मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष|
आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज

आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज

दत्त संप्रदायातील सत्पुरूष


नाव: आनंद योगेश्वर निळकंठ महाराज (भाऊमहाराज करंदीकर)                  
जन्म: ७ सप्टेंबर १९३१. श्रावण १०. ११ एकादशी
आई/वडील: सौ. पार्वती देवी व अनंतराव करंदीकर (बापूराव)
कार्यकाळ: ७-९-१९३१ ते ८-३-२००४
गुरु: दादा महाराज निंबाळकर. पण गुरूंचे अनुसार गुरु वासुदेवानंद सरस्वती
विशेष: आयुष्यभर फक्त दिनदुबळे पीडित व संकटात सापडलेल्या जनाना मदत व मार्गदर्शन
प. पू. भाऊ महाराज करंदीकर प. पू. आनंद योगेश्वर निळकंठ महाराज (भाऊमहाराज करंदीकर)
एकमेवा द्वितीय दत्तयोगी प. पू . भाऊमहाराज करंदीकर यांचा अल्प परिचय

मनुष्यमात्राचा कल्याणासाठी परमेश्वर विविध सत्पुरुषांच्या रूपातून जन्म घेत असतो. सगुण रूपातील आपले अस्तित्व, आपली चैतन्यशक्ती आपला साक्षात्कार दाखवून सर्व सामान्य मनुष्याला भक्ती मार्गाकडे वळवून, त्यांच्यातील ईश्वरीय स्पंदने जागृत करून मानवी देहाचा उधार करीत असतो.

सांप्रत समाजाच्या कल्याणासाठी जन्मलेली एक साक्षात्कारी विभूती म्हणजे प. पू. आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज (प. पू. भाऊ महाराज करंदीकर) होत. गुरुचरित्र पारायण, नामस्मरण, नामजप व मौलिक मार्गदर्शनाद्वारे सर्व सामन्यांचे जीवन आनंदमय करणारे प. पू. आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज साश्वत अनंत चिरंतन ईश्वरीय शक्तीचा स्त्रोत होत, न्हावे आजही ते देहातीत रुपात असूनही भक्तांना साक्षात्कारी अनुभव देत आहे.

अशा या प. पू. आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज अर्थात श्री नीलकंठ अनंत करंदीकर (प. पू. भाऊ महाराज करंदीकर) यांचा जन्म श्री अनंत व सौ. पार्वती करंदीकर या सतप्रवृत्त मातापिताच्या उदरी नाडसूर, जि. रायगड येथे दि.0७/0९/१९३१ रोजी झाला. इयता चौथी पर्यंतच्या शिक्षणानंतर ते गिरगाव, सदानंद वाडी (मुंबई) येथे रहायला आले. सामान्य आर्थिक परिस्थितीमुळे फारसे शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे तरूनपणत नोकरी करावी लागली. नोकरी करत असताना श्री. कुलदैवत - गायत्री उपासना, या मुले सर्व लक्ष ईश्वर उपासनेकडे वळले. नोकरी निमित्त देशभर भटकंती झाली. त्याच वेलास "चरक फार्मासिटीकल" या कंपनीत नोकरी लागली ती निवृत्ती  नंतरही सुरु होती.

गायत्री उपासना करता करता मी कोण आहे ?  माझे गुरु कोण आहेत ? याचा शोध घेण्याची तळमळ लागली असताना त्यांची भेट श्री. प. पू. दादा महाराज निंबाळकर या सत्पुरुषाशी झाली. दादा महाराजांनी भाऊंना, तुमचे गुरु श्री दत्तावतारी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्द सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज आहेत असे सांगितले. त्यानंतर भाऊंनी आपल्या गुरूंचा शोध घेतला.
आनंद योगेश्वर निळकंठ महाराज (भाऊमहाराज करंदीकर) आनंद योगेश्वर निळकंठ महाराज (भाऊमहाराज करंदीकर)

श्री दत्त संप्रदायला, "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" हा सर्वश्रेष्ठ मंत्र देणारे साक्षात दत्तावतारी परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानन्द सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज यांचा जन्म श्रावण कृष्ण पंचमी इ. स. १८५४ साली माणगाव जि. सिंधुदुर्ग येथे झाला. श्री दत्तात्रेयांचे आज्ञेनुसार त्यांनी आपले जीवन व्यतीत केले. संन्यास धर्माचे कठोर असे व्रत पालन करून संपूर्ण देशभर प्रवास केला. अनेक ठिकाणी त्यांनी चातुर्मास केले. श्री स्वामींनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक ग्रंथ व स्तोत्रे लिहिली आहेत. श्री स्वामी समर्थ, श्री साई बाबा, श्री गजानन महाराज यांचे ते समकालीन होत. या सर्वांच्या चरित्र ग्रंथात परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानन्द सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांचा उल्लेख आहे. त्यांचे जन्मगाव माणगाव, हे तर प्रतीगाणगापूर म्हणून प्रसिद्ध आहे. श्री स्वामी महाराजांनी नरसोबावाडी, औदुंबर वगेरे अनेक ठिकाणी तपसाधना केली, अध्यात्माचा प्रचार केला, भक्तांना मार्गदर्शन केले. हे सर्व करीत असताना श्री क्षेत्र गरुडेश्वर येथे नर्मदातीरी आषाढ शुद्ध प्रतिपदा ए. स. १९१४ साली आपला देह विलीन केला. आजही परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्द सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज चैतन्य रूपाने सर्व भक्तांना अनुभूती देतात.

श्री. स्वामींच्या अध्यात्मिक कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प. पू. आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांनी, "ओम सदगुरू प्रतिष्ठान" हि संस्था बोरिवली येथे स्थापन केली, व तेथे ११/०२/१९८४ रोजी श्री. स्वामींच्या पादुकांची स्थापना केली. गुरुतत्व म्हणजे काय ?, हे भक्तांना समजवण्याचे व जनकल्याणाचे व्रत घेतले. त्यानंतर खोपोली येथे श्री स्वामींच्या पंचधातूंच्या मुर्तीची  दिनांक. ०१/१२/१९९० श्री. दत्त जयंती ह्या दिवशी प्राणप्रतिष्ठा केली व भक्त आपल्या गुरुप्रती काय करू शकतो याचा आदर्श असे स्थापन केले. जगदविख्यात मुर्तीकार श्री सोनावडेकर यांनी हि मुर्ती घडविली आहे. सामाजिक, शेक्षणिक, आरोग्यशिबिरे, रक्तदान, अन्नदान, इत्यादी उपक्रम राबवून जनसेवा केली.

श्री. नाना महाराज तराणेकर, श्री. गगनगिरी महाराज आदि सत्पुरुषांचा त्यांचावर फार लोभ होता. त्यांच्या अनेक भेटी झालेल्या आहेत. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानन्द सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांच्या कार्याचा प्रचार व महाराष्ट्रातच न्हावे तर प्रसार दुबई, अमेरिका,  सिंगापूर, आफ्रिका, इत्यादी देशात करून तेथे अनेक भक्त परिवार निर्माण केले.

"नाम चिंतनाने चिंता मुक्त व्हा !" हे त्यांचे घोष वाक्य होते. त्यांचे "आत्मशोध" हे प्रवचनपर तर "चिरायू" चरित्रपर हे ग्रंथ उपलब्ध आहे. माझा भक्त सुखी झाला पाहिजे, तो आनंदी असला पाहिजे हि त्यांची भक्तांप्रती कळकळ तळमळ होती. आपले दैनंदिन जीवन नामजप व नामस्मरणाचा मार्ग अनुसरून सुखी करावे असे त्यांना वाटे. त्याप्रमाणे त्यांनी हजारो भक्तांच्या जीवनात आनंद निर्माण केले. कालांतराने "प. पू. भाऊ महाराज करंदीकर" ते "प. पू. आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज" (भाऊ ते महाराज) असे रुपांतर झाले. म्हणूनच परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानन्द सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांनी भक्तांना प्रेरणा देऊन हे नाव दिले. सदगुरुंच्या लीला सर्व सामान्य भक्तांना कळत नाहीत. श्री. प. पू. आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज हे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानन्द सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांचेच अवतार आहेत अशी भक्तांची ठाम श्रद्धा आहे.

भक्तांचे जीवन आनंदमयी करणार्या श्री. प. पू. आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांनी सोमवार दि. ०८/०३/२००४ रोजी, तुकाराम बीज, या पावन दिवशी आपल्या देह त्याग केला. आजही त्यांच्या निर्गुणरुपातील साक्षात्काराचा अनुभव भक्तांना येत आहे.
आनंद योगेश्वर निळकंठ महाराज (भाऊमहाराज करंदीकर) आनंद योगेश्वर निळकंठ महाराज (भाऊमहाराज करंदीकर)
सदगुरु प. पू. आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज (प. पू. भाऊ महाराज करंदीकर) विचारधन !

१. नाम चिंतनाने चिंता मुक्त व्हा.
२. आपल्या मनाला पूर्णपणे भावलेली गोष्ट साध्य करण्यासाठी देहाला आणि मनाला लावलेले वळण म्हणजे साधना होय.
३. गुरु तत्वाचा प्रचार आणि प्रसार करणे हे भक्ताचे कर्तव्य आहे.
४. सगुण भक्ती साध्य झाल्या शिवाय निर्गुणातील मर्म कळणार नाही.
५. आपल्या गुरूशी सतत अनुसंधान ठेवणाऱ्याला गुरुकृपेचा निश्चित लाभ होतो.
६. सदगुरु ज्या दिशेने नेतील त्या दिशेनेच चालत रहा, मधेच वाट बदलू नका.
७. देह व्यापाराच्या पलीकडे जाऊन, जीवनाचा केलेला व्यापक विचार म्हणजे आध्यात्म.
८. गुरु आज्ञेचे पालन करणारा भक्त नेहमी आनंद प्राप्त करत असतो.
९. गुरु एक व्यक्ती नसून तत्व आहे. त्या तत्वाशी तुम्ही जेवढे एकरूप व्हाल तेवढ्या प्रमाणात तुम्हाला आनंदाचा अनुभव येवू लागेल.
१०. सुरवातीला नाम हे बेचव, वास नसलेलं निरर्थक वाटत पण एकदा नाम घ्यायची सवय झाली कि ते अमृता पेक्षा ही गोड वाटायला लागत.
११. सदगुरु तुम्हाला कृपाशीर्वाद देण्यास समर्थ असतात, पण तो घेण्या साठी देह आणि मन शुद्धीने तुम्ही समर्थ व्हायला पाहिजे.
१२. संपूर्ण विश्वाशी आपल्याला एकरूप होता येत आणि तिथेच ब्राम्हानंदाला सुरवात होते.
१३ (गुरु) स्थानाशी अनुसंधान  ठेवा.
१४. नामामध्ये जादू आहे, नामामध्ये आनंद देण्याची शक्ती आहे, नामामुळे तन, मन शुद्ध होते पण त्यासाठी नामामध्ये रंगून जायला हवे, हि अवस्था क्रमाक्रमाने प्राप्त होते. एकदा तो चिदानंद अनुभवण्याची ताकद तुमच्यात आली की सारे जग तुम्हाला आनंदमय वाटेल.
१५. श्वासे श्वासे वासुदेव (प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज) नाम स्मरामि.
१६. जीवनात षडरिपु आवश्यक आहेत, पण ते ताब्यात ठेवण्यासाठी तुमची स्पंदने शुद्ध पाहिजेत, मन स्वच्छ पाहिजे आणि हे केवळ नामस्मरणाने शक्य करता येते.
१७ गुरु हे एक तत्व आहे. ते कधीही नष्ट होत नाही.
१८. नामाचे मोल होऊ शकत नाही, इतके ते मौल्यवान आहे. नामाला आकार नाही, रूप नाही, स्वरूप नाही, पण तेज आहे.
१९. नाम सत्शील स्वरुपात असेल तर देवातील देवपण तुम्हाला जाणवेल.
२०. ज्याचा आम्ही नाम घेतो त्यामध्ये जे सदगुण आहेत त्याची जाणीव आमच्या आत्म्याला जर का व्हायला लागली तर परमात्म्याशी नाते जोडणे सोपे जाते, म्हणून नामाचे महत्व आहे.
आनंद योगेश्वर निळकंठ महाराज (भाऊमहाराज करंदीकर) आनंद योगेश्वर निळकंठ महाराज (भाऊमहाराज करंदीकर)
सगुणाचे मह्त्व ! सदगुरु प. पू. आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज (प.पू. भाऊ महाराज करंदीकर) यांचे मुखे

परमेश्वराने मानवाला बुद्धीचे वरदान दिले आहे. त्याचा उपयोग करून मानवाने असंख्य शोध लावले. नवीन नवीन शोध सातत्याने लागतात ही मानवाच्या बुद्धीची कमाल आहे. चंद्रावर जाणारे राकेट, अणुउर्जेचा उपयोग, मानवविरहीत क्षेपणास्त्र, कॉम्पुटर असे शोध वैज्ञानिकांनी लावले. शोध यशस्वी झाला की शास्त्रज्ञाचे कौतुक होते. थोडा विचार केल्यावर असे लक्षात येते की या शोधांची उपयुकतता मोठी असली तरी ते सर्व शोध निर्जीव आहेत. या निर्मितीचा आनंद कायम टिकणारा नाही. शास्त्रज्ञांचे शोध हि निर्मिती (creation) आणि मातेने अर्भकाला जन्म देणे निर्मिती. यामध्ये फार फरक आहे. नवजात अर्भकामध्ये सजीवता आहे. सजीवाकडूनच सजीवाची निर्मिती होते असते. अदृष्यातील चैतन्य अर्भकाच्या रूपाने दृष्यमान होते. कॉम्पुटर कधी रडत नाही, राकेटला कधी भूक लागत नाही. पण भूक लागली की अर्भक रडत. तर कधी आनंदाने हस्त. बाळाला वाढविण्यात मातेला जे परमसुख आहे तो अनुभव शास्त्रज्ञाला कधीच मिळणार नाही. निर्जीवतेबरोबर भावनिक बंध कसे जोडता येणार ? शिवाय निर्जीव वस्तूनाही भावनिक गरज असू शकत नाही. या उलट अत्यंत कठीण शारीरिक वेदना सहन करून माता बालकाला जन्म देते आणि त्याक्षणी तिला वेदनाच विसर पडतो. मातेच्या गर्भामध्ये असल्यापासूनच ते बालक आणि माता यांचे भावनिक बंध जोडलेले असतात. म्हणूनच मातेला होणार्या नवनिर्मितीच्या अवर्णनीय आनंदाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. इतके सगुणाला महत्व आहे.

सगुण हे निर्गुणात्माकातून आकाराला आलेले असते. सगुण रुपामध्ये येण्यासाठी आणि सगुण रुपात आल्यानंतर संपूर्ण विश्वामध्ये एक अतिशय प्रभावी असे वातावरण क्षणार्धात निर्माण होते. त्याचे नाव आहे कोंडमारा. आपण सर्वजण कोंडमर्याच्या माध्यमातून सगुण रुपात आलेलो आहोत. आणि निर्गुणात्म्कामध्ये पुन्हा जाण्यासाठीही कोंडमारा आहे. हा कोंडमारा जाणवू नये यासाठी सदगुरू आहेत. ‘ Man is the highest , powerful , precious material available in the whole world ’. म्हणून असंख्य योनींचा प्रवास केल्यानंतर प्राप्त झालेला देह आत्महत्या करून नष्ट करू नये.

परमेश्वर हा चराचर सृष्टीमध्ये भरलेला आहे ही सर्वमान्य गोष्ट आहे. पण परमेश्वरभक्ती करण्यासाठी आपल्याला त्याचे कोणतेतरी रूप डोळ्यांसमोर हवे असते. चराचर सृष्टीला नमस्कार करून कोणत्याही भक्ताचे समाधान होणार नाही. डोळ्यांसमोर परमेश्वराचे कोणतेही सगुणरुप असावे असे वाटते. सगुण रूपातील परमेश्वर हवाहवासा वाटतो. म्हणून तर गणपती, राम, कृष्ण, विष्णू, अंबामाता, यांच्या मानवी रूपातील तसबिरींचे पूजन केले जाते. वर सांगितलेले सर्व देव कोणीही पाहिलेले नाहीत. पण ज्याला असे जसे भावले तसे तसे रूप चित्रकाराने रेखाटले आणि आपण ते स्वीकारले. त्या तसबिरीतील मानवी रूपाचे चरणी आपण आपल्या भक्तीभाव ओततो. आपल्याला प्राप्त झालेले सगुणरूप म्हणजे मानवी देह हा सालंकृत केला पाहिजे. तो कसा होणार ? चांगले विचार, चांगले कर्म, भक्तीभाव, कृतज्ञता भाव, विनम्रता अशा विविध गुणांची जोपासना करून आपण सगुणरुप सालंकृत करू शकतो. अंगाखांधावर भरपूर दागिने घालून देह सालंकृत होत नाही. तुमच्यातील गुणांनी तो सालंकृत होतो. तेजस्वी दिसतो. पण हे सर्व गुण गुरुकृपेच्या प्रसादाने प्राप्त होतात. यासाठी तळमळीने प्रेमपूर्वक सदैव गुरूंचे नाम जपत रहा. म्हणजे कालांतराने तुम्हाला लाभलेल्या सगुणाचे नाव इतर सर्वजण आदराने घेऊ लागतील.
आनंद योगेश्वर निळकंठ महाराज (भाऊमहाराज करंदीकर) आनंद योगेश्वर निळकंठ महाराज (भाऊमहाराज करंदीकर)
सद्गुरू भाऊ महाराजांची शिकवण कशी होते ते सांगणारा एक प्रसंग

सद्गुरू भाऊ महाराजांनी भक्ती म्हणजे काय? ती कशी करायची? नामस्मरणातून महाराजांशी संवाद कसा साधायचा ते शिकवलं. शिकवलं म्हणजे त्यांनी त्यांच्या आचरणातून, वागण्यातून, बोलण्यातून शिकवलं. स्थानावर बरीच नवीन मंडळी येत असायची, त्यांच्यासाठी सगळेच नवीन असायच. भाऊ महाराज आखाती देशांचा दौरा करून काही दिवसच झाले होते. एके गुरुवारी नेहमीप्रमाणे भाऊ महाराज आरती आणि प्रवचना नंतर दर्शनासाठी बसले. भरपूर गर्दी होती. अजितकडकडे यांची महाराजांवरची गाणी सुरु होती. रात्री साधारण दहा साडेदहा वाजता दुबईवरून फोन आला. थोडावेळ दर्शन थांबले. एक मुसलमान भक्त भाऊंच्याकडे मन मोकळं करत होता. तो ज्या कम्पनीत कामाला होता तिथे पैशाची मोठी अफरातफर झाली होती, आणि त्यामध्ये ह्या माणसाचे नाव आले होते. आखाती दौऱ्यात एका कार्यक्रमात कोणाबरोबरतरी हाही तिथे आला होता. तिथे भाऊमहाराजांचे लेक्चर (प्रवचन) ऐकून तो खूपच प्रभावित झाला आणि त्याच्या भाषेत. ॥ नमो गुरवे वासुदेवाय॥ हा जप डायरीत लिहीत असे. आता ह्या मोठ्या संकटातून भाऊच वाचवू शकतात म्हणून त्याने फोन केला.

भाऊ महाराजांनी त्याचे सगळे म्हणणे समजून घेतले आणि त्याला सांगितले की तू डायरी असाच लिहीत जा, आणि तुझ्या शहरातील जवळपासची जी मशीद आहे तिथे तू जाऊन रोज सकाळी दर्शन घे, पण मशिदीत दर्शन घेणारा तू पहिला माणूस असला पाहिजे. सकाळी मशीद उघडते त्यावेळेस तू तिथे हजर पाहिजे असे तू कर. आणि नमो गुरवे वासुदेवाय चा जप कर. "चिंता करू नकोस चिंतन कर" असे सांगून फोन बंद केला. परत दर्शन सुरू झाले. गर्दी ओसरली होती. रात्रीच्या मुक्कामाला असणारे मोजकेच भक्त शिल्लक होते. थोडयावेळाने भाऊमहाराजही घरी गेले. शुक्रवार गेला की शनिवारी लगेच पुन्हा आरती असायची. गुरुवारप्रमाणेच स्थानावर स्वयंसेवकांची लगबग सुरु व्हायची. आरतीच्या आधी दुपारपासूनच लोक भाऊ महाराजांच्या भेटीसाठी म्हणजे नम्बरात येण्यासाठी (नंबर मिळवण्यासाठी) म्हणून तीन वाजल्यापासूनच येऊन बसायचे. त्या शनिवारी सुद्धा नेहमीप्रमाणेच सर्व सुरु होते. नंबर सुरु झाले. आरती पण सुरु झाली. आरती संपली की भाऊमहाराज खुर्चीवरून उठून माईकच्या येथे उभे राहून महाराजांकडे उपस्थित सर्व भक्तांसाठी प्रार्थना करायचे आणि मग प्रवचनासाठी बाहेर स्टेजकडे यायचे. आणि तेवढ्यात फोन वाजला. दुबईवरून त्याच भक्ताचा फोन परत होता. तो जे तिकडून भाऊमहाराजांना सांगत होता त्याचा आनंद भाऊंच्या चेहऱ्यावर दिसत होता. लगेच प्रवचनात भाऊंनी हा किस्सा सांगितला कि गुरुवारी रात्री फोन आला आणि आज शनिवार संध्याकाळ म्हणजे फक्त दिड दिवसच झाले आहेत. बघा कळकळ तळमळ अशी असेल आणि तुम्ही एकांतिक श्रद्धेने जर महाराजांचे नाम घेतले तर तुमचा धर्म, जात, काहीही मध्ये येत नाही आणि तुम्ही महाराजांच्या असिमकृपेचा लाभ घेऊ शकता. त्यांचा कृपावर्षाव तुमच्यावर होतो, मग तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात का असेनात. महाराज तुमच्या सोबत असतात, कारण ते स्मर्तुगामी आहेत. आठवण करताक्षणीच ते हजर असतात. तुमचा त्यांचेवर आणि सद्गुरुंवर विश्वास तेवढा पाहीजे.

तर, त्या मुसलमान भक्तांचे काम झाले होते. भाऊंनी सांगितल्याप्रमाणे त्याने केले आणि तो त्याच्यावरील सर्व आरोपांमधून मुक्त झाला.
सदगुरु प. पू. आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज (प.पू. भाऊ महाराज करंदीकर)

श्री भाऊ महाराज हे प्रत्यक्ष दत्तवातारी परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती यांचेच नंतरचे अवतार मानले जातात. आयुष्यभर त्यांनी फक्त भक्तांना मार्गदर्शन केले. श्री भाऊ महाराज यांचा जन्म अत्यंत पुण्य पावन व सात्विक दाम्पत्य सौ पर्वतीदेवी व श्री अनंतराव करंदीकर (बापूराव) यांचे पोटी नंदसुर जिल्हा रायगड महाराष्ट्र राज्य यर्थे झाला. सोमवारचा जन्म असल्याने त्यांचे आई वडिलांनी त्यांचे नाव 'नीळकंठ'असे ठेवले असावे. पण घरचे व जवळचे लोक त्यांना प्रेमाने राजा असेच संबोधत. त्यांचे पिताश्री हे व्यवसायाने चित्रपट कॅमेरामन होते. ते १९३१ साली प्रदर्शित झालेल्या पहिल्या थेटर चित्रपट' अलांम अरा' मध्ये कॅमेरामन होते. राजाचे प्राथमिक शिक्षण ४थी पर्यंत जन्मगावीच झाले. नंतर ते गिरगावातील ते सदानंदवाडी येथे राहण्यास आले. लहानपणा पासूनच ते मित्र व इतरांपासून अलिप्त होते. ते कायम स्वतःतच मग्न असत व जास्तीतजास्त एकटेच राहणे पसंत करीत. ते सहाध्यायी व मित्रगणात फारच कमी मिसळत असत. एकेदिवशी गायत्रीमाता त्यांचे स्वप्नात आली व त्यानी गायत्री उपासनेस सुरवात केली.                     

१९४७-४८ मध्ये आणखीनच एककल्ली व इतरांना विचित्र वाटू लागले. या राजाच्या वागण्याने आई वडिलानाही चिंता वाटू लागली व ते सातत्याने राजाचीच काळजी करू लागले. त्या काळाचे सुप्रसिद्ध ज्योतिषी भालचंद्र चिंतामण पुरंदरे शास्त्री यांना जन्म टिपण देऊन पत्रिका अभ्यासण्यास सांगितले. सर्व पत्रिकेचा सर्वांगातून विचार करून श्री पुरंदरे शास्त्री म्हणाले, "बापूराव आपण निर्धास्त राहा. आपल्या मुलाला वेडा म्हणणारे लोक अज्ञानि आहेत. त्याला मिळालेली गायत्री उपसना पुढे करण्यास सांगावे.या मुलामुळे आपल्या कुटुंबास  नावलौकिक मिळेल. हा पुत्र अलौकिक आहे." हे ऐकल्यावर बापूराव व त्यांची पत्नी निर्धास्त झाले व राजाने मात्र अधिक निष्ठेने गायत्री उपासना सुरु केली.

राजाने त्यांचे १०वी पर्यतचे शिक्षण पूर्ण केले. पण त्यांना नाटकात काम करण्यातच अधिक रस वाटू लागला व त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी त्या काळी सुमारे ४३ नाटकात यशस्वी कामे केली आणि त्यांची प्रत्येक नाट्यकृती प्रेक्षकांच्या प्रशंसेस पात्र ठरली. १९५० साली 'लाईस फो' नावाचे औषध कंपनीत त्यांनी सेल्समन ची नोकरी स्वीकारली. नंतर १९५३ ते १९६० या काळात ते नॅशनल टोबॅको कंपनीत नोकरीस लागले. पण मानसिक संयम पहा इतक्या वर्षे नोकरी करूनही त्यांनी कधीही धुम्रपानास स्पर्शही केला नाही!
Nilkantheshwar maharaj प. पू. आनंदयोगेश्वर नीळकंठ महाराज

१९५८ सालापासूनच (म्हणजे वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षा पासूनच) त्यांनी त्यांचेकडे येणाऱ्या लोकांना त्यांच्या अडचणी समजावून घेऊन मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. ते कोणाकडूनही मार्गदर्शनाचा मोबदला घेत नसत. श्री कृपे करून येणाऱ्या माणसांची कामे होत गेली व त्यांचा भाऊंवरचा विश्वास वाढतच गेला. या काळातच त्यांचे माता पिता राजाचे लग्नाबाबत चिंतीत होते. पण गुरुकृपेने त्यांचे  लग्न ठरले व दिनांक १६ फेब्रुवारी, १९५९ला ते सुनंदाशी विवाहबद्ध हि झाले. संसार वेल बहारली व. १५-३-१९६० ला जेष्ठपुत्र नीतीनचा जन्म झाला. त्यानंतर त्यांना हेमंत वश्रीराम अशी आणखी दोन पुत्ररत्ने झाली. १९६० ला भाऊ चरक भांडारात नोकरीस लागले. त्या कंपनीचे प्रॉडक्ट्स विकण्यासाठी त्यांनी मध्यप्रदेश, राजस्थान, नेपाळ व बिहार मध्ये खूप प्रवास केला. श्री भाऊंचे मित्र श्री जुवेकर यांचे चेहऱ्यावर पांढरे डाग दिसू लागले.श्रीभाऊ महाराजांचे सांगण्यानुसार ते डाग दिसेनासे झाले. श्री जुवेकरानी भाऊंना 'श्री गुरुचरित्राची एक प्रत भेट म्हणून दिली.तेथूनच प्रथम श्री गुरुचरित्र वाचन पारायण व श्री गुरु उपासना सुरु झाली.त्यावेळी प्रथम गुरुचरित्र ऐकण्यास ४ लोक होते तर त्याची सांगता माघ व. १ प्रतिपदेसच झाली. त्यानंतर त्यानी श्री क्षेत्र गाणगापूर यात्राही केली. त्यानंतर लगेचच श्रींचे इच्छेनुसार ओम् सद्गुरू प्रतिष्ठानची स्थापना केली. श्री गुरुचरित्र पारायण व समाप्ती उत्सव हाच प्रतिष्ठानचा पहिला महोत्सव ठरला. ३मे १९७४ ला प्रतिष्ठान हे दत्तप।डा बोरिवली ईस्ट मुंबई ६६ येथे प्रशस्थ जागेत प्रतिष्ठान स्थलांतरित झाले. इथंही उपासना आरती व पारायण कार्यक्रम सुरु झाले. परंतू ७ जानेवारीला त्यांचे पितृछत्र हरपले.

श्री भाऊमहाराज व श्री दादामहाराज निंबाळकर यांची १९८० च्या सुमारास भेट झाली तेव्हा ते म्हणाले 'तू मला गुरु म्हण पण तुझे खरे गुरु श्री वासुदेवानंद सारस्वतीच आहेत.' त्यानंतर श्री भाऊ महाराजांनी श्री वासुदेवानंद सरस्वती यांची माहिती मिळवण्यास सुरवात केली. त्यात त्याना श्री नाना महाराज ताराणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले. त्यांचे निवासस्थानी आरतीस येणाऱ्या भक्तात लक्षणीय वाढ झाली. अनेक भक्त त्यांच्या विविध प्रकारच्या समस्या घेऊन येत असत भाऊ महाराज त्यांना उपाय सांगत उपासना सांगत आवर्जून ११ अरत्यास उपस्थित राहण्यास सांगत. श्रीगुरुकृपेने अडचणींचे निवारण होत असे. श्री गुरुकृपा त्यांचे स्थानी भक्तांवर बरसू लागली व अडचणीतले सर्व दुःखी व पीडित भक्तगण भाऊ महाराजांकडे धाव घेऊ लागले.                                        
प. पू. आनंदयोगेश्वर नीळकंठ महाराज प. पू. आनंदयोगेश्वर नीळकंठ महाराज
श्री पादुकांची व मठ स्थापना

११ फेब्रुवारी १९८४ला येथे श्री वासुदेवानंद सरस्वती यांचे पादुकांची प्रतिष्ठापना दौलतनागर बोरिवली ईस्ट येथे करण्यात आली. पण या जागेतही आरती व भक्तांची संख्या सामावून घेणे दिवासोदिवस कठीणच होऊ लागले. २ डिसेंबर १९९० ला स्वामी कृपेने एक भक्त श्री चाफेकर यांनी दान दिलेल्या जागेत श्री दत्तजयंतीचे मुहूर्तावर खोपोली येथे श्री वासुदेवानंद सरस्वती यांची पंचधातूंची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. तत्कालीन सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री सोनावडेकर यांनी ही मूर्ती बनवली. येथे दरवर्षी दत्तजयंतीस पालखी सोहळा होतो. या मठापासून जवळच्याच गावी एका अनुग्रहित साधकाने भाऊ महाराज इंग्लिश मेडिअम स्कूल सुरु केले आहे. ७ सप्टेंबर १९९६ रोजी आत्मबोध नावाची प्रवचनमाला पुस्तक रूपाने प्रकाशीत झाली तर त्यांचे चरित्र चिरायू नावाने ७ फेब्रुवारी २००३ ला प्रसिद्ध झाले. श्री भाऊ महाराजांचे जीवन म्हणजे भक्तिमार्गाने सामान्य माणूस कोठली उंची गाठू शकतो यांचा वस्तुपाठच होय. श्री भाऊ महाराजांचे पवित्र तम् जीवन थोरल्या महाराजांचे कृपेने उजळून गेले पण त्याहीपेक्षा त्यांनी  हजारो लोकांचे जीवन दुखमुक्त केले त्यांना मार्गदर्शन करून त्यांना प्रगतीपथावर नेऊन ठेवले.                                                                 

श्री भाऊ महाराजांच्या मार्गदर्शनाने अनेकांचे संसार उद्धरून निघाले, अनेकजण समस्यामुक्त व आनंदी झाले असे भक्तजन आवर्जून सांगतात. भक्त त्यांचे समोर येताच भाऊमहाराज।ना त्यांच्या समस्यांची कल्पना येत असे. पण ते शांतपणे भक्तांचे म्हणणे ऐकून घेत असत व मग त्यांना मार्गदर्शन करीत असत. भक्त समस्यामुक्त झाला तरीही ते या सर्वाचे श्रेय आपले गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती यांनाच देत असत. म्हणत हि सर्व स्वामींची कृपा मी तर साधा सेवक! श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामींचे विचार वाडगमय उपासना पद्धती यांचा प्रचार करणे हेच त्यांच्या आयुष्याचे उद्दिष्ट होते. २००३ मध्ये भाऊ महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथील गुरुचरित्र वाचन कार्यक्रमास अंदाजे ५०० भक्त गुरुचरित्र ऐकण्यास होते तर अंदाजे ३००० भक्त प्रसादास होते.

ओम् सद्गुरू प्रतिष्ठानास अनेक सत्पुरूष संत व सिद्ध पुरुषांनी भेटी दिलेल्या आहेत. या सिद्ध स्थाना बाबत व श्री भाऊमहाराज करीत असलेल्या अध्यात्मिक व सामाजिक कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे व आपले कृपाशीर्वाद प्रतिष्ठानचे पाठी ठेवले आहेत. त्यात मुख्यत्वेकरून प. प. दादामहाराज निंबाळकर, प. प. दत्तमहाराज कविश्वर, शंकराचार्य, प. प मामा देशपांडे, श्री माधवनाथ  महाराज, प. प. केशवराव जोशी, प. प. पाचलेगावकर महाराज, दादामहाराज झुरळे, अक्कलकोटचे श्री गजानन महाराज. इ. स. १९९८ मध्ये बोरिवली स्टेशनचे बाजूस जो बंगला घेतला तेथेच प. प. टेम्बे स्वामींच्या पादुका प्रतिष्ठापित केल्या होत्या. आता भाऊ महाराज प. पू. आनंदयोगेश्वर नीळकंठ महाराज या नावाने ओळखले जाऊ लागले होते. याच वास्तूत श्री भाऊमहाराज यांनी आपला नश्वर देह श्री दत्तचरणी अर्पण केला. तो दिवस म्हणजे ८-३-२००४. तिथी होती तुकाराम बीज! म्हणजेच तुकाराम महाराजांचे वैकुंठ गामानाचा!

गरीब, दिनदुबळे, पीडित व व्याधीग्रस्त लोकांचा आसरा काळाचे पडद्या आड झाला. हजारो लोक अंत्यदर्शन घेऊन गेले. सारे भक्तगण, दीक्षार्थी द्विक्षा घेतलेले शोकसागरात बुडाले. पण अनेकांना भाऊमहाराज नंतरही दिसल्याने आवर्जून सांगतात. मठ, पादुका, वं मूर्ती आजही सर्वाना मार्गदर्शन करते असा भक्तांचा ठाम विश्वास आहे. आ्जही हजारो भक्त खंडाळा येथील ध्यान मंदिरात मनःशांती मिळवतात आरतीत सहभागी होऊन आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याचे सांगतात!

प. प. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांची प्रासादिक आरती सदगुरु प. पू. आनंद योगेश्वर निळकंठ महाराज उर्फ प. पू. भाऊ महाराज करंदीकर यांनी अंदाजे ३५ वर्षांपूर्वी सुरू केली. प. पू. भाऊ महाराज, प्रश्न विचारण्यास येणाऱ्या नवीन भक्तांस ११ गुरुवार - शनिवार, स्थानावर आरतीस उपस्थित राहण्यास सांगत. याची प्रचिती भक्तांना येत असे. आजही अनेकांना याचा लाभ झाला आहे. आरतीची वेळ संध्याकाळी ७.२५ ची असे. ज्या भक्तांना काही अपरिहार्य कारणांमुळे आरतीला उपस्थित राहणे शक्य नसल्यास, प. पू. भाऊ महाराज त्यांना संध्याकाळी ७.२५ ला स्वगृही किंवा कॅसेट लावून आरती म्हणण्यास सांगत.

खास भक्तांच्या आग्रहासाठी, आणि जे भक्त, काही अपरिहार्य कारणांमुळे आरतीला उपस्थित राहू शकत नाहीत. किंवा मुंबई बाहेर, किंवा देशाबाहेर आहेत. अशा सर्व भक्तांच्या कल्याणा साठी. आपण या आरतीची ऑडिओ क्लिप, पण मागवू शकता. खास करून ज्या भक्तांना काही समस्या मुक्ती करिता ११ गुरुवार आरती म्हणायची / श्रवण करायची असेल व आरतीची ऑडिओ क्लीप सेवही करता येईल. केली सर्वांनाच याचा लाभ / अनुभूती घेता येईल. ज्यांना ७.२५ ला आरती म्हणणे / श्रवण करणे शक्य नसेल त्यांनी आपल्या सोयीनुसार वेळ ठरवून प्रत्येक गुरुवारी आरती चा लाभ घ्यावा व आपल्या नातेवाईक, स्नेही मंडळींना देखील लाभ घडवून द्यावा.

N/A

References : N/A
Last Updated : June 20, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP