जगामधीं या तुला कशाला परमेशें धाडिलें ?
केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.
[ चाल - वीरा भ्रमरा० ]
जगामधीं या तुला कशाला परमेशें धाडिलें ? -
कराया श्रम तुजला योजिलें.
मधुर माधवीकुंज आपुले विस्तृत करणें कधीं
देऊं नको सोडुनि गा तूं मधीं;
घाम उन्हाचा फार येईल बा तुला,
पण धीर धरीं, जों अस्तसमय पातला,
जों कालाच्या मंजुर घण्टाटंकारें सुचिवलें -
चला रे काम अतां संपलें. ॥१॥
देवें उटणीं तुला चर्चिलीं काय म्हणुनि सांग कीं ? -
झगडण्या, नच पडण्या मंचकीं !
स्फटिक ते धवल जेंवि शोभले,
अश्रु जे तेंवि तुवां ढाळिले
तुझ्या धाकल्या उद्यमबन्धूंकरितां, देवें भले
भुजालंकरणीं ते गोविले. ॥२॥
धैर्य आणि ती कार्यनिरतता दावुनि तूं आपुली,
बांधवीं स्फूर्ति पसर चांगली,
तुझें बघुनि ते हृदयिं धीरता घेतिल मग लागली,
करीं ही धरितिल कृत्यें भलीं;
मग - काय सांगणें ! - द्वारें तुझिया तयां
देइल सुफलें ईश्वर हरिखूनियां.
अल्प पुष्पही बिन्दु हिमाचे अपुल्या पेल्यांतले
वांटितें भावंडीं आपले. ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 15, 2017
TOP