दत्त भक्तीमध्ये डोक्यावर घेऊन नाचावं असा घराघरात असलेला ग्रंथ म्हणजे "श्री गुरुचरित्र". नुसताच घराघरात काय तर हृदया हृदयात स्थानापन्न झालेला हा ग्रंथ. या ग्रंथाचे कथानक हे फ्लॅश बॅक पद्धतीने रचण्यात आले आहे. या कथानकात एक नाव तीन वेळा येते ते म्हणजे "सिद्ध". पहिल्यांदा येते ते सायंदेवाच्या पाचव्या पिढीतील विष्णू शर्मा उर्फ सरस्वती गंगाधर उर्फ नामधारक जेव्हा भिमा अमरजा संगमावर पोहोचतो तेव्हा जणू काही त्याचं स्वागत करायला एक व्यक्ती त्याची वाट पाहत उभी असते ती म्हणजे हा सिद्ध.
दुसऱ्यांदा ठळक उल्लेख होतो तो जेव्हा श्रीगुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज परळी वैद्यनाथ अंबेजोगाई येथून स्वतः सोबत असलेल्या बहुतांश शिष्यांना संपूर्ण भारतातील तिर्थक्षेत्र करून बहुधान्य नावाच्या संवत्सरात श्रीशैल्य क्षेत्रात यायला सांगतात व मोजक्या निवडक शिष्यांस स्वतः बरोबर ठेवतात, या स्वतः बरोबर असलेल्या शिष्यांतील एक प्रमुख म्हणजे हा सिद्ध. आणि तिसऱ्यांदा ठळक उल्लेख येतो तो श्रीगुरुंच्या श्रीशैल्य गमनी सोबत घेतलेल्या चार शिष्यांमध्ये दोन नंदी कविश्वर, सायंदेव व सिद्ध.
हे उल्लेख सोडले तर सिद्धाने शक्यतोवर स्वतःला श्रीगुरुचरित्रात लपवून, पडद्याआड ठेवलं आहे. यातून सिद्ध एक आदर्श शिष्याचं उदाहरण सर्वांसमोर ठेवत आहे. पण म्हणून त्यांचं मोठेपण लपत नाही. श्रीगुरूंसोबत असताना व श्रीगुरू गुप्त झाल्यावर श्रीगुरू आज्ञेनुसार प्रचंड मोठं कार्य कुणाचं असेल तर ते म्हणजे एकमेव सिद्ध!
आता गाणगापूर जवळ सायंदेवांच्या कडगंची जवळ आळंद कर्नाटक येथील थोर दत्तभक्त, दत्त इतिहास संशोधक श्री भिमाशंकर देशपांडे यांचे टिपणावरुन या सिद्धाचा उपलब्ध मागोवा घेऊया.
कर्नाटकात व्हंदनहळ्ळी गावात कण्व शाखेत कौंडीण्य गौत्रात एक शास्त्री कुटुंब होते. ते व्यवसायाने सराफ असून सोनं व जवाहराचा व्यापार करत. त्यानिमित्ताने ते अव्याहतपणे प्रवास करत. या कुटुंबात दोन भाऊ होते. मोठा रामण्णा व धाकटा भिमण्णा. रामण्णा विशेष धार्मिक वृत्तीचा होता. त्यानं आईवडीलांची मनोभावे सेवा केली. वृद्धापकाळाने एका आठवड्याच्या अंतराने आईवडील निर्वर्तले. त्यांना एका यतीने (भविष्यातील व्यवस्था कशी लावली जाते पहा, कदाचित हे यती म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ असावेत) काशीयात्रा करण्याचा आदेश दिला होता. पण तो आदेश पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे आईवडिलांनी अंतकाळी काशीयात्रा ही आपली अंतिम इच्छा पूर्ण करण्याचं वचन मुलांकडून घेतलं.
या वचनानुसार आपल्या घराची आणि व्यवहाराची निरवानिरव करुन दोघं भाऊ काशीस जाण्यासाठी निघाले. त्याकाळी काशीयात्रा अत्यंत कष्टप्रद होती. एका वर्षाच्या प्रवासानंतर ते काशीत पोहोचले. तेथे विधिवत सर्व दर्शनं, पूजा, श्राद्ध, अस्थी विसर्जन करुन परत माघारी फिरण्याच्या तयारीत असताना स्वप्नात आईवडीलांचे दर्शन दृष्टांत झाला व त्यानुसार काशीत कायमस्वरूपी वास्तव्यास राहण्याचे निश्चित झाले. येथेच त्यांनी व्यापार व्यवसाय सुरू केला. येथेच रामण्णास एक मुलगा झाला. हा मुलगा चार वर्षांचा असताना रामण्णाची पत्नी मरण पावली. त्यानंतर अपघातात रामण्णाच्या पायाचे हाड मोडले. व परत कर्नाटकात येणे लांबणीवर पडत राहिले. यथासमयी परतण्याची आज्ञा झाली व परत जावं की नाही या निर्णयात बराच वेळ गेला. व या दरम्यान रामण्णा मरण पावला. मुलगा सात वर्षांचा झाला होता. काका भिमण्णाने पुतण्याचे मौंजीबंधन केले. पण भिमण्णाणी बायको अतिशय खाष्ट होती. ती पुतण्याचा अनन्वित छळ करायची. या सुमारास एका महाराष्ट्रीयन बाल यतीची एंट्री काशीत झाली.
हे बाल यती म्हणजे आपलं आराध्य दैवत श्री दत्तात्रेयांचा श्रीपाद श्रीवल्लभ अवतारानंतरचा संन्यासी अवतार श्रीगुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज! बालवयात संन्यासी आणि तेजःपुंज रुपामुळे श्रीगुरू काशी मध्ये क्षणात प्रसिद्ध झाले.
कित्येक वयोवृद्ध यती, महापुरुष श्रीगुरूंच्या काशी प्रवेशाची वर्षानुवर्षे वाट पहात होते. त्यांनी श्रीगुरुंना गुरुस्थानी विराजमान करुन त्यांचं शिष्यत्व पत्करते झाले. काका भिमण्णाने ख्याती ऐकून श्रीगुरूंचे दर्शन घेतले व आपल्या पुतण्याला श्रीगुरूंच्या अनुमतीने त्यांच्या चरणी अर्पण केले व पत्नीसह तो गावाकडे परत फिरला.
हा श्रीगुरूंना अर्पण केलेला पुतण्या म्हणजे दत्त संप्रदायातील दिग्गज व्यक्तीमत्व म्हणजे "सिद्ध". श्रीगुरूंनी याचं ठेवलेलं नाव म्हणजे "सिद्धांतपाद". स्वतः श्रीगुरू म्हणजे श्रीपाद म्हणून हा प्रिय शिष्य "सिद्धांतपाद". श्रीपादांनी अगोदरच या सिद्धाची काशीत जन्मण्याची व आपण श्रीगुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज अवतारात काशीत आल्यावर सिद्धाला ताब्यात घेण्याची व्यवस्था करून ठेवली होती. आणि आश्चर्य पहा की श्रीगुरू वयाच्या आठव्या वर्षी लाड कारंजाहून काशीत आले तेव्हा हा सिद्ध देखील आठ वर्षांचाच होता. तसं पाहिलं तर दोघांचंही हे वय खेळण्याचं, पण या वयात एक गुरू बनतो आणि एक शिष्य बनतो, म्हणजे काय ती समज, काय ते दृश्य असेल ना! नुसते डोळ्यासमोर त्या दृष्याची कल्पना केली तरी अष्टसात्विक भाव जागृत होतात.
इथे ही गुरू शिष्याची अनोखी, एकमेव, जगत्विख्यात जोडी जमली इस १३८५ साली व सशरीर दोघे एकमेकांबरोबर राहीले ते इस १४५८ पर्यंत म्हणजे श्रीगुरू गुरुप्रतिपदेस गुप्त होईपर्यंत, एकूण ७३ वर्षे. हे ७३ वर्षे आपल्यासाठी आहेत. प्रत्यक्षात ही जोडी क्षणभर देखील एकमेकांपासून दूर होत नाही. श्रीगुरूंनी काशी निवास, हिमालय सव्य प्रदक्षिणा, गंगासागर ते प्रयाग, पुन्हा आईवडीलांना दिलेल्या पुनर्दशनाच्या वाचनामुळे विंध्याचल, नर्मदा, अवंती, तापी ओलांडून लाड कारंजे, नासिक, त्रिंबकेश्वर, गोदावरी परिक्रमा, वासर ब्रम्हेश्वर, वैद्यनाथ, अंबेजोगाई, भिल्लवडी, औदुंबर, वाडी, गाणगापूर, बिदर, श्रीशैल्य या प्रचंड प्रवासात अनेकांना दीक्षा दिली, अनेक शिष्य केले. परंतु स्विय सहायकासारखा एकच शिष्य जवळ ठेवला तो म्हणजे सिद्ध.
श्रीगुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज १४५८ साली श्रीशैल्यात गुप्त होतो असे जगास भासवून गाणगापूरातच गुप्त राहिले. त्यांनी सिद्धास सर्व व्यवस्था व पुढील कार्यक्रमपत्रिका निश्चित केली. त्यानुसार सिद्धाने गाणगापूर मठाचे निर्माण केले व स्वतः सर्व व्यवस्था साठ वर्षे पाहिली. व श्रीगुरूंच्या बहुधान्य नावाच्या संवत्सरात जगासाठी गुप्त होण्याच्या घटनेनंतर साठ वर्षांनी आलेल्या बहुधान्य संवत्सरात सिद्ध श्रीशैल्य येथे आले व कर्दळीवनात गुप्त राहिले. हे साल आहे १५१८.
श्रीगुरूंनी आपल्या त्रिंबकेश्वर पासून सुरू केलेल्या गोदावरी परिक्रमेत त्यांना सध्याच्या आंध्रप्रदेशातील वासर ब्रम्हेश्वर येथे
सायंदेव भेटतो. श्रीगुरू त्याची मृत्यू भयातून सुटका करतात व त्याची घरी येऊन माधुकरी भिक्षा स्विकारण्याची विनंती मान्य करतात. सायंदेवाचा निरोप घेताना त्याचा भाव, समर्पण पाहून श्रीगुरू त्याला सांगतात की आजपासून पंचवीस वर्षांनी तू दक्षिणेस भिमा अमरजा संगमावर गंधर्वपूरात ये व तुझ्या पिढ्यांनपिढ्यांवर माझी कृपा राहील. नंतर योग्य वेळी सायंदेव आधी एकटे व नंतर मुलं, नातवंडांसह श्रीगुरूंच्या सेवेत येतात. श्रीगुरू गुप्त झाल्यावर त्यांच्या आज्ञेनुसार बिदरच्या बादशहा कडून कुरवपूर क्षेत्रात मंदिर बांधकाम करुन घेतात. त्यांचा जेष्ठ पूत्र नागनाथ वगैरे पर्यंत आपण गुरू चरित्रात वाचतो. पण आता रोल येतो तो श्रीगुरुंनी वासर ब्रम्हेश्वर येथे सायंदेवास दिलेल्या पिढ्यानपिढ्या कृपेच्या वचनाचा. तो असा....
श्रीगुरू गुप्त झाल्यावर साठ वर्षे सिद्ध गाणगापूरात व्यवस्था सांभाळून होते. या साठ वर्षांत सायंदेवाच्या पाचव्या पिढीतील विष्णू शर्मा यांस दृष्टांत देऊन भिमा अमरजा संगमावर बोलावले गेले. कडगंची येथे घरात थोरामोठ्यांकडून वारंवार श्रीगुरू लीला ऐकत ऐकत विष्णू शर्माच्या अंतःकरणात श्रीगुरू दर्शनाची आत्यंतिक ओढ निर्माण झाली व तो पायी प्रवास करून तहानभूक विसरून संगमावर पोहोचला व तिथे त्याला घ्यायला हजर होते स्वतः सिद्ध. यावेळी सिद्धांचं शारीरिक वय असेल १४८ वर्षं व विष्णू शर्मा जेमतेम २० वर्षांचा. सिद्धांनी मोठ्या प्रेमाने विष्णू शर्मास आलिंगन दिले व त्याचा हात धरून त्याला औदुंबर वृक्षाखाली घेऊन आले व श्रीगुरू जिथे बसत त्या जागेसमोर विष्णू शर्मास बसविले.
येथून सुरू झाले सिद्धाचे नवे कार्य ते म्हणजे एक लेखक घडवणे श्रीगुरुचरित्र लिहिण्यासाठी. स्वतः सिद्ध श्रीगुरुंच्या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार आहे, मग त्याने स्वतः का नाही लिहिले गुरू चरित्र! हीच तर गुरू संप्रदायातील गंमत आहे ती दिलेलं वचन कितीही काळ लोटला तरी न विसरणे व दुसऱ्याला मोठेपणा देणे. नाही तर माझ्या नंतर माझा मुलगा माझ्या गादीवर अशी उदाहरणे आपण गावोगावी आज पहातोय.
तर सिद्धाने विष्णू शर्मास समाधी अवस्थेत नेऊन श्रीगुरूंच्या जन्माची पूर्वपिठिका अत्री अनसुयेपासून, अप्पळराज सुमती श्रीपाद श्रीवल्लभ वृत्तान्त ते श्रीगुरूंच्या गुप्त होईपर्यंत साक्षीभावाने दाखवला. या अवस्थेतून विष्णू शर्मा जेव्हा भानावर आला तेव्हा त्याचं शरीर सात्विक भावात कंपित झाले होते. पण सिद्धाने गोंजारत त्याला भानावर आणले व स्वतः गुप्त होईपर्यंत श्री रामचंद्र योगेश्वरांच्या मार्गदर्शनानुसार विष्णू शर्माकडून श्री गुरुचरित्राचे लिखाण पूर्ण करून घेतले.
आज नवरात्राताच्या तिसऱ्या दिवशीच्या संधीकाळात हा लेख पूर्ण करताना सिद्धाबद्दल एकच भावना समोर येते की सिद्ध हे सावली सारखे दत्तांसोबत आहेत.