मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष|
श्री गोपाळबुवा केळकर

श्री गोपाळबुवा केळकर

दत्त संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचक्रधर यांची परंपरा दत्तात्रेय-चांगदेव राऊळ-गुंडम राऊळ-चक्रधर अशी आहे.


जन्म: कोकण प्रांत
आई/वडिल: ज्ञात नाही
गुरु: स्वामीसुत
निर्वाण: मारकेडी (चिपळूण)
विशेष:
स्वामीसुतांच्या सांगण्यावरुन पत्नीसह मारकेडी, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागीरी येथे पाठवले.
श्री स्वामी समर्थांच्याकडून चांदीच्या पादूका, झोळी व दंड मिळाला.

स्वामी महाराजांनी स्वहस्ते दिलेल्या चांदीच्या प्रसाद पादुका व दंड आणि स्वामीसुत महाराजांनी दिलेल्या संगमरवरी चरणपादुकांची स्थापना प. प. केळकर बुवानी चिपळूण मध्ये मार्कंडी यागावी स्वामी महाराजांचे आज्ञेने केली. सुरवातीला प. प. बुवा ज्यावेळी चिपळूनमध्ये आले त्यावेळी भक्तांनी अनेक जागा दाखवल्या पण स्वामीसुतांनी ते चिपळूणला येण्यापूर्वी ६ महिने आधी संगमरवरी पादुका पाठवल्या होत्या. स्वामी समर्थ शिष्य ब्रम्हचारी बुवा यांनी स्वामीसुत महाराजांनी दिलेल्या पादुका ठेवलेल्या असतील ती जागा मठासाठी  निश्चित करावी हा आदेश मानून तीच जागा मठासाठी निर्धारित केली. बुवा नि शोध घेतल्यावर एका डुंग्यावर निशाण आढळले व झोपडीत पादुकाही मिळाल्या. ती जागा स्मशानाची होती.बुवा नी येथे नित्यक्रम सुरु केला. जे स्थान गावाबाहेर होते आज ते मध्यवर्ती भागात आले असून मठ स्वामी वैभवाने  शोभून दिसत आहे. कोयना धरणाचे सर्व्हे अधिकारी श्री भट्टाचार्य हे बुवाच्या ज्ञानेश्वरी सत्संगास उपस्थित असत २-३ वर्षांनी बदली झाली असता  बुवाना काही करून देण्याची इच्छा प्रदर्शित केली. तेव्हा स्वामी पादुकांना छोटीशी वस्तू बांधण्याची इच्छा व्यक्त केली.तेव्हा त्यांनी सहा महिने रजा घेऊन एक इमारत बांधून घेतली. या कामात अनेक भक्त, ग्रामस्थ व इतर लोकांचा सहभाग होता. याच मंदिराचा जीर्णोद्धार २००१ मध्ये पार पडला. त्यावेळी ६३लक्ष एवढी  जपसंख्या पादुकांखाली ठेवण्यात आली.यातही सर्व थरातील स्त्री पुरुष व अनेक जाती जमातीतील लोकांचा सहभाग होता. येथेच भव्य-दिव्य मठ तयार झाला.                        

येथील नित्यक्रम हा स्वामीसुतांनी सांगितल्या प्रमाणे चालू आहे. त्यात काकड आरती षोडशोपचार पूजा, आरती, नैवेद्य व  सायंकाळी पंचोपचार पूजा, धुपारती व रात्री पंचपदी होते. दर गुरुवारी वएकादशीला रात्री बारा वाजेपर्यंत भजन सेवा चालते. तसेच प्रत्येक गुरुवारी व शुद्ध द्वितीयेला विडा शेजारती होते. सणासुदीचे दिवशी पादुकांना श्री स्वामी सुतांनी दिलेले चांदीचे छत्र लावण्यात येते.
मठात साजरे होणारे उत्सव
१) स्वामी समर्थ जयंती उत्सव- फाल्गुन शु.११  ते  चैत्र  शु २              
२) स्वामीसुत पुण्यतिथी उत्सव- श्रावण शुद्ध त्रयोदशी ते श्रावण कृष्ण प्रतिपदा  
३) गोपालबुआ पुण्यतिथी
४) गुरुपौर्णिमा  
५] गुरुद्वादशी इ.  

उत्सवात अन्नदान व नामस्मरण यावर उपासनेत भर आहे.उत्सवात प्रामुख्याने कीर्तने, प्रवचने, भजन, गायन होते. उत्सव प्रवचन व प्रसादास मोठया प्रमाणात भक्त उपस्थित असतात. श्री स्वामी महाराजांचे जयंतीचे कीर्तन  केळकर घराण्यांपैकी कोणी करण्याची परंपरा पूर्वापार चालू आहे.जन्मवेळी श्रींचे पादुकावरील छत्र आपोआप हलते.श्री स्वामी महाराजांचे अभिवचन 'हम  गया नही जिंदा है' या शब्दाची अनुभूती आजही  हजारो लोकांना येते. या मार्कंडी मठात आजवर अनेक सिद्ध महात्मे येऊन गेलेले आहेत.

हा मठ पूर्णतः खाजगी असून कोणत्याही प्रकारचा ट्रस्ट नाही. केवळ भिक्षेवर येथील सर्व कार्यक्रम चालतात. समर्थानी गोपालबुआ ना दर गुरुवारी ५ घरे भिक्षा माग काहीही कमी पडणार नाही याच अभिवाचनावर या मठाचे व्यवस्थापन चालते.उत्सवापूर्वी भिक्षाफेरी निघते व जमा होणाऱ्या समुग्रीत दुसऱ्या दिवशीचा महाप्रसाद  पार पडतो आज १४२ वर्षे झाली खंड  नाही.अनंकोटी ब्रम्हाडनायक राजाधिराज स्वामी समर्थ सर्व वैभवानीशी नांदत आहेत. प्रत्येक दत्त भक्तांनी या प्रासादिक स्थानी जाऊन श्रीचरणांची तनमन व धनांनी सेवा करावी.

चिपळूणचे एक दत्तभक्त म्हणून गोपाळबुवा केळकरांचे नाव प्रसिद्ध आहे. खरे म्हणजे हे अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे प्रख्यात शिष्य होते. घरच्या गरिबीमुळे यांना शिक्षण घेणे जमले नाही. प्रथम यांनी रेल्वेत नोकरी केली. त्यांना मध्येच जलोदराची व्यथा जडली; म्हणून ते परत कोकणात आले. शरीराच्या पीडेमुळे यांचे लक्ष परमेश्र्वराकडे वळले. नाशिक येथील देव मामलेदार यांच्यापासून यांना प्रेरणा मिळाली. अक्कलकोट येथील स्वामी समर्थांची ओढ यांना लागली. त्यांचा यांना दृष्टांत झाला. स्वामींनी यांच्यावर दया केली.

गोपाळबुवा काही दिवस स्वामींच्याजवळ अक्कलकोट येथे राहिले. स्वामींच्या अद्भूत लीलांचे त्यांनी अवलोकन केले. गोपाळबुवांचे लग्न झाले होते. सर्व कुटुंब स्वामींच्या चरणांचे आश्रित होते. चिपळूण येथील मार्कंडी वार्डात बुवांचा निवास होता. येथे त्यांनी श्रीगुरूंच्या पादुका स्थापन केल्या. दर गुरुवारी त्यांची प्रार्थना सुरू झाली. प्रपंचात यांचे मन रमले नाही.

यांनी श्रीस्वामी समर्थांची बखर लिहून स्वामींच्या लीलांचे वर्णन केले आहे. शिवाय ‘करुणास्तोत्र’ आणि ‘साधनविवेकसारामृत’ अशी प्रकरणे लिहिली. ‘प्रीतिनंद’ असे यांचे आणखी एक नाव होते. करुणास्तोत्र २१० ओव्यांचे आहे. साधनाविवेकसारामृत या लघु ग्रंथात चार प्रकरणे असून ओव्या ११८ आहेत.

बुवांनी स्थापन केलेल्या चिपळूण येथील मठाला शंभर सव्वाशे वर्षे झाली आहेत. जन्मोत्सव, श्रावणातील उत्सव इत्यादी कार्यक्रम या मठात होतात. मठात स्वामींच्या पादुका आहेत. दंडही आहेत. नारायण दत्तात्रय केळकर हे विद्यमान अधिकारी आहेत.
गुरुपरंपरा

श्री स्वामी समर्थ
    ।
श्री स्वामीसुत
    ।
श्री गोपाळबुवा केळकर  
गोपाळराव केळकर डावीकडे श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वहस्ते दिलेला दंड व चांदीच्या पादुका, त्यामागे पू. बुवांच्या ग्रंथरचना. उजवीकडे वर पू. बुवांचा फोटो व त्याखाली पू. बुवांची समाधी
प्रीतिनंद मागतसे प्रीती सेवादान

काही विभूती आपल्या अल्पशा पण अत्यंत महत्त्वपूर्ण सेवेमुळे अजरामरच होऊन जातात. तेवढ्या गोष्टीसाठी अवघे जग त्यांचे ऋणाईत होऊन राहते. उदाहरण सांगायचे तर; दौलताबादच्या श्रीसंत जनार्दन स्वामींचे शिष्य श्रीसंत रामाजनार्दन महाराजांचेच देता येईल. त्यांचे नाव गाव, ठावठिकाणा, चरित्र विचारले तर कोणीही सांगू शकणार नाही, पण त्यांच्या अवघ्या एकाच दिव्य रचनेमुळे, अक्षरश: हजारो लोकांच्या मुखी त्यांचे नाव आजही रोज येते. त्यांची ती सुप्रसिद्ध रचना म्हणजेच सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांची, "आरती ज्ञानराजा ।" ही आरती होय.

अगदी अशाच प्रकारचे दुसरे विभूतिमत्व म्हणजे, राजाधिराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांची बखर लिहिणारे, स्वामीशिष्य प्रीतिनंद स्वामीकुमार तथा श्रीसंत गोपाळबुवा केळकर हे होत. त्यांनी लिहिलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बखरीमुळेच आजमितीस आपल्याला परमअद्भुत अशा असंख्य स्वामीलीलांचा सप्रेम आस्वाद घेता येतो आहे. खरेतर हे श्री.गोपाळबुवांचे आपल्यावरील कधीही न फिटणारे महान ऋणच आहे !

चिपळूण शहरातील मार्कंडी भागातला 'स्वामी समर्थ मठ' ही भक्तश्रेष्ठ श्री.गोपाळबुवा केळकरांची कर्मभूमी. मूळचा कोकणातला, इंग्रजी तिसरी शिकलेला व नागपूर येथे रेल्वे स्टेशन मास्तर म्हणून नोकरी करणारा, गोपाळ नावाचा हा नास्तिक माणूस, पोटाच्या व्याधीने खूप गांजून गेला होता. काहीच उपयोगी पडत नाही म्हणून शेवटी त्याने देवाधर्माचाही आधार घेऊन पाहिला. "या जगात ईश्वर म्हणून कोणी जर असेल तर त्याने माझी पोटशूळाची व्याधी बरी करावी, मी आजन्म त्याच्या सेवेत घालवीन !" असा निश्चय गोपाळाने केला आणि त्यातच दैव अनुकूल झाल्यामुळे खरोखरीच व्याधीला आराम पडला. आता त्या ईश्वराला शोधणार कुठे? त्यांनी ऐकलेले होते की, देव साधूसंतांच्या जवळ असतो. म्हणून गोपाळ केळकरांनी साधूंच्या दर्शनास जाण्याचे ठरविले.

त्याकाळी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रसिद्धी होती, म्हणून ते त्यांच्या दर्शनाला गेले. गोपाळ केळकरांवर श्री स्वामी महाराजांची कृपादृष्टी झाली व त्यांना आपल्या जीवनाचे कर्तव्यही समजून आले. ते स्वामीसेवेत गढून गेले. घरातून न सांगताच ते अक्कलकोटला आले होते. पुढे त्यांच्या पत्नीला त्यांचा ठावठिकाणा लागला, त्याही अक्कलकोटी आल्या व श्री स्वामींचे दर्शन लाभून धन्य झाल्या.

गोपाळराव अक्कलकोटी तीन साडेतीन वर्षे स्वामीसेवेत होते. त्यांनी डोळसपणे सर्व स्वामीलीला जाणून घेतल्या, आपल्या मनेमानसी जपून ठेवल्या. नंतरच्या काळात त्यांनी आपल्या सवडीने हे स्वामीलीलांचे अलौकिक वैभव शब्दबद्ध करून, मोडीमध्ये लिहून काढले. त्यांच्या हातची मोडीत लिहिलेली व २६४ लीलाकथा असणारी बखर आजही चिपळूणच्या मठात जपून ठेवलेली आहे.

श्री.गोपाळबुवांच्या अक्कलकोट वास्तव्यात त्यांनी स्वत: श्री स्वामीमहाराजांच्या अनेक लीला समोर घडलेल्या पाहिलेल्या होत्या. श्री स्वामी महाराजांचे काही दिव्य अनुभव त्यांनी स्वत: देखील घेतले. त्यामुळे त्यांची पक्की खात्री झालेली होती की, साक्षात् परब्रह्मच श्री स्वामी समर्थ रूपाने अक्कलकोटी प्रकटलेले आहे. ते अनन्यभावाने त्या पावन श्रीचरणीं शरण जाऊन, त्यांच्याच स्मरणात अखंड सेवारत होऊन राहिले. श्री स्वामी महाराजांनाही आपल्या या दासाची एकेदिनी दया आली व श्री.गोपाळबुवांवर स्वामीकृपामेघ असा अनवरत बरसला, की बुवांचे अस्तित्वच पार मावळून गेले. बुवांच्या शुद्ध झालेल्या चित्तात श्री स्वामी महाराजांचा कृपामयूर बेभान नृत्य करू लागला. त्याच्या त्या प्रीतिनर्तनाने आनंदाची जणू कारंजीच फुटली बुवांच्या सर्वांगाला; बुवा त्या कृपावर्षावाने सहज समाधी अनुभवते झाले. त्यांचा जणू नवीन जन्मच झाला; आणि प्रत्यक्ष मायबाप श्री स्वामीपरब्रह्माने त्यांचे नामकरणही केले; गोपाळबुवांचे 'प्रीतिनंद स्वामीकुमार' होऊन ठाकले !!

श्री.गोपाळबुवांवर राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांनी हचनाळ या गावी पहाटे तीन वाजता, कृपादृष्टीने न्याहाळून शक्तिपात केला. त्याक्षणी बुवांचे भानच हरपले, ते तासभर त्याच समाधिस्थितीत होते. नंतर काही दिवसांनी श्रीगुरु स्वामी महाराजांनी गोपाळबुवांना व त्यांच्या पत्नीला बोलावून आज्ञा केली, "चिपळूण ग्रामाबाहेर मार्कंडी स्थानी जाऊन राहावे व आमची सेवाचाकरी करावी. गुरुवारी भिक्षा मागून सेवावसा चालवावा, आमच्या कृपेने काहीही कमी पडणार नाही, जाव !" श्री स्वामीगुरूंनी नुसतीच आज्ञा केली नाही, तर आपला लाकडी दंड व चांदीच्या पादुकाही कृपाप्रसादपूर्वक बुवांच्या ओटीत घातल्या. आजमितीस हा देवदुर्लभ ठेवा मार्कंडी मठात सुखरूप ठेवलेला आहे. श्री स्वामी महाराजांनी निघताना बुवांना दोन नारळ व एक खारीक प्रसाद म्हणून दिली. या संकेतानुसार पुढे बुवांना दोन पुत्र व एक कन्या झाली. बुवांचे सर्व कुटुंब प्रेमाने स्वामीसेवा करण्यात निमग्न असे.

चिपळूण येथे मार्कंडी भागातील एका डुंगावर श्री ब्रह्मचारीबुवा नावाच्या श्रीस्वामी शिष्यांकरवी श्री स्वामीसुत महाराजांनी इ. स. १८७३ मध्येच संगमरवरी श्रीस्वामीपादुकांची स्थापना करवून घेतलेली होती. श्री ब्रह्मचारीबुवा त्या पादुकांची जबाबदारी एका शिक्षकावर सोपवून यात्रेला निघून गेले होते. तत्पूर्वी त्यांनी सांगून ठेवले होते की, "काही दिवसांतच आमचा माणूस येऊन सगळी जबाबदारी पाहील, तोवर तू सेवा कर." राजाधिराज श्री स्वामी महाराजांच्या प्रेरणेने, श्री स्वामीसुत महाराज व श्री ब्रह्मचारीबुवा या दोघांना मार्कंडी मठाचे भविष्य स्पष्ट माहीत होते. श्री स्वामींनी देखील याच स्थानाचा निर्देश करून बुवांना चिपळूणकडे रवाना केले होते.

काही काळ गोपाळबुवा पत्नीसह मुंबईला श्री स्वामीसुतांच्या सान्निध्यात राहिले व इ. स. १८७४ साली श्री स्वामी महाराजांनी दिलेल्या पादुकाप्रसादासह मार्कंडीला येऊन स्थिरावले. श्री गोपाळबुवांचा दिनक्रम रेखीव होता. त्यांना पहाटे तीनला स्वामीकृपा लाभली, म्हणून ते पहाटे तीननंतर कधीच झोपले नाहीत. एवढेच नाही तर, त्यांनी देह देखील पहाटे तीन वाजताच ठेवला. नित्यनियमाने दोन्ही श्रीपादुकांची पूजा अर्चा, नैवेद्य, भजनादी नित्यक्रम व फावल्या वेळात श्रीज्ञानेश्वरी, भागवत, गाथा आदी सद्ग्रंथांचा ते अभ्यास करीत. त्यांवर सुरेख प्रवचनसेवाही करीत. श्री स्वामीआज्ञेने रंजल्या गांजल्या जीवांना योग्य मार्ग सांगून चिंतामुक्त करीत, त्यांना स्वामीभक्तीचा उपदेश करीत. श्रींच्या अगाध कृपेने बुवांच्या माध्यमातून असंख्य लोकांचे भले झाले, अजूनही होत आहे. श्री गोपाळबुवांची चौथी पिढी त्यांनी सांगितल्यानुसार आजही मार्कंडी मठात सेवारत आहे. या स्थानावर श्री स्वामी महाराजांच्या कृपेची प्रचिती सर्वांना निरंतर येत आहे. श्री.गोपाळबुवा फक्त गुरुवारी भिक्षा मागून आणत व त्यात मिळालेल्या जिनसांवर संपूर्ण आठवडा काढीत. त्यांच्या धर्मपत्नीनेही त्यांना व त्यांच्या खडतर स्वामीसेवेला सर्व बाजूंनी साथ दिली.

इ. स. १८७८ साली चैत्र कृष्ण त्रयोदशीला राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांनी लौकिक देहत्यागाची लीला केली. ती वार्ता ऐकून श्री गोपाळबुवांना गुरुविरहाचे दारुण दु:ख झाले व त्यांनीही देहत्याग करायचा ठरवून प्रायोपवेशन आरंभिले. तिस-या दिवशी साक्षात् श्री स्वामीमूर्ती समोर उभी ठाकली व बुवांचे सांत्वन करीत म्हणाली, "अरे, आम्ही कुठेच गेलेलो नाही. चैतन्यरूपाने आम्ही सर्वत्र व्यापूनच आहोत. भक्तांसाठी तर आम्ही सदैव प्रकटच आहोत, कोठेही गेलेलो नाही. तेव्हा खंत करू नये, निश्चिंत मनाने सेवा चालवावी. आम्ही सतत तुझ्या पाठीशी आहोतच !" श्री स्वामीराजांच्या या आश्वासनाने श्री.गोपाळबुवा पुनश्च नव्या जोमाने स्वामीसेवेस लागले. श्री स्वामी महाराजांच्या या प्रत्यक्ष दर्शनाने त्यांच्या 'प्रकट असण्याची' खात्री पटल्यामुळे, बुवांनी श्री स्वामी महाराजांची पुण्यतिथी कधीच साजरी केली नाही. ते कायम जयंती उत्सवच मोठ्या प्रमाणावर साजरा करीत असत. आजही हा उत्सव मार्कंडी मठात दिमाखात साजरा होतो. शिवाय श्री स्वामीसुत महाराजांची पुण्यतिथी, श्रीगुरुपौर्णिमा, श्रीदत्तजयंती, श्रीगुरुद्वादशी असेही उत्सव साजरे होतात.

सद्गुरु श्री स्वामी महाराजांच्याच प्रसादाने श्री.गोपाळबुवांना सरस्वतीचे वरदान लाभले होते. त्यांच्या मुखातून स्वामी महाराजांनीच अनेक रचनांची निर्मिती करवली. त्यांचे कवित्व अपार झाले. पण त्यातून आपलीच कीर्ती होईल, लोक स्वामी महाराजांच्या ऐवजी आपल्या भजनी लागतील, हे जाणून बुवांनी ते सर्व लिखित ग्रंथ एकेदिवशी 'अग्नये स्वाहा' करून टाकले व 'इदं न मम' म्हणून ते मोकळे झाले. तरीही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने, 'साधनविवेकसारामृत' व  'श्रीकरुणास्तोत्र' या दोनच पद्यरचना व बखर तेवढी आपल्या भाग्याने वाचली. गेल्याच वर्षी, चार प्रकरणांच्या व एकूण ११८ ओवीसंख्येच्या 'साधनविवेकसारामृत' या सुंदर ग्रंथाच्या निर्मितीला शंभर वर्षे पूर्ण झाली. या सारामृतात पू. बुवांनी स्वामीसंप्रदायाचे साधन अनेकांगांनी विस्तारून सांगितलेले आहे. 'श्रीकरुणास्तोत्र' ही दोन अध्यायांची व एकूण २१० ओव्यांची श्री स्वामी महाराजांची करुणाकृपा भाकणारी भावपूर्ण रचना आहे. याच्या नित्यपठणाने भाविकांचे क्लेश, आपत्ती नष्ट होवोत, असे वरदान शेवटी बुवांनी मागून ठेवलेले आहे.

श्री.गोपाळबुवांच्या माध्यमातून प्रकटलेल्या याच स्वामीकृपा-वैभवाचे अपरंपार ऋण आजही सर्व स्वामीभक्त प्रेमादराने मस्तकी वागवत आहेत. बखरीमुळे श्रीसंत प्रीतिनंद स्वामीकुमार तथा श्री.गोपाळबुवा अजरामर झालेले आहेत, अगणित स्वामीभक्तांच्या नित्यपाठात विसावलेले आहेत. 'श्री स्वामी समर्थांची बखर' वाचलेली नाही, असा एकही स्वामीभक्त शोधून सापडणार नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या त्रिभुवनपावन व अत्यंत अलौकिक लीलाकथांचे, प्रामाणिक व सर्वथा सत्य संकलन असणारी ही बखर, स्वामीभक्तांच्या गळ्यातला कंठमणीच आहे यात शंका नाही. ब्रह्मांडनायक श्री स्वामीराजांचे प्रेम हृदयी रुजवणारी, फुलवणारी ही बखर, एकप्रकारे श्री.गोपाळबुवांचे व त्याच्या अनन्य स्वामीभक्तीचे अविनाशी, चिरंतन स्मारकच आहे !

थोडी थोडकी नाही, तर तब्बल शेहेचाळीस वर्षे श्री स्वामीसमर्थ महाराजांची निरलस, निरपेक्ष सेवाचाकरी करून, आजच्याच पावन दिनी, फाल्गुन शद्ध एकादशी दिनांक १ मार्च १९२० रोजी श्री.प्रीतिनंद स्वामीकुमार तथा श्री.गोपाळबुवांनी स्वामीचरणीं आपली काया कायमची वाहिली. मार्कंडी मठाच्या समोरच त्यांच्या अस्थीकलशावर त्यांची समाधी बांधण्यात आलेली आहे. यावच्चंद्रदिवाकरौ अनन्य स्वामीभक्त श्री.गोपाळबुवा, आपल्या परमाराध्य श्री स्वामीराजांचे नित्यश्रीर्नित्यमंगल असे वैभव पाहात, त्यांचे सप्रेम स्मरण करीत श्रीपादुकांसमोर सदैव सेवारत आहेत; आणि त्यांच्याच कृपेने आपणही त्यांच्या लीलांच्या माध्यमातून संपन्न अशा स्वामीचरित्राचे अनुसंधान करीत आहोत, आपले हे भाग्यही किती थोर !

N/A

References : N/A
Last Updated : May 19, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP