जन्म: वैशाख शुद्ध६ १८९०, सोमवार.
जन्म नाव- रोहिणीकुमार, नैष्ठिक ब्रह्मचार्याची दीक्षा नंतरचे नाव- आत्मानंद प्रकाश ब्रह्मचारी, दण्डसहित संन्यास दीक्षा नंतरचे नाव- श्री शंकर पुरूषोत्तमतीर्थ स्वामी महाराज
आई/वडील: दुर्गासुंदरी/प्रसन्न कुमार चाटोपाध्य।य.
गुरु: श्री नारायणतीर्थदेवस्वामी, श्री भारती कृष्ण तीर्थ स्वामी महाराज.
ग्रंथ: योगवाणी.
कार्यकाळ: १८९०-१९५८.
समाधी: भाद्रपद शुद्ध ११, दिनांक २८ सप्टेंबर १९५८
प. प. श्रीशंकरपुरूषोत्तमतीर्थस्वामीमहाराज प. प. श्रीशंकरपुरूषोत्तमतीर्थस्वामी महाराज
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्व बंगाल राज्यात, ढाक्का जिल्ह्यातील विक्रमपूर परगण्यात चीतलकोट येथे प्रसन्नकुमार चटोपाध्याय नावाचे जमीनदार रहात होते. त्यांच्या पत्नीचे नाव दुर्गासुंदरी होते. हे दोघेही मोठे भगवद्भक्त होते. साधुसंतांचा मोठा आदर सत्कार यांचे घरी नेहमी होत असे. यांच्या घराण्यात कालीची तंत्रोक्त पूजापद्धती परंपरेने चालत आली होती.
या धर्मपरायण दम्पतीला दोन मुली व तीन मुलगे झाले. यामध्ये मधला रोहिणीकुमार म्हणजे आत्मानंद प्रकाश ब्रह्मचारी. आणि आत्मानंद प्रकाश ब्रह्मचारी म्हणजेच प. प. श्रीशंकरपुरूषोत्तमतीर्थस्वामीमहाराज होत. रोहिणीकुमार यांचा जन्म वैशाख शु. ६ इ. स. १८९०, सोमवारी झाला. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्यावर मातृवियोगाची पाळी आली. त्या वेळेपासून रोहिणीकुमार, कालीदेवी हीच आपली आई असे अनुभवू लागला. कालीची मूर्ती हालचाल करते, बोलते असे रोहिणीकुमार नेहमी सांगत असत.
लहानपणापासून रोहिणीकुमार वडिलांचे सहवासात त्यांच्यासमोर ध्यानाला बसत असे. एकदा कालीच्या मूर्तीसमोर रोहिणीकुमार ध्यानाला बसले. त्यांचे ध्यान संपून तेथेच समाधी लागली. त्यावेळी डासांनी चावून चावून त्यांचे शरीर लाल केले तरी त्यांच्या शरीराची हालचाल होईना. तेव्हा घरातील मंडळी घाबरली आणि त्यांनी त्यांना हालवून जागे केले. अशा तयारीची चुणुक लहानपणीच दिसून आली.
रोहिणीकुमार हायस्कूलात शिकण्यास दाखल झाले. पण त्यांचे मन त्या शिक्षणात रमत नसे. अभ्यास संपवून ते बराच वेळ अध्यात्म चर्चेसाठी साधुसंतांच्या संगतीमध्ये जाऊन बसत. त्यांनी दहावीमध्ये शाळा सोडली आणि ध्यानधारणा, प्राणायाम यात रमले. एकदा ध्यानाचा अभ्यास चालू असता त्यांना गुरु पाहिजे याची ओढ लागली. स्वप्नांत गुरूंनी दर्शन दिले. वणवण हिंडून ते भव्य शरीराचे दाढी वाढविलेले गुरूचे रूप शोधून काढण्याचा रोहिणीकुमारांनी खूप प्रयत्न केला. त्यांना एकाने सांगितले की तुम्ही रामकृष्णपरमहंसांचे ध्यान करीत जा. ते तुमचे काम करून देतील आणि तसेच झाले. रामकृष्णपरमहंसांची तसबीर पुढे ठेवून ध्यान-अभ्यास सुरू केला आणि थोड्याच दिवसांनी ध्यानात मग्न झालेल्या रोहिणीकुमारांच्या समोर रामकृष्णपरमहंस आले व म्हणाले, "तुझे गुरु सापडत नाहीत काय ? नारायणतीर्थ हे त्यांचे नाव आहे." असे सांगून पुन्हा त्यांचे दाढीदारी रूप दाखविले. या दृष्टांताप्रमाणे परत रोहिणीकुमारांनी गुरूंची शोधाशोध सुरू केली. शेवटी विनिटिया येथे ‘ज्ञान साधन मठात’ ते आले. स्वप्न व दृष्टांत यामध्ये पाहिलेले श्रीनारायणतीर्थदेवांचे दाढीदारी रूप पाहून परम आनंद झाला. हे इ. स. १९१० साल होते. रोहिणीकुमार फक्त वीस वर्षांचे होते. आता सद्गुरूंची भेट झाल्यामुळे त्यांचे सारे जीवन उजाळून निघण्याची पर्वणी आलेली होती.
Shankar-Purushottam-Tirth swami प. प. श्री शंकरपुरूषोत्तमतीर्थ स्वामी महाराज
श्रीनारायणतीर्थदेवांनी "गुरु करणार का?" हा प्रश्न रोहिणीकुमारांना विचारला. प्रश्न ऐकताच ‘होकार’ देऊन रोहिणीकुमार पुढच्या आज्ञेची वाट पाहू लागला. मग श्रीनारायणतीर्थदेव यांनी रोहिणीकुमार यास नैष्ठिक ब्रह्मचार्याची दीक्षा व शक्तिपात दीक्षाही दिली. ‘आत्मानंद प्रकाश ब्रह्मचारी’ हे नूतन नामकरण झाले. आता श्रीआत्मानंदब्रह्मचारीजी ज्ञान साधन मठात राहून श्रीगुरुसेवा करू लागले. रोज गुरुसान्निध्यात साधना तीव्र वेगाने होऊ लागली. सेवा आणि साधना पाहून गुरुंचा संतोष वाढू लागला. गुरुंच्या संतोषाने अनुभूती येऊ लागली. आत्मानंदांनी ज्ञान साधन मठात पडेल ते काम केले. होईल तेवढी साधना केली.
आत्मानंदांना साधनेत इतके अनुभव आले की सर्वांचा उल्लेख अशक्य आहे. कंप होता. दिव्य नाद ऐकू येत होते. शरीर प्रेतवत् निश्र्चेष्ट होत होते. श्र्वासोच्छवास आतले आत चालत असत. कालीभाव जागृत होऊन जिव्हा लपलप करू लागत असे. भस्त्रिका, रडणे, हसणे, नाचणे, गाणे इ. होत असे. रात्र रात्र समाधी लागलेली उतरत नसे. असे होता होता त्यांना एकदा असा अनुभव आला की, "मी स्वत: आदिअन्तविहीन आकाशाप्रमाणे अनंत आहे." नंतर असा अनुभव आला की, "मी सूर्याप्रमाणे अखंड तेज:पुंज असून माझ्यातून अनंत तेजकिरणे बाहेर फेकली जात आहेत." श्रीनारायणतीर्थदेवांनी आत्मानंदांची पूर्वपुण्याई पाहून गुरुत्वाचे अधिकार लगेचच दिले होते. या कार्याच्या प्रचारासाठी काशीकडे जाण्याची आज्ञाही दिली.
श्रीआत्मानंदप्रकाशब्रह्मचारी गुरुआज्ञेप्रमाणे काशीस आले. हरिद्वार, हृषिकेश, उत्तरकाशी इ. ठिकाणी जाऊन आले. उत्तर काशीला आपला आश्रम असावा असा मनात संकल्प झाला आणि त्याच दिवशी एका वृद्ध गृहस्थाने आपले घर व जमीन दान म्हणून यांना दिले. उत्तर काशीचा मठ ‘शंकर मठ’ नावाने स्थापन झाला. इ. स. १९३२मध्ये समारंभही झाला.
मध्यंतरी १९२६ मध्ये श्रीनारायणतीर्थदेवांच्या इच्छेने श्रीआत्मानंदांना संन्यास दीक्षा दिली. ही दण्डसहित संन्यास दीक्षा जगन्नाथपुरीच्या आचार्य पीठाचे श्रीमत् शंकराचार्य १००८ श्री. प. प. श्रीभारतीकृष्णतीर्थस्वामीमहाराज यांचेकडून झाली. यानंतर श्रीआत्मानंद हे प. प. श्रीशंकर पुरुषोत्तमतीर्थस्वामीमहाराज झाले. नंतर उत्तर काशीच्या शंकर मठाची स्थापना झाली. त्यानंतर इ. स. १९३४मध्ये काशी क्षेत्रात छोटी गैबीमध्ये ‘सिद्धयोगाश्रम’ हा दुसरा मठ स्थापन झाला. जिज्ञासू, तत्पर, श्रद्धाळू व्यक्ती पाहून दीक्षा होत होत्या. कार्याचा व्याप वाढत होता. इ. स. १९३५मध्ये श्रीनारायणतीर्थदेव ‘ज्ञान साधन मठ’ मदारीपूर येथे समाधीस्थ झाले. तत्पूर्वी वाढलेल्या कार्याचे स्वरूप त्यांना समजलेले होते.
प. प. श्रीशंकरपुरुषोत्तमतीर्थस्वामीमहाराज दरवर्षी बंगालमध्ये जाऊन येत असत. काशीच्या आसपास व उत्तर काशीस त्यांचे जाणे होत असे. शक्तिपातयोग मार्गाची कल्पना जिज्ञासूंना व साधकांना असावी म्हणून त्यांनी ‘योगवाणी’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ इ. स. १९२८मध्ये लिहिला. आश्रमात साधन, सत्संग, शास्त्रचर्चा सतत चालू असे. शिष्यपरिवारही वाढत होता.
इ. स. १९३१ मध्ये स्वामीशंकरपुरुषोत्तमतीर्थमहाराजांकडे श्रीकालीपद आचार्य नावाचे जिज्ञासू, शिष्यत्व पत्करण्यास आले होते. स्वामींनी प्रसन्न होऊन त्यांना शक्तिपातसहित ब्रह्मचर्याची दीक्षा दिली. तेव्हा त्यांचे नाव ‘वासुदेव-प्रकाश’ असे ठेवले. पुढे या श्रीवासुदेवप्रकाशब्रह्मचारीजींनी स्वामींची सेवा सावलीप्रमाणे सान्निध्य ठेवून केली. शिष्याची ही अनन्यता पाहून स्वामीश्रीशंकरपुरुषोत्तमतीर्थमहाराजांनी इ. स. १९५०मध्ये स्वत: ‘वासुदेव-प्रकाश’ यास संन्यास दीक्षा दिली. त्यानंतर श्रीवासुदेव-प्रकाश-ब्रह्मचारीजी हे प. प. श्रीनारायणतीर्थस्वामीमहाराज झाले. १९५७च्या २४ नोव्हेंबरला यांना स्वामींनी आपल्या गादीचे उत्तराधिकारी केले. सध्या हेच छोटी गैबीतील सिद्धयोगाश्रमाचे उत्तराधिकारी आहेत.
इ. स. १९५८मध्ये भाद्रपद शु. ११ स. दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी ‘सोऽहं’ ‘सोऽहं’ ‘सोऽहं’ या प्रणवोच्चारांनी स्वामी श्रीशंकरपुरुषोत्तमतीर्थ ब्रह्मलीन झाले.