मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष|
श्री नारायणदास श्रीपादश्रीवल्लभ पिठले महाराज

श्री नारायणदास श्रीपादश्रीवल्लभ पिठले महाराज

दत्त संप्रदायातील सत्पुरूष


श्री पिठले महाराज समाधी स्थळ, नाशिक श्री पिठले महाराज समाधी स्थळ, नाशिक

नाशिकला एक फार मोठे अवलिया होऊन गेले. आपल्याकडे कुणी आल्यास त्याने पहिल्या पायरीवर पाय ठेवला की कोण आले ते त्यांना ज्ञात होत असे. नारायणदास श्रीपादश्रीवल्लभ पिठले हे त्यांचे नाव. मूळ नाव वेगळे. परंतु, नंतर याच नावाने त्यांनी कार्य केले. अवलियांमध्ये एखादाच असा असतो की समाजाचे भान, व्यवहाराचे ज्ञान आणि आध्यात्मिकता याची सांगड घालून तो पुढे जातो, पिठले महाराज त्यापैकीच एक होते.

अवलियांच्या पुर्वायुष्यात डोकावू नये कारण आपला भूतकाळ पुसूनच अवलिया जीवन जगता येते. परंतु, याला काहीजण अपवाद असतात. काहींचा भूतकाळ रहस्यमय होऊन रहातो आणि वर्तमानकाळावर त्याची सावली पडते. नाशिकला एक फार मोठे अवलिया होऊन गेले. श्री दत्त महाराजांच्या परंपरेतील साक्षात्कारी व श्री स्वामी समर्थांची सेवा पंचक्रोशीत कानाकोपऱ्यात घराघरात पोहचविणारे महापुरूष म्हणजे प. पू. सदगुरू श्री नारायणदास श्रीपादश्रीवल्लभ पिठले महाराज. त्यांची समाधी तपोवनात आहे. अनेक आध्यात्मिक व जिज्ञासू भक्त त्यांचे दर्शन घेतात.

परमपूज्य पिठले महाराज हे साधारण घरात जन्माला आले. एकदिवस स्वामी समर्थ महाराजांनी स्वप्नात दृष्टान्त दिला, पुढे मोठे कार्य करावयाचे आहे याची आठवण करून दिली. आणि तेथून पुढे आध्यात्मिक प्रगतीला सुरुवात झाली. स्वामी समर्थांचा दृष्टांत झाल्यावर तेजेची तप:श्चर्या करण्याच्या इच्छेने त्यांना झपाटून टाकले. त्यामुळे त्यांनी स्वामी समर्थ महाराजांकडे परवानगी मागितली. मात्र त्यांनी पिठले महाराजांना श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पायी घातले. कारण त्यांनी त्यांच्या अवतारकार्यात तेजाची तपश्चर्या केलेली होती. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांनी पिठले महाराजांना अनुग्रहीत केले. तेजाची तपश्चर्या पूर्ण झाल्यावर पिठले महाराजांनी नाशिकला आपली कर्मभूमी म्हणून निवडले. श्री स्वामी महाराजांची सेवा प्रत्येक जीवापर्यंत पोहोचवायची हे कर्म मानून त्यांनी कार्यास सुरुवात केली. पेठे हायस्कूलच्या मागच्या बाजूला असणाऱ्या बेळेवाड्यात स्वामींचा दरबार भरवला. तेथे राहून श्री स्वामी समर्थ महाराजांनी सोपवलेले कार्य ते निस्सिमपणे करीत होते. अडचणीत आलेल्यांच्या अडचणी सोडविणे हेच त्यांचे काम. त्यासाठी ते स्वामी समर्थ महाराजांची सेवा देत असत. पिठले महाराजांच्या दरबारात अनेक लोक प्रश्न पाहण्यासाठी येत असत. त्यांना उपासना देऊन ते त्यांचे प्रश्न लिलया सोडवत. परंतु, त्यांनी कधीही कुठेही प्रसिध्दी केली नाही. कधी स्वत:च्या नावाचा गवगवा केला नाही. महाराज सूर्यनारायणाचे निस्सिम उपासक होते. तेजाची उपासना केल्याने त्यांचे शरीर अत्यंत तेजस्वी झालेले होते असे त्यांना प्रत्यक्ष पाहिलेले सांगतात.

पिठले महाराजांचे पाच सतशिष्य होते. त्यात दिंडोरीचे खंडेराव अप्पाजी मोरे आणि रावसाहेब मगर हे प्रमुख! मगर यांना त्यांनी पहिल्याच भेटीत तुम्हाला काय हवे असे विचारले असता आता हे चरण सोडून काहीच नको असे त्यांनी सांगितले त्यावर ‘आता गुरूपौर्णिमेला या’ असे पिठले महाराजांनी सांगितले. गुरूपौर्णिमेच्या दिवशी अकरा जणांना पिठले महाराजांनी नारळ देऊन श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा महाराष्ट्रभरात प्रसार करण्याचा आदेश दिला. पिठले महाराज अत्यंत सात्विक वृत्तीचे होते. मूळचे कऱ्हाडे ब्राह्मण असलेले पिठले महाराज कोकणातील. पुढे त्यांचा प्रवास दत्तप्रभूंच्या क्षेत्रावर, पंढरपूर, बार्शी, पुणे आणि नंतर नाशिक असा झाला. पंचविशीच्या उंबरठ्यावर असताना पत्नी व दोन मुलींचे निधन झाले. संसारात विरक्ती आली, एका मुलाला मामाच्या हाती सोपवून ते पुढील वाटचाल करण्यासाठी निघाले ते वर्ष होते १९२९. सन १९३५ मध्ये महाराज पंढरपूर मुक्कामी होते. त्यांच्याबरोबर सावलीसारखे गजाननराव अनंत भागवत म्हणून गृहस्थ रहात होते. हे कोण होते याचा उलगडा शेवटपर्यंत झालाच नाही. पिठले महाराज हे श्री स्वामी समर्थांची सेवा करीत असत. अनेक वर्ष तप:श्चर्या करणारे महाराज नाशिकला असताना निजानंदात मग्न रहात असत. नाशिक येथे पगडबंद लेनमध्ये नावरेकरांच्या वाड्यात रहात असत. समवेत भागवत होते. नरसोबाच्या वाडीला श्री स्वामी समर्थ आणि श्रीपाद श्रीवल्लभ महाराज यांनी बाजूस बसून पिठले महाराजांना दीक्षा दिल्याची आख्यायिका आहे. पिठले महाराजांच्या नाशिक वास्तव्यात दिंडोरीचे सरपंच खंडेराव अप्पाजी मोरे (मोरेदादा) आणि बाळकृष्ण (रावसाहेब) विठ्ठल मगर यांच्याशी त्यांचा संपर्क आला. पुढे महाराज बेळे वाड्यात आले. भागवत यांचा रघुनाथशास्त्री बेळे यांच्याशी परिचय होता. दोन खणांच्या जागेत हा महात्मा शेवटपर्यंत राहिला. पुढे येथेच सर्वजण दर्शनासाठी येत असत.

नाशिकला आल्यानंतर त्यांची शरीरकांती तप:श्चर्येमुळे तांबूस झाली होती. डोक्यावरील व भुवयांचे केस सफेद झाले. नाशिकला असताना महाराज पहाटे साडेतीन वाजता रामकुंडावर जायचे. अनुष्ठान आटोपून साडेपाच वाजता परतायचे. त्यांनी गोदावरीच्या पात्रात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण केलेले होते. महाराजांभोवतीची चमक साध्या नजरेलाही दिसत असे. त्यांच्या जवळ गेल्यास चंदनाचा सुगंध येत असे. बेळे वाड्यात उंदीर फार धुडगूस घालत असे परंतु, पिठले महाराजांचा स्वामी दरबार जेथे होता तेथे माती पडत नसे. महाराज दक्षिणोत्तर झोपत असत. त्यांचे झोपणे, बसणे एकाच जागी होते. महाराज नेहमी स्वत:च्या हाताने स्वयंपाक करीत असत. गुरूपौर्णिमेला एका मोठ्या भांड्यात पाच सहा जणांना पुरेल इतका स्वयंपाक ते करीत, त्यादिवशी त्यांचे असंख्य कृपांकित शिष्य तेथे येत, जेवत परंतु भांड्यातील अन्न संपत नसे. हा अजबच अनुभव आहे. पिठले महाराज नेहमी स्वामीकृपा हा शब्द उच्चारत असे. ते प्रत्येक गोष्ट बोटाने सुचवित असत. प्रसाद घे असेदेखील बोटानेच सांगत.

बाहेरची खोली व आतील स्वयंपाक घर एवढेच घराचे आकारमान होते. बाहेरील जागेत स्वामींचा दरबार. दरबारात तीन फोटो. श्री स्वामी समर्थ. शेषशायी नारायण व भगवान दत्तप्रभू. अगदी खाली दर्भाचे आसन मग लोकरीचे. तिघांना केशरी, गुलाबी व जांभळे आसन. स्वामींसाठी मखर होते. त्या तीनही फोटोस हार घालत. आसनासही हार घालत. खोलीत मंद सुगंध दरवळ पसरलेला. सकाळी साडेदहा वाजता महाराजांना भोजनाचा नैवेद्य. दुपारी दीड वाजता चहा ठेवत मगच स्वत: घेत. येणाऱ्या भक्तमंडळीत महाराजांचा दरारा होता. येणारा त्यांच्यासमोर अर्धातास फक्त बसून रहात असे. अनेकदा ते आत्मानंदी गढलेले असायचे. त्यामुळे अवांतर चर्चेला वाव नव्हता. दरवाजावर क्षणकाल कानोसा घेतला तर ते एकटेच कुणाशी तरी बोलत असल्याचे ऐकू यायचे. बाहेर कुणी आलेय असे लक्षात आले की तो संवाद बंद व्हायचा. महाराज अत्यंत व्यवहारज्ञानी होते. बेळे वाड्यात ज्या खोलीत महाराज रहात त्याचे भाडे २३ रुपये होते. हे भाडे ते महिन्याच्या महिन्याला एका पुडीत काढून ठेवत असत. पुडीकडे अंगुलीनिर्देश करीत असत. पावती आणली का हेदेखील विचारत असत. पावतीवर महाराज लिहिलेले त्यांना आवडत नसे. ते म्हणत मी महाराजांचा दास आहे. ते स्वामींच्या भक्तांना नेहमी सांगत की, मनाचे विचार नीट असावेत. प्रपंच करताना उधळपट्टी करू नये, व्यवहार राखावा. तो सोडून चालणार नाही.

प्रत्यक्षात पिठले महाराजांकडे येणाऱ्यांची संख्या अगदीच नगण्य होती. त्यांनी उपासनेचा कधी बाजार मांडला नाही. रावसाहेब मगर उभयता, मोरेदादा, प्रा. यशवंतराव पाटील उभयता, नारायण बाळाजी जाधव, तुकाराम पाटील, पांडुरंग दादा पाटील, दिगंबर रंगनाथ गायधनी अशी थोडी मंडळी नाशिकला संपर्कात आली. महाराज नेहमी स्वामी समर्थांसारखे अर्धपद्मासनात बसलेले असत. पहाटे साडेतीन वाजता स्नान आटोपून श्री गुरूचरित्राचा अध्याय पठण हा त्यांचा नित्य परिपाठ होता. कुणाला काही सांगण्याची वेळ पडलीच तर कुंडली न पाहताच सांगत असत. ते म्हणायचे ‘देवाकडे फक्त कृपा मागा, अन्य काही मागू नका, कृपाप्राप्तीने सर्व काही मिळते’. महाराज स्वत:च्या हाताने स्वयंपाक करून खात असत. त्यांचे शिष्य बाळासाहेब मगर हे उच्चपदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांचे नेहमी बाहेरगावी जाणे होत असे. एकदा ते पुण्याला निघाले असता पिठले महाराजांनी त्यांना लाकडी खडावा आणावयास सांगितल्या. पुढे शेवटपर्यंत महाराज याच खडावा घालत असत. या खडावा आजही रावसाहेब मगर यांच्या देव्हाऱ्यात आहे. पिठले महाराज नेहमी म्हणत श्री समर्थांना भूषणावह होईल असे वागावे, समर्थांच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे. ऑगस्ट १९७४ रोजी महाराजांनी देह ठेवला. रावसाहेब मगर यांची इच्छा होती की सदगुरूंचे स्थान तपोवनात असावे, त्यानुसार सरदार विमादी पटवर्धन यांच्याकडून जागेची परवानगी घेतली. सदगुरूंचे संन्यासाप्रमाणे विधी करून घेतले. याचे साक्षीदार म्हणून आजही केवडीबनातील म्हसोबा महाराज देवस्थान येथील फुल विकणाऱ्या आजी आहेत. आयुष्याची ३२ वर्षे नाशिकला घालविणाऱ्या परमपूज्य पिठले महाराजांचा भूतकाळ व वर्तमानकाळ गुपितच राहिला. महाराजांनी संन्यास घेतला होता की नाही याचाही उलगडा होत नाही. त्याकाळी गृहस्थधर्माला उधाण आलेले असल्याने अवलियांचे चरित्र लिहून ठेवण्याकडे फारसा कुणाचा कल नव्हता. त्यामुळे पिठले महाराजांसारख्या मोठ्या अवलियाचे चरित्र गुप्तच राहिले. परंतु, त्यांनी मोठे कार्य केले. सतशिष्य घडविले, त्यांचे कार्य आजही अंशरूपाने सुरूच आहे. ऑगस्ट १९७४ मध्ये तपोवनातील केवडीबनात पिठले महाराजांना समाधी देण्यात आली. तपोवनासारख्या तपोभूमीत आपल्या गुरूंना समाधी मिळावी, अशा विचारांनी रावसाहेब मगर यांनी सरदार पटवर्धन यांच्याकडून जागा मिळवली. तेथे आजही ही समाधी आहे. पुढे मुकुंददादा अमृत चौधरी, ऋतुजा (ताई) मुकुंद चौधरी, मिलिंददादा बाळकृष्ण मगर, स्वाती (ताई) मिलिंद मगर, वैद्य राजेंद्र खरात या पंचतत्त्वाकडून स्वामी महाराज व पिठले महाराज कार्य करून घेत आहेत.

समाधी दिलेल्या जागेवर कोणत्याही प्रकारचे उत्सव होऊ नये, अशी विमादी पटवर्धनांची इच्छा होती कारण जागेची खरेदी झालेली नव्हती. या समाधीवर निसर्गदत्त असा सावली देणारा आम्रवृक्ष होता. आम्रवृक्ष हा फलदायी मानण्यात येतो. तद्वतच महाराजांचे आशीर्वाद फलदायी होत असून, जनस्थानला देदीप्यमान करीत आहे.
ब्रम्हज्ञानी सद्गुरु पिठले महाराजांनी (समाधिस्थान-केवडीबन, तपोवन, पंचवटी-नाशिक) स्वामी भक्तांच्या निमीत्ताने सर्वाना दिलेली ज्ञानदीक्षा

जागृत होई आत्मयरामा । अनामा सच्चितसुखघनधामा ॥
गुरु साक्षात परब्रम्ह । अखिल व्यापूनी उरलासी ॥धृ॥

आरतीच्या या ध्रुवपदात सद्गुरू पिठले महाराज प्रत्येकाचे अंतस्थ आत्मारामाला जागृत करण्याचे आवाहन करत आहेत.

प्रत्येक जण स्वतःला शरीर व मन समजत आहे, हे अज्ञान आहे, ही आत्मस्वरुपाप्रति निद्रा आहे. उठा, जागे व्हा म्हणजे तुम्ही शरीर-मन नसुन प्रत्यक्ष परब्रम्ह, आत्माराम आहात हे समजुन घ्या ! इश्वराचा शोध तुमच्या आत घ्या बाहेर नाही. येशु ख्रिस्त म्हणतात स्वर्गाचे राज्य तुमच्या आत आहे, बुद्ध सांगतात तटस्थ राहून मनातील भाव-भावनांचे निरीक्षण करा, जैन धर्मात महावीरही आत वळायलाच सांगताहेत !

स्वामी सतत म्हणायचे-अरे कस्तुरी मृग बेभान होवुन फीरतोय पण स्वतःच्या आतुन सुगंध येतोय हे जाणत नाही ! त्याप्रमाणे तुम्ही-आम्ही स्वतःच्या आतील इश्वराला विसरून त्याला बाहेर शोधतोय ! तेंव्हा इश्वराचा शोध आपापल्या आत घ्या कारण तुम्हीच स्वतः परब्रम्ह आहात!

पुढे आपल्या सर्वांच्या आत्मरुपाचे वर्णन ते करतात-त्या स्वरूपाला कुठलेही नाव, रंग, आकार, रुप, जात-धर्म-लिंग काही नाहीये. परंतु सत् म्हणजे ते आहे, चित् म्हणजे ते चैतन्यच आहे आणि ते घनदाट सुखाने भरलेले एकमेव असे आश्रयाचे धाम आहे आणि तेथेच आपल्याला आराम मिळेल!

गुरु साक्षात परब्रम्ह याचा अर्थ आपण जाणतो, तो अर्थ आहेच, परंतु पिठले महाराजांनी हे शब्द आपल्या अंतस्थ आत्मारामाचे वर्णन करण्यासाठी काढले आहेत, कोणत्या गुरु साठी नाही ! येथे थोडा विचार करावा, जर गुरु साक्षात परब्रम्ह आहे आणि तो समस्त चराचराला व्यापुन उरलाय तर मग आपण सर्व चराचरामध्ये सामील आहोतच, तर तोच परब्रम्ह गुरु तुम्हा-आम्हाला अंतर्बाह्य व्यापुन आहे म्हणजे आपण सर्वं परब्रम्हस्वरूपच आहोत हे पिठले महाराजाना या ध्रुवपदात सुचवावयाचे आहे !

तुमचे-आमचे अंतस्थ स्वरुप हेच सद्गुरू आहे आणि तेच परब्रम्ह आहे, प्रत्येकाने आपल्या आत्मारामाचीच भक्ती करावी, भक्ती म्हणजे जो विभक्त नाही तो-इश्वरापासुन स्वतःला वेगळा न मानणे- तीच गुरूची, परब्रम्हाची खरी भक्ती आहे, हे पिठले महाराजांना सुचवायचे आहे

इराकमधील सुफी संत राबिया एके दिवशी गल्लीमध्ये काहीतरी शोधू लागली, सर्व गल्ली तीच्या शोधात सामील झाली. खूप वेळाने एकाने विचारले, राबीया, तु काय शोधते आहेस? राबीया म्हणाली सुई शोधते आहे, त्याने परत विचारले, सुई हरवली कोठे आहे? राबीया म्हणाली घरामध्ये ! यावर सर्वजण राबीयाच्या वेडेपणाबद्दल हसु लागले. मग राबीया त्यानां म्हणाली-अरे वा तुम्ही सर्व शहाणे दिसताय, मग आत असलेला परमात्मा बाहेर का शोधतायरे वेड्यासारखा ? यावर सर्व जण चूप झाले !

मुख्य दिशा चार, उपदीशा चार, वर आणि खाली दोन अश्शा दहाच दिशा आपल्याला माहीत आहेत, कोणत्याही धार्मिक विधीमध्ये आपण या दहा दिशांना अक्षता टाकून नमस्कार करतो परंतु स्वतःच्या आत म्हणजे अकरावी दिशा आपण कधीच विचारात घेत नाही ! कदाचित त्यामुळेच वारकरी संप्रदायात एकादशी करण्याची प्रथा असेल कारण एकादशी म्हणजे अकरावी तिथी, अकरावी दिशा-आत शोधा ! त्या दिशेकडे फक्त खरे सद्गुरूच तुम्हाला आम्हाला वळवु शकतात, आणि ती आत्मारामाची दिशाच पिठले महाराज दाखवत आहेत जी अंधाराकडून प्रकाशाकडे आणि मृत्यु कडून अमरत्त्वाकडे नेते.
सद्गुरू श्री पिठले महाराजांच ! भक्तांचे प्रेमदृष्टीतून

जन्म इ स १९०५ च्या दरम्यान म्हणजे स्वामींच्या समाधि (इ स १८७८) नाट्यानंतर सुमारे २७ वर्षानी, नाव गंगाधर विष्णूपंत आठल्ये, विवाहीत गृहस्थाश्रमी, रा. शिंपोशी ता लांजे जि रत्नागिरी-कोकण सद्या त्यांचे नातू बडोदा येथे राहतात. प्रंपचाच्या योगक्षेमासाठी गंगाधरपंत दादर मुंबई येथे इंग्रजी विषयाची शिकवणी घेत असत.

संसारामध्ये दोन मुली वारल्या आणि मुलाच्या जन्मानंतर पत्नीवियोग, ह्या दुःखद प्रसंगाने  बुद्धांसाऱखा विवेक जागृत होऊन सत्यप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला, चिमुकल्या मुलाला त्याच्या मामाकडे सोपवुन गंगाधरपंत घराच्या बाहेर पडले ते कायमचेच, पुन्हा त्यानी मागे वळून पाहिले नाही !

गृहस्थाश्रमी गंगाधरपंत ते साक्षात्कारी सद्गुरू श्री पिठले महाराज हा त्यांचा प्रवास बराचसा अज्ञात आहे, परंतु स्वामी कृपेने श्री संजयजी वेंगुर्लेकर यानी यावर संशोधन करुन आपल्या संजना पब्लिकेशनच्या "शूर सेनानी" अंकात वेळोवेळी त्यांची सत्य व विश्वास ठेवण्याजोगी जी माहिती दिली आहे ती मुळातुनच वाचण्या सारखी आहे, या दरम्यान पंढरपूर-पुणे-नाशिक असा त्यांचा प्रवास झाला

परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट हे पिठले महाराजांचे सद्गुरू ! श्री पिठले महाराज लिखीत आरती व इतर साहित्य पाहता असे म्हणण्यास नक्कीच वाव आहे की त्यांची ज्ञान-विचाराची म्हणजे अद्वैताची साधना स्वामींच्या अनुग्रहाने झाली व ज्ञान प्राप्ती होऊन ते सद्गुरू पदी आरूढ़ झाले

बेेळे वाड़ा, रविवार कारंजा, नाशिक येथे ते किरायाने राहत होते. आम्ही सर्व मित्रानी ती खोली पाहीली, ते नेहमी बसत त्या जागेचे दर्शन घेतले, त्या खोली मध्ये प्रवेश करताच आपोआप निर्वीचार अवस्था प्राप्त होते व दिव्य स्पंदनाची अनुभुति येते. त्या वेळी वयाने लहान असलेले बेळे काका सांगू लागले, "पिठले महाराज उंचीने लहान पण चेहरा व तेज स्वामी सारखे भासे. त्यानां डोळ्याने व्यवस्थित दिसत होते. रविवार व गुरुवार वगळता पिठले महाराज शक्यतो एकांतात असत आणि श्री गुरुचरीत्राच्या पारायणाची त्यानां आवड होती."  

अशा या ज्ञानी संताने "समर्थाना भूषणावह होईल असे वागावे, समर्थांच्या इच्छेत इच्छा मिळ्वुन राहवे" असा संदेश देवुन सकाळी १०:३० वाजता समर्थांच्या नियमित आरती पश्चात आपली आत्मज्योत नाशिक मुक्कामी समर्थरूपी अनंतात विलीन केली तो दिवस होता १४ ऑगस्ट १९७४, श्रावण वद्य एकादशी ! त्यांची समाधि केवडीबन, तपोवन, पंचवटी-नाशिक येथे असुन सर्वाना दर्शनासाठी खुली आहे, मनात कोणताही किंतु न बाळगता आपण या स्वामीसमर्थ कृपांकीत समाधिस्थ महापुरूषाचे दर्शन घेऊन स्वतःचा आत्मदिप प्रज्ज्वलित करुन घ्यावा !

पिठले महाराजांच्या समाधिचा भूखंड खरेदी करण्याची महान सेवा श्री मूकूंदजी चौधरी, ठाणे यांच्या भाग्यात स्वामीनी लीहीली होती !

भारतीय अध्यात्मिक इतिहासामध्ये गुरू स्वमुखे ब्रम्हज्ञानाचा बोध शिष्यानां करण्याची परंपरा आहे. शिष्याची बौद्धीक पात्रता, तळमळ, अध्यात्मिक अधिष्ठान इ., गोष्टी पाहून सद्गुरू हा बोध करत असत. हाच बोध तमाम स्वामी भक्त सेवेकऱ्यांच्या निमीत्ताने सर्वांसाठी पिठले महाराजानी श्री स्वामी सेवा केंद्र तथा मठामध्ये सकाळी ८ ला म्हटल्या जाणाऱ्या भूूपाळी आरती मध्ये दिला आहे तो आपण स्वामी कृपेने समजुन घेण्याचा प्रयत्न करूया.

जागृत होई आत्मयरामा । अनामा सच्चितसुखघनधामा ॥
गुरु साक्षात परब्रम्ह । अखिल व्यापूनी उरलासी ॥धृ॥

आरतीच्या या ध्रुवपदात सद्गुरू पिठले महाराज प्रत्येकाचे अंतस्थ आत्मारामाला जागृत करण्याचे आवाहन करत आहेत.

प्रत्येक जण स्वतःला शरीर व मन समजत आहे, हे अज्ञान आहे, ही आत्मस्वरुपाप्रति निद्रा आहे. उठा, जागे व्हा म्हणजे तुम्ही शरीर-मन नसुन प्रत्यक्ष परब्रम्ह, आत्माराम आहात हे समजुन घ्या ! इश्वराचा शोध तुमच्या आत घ्या बाहेर नाही. येशु ख्रिस्त म्हणतात स्वर्गाचे राज्य तुमच्या आत आहे, बुद्ध सांगतात तटस्थ राहून मनातील भाव-भावनांचे निरीक्षण करा, जैन धर्मात महावीरही आत वळायलाच सांगताहेत ! स्वामी सतत म्हणायचे-अरे कस्तुरी मृग बेभान होवुन फीरतोय पण स्वतःच्या आतुन सुगंध येतोय हे जाणत नाही ! त्याप्रमाणे तुम्ही आम्ही स्वतःच्या आतील इश्वराला विसरून त्याला बाहेर शोधतोय ! तेंव्हा इश्वराचा शोध आपापल्या आत घ्या कारण तुम्हीच स्वतः परब्रम्ह आहात!

पुढे आपल्या सर्वांच्या आत्मरुपाचे वर्णन ते करतात-त्या स्वरूपाला कुठलेही नाव, रंग, आकार, रुप, जात-धर्म-लिंग काही नाहीये. परंतु सत् म्हणजे ते आहे, चित् म्हणजे ते चैतन्यच आहे आणि ते घनदाट सुखाने भरलेले एकमेव असे आश्रयाचे धाम आहे आणि तेथेच आपल्याला आराम मिळेल! गुरु साक्षात परब्रम्ह याचा अर्थ आपण जाणतो, तो अर्थ आहेच. परंतु पिठले महाराजांनी हे शब्द आपल्या अंतस्थ आत्मारामाचे वर्णन करण्यासाठी काढले आहेत, कोणत्या गुरु साठी नाही !

येथे थोडा विचार करावा, जर गुरु साक्षात परब्रम्ह आहे आणि तो समस्त चराचराला व्यापुन उरलाय तर मग आपण सर्व चराचरामध्ये सामील आहोतच, तर तोच परब्रम्ह गुरु तुम्हा-आम्हाला अंतर्बाह्य व्यापुन आहे म्हणजे आपण सर्वं परब्रम्हस्वरूपच आहोत हे पिठले महाराजाना या ध्रुवपदात सुचवावयाचे आहे ! तुमचे-आमचे अंतस्थ स्वरुप हेच सद्गुरू आहे आणि तेच परब्रम्ह आहे, प्रत्येकाने आपल्या आत्मारामाचीच भक्ती करावी, भक्ती म्हणजे जो विभक्त नाही तो-इश्वरापासुन स्वतःला वेगळा न मानणे- तीच गुरूची, परब्रम्हाची खरी भक्ती आहे, हे पिठले महाराजांना सुचवायचे आहे.

इराकमधील सुफी संत राबिया एके दिवशी गल्लीमध्ये काहीतरी शोधू लागली, सर्व गल्ली तीच्या शोधात सामील झाली. खूप वेळाने एकाने विचारले, राबीया, तु काय शोधते आहेस? राबीया म्हणाली सुई शोधते आहे, त्याने परत विचारले, सुई हरवली कोठे आहे? राबीया म्हणाली घरामध्ये ! यावर सर्वजण राबीयाच्या वेडेपणाबद्दल हसु लागले! मग राबीया त्यानां म्हणाली-अरे वा तुम्ही सर्व शहाणे दिसताय, मग आत असलेला परमात्मा बाहेर का शोधतायरे वेड्यासारखा? यावर सर्व जण चूप झाले !

मुख्य दिशा चार, उपदीशा चार, वर आणि खाली दोन अश्शा दहाच दिशा आपल्याला माहीत आहेत, कोणत्याही धार्मिक विधीमध्ये आपण या दहा दिशांना अक्षता टाकून नमस्कार करतो परंतु, स्वतःच्या आत म्हणजे अकरावी दिशा आपण कधीच विचारात घेत नाही ! कदाचित त्यामुळेच वारकरी संप्रदायात एकादशी करण्याची प्रथा असेल कारण एकादशी म्हणजे अकरावी तिथी, अकरावी दिशा-आत शोधा ! त्या दिशेकडे फक्त खरे सद्गुरूच तुम्हाला आम्हाला वळवु शकतात, आणि ती आत्मारामाची दिशाच पिठले महाराज दाखवत आहेत जी अंधाराकडून प्रकाशाकडे आणि मृत्यु कडून अमरत्त्वाकडे नेते.

N/A

References : N/A
Last Updated : May 15, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP