मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष|
श्री श्रीधरस्वामी महाराज

श्री श्रीधरस्वामी महाराज

दत्त संप्रदायातील सत्पुरूष


नाव:  श्रीधर  नारायण  पतकी
जन्म:  नांदेड जिल्ह्यातील देगलुर लाडचिचोळी कर्नाटक येथे ७ डिसेंबर १९०८,  मार्गशिर्ष पौर्णिमा (दत्तजयंती), देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण.
आईवडिल:  कमळाबाई/नारायणराव.
कार्यकाळ:  ७ -१२-१९०८ ते १९-४ -१९७३.
समाधी:  १९ एप्रिल १९७३.
श्री श्रीधरस्वामी महाराज श्री श्रीधरस्वामी महाराज

पतकी घराण्यात पूर्वजांकडून अकारण नागदेवतेची हत्या झाली हा नागदेवतेचा शाप नारायणरावांच्या कुळाला होता. या शापातून मुक्तीसाठी ज्योतिषाच्या मार्गदर्शनाप्रमाणे नारायणराव व कमळाबाईंनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे प्रयाण केले. श्री क्षेत्री या दांपत्याने कठोर तपसाधना केली. भिमा-अमरजा संगमावर स्नान करावे, अश्वत्थ, औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालाव्यात, नारायणरावांनी गुरूचरित्र वाचावे, सौं नी ते एकनिष्ठेने ऎकावे. दोघांची मनोभावे व सात्विक साधना फलित झाली. श्री गुरूंनी प्रसन्न होऊन ओटीत श्रीफळ व दोन केळी प्रसादरूप दिली. या कृपाप्रसादाप्रमाणे झालेला श्रीदत्तात्रेयांचा अवतार म्हणजेच प. पू. श्रीधरस्वामी होत.

भगवान श्री श्रीधर यांचे मूळचे नाव श्रीधर नारायण पतकी असे होते. हे पतकी कुटुंब महाराष्ट्रातील नांदेड जिल्हयातील आजोळी ‘लाडचिंचोळी’ या गावी दि. ७ डिसेंबर १९०८ साली मार्गशीर्ष पोर्णिमेला म्हणजेच दत्तजयंतीला झाला.

लहानपणापासून त्यांना कथा-कीर्तनाची आवड होती. वडिलांच्या पश्चात त्यांच्या मातोश्रींनी त्यांना रामायण-महाभारतातील गोष्टी सांगितल्या होत्या. तेव्हापासूनच त्यांची श्रीरामावर श्रध्दा बसली होती. लहानपणीच त्यांनी सौरसूक्त, रूद्र, वैश्वदेव, त्रिसूपर्ण इ. ची संथा घेतली होती. लौकिक दृष्टीने शालेय विद्याभ्यासाबरोबर वैदिक धर्मकर्माचाही अभ्यास ते करीत असत. १९२४ साली ते पुण्यात शिक्षणासाठी आले. लो.टिळकांनी त्यांच्याबद्दल, ‘हा विद्यार्थी जगवंद्य असा महापुरूष होईल’ असे भाकित लिहिले होते, ते शब्दश: खरे ठरले. पुणे विद्यार्थीगृहात ते विद्यार्थी व शिक्षकात अतिशय प्रिय होते. देशासाठी, समाजासाठी व धर्मासाठी कार्य करण्याचे बीज याच काळात त्यांच्या मनात खोलवर रूजले गेले. भारतीय आर्य संस्कृती, वेद, उपनिषदे, पुराणे यावर त्यांची श्रध्दा होती. समर्थ रामदासांचे चरित्र वाचून त्यांनी केलेल्या तपासारखे तप आपणही करावे असे त्यांना वाटू लागले. सनातन आर्य धर्माच्या प्रसारासाठी जीवन समर्पित करावयाचे असे त्यांनी ठरविले होते.

सन १९२७ च्या नवरात्रात दस-याचे दिवशी सीमोल्लंघन करून ते तपासाठी पुणे सोडून सज्जनगडावर पोहोचले. ‘जय जय रघुवीर समर्थ’ म्हणत त्यांनी समर्थांच्या समाधीचे व श्रीराम प्रभूंच्या मूर्तींचे दर्शन घेतले आणि गडावर श्रीधरबुवा रामदासी म्हणून राहू लागले. जप, तप, सेवा, अभ्यास, दासबोध वाचन, करूणाष्टके पठण असा त्यांचा नित्याचा परिपाठ असे. १९३० च्या दासनवमीच्या दिवशी श्रीधरांना समर्थांचे दर्शन झाले. श्रीधरांना या काळातच विदेह अवस्था प्राप्त झाली.
श्रीधर स्वामी श्री श्रीधरस्वामी महाराज

श्री समर्थांच्या आज्ञेने गडाच्या दक्षिणेच्या बाजूने उतरून, जंगलातून गोकर्ण-महाबळेश्वरला गेले. त्याठिकाणी शिवानंद योगी व स्वामींची भेट झाली. अतूट नाते निर्माण झाले. पुढे ते शिवानंदांच्या आश्रमात कर्नाटकात शिगेहळ्ळीला राहिले. तेथे तप: साधना केली. असेच पुढे जाता जाता कोडसाद्री या पर्वतावर श्रीधर तप करीत असता त्यांना आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी दर्शन दिले. त्यांना ब्रम्हासनावर बसविले. तेथे रिद्धिसिद्धी योगिनी, शक्तिदेवता प्रकट झाल्या व सांगितले की, “आपल्या धर्मकार्यासाठी आमचे आशिर्वाद व सहाय्य राहील.” सन १९३५ चे सुमारास ते पुन्हा गडावर  आले. त्यांचे हातून रामगौरव, श्रीरामपाठ, श्रीसमर्थपाठ, मारूति माहात्म्य, स्वात्मनिरूपण हे साहित्य निर्माण झाले. कानडी, इंग्रजी, संस्कृत व मराठी भाषेतून तत्वज्ञानपर चिंतन त्यांनी ग्रंथरूपाने लिहिले.

सन १९४१ मध्ये शिवानंदस्वामींनी देह ठेवल्यावर शिगेहळ्ळीला मठाची व्यवस्था श्रीधरांनी पाहिली. मठाचे नूतनीकरण व विस्तारीकरण केले. नंतर गडावर आले व पुढे महाराष्ट्रात भ्रमण करून पुन्हा सन १९४२ साली ते शिगेहळ्ळीला परत आले. त्या आश्रमात त्यांनी “विजयादशमी”च्या मुहूर्तावर संन्यासदीक्षा घेतली. आता श्रीधरबुवा हे ‘श्रीधरस्वामी’ म्हणून प्रसिध्दीस पावले. श्रीधरस्वामींच्या प्रतिभासंपन्नतेने ते अनेकांचे श्रद्धास्थान बनले. समर्थांनी प्रत्यक्ष दर्शनात श्रीधरस्वामींना “भगवान” म्हणून संबोधिले होते.

१९४७ पर्यंत कर्नाटकातील संचारानंतर उत्तर भारतात बहुतेक सर्व श्रद्धेय तीर्थक्षेत्रांना भेटी देत पारायणे, यज्ञयागादि कर्मे केली. समर्थांची ३५० वी जयंती मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरी केली. लोकांच्या अडीअडचणी उपासनामार्गाने सोडविण्यासाठी मार्गदर्शन करू लागले. आता त्यांच्या कीर्तीचा सुगंध सर्वत्र पसरला होता. सन १९४९ साली गुरूपोर्णिमेला श्रीधरस्वामी गडावर आले. ‘समर्थ सेवा मंडळाची’ स्थापना केली. गडावर अनेक सुधारणा केल्या. समर्थांच्या वाड.मयाचा, तत्वज्ञानाचा प्रसार आता जोरात सुरू झाला. समाजजागृती करून धर्मप्रसाराचे त्यांचे कार्य अविरत सुरू झाले.

१९५३ साली वरदपूर या पुण्यभूमीवर “श्रीधराश्रम” स्थापन केला. हे स्थान अगस्ती ऋषींची तपोभूमी होय. हे क्षेत्र कर्नाटकात सागर जिल्ह्यात आहे. येथे दुर्गाम्बा देवीचे मंदिर आहे. अनेक पवित्र स्थानी, उत्सव व धर्मपारायणादि कार्ये सुरू झाली.

इतके असूनही श्रीधरस्वामींना एकांतवास प्रिय असे. त्यांनी एकूण १३ वर्षे एकांतवास केला होता. ज्यांचे मन सतत आत्मारामाशी (भगवंताशी) रमबाण होते. तोच एकांत होय. अशा या श्रीधरस्वामींनी १९६७ साली पुन्हा एकांत साधना सुरू केली. चैत्र वद्य व्दितीयेला दि. १९ एप्रिल १९७३ साली रोजी सकाळी नऊच्या सुमारास ‘ओंकाराचा तीन वेळा उच्चार करून श्रीधरस्वामींची ज्योत अनंतात विलीन झाली.
श्री श्रीधरस्वामी महाराज श्री श्रीधरस्वामी महाराज

पू. स्वामीजींचे जीवन म्हणजे,

साधक भावे नमस्कार घाली । त्याची चिंता साधूस लागली । अखिल मानवाला,

साधक, मुमुक्षु सर्वांना त्यांच्या त्यांच्या साधनेच्या अधिकाराप्रमाणे ममतेने, कधी जिव्हाळ्याने, वात्सल्याने, कधी कठोर बनून विचारांनी ज्ञानदान दिले. बोध दिला त्याचे हे चिंतन आहे. पू. श्रीधरस्वामी म्हणत असत, ‘मनुष्याने आपल्या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे व त्याने मंगलमय नित्यानंदस्वरूपी परमपवित्र परमानंदरूपी भगवंताला जाणून घ्यावे. तो सत्यस्वरूपी आहे. अशा भगवंताची प्राप्ती करून घ्यावी हेच मानवी जीवनाचे ध्येय असावे.’

हे विश्व हीच एक सुखाची प्रयोगशाळा आहे. प्रत्येक मनुष्य सुखासाठी धडपडत असतो. सुखाचे ध्येय एकच आहे व तिचे प्रवृत्ती व निवृत्ती हे दोन मार्ग आहेत. या दोन्ही मार्गाने सुख प्राप्त होते पण प्रवृत्तीपासून वैषयिक सुख प्राप्त होते तर निवृत्तीपासून आत्मिक सुख प्राप्त होते.

वैषयिक सुख म्हणजे विषयापासून मिळणारे सुख! हे सुख वस्तुसापेक्ष, देहइंर्दियगम्य, क्षणभंगुर, भोगान्ती वीट आणणारे, भोग, रक्षण, नाश व भोगान्ती सर्वकाळ दु:ख देणारे, खरे सुख विसरावयास लावून, आपले वेड लावून आपल्या नादाने जन्माला कारण देणारे, कधी शांती, समाधान, तृप्ती न देणारे, हाव वाढविणारे, मृत्यूस कारणीभूत होणारे, पुन्हा जन्मास कारणीभूत होणारे, रागव्देष वाढविणारे, मनुष्याला रोगी बनविणारे, मन-इंद्रियाला ओढ वाटणारे असे असते. आत्मिक सुख म्हणजे वैषयिक सुखाविरूध्दची लक्षणे होत. विषयसुखाला ‘संसारसुख’ म्हणतात. तर आत्मिक सुखाला ‘मोक्षाचे सुख’ म्हणतात. हे सुख मनुष्याला जन्ममरण फे-यातून सोडवित असते. असे हे सुख अनंत व अविनाशी असते.

वैषयिक सुख हे ‘प्रेय’ असून आत्मिक सुख हे ‘श्रेय’ आहे. भगवंताला जाणण्यासाठीच एक उपाय म्हणजे ‘आत्मज्ञान’ होय. आत्मज्ञान हेच संसार महासागरातील सेतू आहे. मनुष्याला ‘मी’ हा जाणीवेचा अनुभव असतो. त्यातच आपले निराकाराचे अव्दितीय ज्ञानानंदस्वरूप प्रकट होते. यासाठी ‘मी’ हा देहातून अगदी निराळा आहे, हे समजणे-वाटणे हाच विवेक होय. मनुष्याच्या जीवनात जिव्हेंद्रिय, कामेंद्रिय व संपत्ती ही जीवनाची तीन व्दारे आहेत. याची सुरूवात म्हणजे सुग्रास अन्न, कांता व कांचन याचा अति लोभ होय. यावर विवेकाचे अंजन हवे  आहे. देहबुद्धी, देहाभिमान, ममत्व यांचा त्याग हाच ‘कामा’वर विजय मिळविण्याचा मार्ग आहे. त्याचा समूळ सबीज त्याग म्हणजे मोक्षप्राप्तीचा मार्ग होय. जीव त्रिगुणांमुळेच एका लोकात जन्म घ्यावा लागतो. ह्या त्रिगुणावर विजय म्हणजे केवळ आत्मसुखाचा अंगिकार हाच होय. मनुष्याने जीवनात पवित्र आचरण आणि गोड स्वभाव ठेवावा. हा आदर्श मानवी जीवनाचा अचूक कस आहे. आई-वडील, कुलपुरोहित, सद्गुरू, गोब्राम्हण, कुळधर्म, कुळाचार, देव-देवतांबद्दल आदर बाळगून असणे हे अभ्युदयाचे लक्षण आहे. या सर्वांची सेवा करून मनुष्याला सर्वोत्कृष्ट जीवनाची प्राप्ती होते. तसेच सोवळे हे पावित्र्याचे द्योतक आहे. यांनी जीवनाला दिव्यता प्राप्त होते. परिश्रम केल्याशिवाय देवाशी मैत्री होत नाही. तसेच देवाचे साहाय्य प्राप्त होत नाही.
श्रीधर स्वामी पादुका वरदपूर श्रीधर स्वामी पादुका, वरदपूर

आत्मा परमात्मा यामध्ये भेद नसतो. अज्ञानाने भेद आहे असे वाटते. ही व्दैत भावना नाहीशी झाली पाहीजे. यासाठी ‘तया देवभक्तां एकांत । करी तो सद्गुरू ॥’ देव भक्तांचे जीव-शिव ऎक्य करून देतो तोच सद्गुरू असतो. यासाठी मनुष्याने श्रवण, मनन, चिंतन, निदिध्यास करावा. प्रपंच्याचा लय हा मनात करून, मन हे बुद्धित लीन करावे. बुद्धीने ‘मी’ असे समजणे व मी असे समजून घेताना, जी हिरण्यगर्भातील (विश्वातील) संकल्प संपून जातो व जीव हा शांत व आनंदधन स्वरूपात लीन होऊन राहतो. यातून समजून येते की, भगवंत हाच सर्व प्रकारच्या उपासनेचे स्वरूप असते. हीच खरी स्वयंप्रकाशस्वरूपाची उपासना असते. सर्व कार्य हे जड असते. त्यांना प्रकाशमान वा गतिमान करणारे इतर कोणीतरी असते. तोच स्वयंप्रकाशी भगवंत असतो. हाच प्रकाशक व प्रकाशित तसेच अनंतस्वरूप असतो.

यासाठी साधकांनी भगवंत, सद्गुरूंवर परिपूर्ण श्रद्धा ठेवावी. विनयशीलता, लीनतेने व सद्गुणांच्या अंगिकाराने भगवंत आपलासा करावा. नेहमी सर्वांच्या हिताचे मित व मधुर बोलावे. असे जो जाणतो त्यास भगवंताची भीती नसते. सर्वांतर्यामी देवाची वस्ती आहे, हे ओळखून वागावे. कुणाचाही कशाप्रकारचाही अपमान होऊ नये हे पहावे. शाब्दिक मार हा देहिक मारापेक्षा जास्त दु:खद असतो. एकदा आपल्या प्रामाणिकतेवर विश्वास बसला की सर्वजण आपले मित्र बनतात. काया, वाचा, मनाने कुणाचेही वाईट चिंतू नका. सदैव आपले मन परिशुद्ध ठेवावे. आंतर्बाह्य चांगलेच वागणे असावे. ज्याला सज्जनांची मान्यता मिळते त्याला देवाची कृपा लाभते. धनप्राप्तीही न्याय्य असावी. जसे आपण वागत असतो तसेच इतरही वागत असतात. परद्र्व्य व परस्त्री यांच्याविषयी मन शुद्ध असावे. दुर्गतीस या गोष्टी कारणीभूत ठरतात. श्रीगुरू हे परमात्म्याचेच रूप ओळखून वागावे. देवाच्या व गुरूसेवेत आपले वैभव वापरावे. देव व श्रीगुरू हे आपल्या जीवनाचे आधार आहेत हे विसरू नये.

प. पू. श्रीधरस्वामीच्या एका पत्रसंग्रहात एक वाक्य असे आहे, “बाळ, श्रीगुरूपरमात्म्याच्या अनुग्रहाने तुझ्यात सारे सद्गुण सदैव असोत. तुम्ही सारेजण श्रीगुरूचे महत्व सांगणारे दीपस्तंभ व्हा व आपल्या प्रकाशाने सदैव देदिप्यमान राहा.”

प. पू. श्रीधरस्वामीचे अनुगृहित शिष्य श्रीरामास्वामी आपल्या गुरूच्या आज्ञेनुसारच श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान श्री क्षेत्र पिठापूर या क्षेत्रीजाऊन सुमारे ५० वर्षापेक्षा अधिककाळ व्यतीत केलेला आहे. तेथे जन्मस्थान, कुक्कुटेश्वरमंदिर व परिसर विकासाचे काम अव्याहत करीत आहेत. आजही वयाच्या ९५ व्या वर्षी भक्तनिवास संस्थान व मंदीर येथील व्यवस्थापन संभाळीत आहेत.
श्री श्रीधरस्वामी महाराज श्री श्रीधरस्वामी महाराज
श्रीधर स्वामींचा कुरवपूर येथे निवास

शके १९६१ चैत्र मासात स्वामी कुरवपूर ला निघाले. कृष्णा स्टेशन येथे उतरले असता जवळच्या कृष्णा नदीत स्नान केले. स्वामींना पाहून त्या गावातील एका वृद्ध माणसाने स्वामींचा अधिकार ओळखून स्वामींना भिक्षे करीता आमंत्रित केले. स्वामींनी करतल भिक्षा ग्रहण केली.
भिक्षे नंतर त्या वृद्ध ब्राह्मणाने स्वामींना सांगितले बऱ्याच वर्षांनी आमच्या घरी ब्रह्मनिष्ठ संन्यासाचे पाय लागले, या आधी टेम्बे स्वामी यांनी या घरी भिक्षा ग्रहण केली आहे हे समजल्यावर स्वामींना फार आनंद झाला. दुसऱ्या दिवशी पहाटे पाच च्या सुमारास नदी पार करून स्वामी कुरवपुरास आले. समाधी मंदिरात दर्शनासाठी गेले असता स्वामींची भावसमधी लागली. हा प्रकार पाहून हे कोणीतरी सिद्ध पुरुष असावेत हे ओळखून वे. मु. भट्ट ह्यांची स्वामींवर श्रद्धा बसली व त्यांनी स्वामींच्या वास्तव्याकरिता कुटी व भिक्षेसाठी लागणाऱ्या साहित्याची सोय केली.

स्वामी प्रातः स्नान, आन्हिक, देवदर्शन करून मध्यान्ही पावेतो गुहेतच बसून महानैवेद्य नंतर करतल भिक्षा घेत. दुपार नंतर साधकांना मार्गदर्शन करीत सायं संध्ये नंतर साधकांचे भजन होई. थोड्या दिवसांनी स्वामींनी त्यांच्या समवेत आलेल्या दत्ता बुवाना परत पाठवुन एकटे राहिले. त्रिकाळ स्नान, कडुनिंबरस पान करून आत्मरूपात ध्यानस्थ असा स्वामींचा नित्यक्रम होता. श्रींच्या गुहे वरील भागात एक महादेवाचे मंदिर होते. स्वामींनी तिथे त्रिकाळ अभिषेक सुरू केला. अभिषेक सुरू केल्यावर एक ऐन तारुण्यातील अंदाजे अठरा वर्षाचा एक तरुण कृष्णा घाटाच्या पायऱ्या वर चढून येत असलेला दिसला. त्याचे शरीर निळसर होते, मस्तकावर जटाभार व मुकुट शोभत होता, कमरेवर व्याघ्रजिन सोडून इतर कपडा नव्हता. तो मंदिरात येऊन अदृश्य झाला. पूर्वी ह्या मंदिरात शंकराचे अस्तित्व होते परंतु रोजची पूजा होत नसल्याने त्याचे वास्तव्य कृष्णा नदीत होते. स्वामींचा त्रिकाळ अभिषेक सुरू झाल्याने त्यांनी पुन्हा शिवलिंगात प्रवेश केला.

काहि दिवसांनी एक वृद्ध नरसोबाच्या वाडीहून स्वामींकडे आले. त्यांना वाडीस दत्ताचा दृष्टांत झाला की तुझे गुरू कुरवपुरास आहेत त्यांची सेवा कर. ते स्वामींच्या समवेत कडुनिंब रस घेऊन साधना करू लागले. ह्यांचे नाव केशवदास. हे अत्यंत क्रोधी होते. एकदा असेच रागावून कृष्णेच्या पैलतीर गेले. एके दिवशी पहाट झाली असे समजून रात्री 12 वाजताच कडुनिंब ची पाने तोडून कुटत बसले. कडुनिंबाच्या पानावर बारीक विषारी जन्तु असावेत ते घेतले तर ते मृत होतील हे जाणून दत्त तेथे प्रत्यक्ष येऊन "अरे तुझे डोके ठिकाणावर आहे का? त्या पानां वर विषारी जन्तु आहेत. रागावून इकडे आलास! गुरूवर रागावणे योग्य आहे का? गुरुसेवेने पुनीत व्हावे म्हणून तुला इकडे पाठवले पण सेवा न करीता तू त्यांना वाटेल तसे बोलून इकडे आलास हे योग्य आहे का? अरे तुझे गुरू किती शांत आहे त्यांची क्षमा मागून सेवा करून पावन हो असे सांगून अदृश्य झाले. केशवदास कुरवपुरास येऊन श्रींची माफी मागून सेवेत रुजू झाले.

जेष्ठ मासात एक ब्रह्मचारी तरुण ह्या ठिकणी अनुष्ठान करिता आला. तो रोज एकादश रुद्रावर्तने करून मध्यान्ह पर्यंत जप करत असे. कोणा कडे जात नसे. ह्याने स्वामींना एकदाही हात जोडले नाहीत असे कोणीतरी म्हंटले असता स्वामी म्हणाले "बाळ! ही सगळी बाह्यांगी साधने असून तत्वनिष्ठात दुसरे कोणी नसून आपणच एकमेव आहोत असा निश्चय कधीही असू शकतो. त्यात वावगे काही नाही". पुढे त्या ब्रह्मचाऱ्याची सर्व सामुग्री सम्पली असता स्वामींनी गणपती मास्तर ह्यांना सांगून दीडशे रुपये त्या साधकास दिले. एकदा स्वामी बाहेर आले असता त्या साधकाच्या कुटी बाहेर गुरू गुरू असा आसन्न मारणावस्थेतील मनुष्याचा आवाज आला. आत गेले असता तो डोळे वर करून मरणासन्न अवस्थेत विव्हळत असलेला दिसला. त्यास ब्रह्मरक्षसाची बाधा झाल्याचे स्वामींना कळले तो ब्रह्मराक्षस पूर्वीचा गौतमाचार्य मुनी होता तो चारी वेद सम्पन्न होता. स्वामींनी त्यास जाब विचारताच "मी ज्या प्रमाणे भ्रष्ट झालो त्या प्रमाणे येथील साधकांना भ्रष्ट करेन" उत्तरला. स्वामींनी त्याच्या डोक्यावर कुबडीने प्रहार करून तुला बंधनात राहायचे की मुक्ती हवी विचारले. मुक्ती हवी असे सांगून तो शरण आला. त्याने भ्रष्टविलेले साधक पण त्या समवेत ब्रह्मरक्षस होऊन त्या समवेत असत व तो बलिष्ठ गर्विष्ठ होता देवतांची हि पर्वा करीत नसे. त्याला मुक्ती देऊन ब्रह्मचारी साधकास हि स्वामींनी सोडविले व आपल्या कुटीत राहण्यास सांगितले. प्रत्यक्ष गुरू च्या सानिध्यात साधना करणार्यांना कुठलीही दुष्ट शक्ती त्रास देत नाही हेच ह्यातून सिद्ध होते.

श्रावणात श्रीं नी श्रीपाद श्रीवल्लभांना पुजाऱ्या द्वारे रोज अभिषेक करून उपस्थित सर्वाकरीता पक्वान्नाचा नैवेद्य करविला. ह्याच मुक्कामात स्वामींनी "दत्तस्तवराज" हे काव्य रचले.
श्रीधर स्वामी श्रीधर स्वामी
श्रीधर स्वामी म्हणत!

१) 'दृश्यमान अशा या विश्वाला कारण असलेले ब्रह्म आनंदरूपच आहे. उत्पन्न झालेली सर्व दृष्टी आनंदाच्या शक्तीनेच जीवंत आहे. आपले मुलकारण असलेल्या आनंदाकडेच तिची सारी धावाधांव आहे आणि शेवटी सर्व सृष्टी आपले मुलकारण असलेल्या आनंदात प्रविष्ट होऊन त्यातच एकरूप होत असते' असे श्रुतिमातेचे म्हणणे आहे. वस्तुतः हा शोध पुर्णपणे मुलग्राही असून तो अंतिम शोध होय. याच्यापेक्षा कोणताही मोठा शोध 'न भुतो न भविष्यति' आजपावेतो झाला नाही व पुढेही होणार नाही. हीच सर्व शोधांची परिसमाप्ती, परिपूर्णता असून उद्देशजाताची पुर्ती आहे. हिच्यामध्येच विश्वमित्रांच्या प्राप्तव्य भावनेची व तृष्णेची शांती होते. अहर्निश प्रयत्नशील अशा मनाच्या सुखपिपासा येथे येऊन पुर्णपणे शांत होतात. सुखाच्या अचुक शोधामुळे विश्वातील अहमहमिकांचा अंत होतो. त्याची सारी तडफड नष्ट होते. विकारांची निर्विकारांमध्ये परिणती होते. समरांगण बनणारे जग आनंदात विलीन होऊन त्यांत बुडून ते एक पवित्रतम ध्यानक्षेत्र बनते. या शोधाच्या योगाने विश्वातून दुःखाचा अस्त होतो. शोक सुकून जातो व कमी असलेले पुर्ण होते. मोठ्यात मोठ्या श्रीमंतापासून अठराविश्वे दारिद्रयाने संत्रस्त झालेल्या जिवापर्यंत सर्वाचे जीवन शांत, नित्यतृप्त, अचल अशा समाधानाने परिपुर्ण सर्वसमान, अनंतसुखात्मक आणि त्यातच सत्यसुखमय बनते यांत किंचीतही संदेह नाही.
 
२) सर्व जण एकमताने वागा. आपलाच हेका न चालविता सर्वांच्यामते जे युक्त असेल तसे दुराभिमान सोडून वागण्याची धीरोदत्त संवय तुमच्या आंगवळणी पडू द्या. खेळीमेळीने सर्वही कामे व्हावीत. निस्पृहांचे जीवन जगत्कल्याणाकरता असते. तो विश्वसुखमूर्ती असतो, निस्पृहाने आपले ब्रम्हानंदात्मक जीवन जगद्हिताचे आहे असे मानावे.

३) पुढच्या सुखस्वप्नांचा उत्साह आणणा-या आनंददायी कल्पना करीत होईल तितके विवेक-विचाराने सेवेचे काम सुव्यवस्थितपणे पार पाडा. संघटित कार्यात शांति, समाधान लाभून कोणी एकावरच कामाचे ओझे पडत नाही. 'योगिन: कर्म कुर्वन्ति सड:गं त्यक्त्वाssत्मशुद् ये!' आपल्या प्रत्येक कामांतून आत्मसमाधान वाढत गेले पाहिजे.

४) खरें बोला, नीतिन्यायाने शुद्ध आचरण ठेवा, मद्य पिवूं नये, मांस खांऊ नये, परस्त्रीची अभिलाषा धरू नये, कोणालाहि दुखवू नये, असा साधा उपदेश तरी माना! परदारा-द्रव्य-भूमी अभिलाषूं नका, निर्व्यसनी असे पवित्र जीवन चालवा, परोपकारी पावन असे चारित्र्य राखा, सत्कर्माने पवित्र आयुष्य घालवा, परस्त्री मातेसमान माना. परद्रव्य विषाप्रमाणे समजा.

५) परहिंसा म्हणजेंच स्वनाश हे ओळखा. देव, गुरू, वेद, गाय, देवप्रतिमा यांची सच्चिदानंद परमात्म्याच्या भावनेने पूजा करा. धर्ममार्गाने वागून संपादिलेल्या द्रव्याचा विनीयोग स्वकुटूंबभरण, परिजनपोषण, दीनजनरक्षण, देव-गुरू-सेवा यांत करा व देवमाणुस होऊनच जगा.

६) आपणात आळस नसावा. वेळेचे महत्व फार मोठे आहे. ज्यावेळचे काम त्यावेळी झाले नाही की फार नुकसान होते. पांच मिनिटांच्या दिरंगाईने नेपोलियनास हार खावी लागली. एका सरदाराच्या मूर्खपणामुळे नेपोलियनला किती भोगावे लागले बरे! कोणतेहि काम दक्षतेने वेळेवर होण्याविषयीचे हे एक ऐतिहासिक उदाहरण प्रत्येकास धडा देणारे आहे.

७) हातपाय दणकट व घट्ट असले तरच काही कार्य होत असते. गबाळेपणा थोडासुध्दाहि असू नये. 'सावध, साक्षेंपी आणि दक्ष' हेच श्री समर्थां मान्य आहे. कोणचेच कार्य शिस्तीशिवाय यशस्वी होत नाही.

८) प्रथम मुलाचे उपनयन, मग लग्न, मग मुलींची लग्ने, नंतर नातवंडांची उपनयने, लग्नें व हे संपल्यानंतर सर्वसंगपरित्याग करूं, असे मानव मनांत ठरवितो. मुलामुलींची लग्ने होतात, मग नातवंडे होतात व हे सर्व होऊन कांही वर्षे लोटून गेली तरी  त्यांचे पुढील संस्कार पहावेत ही आशा कायमच असते. या प्रकारे विषयी जनांची आशा दिवसेंदिवस वाढत असते. आशारूपी अग्नि सर्वभक्षक आहे. संसारात सर्वकाही ठाकठीक करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो पूर्ण होत नाही. शेवटी आयुष्य संपून अपेक्षा नसतांनाही यमराजाचे पाहुणे व्हावे लागते. पण वासना शिल्लक राहिल्याने त्याचे 'पुनरपि जननं पुनरपि मरणम्' चालूच राहाते.

९) दयाळू परमेश्वराने जीवांना वैराग्य प्राप्त व्हावे आणि अवीट सुखाचा शोध लागावा म्हणून वीट आणणाऱ्या पदार्थाचा, देहाचा, अवस्थांचा, त्यांच्या अनुभवाच्या अभिमानांचा परिचय जीवनात सर्वांना करून दिला आहे. थोडासा विचार केल्यास सुषुप्तीत जे सख उरते ते, जागृतावस्थेच्या, स्वप्नावस्थेच्या आणि सुषुप्तीतल्या अज्ञानाच्या त्यागाने त्याच्याशी एकरूप होऊनच लाभते व तेच सुख अवीट असल्यामुळे त्याच्या प्राप्तीकरता या सर्वांचा त्याग प्रत्यही घडत असतो हे स्पष्ट होते ही गोष्ट समजून घेऊन त्या निष्ठेत रहाण्यास जागृत, स्वप्न, सुषुप्ती या तीन अवस्थांचा अनुभव एक पुरे, यावरच स्वतंत्रपणे विचार केला तरी प्रत्यही येणाऱ्या अनुभवावरून त्यागाचे महत्त्व, जगाचे मिथ्यत्व, एकात्मत्य आणि सर्वांचे आनंदरूपत्व स्पष्टपणे कळुन येण्यासारखे आहे. जागृत स्वप्नातील देहात्मबुध्दीला, विषयवासनेला, भेदाला आणि विविधतेला कारण, एक आनंदस्वरूपाचे अज्ञानच हे सुषुप्तीतील 'आनंद झाला 'व' काही समजले नाही' या अनुभवावरून समजून येते. आनंदाचा अनुभव आला तो तेथे आनंद असल्यामुळेच, काही समजले नाही अशा स्वरूपाच्या अज्ञानाचा भाव प्रगट करतो व त्यामुळेच स्वप्नजागृतीतील सृष्टीची व त्यामधून घडणाऱ्या मानसिक तसेच दैहिक व्यवहाराची उत्पत्ती होते हे समजून येते. अज्ञानाच्या नाशाने अद्वितीय आनंदस्वरूपाशी ऐक्य होऊन दृश्य वासना नाहीशी होते, दृश्याभास ओसरतो व जन्ममरणाचा हिशोब आटोपतो हे स्पष्ट होते. यालाच ब्रह्मैक्य, स्वरूपानुभव, मोक्ष अथवा जीवनमुक्ति असे म्हणतात.

१०) आनंद म्हणजे ब्रह्म. परब्रह्माची प्राप्ती म्हणजेच आनंदाची प्राप्ती. हाच सिध्दांत सांगावयास श्रुति प्रवृत्त झाली आहे. त्यासाठी तात्विक उपदेश म्हणून तिचे असे सांगणे आहे की, 'हे सारे विश्व आनंदरूप आहे.' या जगात आनंदाशिवाय खरोखरच दुसरी वस्तूच नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपण याची खरोखरच प्रचिती घेतली तर हे जग म्हणजे एक आनंदाचा गाभा आहे. हे जग म्हणजे आनंदरूपच, असा जेव्हा अनुभव येईल तेव्हाच 'तत्वसाक्षात्कार' झाला असे होईल. आनंद हेच आपले खरे स्वरूप, आनंद हेच जगाचे रूप हे तत्व अनुभवणे म्हणजेच 'तत्वसाक्षात्कार' आनंद हेच परमात्म्याचे खरे स्वरूप. तेथे दु:ख, शोक, विकार हे काही सुध्दा नाहीत. 'आनंन्देन खल्विमानि भूतानि जायन्ते ।' हे जग आनंदानेच उत्पन्न झाले असे तयाचे स्वरूप. आनंद हेच त्याचे स्वरूप. आनंद हेच जीवन आहे. आनंदासाठीच प्रयत्न करून, आनंदासाठी जगून आनंदरूप होऊन रहावे, आपला देहही आनंदरूपच म्हणून रहावे, समजून न समजताच आनंदासाठीच प्रयत्न करून आनंदरूप होऊन रहावे हीच मुक्तता. आनंदामुळे जे उत्पन्न झाले, आनंदामुळे जगत आहे, त्याच्याकडेच ज्याची धाव आहे व ज्याच्यामुळेच ज्याच्यातील जीव शांत होतात, आनंदरूप होतात तेच हे जग, असे श्रुति म्हणते.

११) ध्यानाचे बरेच प्रकार आहेत. ध्यानाने दृष्टीसाधन घडून तेजाचा साक्षात्कार होतो व आत्मा सर्वप्रकाशक आणि स्वतज्ञ स्वयंप्रकाशक आहे ही जाणीव उत्पन्न होऊन क्रमेण 'आत्मसाक्षात्कार' होतो. उपासनेचे सगुण ध्यान सावयव, साकार असते तर निर्गुण ध्यान आनंदरूपाच्या केवळ जाणिवेचे असते. चरणांगुष्टापासून ध्यान करीत करीत संपूर्ण मूर्तीचे ध्यान दृढ करावे व नंतर उपासनेच्या कृपापूर्ण हास्यांत प्रगट झालेल्या स्वरूपानंदाच्या जाणिवेचे ध्यानच एकमेव उरवावे. असा हा सगुणातून निर्गुणात जाण्याचा क्रम आहे.

१२)  'वासनात्मकं मनः | सड्क़कल्पात्मकः मनः | अशा मनाच्या व्याख्या पूर्वाचार्यानी केल्या आहेत. पण ध्यानाभ्यास करणाऱ्या साधकाला सांगावयाचे झाल्यास 'मननात् मनः|' स्वरूपानंदाच्या जाणिवनेंच केवळ सुस्थिर राहणारा तत्वज्ञानाचा अथवा आत्मज्ञानाचा निश्चय म्हणजेच 'मन' म्हणून ज्ञानध्यानाभ्यासी साधकाने मानावे. जो आनंद स्वयंवेद्य आणि स्वमात्र राहणारा आहे त्यालाच 'आत्मा' म्हणजे 'मी' या भानाचे लक्ष्य मानून तदाकारस्थितीत इतर कसलेहि भान न उमटूं देता अधिकाधिक वेळ राहण्याचा अभ्यासच 'समाधीचा अभ्यास' म्हणवून घेतो.

१३) देहाचे अस्वास्थ्य आणि मनाचे अस्वास्थ्य ही दोन्ही आत्मस्थितीत दोष उत्पन्न करतात. महाभयानक अशा जन्ममृत्युरूपी संसारातून मुक्त होण्यासाठी ' तूच आनंदरूप महत् तत्त्व आहेस' असा मी जो उपदेश केला होता, त्यावर निष्ठा ठेवून तत् परायण रहा. त्याने सर्व प्रकारचे दुःख, शोक, दौर्बल्य इत्यादींची निवृत्ति होईल आणि तू आनंदरूपाने चककाशील. हा रोग, तो रोग इतकेंच नव्हे तर संपूर्णपणे तुझा भवरोगच नष्ट होईल.

तू आनंदघन ब्रह्मरूपाने राहा. विचार करून पहा! दैव, प्रारब्ध या सर्व अज्ञानाच्या कल्पनाच आहेत. ज्ञानदृष्टीने द्वैताची कल्पनाहि न होता तूं आपले अविकारी अंतर्बाह्य एकाकार आपलेच स्वरूप असून या शिवाय इतर काहीहि होणार नाहींस.

१४) जेवण करीत असतां जेवणांत लक्ष्य नसेल तर रूचकर अन्नानें पोट भरल्याचे समाधानहि मिळणार नाही हे लक्षात घे!  उपासना करीत असता त्या उपासनेच्या ठिकाणी श्रध्दा, प्रेम, आवड ही असावी लागते. इतकेच नव्हें, तर भटकणाऱ्या मनाला आंतच स्थिर करण्याचा प्रयत्नहि करावयास हवा! केवळ परमार्थाचे नाटक करून परमार्थप्राप्ति घडत नाही हे लक्षात ठेव!  'वेशभूषण तें दूषण | अंतरी भूषण तें भूषण |'  असें समर्थांचे म्हणणे आहे. साधकाने सतत अंतर्मुख वृत्ती ठेवून समाधानाचा शोध घेणें हीच खरी 'उपासना' आहे. दृश्यमान व भासमान होणाऱ्या सर्वांचा संग सोडून अंतरंगात स्वतःचा शोध घेणे हा भगवद्प्राप्तीचा सुलभ उपाय आहे बरं!

१५) आज आपल्या देशात वैदिकधर्म तर अत्यंत हीनस्थितीला पोहोचला आहे. भटजींना, पुरोहितांना थोडीशी दक्षिणा दिल्याबरोबर आपल्या वैदिक कर्माची पूर्तता झाली असे समजणारे पुष्कळजण आहेत. वैदिक धर्माचा संपूर्ण अधिकार दक्षिणेबरोबरच पुरोहितांना देऊन स्वतः ऑफिस किंवा कचेरीस जाणारे ऑफिसरच जास्त झाले आहेत. वैदिक धर्माबद्दल आपल्याला असणारी श्रध्दा ही अशा प्रकारची आहे! पुरोहितांना आपण ज्या दृष्टीकोनातून बघतो ती अत्यंत शोचनीयच आहे. परसातील झाडाला पुरोहितापेक्षा, भटजीपेक्षा जास्त महत्त्व आहे हेच नाही का आमचे धर्माचरण!

आपल्या देशातील काहींची ख्रिश्चन किंवा मुस्लीमधर्माकडे जास्त आसक्ती होऊ लागली आहे. आपल्या धार्मिक अवनतीला हेही एक कारण आहे. प्राचीन धर्मतत्त्वच त्यानंतर आलेल्या धर्माचे वैशिष्ठ्य. प्राचीन धर्माच्या पायाभरणीवरच नंतरचे धर्म उभे राहिले आहेत. त्यामुळे सनातन धर्मच श्रेष्ठ होय. आपल्या धर्माचे मुळ 'वेद' व वेद ही परमात्म्याची कृपाच ! ब्रह्मज्ञानाचे सार म्हणजे वेद. यावरूनच आपल्या धर्माच्या श्रेष्ठतेची जाणीव होणार, नाही कां?

या भारतीय पुण्यप्रदेशामध्ये असणाऱ्यांकडून संपूर्ण भूमीत असणाऱ्या सर्व मानवांनी आपला श्रेयसाचा मार्ग शिकून घेतला पाहिजे. या मनूच्या उक्तीने धर्माचे वैशिष्ठ्य व्यक्त होत नाही कां? त्याप्रमाणे सर्वच्या सर्व मानवकुळास मार्गदर्शक अशा सनातन धर्माचा आश्रय घेऊन, त्याप्रमाणे आचरण करून सद्यपरिस्थितीवर मात करणे हेच प्रत्येकाचे कर्तव्य!

१६) भगवंताच्या शक्तीमध्ये भक्तांची अचल श्रद्धा पाहिजे आणि तो आपला उद्धार करील हा दृढविश्वासही हवा. विश्वास ठेवल्याने तोटा होत नाही. पण विश्वास न ठेवल्याने हानी होतेच होते. भगवंताबद्दल अचल श्रद्धा असल्याशिवाय केलेले कोणतेही कार्य फलद्रुप होत नाही. अचल निष्ठेने भगवद् आराधना केल्यास मात्र निश्चितपणे फलप्राप्ती होतेच होते. परमात्म्यामध्ये मन गुंतवून ठेवणे फारच कठीण. त्याच्या समोर बसून प्रपंचामधल्या तापत्रयांचे ध्यान करणाऱ्या लोकांवर त्याची कृपा कशी होणार?

मुक्तीला भक्तीच कारण आहे असे म्हटले जाते. पण ती भक्ती अचल पाहिजे. तींत युक्ती वगैरे उपयोगाची नाही. भगवंताचे नामस्मरण करणारे दांभिक आचारप्रवर्तक असे जे लोक असतात ते दिखाऊ भगवद् भक्त होत, ते खरे भगवद् भक्त नसल्याने त्यांना मुक्ती मिळत नाही आणि त्यांच्या या दिखाऊ युक्तीचा काहीही उपयोग होत नाही. श्रद्धा नसेल तर भगवान किंवा भगवद् भक्त यापैकी कोणीही तुमचे कल्याण करू शकणार  नाहीत. अचल श्रद्धेने भगवदाराधाना करणाऱ्या भक्तांना नित्य, निर्विकार, स्वप्रकाशी सच्चिदानंदस्वरूप प्राप्त होते. कनवाळू परमात्म्याच्या कृपेने तुम्हा सर्वांना मी सांगितलेला भक्तिमार्ग लाभो व त्या सच्चिदानंदस्वरूपाचे तुम्हास दर्शन होवो व ते स्वरूप तुम्हाला प्राप्त होवो.
॥ श्रीधर नमन ॥

श्रीगुरुनाथा तुज नमितो, सद्गुरुनाथा तुज नमितो।
श्रीधरयतिवर भक्तकृपाकर, करुणासिंधो तुज नमितो ॥१॥
प्रसन्नवदना तुज नमितो, पवित्रचरणा तुज नमितो।
दीनदयाघन शांत सुशीतल, ब्रह्मनिरंजन तुज नमितो ॥२॥
पतितोद्धारा तुज नमितो, हीनपावना तुज नमितो।
क्लिन्तमना प्रभु ! अभयकराम्बुज, काशायाम्बर तुज नमितो ॥३॥
विकाररहिता तुज नमितो, विरागसहिता तुज नमितो।
विभावविरहित विहासविलसित, विशालनयना तुज नमितो ॥४॥
भवाग्निशमना तुज नमितो, भवनदतारक तुज नमितो।
भस्मविलेपन भारविमोचन, भवभयहारक तुज नमितो ॥५॥
निजानंदगुरु तुज नमितो, निजपददायक तुज नमितो।
ऋषिमुनिसुरवरनरअभिवादित, श्रुतिप्रतिपादित तुज नमितो ॥६॥
षडरिविभेदन तुज नमितो, षडंगन्यासा तुज नमितो।
प्रणवाकारा प्रणवसुशब्दा, प्रणवातीता तुज नमितो ॥७॥
स्वरुपबोधा तुज नमितो, स्वभावसिद्धा तुज नमितो।
सदैव प्रमुदित स्वमात्रतृप्ता, सत्सुखसारा तुज नमितो ॥८॥
सेवकपालक तुज नमितो, शिष्यविमोचक तुज नमितो।
शरणागतसंकटहरणा गुरु, शुभवरदायक तुज नमितो ॥९॥
जगत्पालका तुज नमितो, जगद्रक्षका तुज नमितो।
जगच्चालका जगत्कारणा, जगदातीता तुज नमितो ॥१०॥
विषयातीता तुज नमितो, विश्वपोषका तुज नमितो।
विश्वशांतिकर विषादपरिहर, विश्वस्ता विभु तुज नमितो ॥११॥
आर्तत्राणा तुज नमितो, कृपाकटाक्षा तुज नमितो।
सत्यसनातन पूर्णपरात्पर, सद्गुणसुंदर तुज नमितो ॥१२॥
अज्ञानान्तक तुज नमितो, मोहनिवारक तुज नमितो।
नित्यनिरंतर ज्ञानप्रभाकर, चित्सुखसागर तुज नमितो ॥१३॥

- सुव्रत (पृथ्वीराज भालेराव)

॥ गुरुदेव दत्त ॥
॥ नमो भगवते श्रीधराय ॥
दत्तजयंती दिवशी प्रकटले श्रीमंत परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी

समर्थांची मूर्ती पुनरपि जगी ही प्रगटली । जनोद्धारासाठी सतत फिरली दिनीतली ।
जयांच्या वास्तव्ये वरद नगरी होय वरदा । मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधरपदा ॥

स्वामींचा जन्म गाणगापूर येथील लाड चिंचोळी येथे इ. स. १९०८ साली आजच्या दिवशी झाला, स्वामींनी एकदा आपल्या प्रवचनात उल्लेख केला होता, "आम्ही मूळ गाणगापूर येथीचे असे". स्वामींच्या माता आणि पिता यांनी भगवान दत्तात्रेय यांची खडतर तपश्चर्या करून दत्तात्रेय यांचा मिळालेला प्रसाद म्हणजे श्रीधर स्वामींचा जन्म. म्हणून दत्त जयंती च्या दिवशी, गाणगापूर या पवित्र तीर्थक्षेत्री स्वामींचा जन्म झाला.

महाविद्यालयीन शिक्षणासाठी स्वामी पुण्यात आले, तेव्हा अध्यात्माची ओढ आणि आवड लहानपणापासून च होती तीच ओढ स्वामींना सज्जनगड ला घेऊन आली. अध्यात्मिक साधनेसाठी स्वामी इ. स. १९२७ साली स्वामींचे गडावर आगमन झाले. सज्जनगडावर स्वामीजींनी साधनेबरोबरच समर्थांची सेवा सुरू केली.साधनेबरोबरच सज्जनगडावर सेवेलाही विलक्षण महत्त्व आहे.योगिराज कल्याण स्वामींनी समर्थांच्या सान्निध्यात सेवा करून चंदनाप्रमाणे आपला देह सद्गुरूंच्या चरणी झिजवला. त्या कल्याण स्वामींच्या सेवेची आठवण पुन्हा श्रीधर स्वामी महाराजांनी करून दिली.

ज्या प्रमाणे कल्याण स्वामींना समर्थांनी समाधीच्या बाहेर येऊन दर्शन दिले त्याच प्रमाणे अवघ्या ३ वर्षाच्या सेवेत स्वामींना समर्थांनी १९३० च्या दासनवमी दिवशी सगुण दर्शन देऊन दक्षिण भागात समर्थ विचारांचा प्रचार करण्याची आज्ञा केली. त्यांच्या आज्ञे प्रमाणे स्वामी पुढे कर्नाटकात गेले आणि पुढे पूर्ण कर्नाटकात स्वामींनी समर्थ संप्रदाय वाढवला. शिगेहल्ली येथे स्वामींनी संन्यास ग्रहण केला.

मधल्या कालखंडात एक प्रकारचे ग्लानित्व आणि औदासीन्य संप्रदायाला आले होते. आणि समर्थांचे समाधी स्थान सज्जनगड, त्याच प्रमाणे चाफळ, शिवथरघळं, समर्थांचे जन्म गाव जांब या ठिकाणांचाही खूप विकास घडवून आणणे गरजेचे होते. श्रीधर स्वामी महाराज यांनी संपूर्ण भारत भ्रमण करून हिंदू धर्माचा आणि समर्थ संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला. आणि वरील सर्व तीर्थ क्षेत्राचा विकास केला. अनेक ग्रंथ,स्तोत्र रचना स्वामींनी केली. आणि  १९७३ साली वरदहळ्ळी (वरदपूर), ता. सागर, जि. शिमोगा (कर्नाटक) येथे महासमाधी घेतली.

समर्थांना सुद्धा दत्तात्रेय यांनी दिलेला सोटा समर्थांच्या शेजघरात आहे आणि त्यांनी दिलेल्या पादुका समर्थ समाधी च्या मागे सिंहासनावर विराजमान आहेत. जेव्हा-केव्हा सज्जनगडावर जाल तेव्हा अवश्य श्रीधर कुटी या वास्तू मध्ये दर्शन घेऊन अध्यात्मिक अनुभूती चा अनुभव नक्की घ्या.

दत्तजयंती निमित्त भगवान दत्तात्रय आणि श्रीमद परमहंस परमव्रजकाचार्य सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी यांच्या चरणांचे स्मरण करून आपले जीवन सार्थक करूयात !

स्वामींना एकच मागणे मागू;

व्हावी पूर्ण कृपा गुरू मजवरी प्रारथीत भावे तुला ।वारी सर्व अरिष्ट नेऊनी लया संमोह जो वाढला ।
अज्ञानांध जनांसी मुक्त करुनी शांती पदी बैसवी ।विनंती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी ॥
श्री श्रीधर स्वामी महाराजांचे समग्र प्रकाशित वाङमय

श्री दत्तावतारी श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांचे समग्र प्रकाशित वाङमय आता इंटरनेट वर shridharsahitya.com/ वर उपलब्ध !

एकूण ३० प्रकाशित ग्रंथ 'ebooks' स्वरूपात उपलब्द!
इतर कैक मराठी, संस्कृत, कानडी स्तोत्रे!
श्री स्वामींच्या आवाजातील १९ दुर्मिळ प्रवचनांचे ऑडियो!
श्री स्वामींचे दुर्मिळ हस्ताक्षर!
श्री स्वामींचे अनेक दुर्मिळ फोटो व २ दुर्मिळ विडीयो!

श्रीधर स्वामी दत्त व रामदासी संप्रदायाचे प्रसारक

महान संत श्रीधर स्वामी महाराज मूळचे मराठवाड्यातील देगलूरचे. स्वामीजींच्या मातापित्यांनी गाणगापूरला कठोर तपश्चर्या केली.दत्तमहाराजांचा संपूर्ण आशीर्वाद लाभला.आणि त्या आशीर्वादाचे गोंडस फळ म्हणजे श्रीधर स्वामींचा जन्म. हा १९०८ साली दत्तजयंतीच्या दिवशी झाला. श्रीधरस्वामींना लहानपणापासूनच कथाकीर्तने ऐकण्याची गोडी लागली होती. तसेच रामनामाने हुकमी यश मिळते, असाही त्यांना अनुभव आला होता. शाळेचा अभ्यास, खेळ, देवपूजा, कथाकीर्तनश्रवण व व्यायाम अशा गोष्टीत यांचा बाळपणाचा काळ मजेत चालला होता. पण वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षी यांची आई वारली आणि त्यात खंड पडला.

त्यानंतर हैदराबाद व गुलबर्गा येथे नातेवाईकांकडे राहून यांनी आपले प्राथमिक शिक्षण पुरे केले व माध्यमिक शिक्षणासाठी हे पुण्याला गेले. पण वेद, उपनिषदे, पुराणे यांना गौणत्व देणार्या आणि आपल्या धर्माची श्रद्धा लोपवून टाकणार्या इंग्रजी शिक्षणात यांना गोडी वाटेना. श्रुतिस्मृतिपुराणोक्त समाजाच्या उभारणीनेच भारताला पूर्ववत वैभव प्राप्त होईल, अशी यांची श्रद्धा होती. तेव्हा सनातन आर्य धर्माच्या प्रसारासाठी आपण आपले जीवन समर्पित करावे, असे स्वामींनी ठरवले. त्यासाठी आपण अध्यात्मिक क्षेत्रात अधिकार मिळवावा, असे स्वामींच्या मनाने घेतले. अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी योग्य अशा गुरूची कास धरावी लागते, त्याचप्रमाणे उग्र तपश्चर्याही करावी लागते हे यांना माहीत होते. म्हणून यांनी एका विजयादशमीला सज्जनगडावर तपस्येसाठी जाण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी आज हा देह भगवंताला अर्पण करायचा, म्हणून यांनी एका कागदावर पुढील अर्थाचा मजकूर लिहिला- "मी अमरण अस्खलित ब्रह्मचर्य पाळीन. द्रव्याला शिवणार नाही. न मागताही आग्रहाने कोणी दिल्यास त्याचा उपयोग परोपकारार्थ करीन. मठपती होऊन कुठेही राहणार नाही. गरीबाला शक्य होण्याइतक्या साध्या गरजा ठेवीन. स्त्रीपुरूषांना समदृष्टीने बोध करीन. अखिल स्त्रीसमाज मातेप्रामाणे मानीन. देहनिर्वाहाच्या गरजा शक्य तितक्या कमी करून, होईल तितक्या लोककल्याणाकरिता मी तनमनधनाने झटेन, होईल तितका प्रयत्न करून धर्माची अवनती घालवून जग सुखी करीन. हे सर्व पूर्ण होण्याकरिता हा देह कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम, अशा भगवंताला मी अर्पण केला आहे. मी मुक्त होऊन जगाला मुक्त करावे, हा पुढचा सर्व भार भगवंतावर आहे. त्याने आपल्या ब्रीदाला उणीव न येईल अशा रीतीने या शरण आलेल्या भक्ताचे काळजीपूर्वक संरक्षण करावे. यापुढे या देहाकडून होणार्या चांगल्या किंवा वाईट कर्माचा जबाबदार तोच आहे."

श्रीधरस्वामींना लहानपणापासून अध्यात्माची ओढ आणि आवड होती. या ओढीनेच स्वामींना समर्थांच्या सज्जनगडावर आणले.सज्जनगडावर स्वामीजींनी साधनेबरोबरच समर्थांची सेवा सुरू केली.साधनेबरोबरच सज्जनगडावर सेवेलाही विलक्षण महत्त्व आहे.योगिराज कल्याण स्वामींनी समर्थांच्या सान्निध्यात सेवा करून चंदनाप्रमाणे आपला देह सद्गुरूंच्या चरणी झिजवला. त्या कल्याण स्वामींच्या सेवेची आठवण पुन्हा श्रीधर स्वामी महाराजांनी करून दिली. साधन आणि सेवेने पावन होऊन सज्जनगडावर समर्थांनी समाधीच्या बाहेर येऊन कल्याण स्वामींना दर्शन दिले होते, त्याच पद्धतीने श्रीधर स्वामींनाही समर्थांनी समाधीच्या बाहेर येऊन प्रत्यक्ष दर्शन दिलेले आहे. व दर्शन देऊन स्वामीजींना दक्षिणेकडे (कर्नाटकात) जाऊन कार्य करण्याची समर्थांनी आज्ञा केली. त्याप्रमाणे श्रीधर स्वामींचे महान कार्य महाराष्ट्रात आहेच, त्याप्रमाणे दक्षिणेकडेही स्वामीजींनी समर्थांना अभिप्रेत असणारा परमार्थ सर्वसामान्यांना शिकवला. श्रीधर स्वामींनी आर्य संस्कृती नावाचा ग्रंथ लिहिला.
आर्य संस्कृती हा स्वामीजींनी लिहिलेला ग्रंथ साधकांना साधनेची दिव्यानुभूती देणारा आहे. साधक अवस्थेतून सिद्धावस्थेपर्यंत पोहोचलेले महान संत श्रीधर स्वामी महाराजांनी १९७३ साली वरदहळ्ळी (वरदपूर), ता. सागर, जि. शिमोगा (कर्नाटक) येथे महासमाधी घेतली.

मधल्या कालखंडात एक प्रकारचे ग्लानित्व आणि औदासीन्य संप्रदायाला आले होते. आणि समर्थांचे समाधी स्थान सज्जनगड, त्याच प्रमाणे चाफळ, शिवथरघळं, समर्थांचे जन्म गाव जांब या ठिकाणांचाही खूप विकास घडवून आणणे गरजेचे होते.

श्रीधर स्वामी महाराज यांनी संपूर्ण भारत भ्रमण करून हिंदू धर्माचा आणि समर्थ संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला. त्यांचे असंख्य भक्त महाराष्ट्रात त्याच प्रमाणे कर्नाटकात काही प्रमाणात भारतभर पसरले आहेत. त्यांनी सज्जनगड, शिवथरघळ , चाफळ या ठिकाणांचा प्रचंड विकास घडवुन आणला. त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या शिष्यांनी "श्री.समर्थ सेवा मंडळ,सज्जनगड" या संस्थेची स्थापन १९५० साली गडावर केली. स्वामींनी गडावरच्या सर्व ऐतिहासिक वास्तुंची उत्तम डागडुजी करून घेतली आणि गडावर येणाऱ्या समर्थभक्तांची सोय लक्षात घेऊन गडावर मोठ्याप्रमाणात भौतिक सुविधा घडवून आणल्या.त्यांची समाधी कर्नाटकातील वरदपूर येथे आहे.
श्री श्रीधरस्वामी महाराज श्री श्रीधरस्वामी महाराज
श्रीधर स्वामी संदेश

याच देही याचि डोळा आपले मरण पाहून व जन्मही पाहून तेथे दुसरे काहीही न रहाता स्वतःच शिल्लक रहाणे यालाच जीवनमुक्त म्हणतात. स्वतःची जाणीव आपल्या अनंतानंत आनंदयुक्त आद्य परमात्मस्वरूपांत विरघळून गेल्याचे म्हणजेच विलीन झाल्याचे पहाणे हेच आपले मरण. आत्मज्ञानाच्या दृष्टीने मरण म्हणजे स्वतःची चंचलरूपी जाणीव नाहीशी होणे. निश्चल यथार्थ अशा आनंदरूपांत नित्य निर्विकल्प असणे म्हणजेच देह-द्वैत घालवून अद्वैत असे जेथे इतर काहीही नाही असे निजरूप स्वतःच शिल्लक रहाणे. मोक्षासाठी एखादे नांव धारण केलेला देह असतांनाच अशारितीने मरण पत्करून गर्भवास नाही व मृत्युही नाही. जन्ममरणावर विजय मिळवून मोक्षानंदसौभाग्य श्रीगुरूप्रसादाने प्राप्त होऊ शकते. अनन्यभक्तीने केलेली गुरूसेवा परमानंदरूपी दिव्य फल देते.

जीवनमुक्ताचा देह महासागरांत पडलेल्या बर्फाप्रमाणे वितळून आनंदरूपी महासागरांत विरून जातो. त्यानंतर देहभास नष्ट होऊन तो आनंदब्रह्मरूप परब्रह्मच होतो. तेथे आनंदाशिवाय दुसरे काहीही नसते. ज्ञानी मनुष्याचे संचित, प्रारब्ध व क्रियमाण ही सर्वच नष्ट होऊन तो पुन्हा जन्मास येत नाही. ब्रह्मसाक्षात्कारानंतर आत्मज्ञानी पुन्हा मृत्युलोकी येत नाहीत व कोणत्याही लोकांत पुन्हा जन्म घेत नाहीत.

श्री प. प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी
श्री क्षेत्र लाडाची चिंचोळी, श्रीधर स्वामींचे जन्म ठिकाण, एक दत्तक्षेत्र

प. प. भगवान श्रीधरस्वामी यांचे जन्मठिकाण म्हणजे श्रीक्षेत्र लाडाची चिंचोळी. हे स्थान गाणगापूर पासून सुमारे २५ कि. मी. अंतरावर आळंद तालुक्यामध्ये आणि गुलबर्गा जिल्ह्यामध्ये आहे. श्रीधरस्वामी हे दत्तात्रेयांचे अवतार होते.

नारायणराव देगलूरकर हे हैद्राबाद येथे राहणारे एक सुखवस्तू गृहस्थ होते. एकदा त्यांचे उपाध्याय त्यांना म्हणाले, “नारायणराव, तुम्हाला गाणगापूरला जाऊन अनुष्ठान करायला हवे. तुमच्या पोटी एक महान पुत्ररत्न जन्माला येणार आहे. गाणगापूरला तुम्हाला श्रीदत्तात्रेयांचा प्रसाद मिळवायला हवा. त्यानेच तुमच्या घराण्याचा भयंकर सर्पशापातून मुक्तता होईल.” नारायणराव आणि कमळाबाई यांना दोन मुले होती. त्यांना आपल्या घराण्याला असणाऱ्या सर्पशापाबद्दल माहिती होती. मग नारायणराव आणि कमळाबाई गाणगापूरला गेले आणि तिथे त्यांनी कडक अनुष्ठाने सुरु केली. गुरुचरित्राची पारायणे करताना नारायणराव श्रीगुरुंच्या अगाध लीलेशी एकरुप झाले. एके दिवशी श्रीदत्तात्रेय समोर प्रकटले आणि त्यांनी श्रीफळाचा प्रसाद दिला आणि आपली इच्छा पूर्ण होईल असा वर दिला. एका दिव्य आनंदाने त्यांची मने भरुन गेली. कमळाबाईं बाळंतपणासाठी लाडाची चिंचोळी येथे आई कडे गेल्या, नऊ मास पूर्ण भरले आणि एका दिव्य पुरुषाने जन्म घेतला. त्यांचेच नाव श्रीधर स्वामी.
श्रीधर स्वामी समाधी स्थान, लाडाची चिंचोळी श्रीधर स्वामी समाधी स्थान, लाडाची चिंचोळी

श्रीधरस्वामी हे समर्थ संप्रदायातले. लहानपणापासूनच त्यांनी समर्थ रामदासांना आपले गुरु मानले होते. सदाशिव पेठेतील नृसिंहमंदिरामध्ये त्यांनी तप:साधना केली. त्यानंतर ते सज्जनगडावर गेले. तिथे त्यांना प्रत्यक्ष समर्थ रामदासांनी दर्शन देवून अनुग्रह दिला. तिथे त्यांची सेवा आणि साधना सुरू होती. त्यांच्यावर प्रसन्न होवून प्रभू रामचंद्रांनी त्यांना साक्षात दर्शन दिले.

श्रीधरस्वामींनी श्री दत्तसंप्रदाया साठी अत्यंत मोलाचे कार्य केले आहे. गेल्या काही दशकातील ज्या दोन श्रीदत्त स्थानांनी सर्वांना वेड लावले ती श्री क्षेत्र पीठापूर आणि श्री क्षेत्र कर्दळीवन या दोन्ही स्थानांना प्रकाशात आणण्यासाठी श्रीधरस्वामींचीच प्रेरणा होती. इतकेच नव्हे तर त्यांच्याच संकल्पाने ही स्थाने प्रकाशीत झाली असे म्हणता येईल. श्रीधरस्वामींचे शिष्य प. प. सज्जनगड रामस्वामी यांनी पीठापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानाची स्थापना केली. याचबरोबर त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यामुळे श्रीदत्तभक्तांना एक विलक्षण पर्वणी मिळाली. याचबरोबर श्रीधरस्वामी १९६० साली कर्दळीवनामध्ये गेले होते. त्यांचे शिष्य गाणगापूरचे बटू महाराज नंतर कर्दळीवनात गेले होते. त्यांच्याच प्रेरणेने गाणगापूर येथील काही पूजारी १९९९ साली प्रथम कर्दळीवनामध्ये गेले. त्यानंतर कर्दळीवनाची महिती हळूहळू सर्वांना कळू लागली आणि ते प्रकाशात आले. श्रीधरस्वामींच्याच कृपेने आणि संकल्पाने गेल्या दशकभरामध्ये दत्तसंप्रदायामध्ये एक नवचैतन्य पसरले आहे.

लाडाची चिंचोळी हे श्रीधरस्वामींचे जन्मठिकाण म्हणूनच अतिशय पवित्र आहे. भाविक भक्तांनी भेट देऊन तेथील अनुभूती घ्यावी.
'प. पु. सद्गुरू श्रीधर स्वामी यांचे श्रीधराश्रम याबाबत मार्गदर्शन'

हें सर्वांचे संकट निरसून सर्वांना आनंद प्राप्ती करून इहपर शांति, सौख्य देणारे एक परम पवित्र स्थळ आहे. 'श्रीधराश्रम, वरदपूर' हा दिव्य कर्मांना स्फूर्ति देणारा व माझी स्मृति शाश्वत ठेवणारा माझा जणु प्रतिनिधीच आहे. आश्रम पवित्र ठेवणें व त्याची भरभराट करणे हे सर्व तुम्हा सर्वांच्या वागण्यावर अवलंबून आहे.

काहीं लोक आश्रमाबद्दल वाईट भावना ठेवून प्रचार करीत असले तरी तुम्ही अचल विश्वास ठेवून आपलें कार्य अविरत करीत रहा !! धर्माचे स्फूर्तिकेंद्र म्हणजेच 'वरदपूर' असा संदेशच वरदगिरी शिखरावरील 'धर्मध्वज' सर्वांना देत आहे तिकडे सर्वांचेच लक्ष्य जावूं द्या !!

' सर्वे जना: सुखिनो भवन्तु | '

N/A

References : N/A
Last Updated : June 29, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP