली होती. ब्रह्मचर्यानुसार दाढी व जटाकलाप शोभत असे. डोळे शांत व प्रेमदृष्टी, कमरेस लंगोटी व त्यावर एक वस्त्र व पांघरण्यास एक वस्त्र आणि कमंडलू. ते माध्यान्हकालास आश्रमधर्मानुसार मधुकरी मागत. प्रात:स्नान व संध्या आटोपल्यावर ते तीन तास समाधित रहात आणि त्या आसनावर मधून मधून दीड वीतभर अंतराळी होत होते. ते नित्य श्रीदत्तमाहात्म्य वाचीत. पुढे ते अष्टे येथे गेले. तेथे त्यांनी अनेक साधकांना उपदेश केला. अष्टे येथे असताना औदुंबरास वारंवार जाऊन श्रीदत्त महाराजांचे दर्शन घेत. दक्षिणकाशी करवीरास गेलेवेळी त्यांना षड्भुज दत्तदर्शन झाले.
महाराजांच्या चरित्रामध्ये अनेक चमत्कार आहेत. ते किती म्हणून वर्णन करावेत? मन थक्क होते. महाराजांनी कोणास शिष्य केले नाही. त्यांच्या सहवासात एखाद्याचा संबंध आला म्हणजे तो अधिकारी जीव आहे अगर नाही हे अंतर्ज्ञानाने जाणत व आपण होऊन त्यावर कृपा करीत. महाराजांनी त्यांचेवर एक वेळ प्रेमळ कटाक्ष टाकिला की, त्यांचे अंत:करण ओढ घेत असे.
अष्टे मुक्कामी असताना शके १८४७ फाल्गृन शु. ६ गुरुवारी संध्याकाळी श्रीदत्ताची आरती व मंत्रपुष्प आटोपल्यावर महाराज सर्व मंडळीस दूर करुन समाधीचे आसन घालून बसले. आचमन करुन प्राणायाम केला व लगेच समाधी लावली. लोकांना ही नित्य समाधी अगर महासमाधी आहे हे कळेना. तीन तासपर्यंत ते त्या अवस्थेमध्ये होते. नंतर मान कलली व ब्रह्मरंध्रभेदन करून विदेह मुक्ती घेतली. टाळुस्थानामधून केसासारखी रक्ताची धार निघाली होती. (समाधीकाल रात्रौ ११॥) समाधीस सरकारी परवानगी मिळण्यास १७ तास लागले. तोपर्यंत महाराजांचे सर्वांग मऊ होते. स्नानानंतर कफनी, रुद्राक्षमाला व हार घालण्यात आले. तीर्थासाठी कोण धडपड! मंगल स्नानाचे पाट वाहू लागले व शेवटी तेथील माती चिखल लोकांनी अंगास लावून घेतला. समाधीचे जागी कमंडलू व दतमाहात्म्य पोथी ठेवली. सर्वानी जड अंत:करणाने समाधीचे द्वार बंद केले. त्यावेळी सर्व जातीचे लोक होते. सर्व आटोपण्यास ११ वाजले; तोपर्यत अष्टे गावातील चूल बंद होती. या निर्वाणामुळे अनेक लोक कष्टी झाले.
श्री दत्त महाराजांविषयी त्यांचे निस्सीमभक्त यांचे लेखणीतून, संक्षिप्त
१) वयाच्या १४ व्या वर्षी गाणगापूर येथे ईश्वरानुग्रह.
२) वयाच्या १६ व्या वर्षी पंढरपूर येथे श्री हरिहर महाराजांकडून शक्तिपातयोगदीक्षा.
३) वयाच्या १८ व्या वर्षी परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांचेकडून हटयोग दीक्षा. संपुर्ण कृष्णा प्रदक्षिणा.
४) श्री दत्त महाराजांचे मूळ नाव नरहरी वासुदेवराव दिवाण असे आहे.
५) त्यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील बुवाचे वाठार हे आहे. श्री दत्तमहाराज हे श्री एकनाथ महाराजांच्या वंशजापैकी एक होत. ८ व्या वर्षी व्रतबंध आणि वेदाध्ययन सुरु.
६) इयत्ता ५ वी पर्यंत शिराळा येथे शिक्षण घेतले.
७) वयाच्या १३ व्या वर्षी सांगलीस जातो म्हणून त्यांनी घर सोडले आणि ते थेट नृसिंहवाडीस गेले. तिथे त्यांना वासुदेवानंद सरस्वती टेम्बेस्वामी महाराज यांचे पहिल्यांदा दर्शन घडले. त्यांच्या आज्ञेनुसार महाराजांनी गाणगापूर गाठले .
८) गाणगापूरला असताना त्यांना तापाने पछाडलेले होते तशा स्थितीत प्रत्यक्ष श्री दत्त प्रभुनी दृष्टांत दिला. गाणगापूर ला काही दिवस तपश्चर्या केली.काही काळाने महाराज जेव्हा परत वाठार गावी आले तेव्हा गावकरी त्यांना श्री दत्त महाराज या नावाने संबोधू लागले पुढे महाराजांनी हेच नाव धारण केले.
९) वाठार येथे काही काळ थांबून श्री दत्त महाराज पंढरपूर येथे आले. पंढरपूर येथे श्री दत्त महाराजांचा श्री हरिहर महाराज यांच्याशी ओळख झाली. श्री हरिहर महाराजांनी श्री दत्त महाराजांना शक्तिपातयोग दीक्षा दिली.
१०) एकदा श्रीदत्तमहाराजांवर प्रसन्न होऊन श्री हरिहर महाराज म्हणाले “तुला काही मागवायचे आहे काय? यावर श्री दत्त महाराजांनी आमरणान्त वैदिक धर्म व कर्म सुटू नये ही इच्छा व्यक्त केली. श्री हरिहर महाराजांनी तुझी इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला, पुढे त्याप्रमाणेच घडून आले. श्री हरिहर महाराजासोबत श्री दत्त महाराजांनी १२ ज्योतिर्लिंग, गिरनार पर्वत, उत्तर हिंदुस्थान अशा विविध तिर्थक्षेत्रांच्या यात्रा केल्या.
११) श्री हरिहरस्वामी महाराज्यांच्या आज्ञेनुसार पुढील दीक्षे साठी श्री दत्त महाराज नृसिंहवाडी येथे आले.नृसिंहवाडीस श्री वासुदेवानंद सरस्वती टेम्बेस्वामी महाराज यांनी श्री दत्त महाराजांना हटयोगाची दीक्षा दिली.
१२) यानंतर महाराज पैठण येथे काही काळ वास्तव्य केले. तिथे पण श्री दत्त महाराजांनी योगाची तपश्चर्या चालविली.
१३) वयाच्या १८ व्या वर्षी श्री दत्त महाराज हठयोगात पारंगत झाले.
१४) इ. स. १९१८ साली श्री दत्त महाराजांना कृष्णा नदीची पायी परिक्रमा आदेश मिळाला. यानंतर श्रीदत्तमहाराजांनी संपूर्ण कृष्णा प्रदक्षिणा प्रारंभ केला. संपूर्ण कृष्णा प्रदक्षिणा हि १४०० किलोमीटरची अत्यंत कठीण अशी आहे. श्रीकृष्णा स्नान, तिचेच जलपान, कृष्णेच्या काठावरच सहवास, काठापासून जास्त लांब न जात अन्नग्रहण असे कृष्णा नदीच्या उगमापासून समुद्राच्या मुखापाशी त्यानंतर काठ ओलांडून दुसऱ्या काठावरून परत उगमापर्यंत येणे अशी कठीण प्रदक्षिणा आहे. कृष्णा प्रदक्षिणा केल्यानंतर श्री दत्त महाराजांनी गाणगापूर येथे काही काळ वास्तव्य केले. यानंतर श्री दत्त महाराज दक्षिणेतील यात्रेवर निघाले. तंजावर येथे असताना श्री दत्त महाराजांनी तांब्याचे श्री दत्त यंत्र बनवून घेतले होते. ते आजही मंदिरात पूजेमध्ये आहे. नोव्हेंबर १९२३ मध्ये श्री दत्तमहाराज अष्टे या गावी आले. पुढे हे गाव त्यांचे कायमचे वास्तव्य झाले.
१५) या गावातील सौ. अंबुताई जोशी (तारदाळकर) यांचे घरी श्री दत्तमहाराज राहत असत. घराच्या दक्षिण दिशेला अष्टलिंगातील एक शिवलिंगाचे मंदिर आहे या मंदिरातच श्री केशवनाथ मंदिर (विष्णू मंदिर) आहे. या मंदिरात माडीवर श्री दत्त महाराज ध्यानधारणा करत असत. ५०-५५ वर्ष्यांच्या अंबुताईना दत्तमहाराज अवतारी पुरुष आहेत याची जाणीव लगेच झाली. आपल्या वयापेक्षा कितीतरी लहान असले तरी अंबुताईनी महाराजांची सेवा अत्यंत भक्तिभावाने व एकनिष्ठपणे करीत असत. हळू हळू महाराजांची कीर्ति पंचक्रोषीत पसरू लागली.
१६) श्री दत्त महाराज विविध गावी भेटी देत असत आणि तिथल्या भक्तावर कृपाप्रसाद करत असत.
१७) इस्लामपूर येथे दत्त महाराजांचे सेवक श्री.भाऊराव वैद्य यांचेकडे श्री दत्त महाराजांचे सारखे येणे जाणे असायचे.
१८) कोल्हापूर येथे असताना श्री दत्त भिक्षालिंग मंदिरात षडभुज दत्तदर्शन झाले.
१९) ११सप्टेंबर १९२४ साली श्री दत्त महाराज चिपळूण येथे आले. तेथे एका ब्रह्मसमंधास सद्गती दिली.
२०) १७ सप्टेंबर ला श्री दत्त महाराज फलटण मुक्कामी आले. फलटण मध्ये सुमारे ३ महिने श्री दत्त महाराजांचे वास्तव्य होते. येथे असताना दत्तदर्शन फलटण मध्ये असताना तापामुळे श्री दत्तमहाराजांची प्रकृती ढासळू लागली. डिसेंबर १९२४ ला श्री दत्त महाराज आष्टा गावी परत आले.
२१) इ. स. १९२५ अर्थात शके १८४७ फाल्गुन शुदध षष्ठी रोजी गुरुवारी सायंकाळी संध्या करून दीर्घ समाधी लावली त्यानंतर ब्रम्हरंध्र भेदून देहाचे विसर्जन केले.
श्री दत्त महाराजांचा उपदेश
१) ज्ञानगंगेचा प्रवाह अखंड सुरु आहे. त्यात गुप्त असे काही नाही. आपण काय हवे ते सांगण्यास तयार आहोत. ज्याची ग्रहणशक्ती व इच्छा असेल त्याने ज्ञानजलपान खुशाल करावं.
२) स्वधर्माचे पालन करा"
३) आत्मसाक्षात्कार करून घ्या आणि स्वात्मकल्याण करा”