मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
समृद्धि आणि प्रीति

समृद्धि आणि प्रीति

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


श्लोक
एक दुसर्‍यास म्हणतो :-
आहे द्वीप सुरेख एक सखया त्या दक्षिणेच्या दिशे,
लंकेचें अजुनी भलें शकल तें राहूनि तेथें असे;
शोभे तें दिवसा सरित्पतिवरी, तेव्हां गमे इंदिरा
वैकुण्ठाहुनि पातली आपुलिया ताताचिया ही घरा ! ॥१॥
तेतें कांचनमन्दिरें तळपती सम्पत्तिनें कोंदलीं,
उद्यानें जणुं काय नन्दनवनें स्वर्गाहुनी आणिलीं,
सारे भोग सदैव सिद्ध असती संगीतवाद्यादि ते;
तेथें जाइल आयु साच मजला स्वप्नापरी वाटतें ! ॥२॥
येतें कां तुझिया मनांत वसुनी भोगां तिथें भोगणें ?
आधीं हें चुकलों परन्तु तुजला सांगावया सांगणें -
कीं तेथें न शके कुणी पुरुष तो स्त्री आणण्याला कदा,
सीताशाप असे अलंघ्य असला द्वीपावरी त्या सदा ! ॥३॥
दुसरा पहिल्यास :-
सीताशाप जरी मुळींच नसता त्या द्वीपखण्डावरी,
न्यायाला मजला जरी गवसती तेथें सखी अंतुरी,
येतों मी न तरीहि तेथिल सुखें तीं भोगण्या आयतीं,
जीं प्रीतीस मला अमे ढकलती शब्दावशेषाप्रती. ॥४॥
सीताशाप परन्तु त्यावरी असे दुर्लंघ्य आतां तर;
तेव्हां पौरुषपूर्ण कोण असला राहील तेथें नर ?
आम्हांला रुचती न तीं श्रमफलें कान्ते दिल्यावांचुनी,
तेथें सेविल कोण अश्रमफलें तीं एकला राहुनी ? ॥५॥
तूं माझ्याकरितां तरी हुडकुनी तें द्वीप रे काढणें,
जेथें रान भयाण फार असती कांटे कडे वांकणें,
जेथें वन्य पशू सदा डिरकती हिंसा जयांना प्रिया;
तेथें घेउनियां प्रिया मग मला आज्ञा करीं जावया ! ॥६॥
कांटे झाडिन मी, पशू वधिन मी, किल्ला तिला बांधिन,
मी तेतें सुख व्हावयास अपुले हे प्राणही टाकिन;
बांधूं आम्हि परस्परांप्रत लताजालीं सुखानें गळीं;
स्वर्गाला निरयामधूनि पहिल्या काढूं अम्ही त्या स्थळीं ! ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP