मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
स्फूर्ति

स्फूर्ति

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


( चाल---किती रहावे तुजविण आतां )

कांठोकांठ भरूं द्या पेला, फेंस भराभर उसळूं द्या !
प्राशन करितां रंग जगाचे क्षणोक्षणीं ते बदलूं द्या !

अमुच्या भाळीं कटकट लिहिली सदैव वटवट करण्याची,
म्हणेला जग आम्हांस मद्यपी; पर्वा कसली मग याची !

जिव्हेचीं बंधनें तर ढिलीं करा तीव्र या पेयानें
यदुष्णतेनें द्यावापृथ्वी द्रवुनि मिसळती वेगानें !

होउनियां मग दंग मनीं,
व्हावें तें आणा ध्यानीं,
गा मग सुचतिल तीं गाणीं;

परिसुनि त्यांचे शब्द, रूढिचे दास झणीं ते खवळूं द्या !
कांठोकांठ भरूं द्या पेला, फेंस भराभर उसळूं द्या !

सोमाचा रस वेदकाळच्या ऋषिवर्यांनीं उकळील,
शेष तयाचा द्या तर लौकर पिपासु जे त्या आम्हांला !

औचित्याच्या फोल विवेका ! जा निघ या दुरवस्थेनें
अम्हां घेरिलें म्हणुनी घेतों झिंगुनियां या पानानें !

क्लृप्तीची मग करुनी नौका व्योमसागरावरि जाऊं,
उडुरत्नें या गरिब धरेला तेथुनि फेंकुनियां देऊं !

अडवतील जर देव, तरी
झगडूं त्यांच्याशीं निकरीं.
हार न खाऊं रतीभरी !

देवदानवां नरें निर्मिलें, हें मत लोकां कळवूं द्या !
कांठोकांठ भरूं द्या पेला, फेस भराभर उसळूं द्या !

पद्यपंक्तिची तरफ आमुच्या करीं विधीनें दिली असे,
टेकुनि ती जनताशीर्षावरि जग उलथुन या देउं कसें !

बंडाचा तो झेंडा उभवुनि धामधूम जिकडेतिकडे ---
उडवुनि देउनि जुलुमाचे या करूं पहा तुकडे तुकडे ---

‘ महादेव ! हरहर !’ समराचा गर्जत तो वार्‍यावरती
येउनि घुमतो अमुच्या कर्णीं ---‘ निजती ते ठारचा मरती !’

उठा ! उठ ! बांधा कमरा !
मारा किंवा लढत मरा !
सत्त्वाचा ’ उदयोऽस्तु ’ करा !

छंद फंद उच्छृंखल अमुचे स्तिमित जगाला ढवळूं द्या !
कांठोकांठ भरूं द्या पेला, फेंस भराभर उसळूं द्या !

मुंबई, २३ मे १८९६

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP