जन्म: तुंगभद्रकिनारी अंजरपेठ येथे, सन १८४९.
मूळ नाव: श्री गोविंद रघुनाथ महाजन
गुरू: श्री देव मामलेदार तथा यशवंत महाराज
भाषा: संस्कृत आणि प्राकृत (स्वामिना सर्व देशांच्या भाषेंवर प्रभुत्व होते)
साहित्यरचना: श्री जातवेद महावाक्यांग ग्रंथ, वेदान्त कौमुदी, हरिपाठ, सुबोध भजन मालिका, हिंदू धर्म पंचांग
कार्य: सत्य श्रेष्ठ ईश्वरीय ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार
प्रसिद्ध वचन: जय सच्चिदानंद
संबंधित तीर्थक्षेत्रे: टेंभोडे पालघर, करीरोड मुंबई, कोल्हापूर
आई/वडील: उमाबाई/रघुनाथ स्वामी
पत्नी: लक्ष्मीबाई
कार्यकाळ: १८४९-१९१२.
कार्यक्षेत्र: कोकण व मुंबई.
समाधी: २६ जानेवारी १९१२.
पद्मनाभाचार्य स्वामी उर्फ पद्मपादाचार्य स्वामी महाराज पद्मनाभाचार्य स्वामी उर्फ पद्मपादाचार्य स्वामी महाराज
पद्मनाभाचार्य स्वामी उर्फ पद्मपादाचार्य स्वामी महाराज हे श्रीगुरू नारद अवतार परंपरेतील कलियुगाचे औतारस्थित सत्गुरू आहेत. श्री महामुळ जगत्पित्याच्या बीज बिंदात उद्भवलेल्या चतुर्वर्णमय हिंदू देवगण आपल्या देव धर्माचा विसर पडून व्यसनी भ्रष्टाचारी बनून अधोगतीकडे जाण्याचा मार्ग अवलंब करतात त्यावेळी श्रीजगत्पिता श्रीनारद स्वामीस आदेश देतात,
महामुळतात म्हणे नारदासी । तू युगायुगे औतरे निश्चयेसी ।
सुमार्गाते बोधुनिया चौवर्णासी । निज्यधर्मासी रक्षीजे ।
कृतात कपिल । त्रेतांत याज्ञवल्कमुनी ।
द्वापारी दत्तात्री कलीत पद्मनाभ जाणी । प्रथी रोमहरसेन त्रिपदी भृगुमुनी ।
द्रौपदांत अंगिरस । कमलायुगी सुत्राचारी ।
हि आठ नावे धरुनी शिरी । नारदा तू औतरे निर्धारी । धर्मरक्षणा कारणे ॥
अश्याप्रकारे नारद मुनींनी कृतात कपिलमुनी, त्रेती याज्ञवल्क्य,द्वापारी दत्तात्रय महाराज, कलियुगात पद्मनाभाचार्य स्वामी, प्रथा युगात रोमहरशेन मुनी, त्रिपदा युगांत भृगुमुनी, द्रौपदा युगांत अंगिरसमुनी, कमला युगांत सुत्राचार्य स्वामी अश्या प्रकारे औतार धारण केले आहेत.
जन्म निरुपण
कलियुगांत पहिल्या चरणात अवतरलेल्या सत्गुरू स्वामी विषयी,
॥ ॐ नमो तत्सत पद्मपादाचार्य स्वमिनाथाय नमोनमः ॥
श्लोक
काषायवस्त्रं कटीमेखळा ब्रह्मसूत्रं गुरुनाथम Iदंडकमंडलुधरम रुद्राक्षहारभूषणाढ़यमं ।
रत्नागरनिलसिंधू लवणसमुद्रतीरवासं । सत्यश्रेष्ठज्ञानदायकम स्वामीराजम पद्मनाभं ॥
श्रीगुरू पद्मनाभाचार्य स्वामी उर्फ पद्मपादाचार्य स्वामी हे श्री ईश आज्ञांकित कलियुगाचे औतारस्थित सत्गुरू आहेत. पद्मनाभ स्वामी इच्छा मरणी असल्या कारणाने भूमंडळी किती वर्ष विद्यमान होते हे निश्चित सांगता येत नाही आणि कोणासही कळलेले नाही. पण ते बरेच वृद्धरूपी भासत आणि दीर्घ काळातील निरुपण चतुवर्ण देवगणाना सांगत असत. चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे हि स्वामींच्या मुखीच वास्तव्य करीत असत. अर्थात पद्मपादाचार्य स्वामींच्या जिव्हाग्री सरस्वतीच वास्तव्य करीत असे. पद्मनाभ स्वामींच्या वडिलांचे नाव रघुनाथ स्वामी, आजाचे नाव सदाशिव स्वामी आणि पणजाचे नाव वामन स्वामी अशी होती तर पद्मनाभाचार्य स्वामींच्या आईचे नाव उमाबाई, आजीचे नाव मथुराबाई आणि पणजीचे नाव गंगाबाई अशी होती. श्रीगुरू पद्मपादाचार्य स्वामी हे नारद वंशी, अश्व लायनी शाखेचे, आगम ऋग्वेदी, अत्रीगोत्री, प्रथम प्रवरी, देशस्थ गुरुवर्य ब्राह्मण होते. श्रीगुरू पद्मनाभाचार्य स्वामींचा जन्म श्री मन्म्हांमूळ देवनगरी हिंदू धर्म शकाच्या ३८९२९४९ सवंत्वरी, मार्गशीर्ष मासी कृष्ण पक्ष नवमी तिथीस सावितुवारी उर्फ शनिवारी सूर्य उदयानंतर ५९ व्या घटिकेच्या ५व्या पळांत रत्नागिरी प्रांतातील तारळ नामक गावी झाला होता. जन्मलेले गाव त्यांचे आजवळ होते. त्यांच्या पित्याचे गाव तुंगभद्रा नदीतीरी अंजारपेठ हे होते. पद्मनाभ स्वामींनी भूतलावरील बहुतेक यात्रा तीनतीन चारचार वेळा केल्या आहेत. स्वामी पंढरीची वारी करीत असत. पद्मनाभ स्वामींनी चतुर्वर्ण हिंदूदेवगणांपैकी बरेच शिष्य केले आहेत. पद्मनाभ स्वामींनी जातवेद महावाक्य, वेदान्त कौमुदी, सुबोध मालिका, शांतिपाठ, हरिपाठ वैगरे ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत. पद्मनाभ स्वामी कोणत्याही प्रकारची कविता बोलणे झाल्यास शीघ्र कवित्वानेच बोलत असत. कवितेतील तथा श्लोकांतील आणि अभंग, आर्या, भजनातील अयोग्य वाक्य निवडून टाकण्याच्या कामी पटाईत होते. याच पद्मनाभाचार्य स्वामींनी कलियुगातील चतुर्वर्णमय देवगणांस सत्यश्रेष्ठ स्वहितसाधनयुग्त असा श्रीईश आज्ञांकित देवधर्म निरुपण केला आहे. त्या धर्म मार्गाचे आचरण करून कलीयुगातील हिंदूदेवगण सुख संपन्न होत असतात, पद्मनाभ स्वामी हे चतुर्वर्णमय देवगणास अत्यंत प्रिय असून स्वर्ग भुवनात महाप्रसिध्द आहेत.
पद्मनाभ स्वामींचे गुरु
सत्गुरू वाचोन सापडेना सोय । धरावे ते पाय आधी आधी ॥
या उक्ती प्रमाणे सर्वसामान्य मनुष्या प्रमाणे कलियुगाच्या औतारस्थित सत्गुरुलाही गुरु कडून अनुग्रह घेणे अनिवार्य होते. त्याप्रमाणे जगदीश लीलेनुसार मुंबईत आलेल्या यशवंत महाराज साधू देव मामलेदार यांनी पद्मनाभस्वामींना उपदेश करून दीक्षा दिली.
श्रीगुरू सिद्धपादाचार्य स्वामी उर्फ देव मामलेदार श्रीगुरू सिद्धपादाचार्य स्वामी उर्फ देव मामलेदार
श्रीगुरू सिद्धपादाचार्य स्वामी उर्फ देव मामलेदार.
॥ सिद्धपादाचार्य स्वामी उर्फ यशवंतराव महाराज साधू देव मामलेदार ॥
कलियुगाचे औतारस्थित श्रीमत सदगुरू पद्मनाभाचार्य स्वामी महाराजांनि श्री जातवेद महा वाक्यांग ग्रंथात वर्णन केलेले स्वामींचे चरित्र थोडक्यात संक्षिप्त रुपात. श्रीगुरू सिद्धपादाचार्य स्वामी हे महाराष्ट्रातील थोर संत आणि कलियुगाचे औतारस्थित श्रीमत सदगुरू पद्मनाभाचार्य स्वामी महाराजांचे गुरु होते. श्रीगुरू सिद्धपादाचार्य स्वामी हे गुरुवर्य ब्राह्मणापैकी श्री प्रवरी, कश्यप गोत्री, अश्वलायनी शाखेचे, ऋग्वेदीय देशस्थ ब्राह्मण होते. त्यांचे मूळ नाव श्री यशवंत महादेव कुलकर्णी होते आणि गुरुगृहीचे नाव सिद्धपादाचार्य स्वामी असे होते. स्वामी हे ऋग्वेदी ब्राह्मण असले तरी त्यांना सरकार दरबारी न्यायासन प्राप्त होते. तिथे स्वामी न्यायदानाचे काम करीत त्यांना मामलेदार हे पद प्राप्त होते. त्यांच्या अलौकिक लीला आणि त्यांच्यातील देवपण यामुळे लोक स्वामींना साधू देव मामलेदार असे संबोधत असत. स्वामींचा जन्म शालिवाहन शके १७३७ साली भाद्रपद मासी शुल्क पक्षी नवमी तिथीस गुरुवारी सूर्योदय समयी पुण्यातील ओंकार वाड्यात झाला. श्रीगुरू स्वामी हे दत्त गुरूंचे उपासक होते मुखी नामाचा अखंड जप चालू असायचा त्यात जराही खंड पडत नसे. स्वामीच्या लीला वर्णिताना पद्मनाभ स्वामी म्हणतात;
II श्री उर्वाच्य II अभंग विषम चरणी II
निपुत्रिका पुत्र I निर्धनासी धन I चिरंजीव जाण I मज केले II
याचकांसी तृप्त I स्वपत्नीचे दान I अज्ञाना सज्ञाना I केले जणे II
राजकीय धन I राजा ज्ञे वांचून I ब्राह्मणासी दान I ज्याने दिले II
योग्यचि हिशोब I साहेबा दाविला I अर्धा आणा दिल्हा I वाढ जेणे II
नवसा पावणे I पाखांड्याचा छळ I करी घननिळ I जयासाठी II
मांसाची मालिका I पुष्पवत केली I गळ्यात घातली I पाखांड्याच्या II
मार्गाने चालतां I मांस पूर्ववत I दाविले गळ्यांत I पाखांड्यासी II
छीथू सर्व ज्यनी करोनी पाखांड्या I म्हणाले कां वेड्या I केला छळ II
हजारो रुपये I कर्जाव काढून I याचकासी दान I ज्याणे दिले II
मेलेला बालक I ज्याणे उठविला I त्या स्वामींची लीला I वाणू काय II
सत्र्या पाटलाचे I पांचशे रुपये I घेवोनिया स्वयें I दान केले II
धुळ्यात मालेगावीI जातां पाठवीन I दिधले वचन I पाटलासी II
परी विसरले I आठवण नाहीI ईशे लवलाही I फेडियले II
पद्मा म्हणे ईशे I भैयाजी होऊनI स्वामींचे वचन I पूर्ण केले II
नवसा पावले I सत्य तें वच्यन I असत्य भाषण I मुळी नाही II
अजुनी पावतीI करिता नवस I परी भाव त्यास I समर्पिता II
पद्मनाभ म्हणे I गुरु यशवंता I नवस बहुतां I लोकी केले II
स्वामींचे गुरु श्रीगुरू निर्मळाचार्य स्वामी जे शृंगेरी मठाचे गुरु होते त्या श्री गुरु निर्मळाचार्य स्वामींनी नृसिंह सरस्वती (गाणंगापूर), कमळाकर स्वामी आणि यशवंतराव स्वामी या तिघांनाच सदगुरू दीक्षा दिली होती .
स्वामींचे शिष्य
स्वामींचे एकंदर तीनच शिष्य होते.
१) सदानंद स्वामी - काशी क्षेत्र
२) नारायण स्वामी - गोदातीर
३) पद्मनाभ स्वामी - कलियुगाचा औतारस्थित सदगुरू
शालिवाहन सन १८०९ मार्गशीर्ष मासी कृष्ण एकादशीस रविवारी प्रातःकाळी श्रीगुरू स्वामीनी आपला देह पंचतत्वांत विलीन केला. नाशकांत गोदावरी तीरी रामकुंडा पाशी स्वामींची समाधी छत्री असून तेथे सुंदर असे मंदिर उभारले आहे.आणि त्याची नित्य पूजाअर्चा योग्य चालण्यासाठी महाजन दातेंनी योग्य तजवीज केली आहे.
स्वामींचे कार्य
गिरगावातील करीरोड येथे दगडी शिळेवर बसून उपदेश कार्य
श्रीगुरू सिद्धपादाचार्य स्वामिंकडून अनुग्रह आणि श्री पद्मनाभाचार्य स्वामी असे गुरुगृहीचे पदनाम प्राप्त झाल्यावर स्वामींनी सत्य श्रेष्ठ ईश्वरीय ज्ञान उपदेशक अशी पदवी धारण करून श्रीईशाने(जगत्पिता) नेमून दिलेल्या हिंदू धर्म कार्यास सुरवात केली. मुंबईतील तत्कालीन असलेल्या गचाळ वस्तीत म्हणजेच लालबाग, परळ, करीरोड येथील गिरणी कामगार, कष्टकरी कामगार यांची परवड पाहावत नसल्याने स्वामी करीरोड स्टेशन जवळील पुलाजवळ दारू, ताडीच्या गुत्या शेजारी एका कातळावर बसून आपल्या अमृत वाणीने कष्टकरी व गिरणी कामगार यांना ज्ञानोपदेश करीत असत. त्यांना समजावत असत की बाबानो आपणास पोटासाठी मुंबईत का यावे लागले? दारूच्या सेवनाने आपले तसेच आपल्या कुटुंबाची दैन्यावस्था होऊन उपासमारीची वेळ का आली आहे? याचा मनापासून विचार करा. अश्या साध्या सोप्या भाषेत परंतु हृदयास भेटून जाणाऱ्या तेजस्वी वाणीने दारू ताडी पिणाऱ्या लोकांवर हळूहळू परिणाम होत गेला आणि ते व्यसनांपासून अलिप्त होऊ लागले. हि गोष्ट त्यांच्या देवांगणांना (पत्नींना) समजल्यावर त्यांनी स्वामींचे मनोमन ऋण निर्देश केले, हि वार्ता संपूर्ण गिरणगावात पवनवेगाने पसरली अनेक गिरणी कामगार रोजच नित्यनियमाने स्वामी उपदेश करीत असलेल्या कातळी शिळेजवळ जमू लागले. रोजच गर्दी वाढत असे त्यामुळे सदर ची जागा अपुरी पडू लागली.
करीरोड येथे दत्त मंदिराची उभारणी
स्वामी ज्या कातळी शिळेवर बसून हिंदू धर्मोपदेश कार्य करत ती जागा एका पारशाच्या मालकीची होती. हि जागा स्वामींनी इ. स. १९०० च्या सुमारास कायम फरोक्त खरेदी केली. आपल्या शिष्य गणांच्या सहाय्याने परेल भागातील सुप्रसिद्ध सर्वेयर श्री गोविंद दादाजी पाठारे यांच्या पुढाकाराने श्री दत्त मंदिर स्थापन केले. सदर दत्त मंदिरात स्वामींचे आराध्य दैवत श्री दत्तात्रय स्वामी व चतुर्वर्ण मय देवताच्या म्हणजेच (जगत्पिता नारद हरी ब्रह्मा विष्णू महेश) मूर्ती करकमलाने प्राणप्रतिष्ठा करून स्थापन केल्या. स्वामींचे वास्तव्य सदर मंदिरात असे. हे मंदिर हिंदूचे धर्मपीठ बनले. स्वामी भल्या पहाटे उठून श्रीईश नाम स्मरण, स्नानसंध्या, ध्यान धारणा व पूजा विधी करीत असत. ह्यामुळे येणारे भाविक भक्तगण, देवांगना यांच्या मध्ये परिवर्तन होऊन ते स्वामींना दीक्षा (अनुग्रह) देण्याविषयी चौकशी करीत, दीक्षा देण्याविषयी मागणी दिवसेदिवस वाढतच होती. म्हणून स्वामींनी आपल्या अवतार कार्यास सुरवात करून सत्य श्रेष्ठ ईश्वरी ज्ञानोपदेषक श्रीमत सत्गुरू पद्मनाभाचार्य स्वामी महाराज अशी पदवी धारण करून, श्री पद्मनाभस्वामी शिष्य सांप्रदाय या नावाने सांप्रदायाची स्थापना केली. अश्या प्रकारे सदर गिरणगावात स्वामींचे बरेच शिष्य झाले.
पालघर तालुक्यात स्वामींचे आगमन, इ.स १९०३
स्वामींनी स्थापन केलेल्या ध्रीदात्त मंदिर करीरोड येथील ज्ञानोपदेशाचे कार्य चालूच होते, परंतु कोणी भक्ताने बोलविल्यास स्वामी त्याच्या आग्रहाखातर त्यांचेकडे जात असत. त्यांचे एक पट्टशिष्य श्री रामानंद स्वामी व्यापार निमित्त तत्कालीन माहीम तालुक्यातील आगरवाडी येथे येत तेव्हा स्वामींची महती तेथील लोकांस सांगत असत. त्याच गावातील दसआगरी समाजाचे पुढारी व प्रतिष्ठीत सद्गृहस्थ श्री मंगळ्या कंबू गावड (पाटील) व त्यांचे समाज बांधव यांची श्री रामानंद स्वामींशी भेट झाली असता श्रीमत सत्गुरू पद्मनाभाचार्य स्वामी महाराजांविषयी तसेच त्यांच्या कार्याची माहिती समजली असता साहजिकच गावकऱ्यांच्या मनात स्वामींविषयी कुतूहल निर्माण झाले. म्हणून त्यांनी श्री रामानंद स्वामींना पद्मनाभाचार्य स्वामींची भेट घडवून आणण्याची विनंती केली. त्याप्रमाणे रामानंद स्वामींनी पद्मनाभाचार्य स्वामीकडून आगरवाडी रामबाग भागात भेट देण्याचे आश्वासन मिळविले आणि एका ठराविक दिवशी येण्याचे मान्य केले. श्री मंगळ्या कंबू पाटील यांचे नातेवाईक श्री जनार्दन जैतू पाटील राहणार टेम्भोडे हे धार्मिक वृत्तीचे सद्गृहस्थ होते आणि धार्मिक ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम नेहमी करीत असत. अध्यात्माविषयी परीक्षा घेण्यात त्यांचा हातखंडा होता. म्हणून मंगळ्या पाटील त्यांना स्वामी येण्याच्या दिवशी खास बोलावून घेतले. ठरल्याप्रमाणे स्वामी आले असता त्यावेळी पुष्कळ मंडळी जमली होती. श्री जनार्दन पाटील यांनी स्वामिना बरेच प्रश्न विचारले आणि स्वामींनी सर्वच प्रश्नांची खुलासेवार समर्पक उत्तरे दिल्यावर जनार्दन पाटलाना खात्री पटली कि स्वामी कोणी गोसावी नसून सिध्दमहापुरुष आहेत सत्गुरू आहेत. काही दिवसांनी स्वामी पुन्हा आगरवाडीस आले असता धार्मिक प्रश्नांवर बऱ्याच चर्चा झाल्या. नंतर श्री मंगळ्या कंबू पाटील आणि श्री जनार्दन पाटील यांनी स्वामींच्या म्हणण्यानुसार स्वामींचे शिष्यत्व पत्करले. तसेच श्री जनार्दन जैतू पाटील यांनी स्वामिना टेम्भोडे गावात येण्याविषयी विनंती केली आणि स्वामिनीही ते मान्य केले.
वरील ठरल्याप्रमाणे एके दिवशी स्वामी टेम्भोडे गावी श्री जनार्दन जैतू पाटील यांच्या निवासी आले असता गावातील लोकांना अगोदर सुचविल्याप्रमाणे सर्व लोक तेथे जमले. स्वामिंबरोबर अध्यात्मिक चर्चा झाल्यामुळे श्री महादू पाटील, श्री जनार्दन जैतू पाटील, श्री रघुनाथ पांडुरंग भानू, श्री दामा पाटील, श्री भास्कर पांडुरंग भानू, तसेच इतर अनेक ग्रामस्थांनी स्वामींचे शिष्यत्व पत्करले. नंतर स्वामी वेळोवेळी टेम्भोडे गावी श्री गोरखनाथ स्वामी (जनार्दन जैतू पाटील) यांच्या निवासी येत असत आणि आपल्या शिष्यांना ईशआज्ञानुसार उपदेश करीत असत. स्वामींच्या आगमनापूर्वी गावांतील लोक मांसाहार करीत, दारू ताडी पीत, व्यसनी होते. स्वामींनी त्यांना उपदेश केल्यानंतर आणि अनुग्रह दिल्यावर त्यांनी वाईट व्यसने सोडून हरी भजनाचा ध्यास घेला आणि त्यांची वाटचाल स्वरुपाची ओळख होण्याकडे झाली. तसेच गावातील काही जुन्या रूढी आणि अंध्रश्रद्धा अस्तित्वात होत्या त्या बंद करण्यास भाग पाडले. स्वामींचे वास्तव्य ज्यावेळी टेम्भोडे गावात असे त्यावेळी स्वामी गावाजवळ असणाऱ्या लहानशा नदीवर स्नानासाठी जात असत, स्नान झाल्यावर स्वामी ध्यानस्त बसत त्या नदीस स्वामींनी वारणावतीअसे नाव दिले. अश्याप्रकारे स्वामींचे कार्य चालू असता त्यांनी बरेचसे शिष्य तयार केले. पालघर पंचक्रोशीतील आगरवाडी, रामबाग, पारगाव, घाटीमं, पंचोली, माकुनसार, टेम्भोडे, केळवे माहीम, या गावात जाऊन स्वामींनी सत्य श्रेष्ठ ज्ञानोपदेशाचे कार्य केले हिंदू देवगणा ना एकजूट करून सत्य श्रेष्ठ ईश्वरीय ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार केला.
स्वामी ज्या ठीकाणी नदीकाठी ध्यानस्थ बसत त्या ठिकाणी भाविक भक्तगणांनी लहानसे पादुका मंदिर स्थापन केलेलं आहे तसेच सभोवती घाट हि बांधला आहे. त्या मंदिरात श्री पद्मनाभाचार्य स्वामींच्या पादुका स्थापन केल्या आहेत. सदर पंचक्रोशीत हे एक अत्यंत पवित्र स्थान मानले जाते या ठिकाणी बहुतेक जण आपल्या कुळातील उत्तरकार्य करीत असतात. माघ महिन्यातील सप्तमीला ज्यावेळी समर्थ सत्गुरू पद्मनाभाचार्य स्वामींचा संजीवन समाधी महोत्सव साजरा केला जातो त्यावेळी आणि इतर उत्सवाच्या वेळी बाहेर गावाहून येणारे स्वामींचे शिष्यगण तसेच देवांगना समाधीचे दर्शन घेऊन वारणावती नदीकिनारी स्थापन केलेल्या स्वामींच्या पादुकांचेही दर्शन घेतात आणि मगच पुढील प्रवासास मार्गस्थ होतात.
श्रीमत सत्गुरू पद्मनाभाचार्य स्वामी महाराजांचे सत्य श्रेष्ठ ईश्वरी ज्ञान प्रसाराचे कार्य महारष्ट्र, गुजराथ,गोवा,कर्नाटक राज्यांत पसरत असताना त्यांना शृंगेरी मठाचे मठाधिकारी म्हणून पदवी मिळत असतानाही त्यांनी तिचा स्वीकार न करता फक्त मठाश्रीत म्हणून कार्य करीत राहिले, यावरून स्वामींची विरक्ती किती उच्च होती याचा परिचय होतो. मुंबईस राहून गिरणी कामगारांची दु:खे दूर करून, त्यांना जागृत करून दत्तोपासनेचे वेड लावणाऱ्या श्री पद्मनाभ स्वामी महाराज (सन १८४९-१९१२) यांचाही निर्देश येथेच करायला हवा. यांचा जन्म तुंगभद्रा नदीच्या तीरावरील अंजारपेट येथे झाला. घराण्यात दत्तोपासना होती. मातेच्या कृपाछत्राखाली हे ऐन वयात मुंबईस आले व अनेक नोकऱ्यांचे अनुभव घेऊन शेवटी त्यांनी गिरणीत नोकरी धरली. संसारबंधन लौकरच संपल्यामुळे त्यांनी आपल्या पारमार्थिक धाग्याची जोपासना दत्तकृपेसाठी व दीनदुबळ्या मजुरांच्या उद्धारासाठी केली. नाशिकचे श्रेष्ठ संतपुरुष श्रीदेव मामलेदार (श्री यशवंतराव महाराज) यांनी त्यांच्यावर कृपा केली आणि ‘गोविंद’ नावाचा हा सत्पुरुष श्रीपद्मनाभस्वामी म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यांनी आपले कार्यक्षेत्र करी रोड स्टेशननजीकचे ठरविले. श्रमजीवी लोकांना सन्मार्ग दाखवून त्यांनी त्यांच्या विसाव्यासाठी एक दत्तमंदिरही उभारले.
कामगारांच्या सेवेत राहून व त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवून स्वामीजी २६ जानेवारी १९१२ रोजी दत्तचरणी विलीन झाले. त्यांची समाधी पालघरनजीक टेंभेवडे गावी आहे. का. म. ताम्हनकर यांनी पद्मनाभस्वामींचे चरित्रही लिहिले आहे. या पद्मनाभ स्वामींची परंपरा आजकाल मोठ्या प्रमाणावर नांदत आहे. पद्मनाथ स्वामींचा प्रभाव कोकणात व गोमंतकावर मोठा आहे. रघुनाथ स्वामी व ठमाबाई यांच्या पोटी पद्मनाथ यांचा जन्म झाला. आईवडिलांनी तुंगभद्रेच्या काठी पुत्रकामेष्टी यज्ञ करून तपश्र्चर्या केली होती. नारदाचार्य यांच्या कृपेने त्यांना पुत्ररत्न झाले. बाळपणीच यांची बुद्धी तीव्र असून वृत्ती वैराग्यशील होती. संस्कृतचे शिक्षण यांनी लहानपणी घेतले आणि चरितार्थासाठी ते मुंबईस आले व एका कापडगिरणीत त्यांनी नोकरी पत्करली, कामगारांचे जीवन जवळून पाहिले. काही दिवस शिक्षणखात्यातही त्यांनी नोकरी केली. पुढे ताराबाई नावाच्या स्त्रीशी त्यांनी विवाह केला.
जगातील सर्व धर्मांचा अभ्यास त्यांनी केला होता. त्यांचे भ्रमण सर्वत्र असल्यामुळे त्यांना लोकांची स्थिती नजरेसमोर होती. भट - भिक्षुक, पंड्ये - बडवे, भोंदू – साधुसंत यांच्या मिठीतून त्यांना लोकांना मुक्त करावयाचे होते. मुंबईतील परळ, लालबाग, काळाचौकी, करी रोड, प्रभादेवी इत्यादी ठिकाणच्या कामगारांमध्ये त्यांनी प्रचार केला. दारू, गांजा, अशी मादक द्रव्ये घेऊ नयेत असा त्यांचा उद्देश होता. ब्रह्मानुभव, भक्तिरसधारा, अमृतविचार, अभंगावली इत्यादी त्यांचे ग्रंथ आहेत. ‘जातवेल’ नावाचा त्यांचा एक ग्रंथ संप्रदायात मान्य आहे. यांच्या परंपरेत सुसेन महाराज, सदानंद महाराज आणि ब्रह्मानंद महाराज यांनी फार मोठे कार्य केले.
अगदी अलीकडे म्हणजे १९९८ मध्ये या संप्रदायातील पद्मनाभस्वामी यांची शतकोत्तर सुवर्णजयंती व ब्रह्मानंदाचार्य यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा मोठ्या थाटाने साजरा झाला. या निमित्त सद्गुरुचरणामृत नावाची एक उपयुक्त पुस्तिका तयार झाली आहे. गोव्यातील कुंडई येथील ‘श्रीक्षेत्र तपोभूमी’ आश्रम आता प्रसिद्ध झाला आहे. याच पद्मनाभस्वामींच्या परंपरेत चिंचखरीस (रत्नागिरी जिल्हा) भंडारी समाजातील बोरकर नावाच्या एका घराण्यातील ‘श्रीगजाननमहाराज’ (समाधी सन, १९६०) यांनी दत्तभक्तीचे रोपटे रुजविले, वाढविले. चिंचखरीस गाणगापुराचे महत्त्व श्रीगजाननमहाराज बोरकर यांच्यामुळेच आले. गुरुचरित्राची पारायणे, अखंड नामसप्ताह, कीर्तने व प्रवचने यांनी हा परिसर जागृत झाला. श्रीपद्मनाथसंप्रदायी श्रीगजाननमहाराज बोरकर यांची दत्तोपासनेची परंपरा श्रीअवधूतस्वामी उर्फ मोरेश्र्वर वासुदेव लिमये हे मुंबईस दादर येथे निष्ठेने चालवीत आहेत.
पद्मनाभाचार्य स्वामींनी लिहिलेले साहित्य
श्री जातवेद माहावाक्यांग (समूळ वेदांंचे सार) एकूण १८ खंड
श्री ईशस्तवराज ग्रंथ
सुबोध भजन मालिका
वेदांत कौमुदी (वेदांचे गुज)
समूळ सृष्टीची रचना दर्शविणारे तक्ते