मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
गांवीं गेलेल्या मित्राची खोली

गांवीं गेलेल्या मित्राची खोली

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


[ जलधरमाला वृत्ताच्या चालीवर. ]
येथें होता रहात माझा स्नेही,
स्नेह्यांसाठीं जो या लोकीं राही,
पाशाला जो तोडायाला पाही,
स्वदेशपाशीं अपणा बांधुनि घेई. ॥१॥
पाशांविण या कोठें कांहीं नाहीं,
पाशांकरितां चाले अवघें कांहीं ;-
पाशांतुनि या सुटतां सुंदर तारे,
तेज तयांचें विझूनि जाई सारें. ॥२॥
चन्द्रानें या सदैव पृथ्वीपाशीं
राहुनीच का सेवावें सूर्याशीं ?
शक्त जरी का असेल तो, तरि त्यानें
सेवावा रवि खुशाल निजतंत्रानें. ॥३॥
सोडी पत्नीपाशाची तो आस,
स्वदेशसेवेकरितां घाली कास,
तो मत्सख निज गांवीं गेला आहे,
खोलीला या कुलूप लटकुनि राहे. ॥४॥
येथें गोष्टी आम्ही करीत होतों,
होतों विद्याभ्यासहि करीत होतों ;-
मित्रत्वाचें बीज पेरुनी खासें
मैत्रीवल्ली वाढविली सहवासें. ॥५॥
देशाविषयीं गोष्टी बोलत येथें
बसलों, विसरुनि कितीकदां निद्रेतें;
श्वासीं अमुचे स्वास मिळाले तेव्हां,
अश्रूमध्यें अश्रु गळाले तेव्हां. ॥६॥
ऐसें असतां, पहांट भूपाळ्यांला
पक्षिमुखां हीं लागयिली गायाला,
हवा चालली मंद मंद ती गार,
प्रभाप्रभावें वितळे तो अंधार; ॥७॥
तेव्हां आम्हीं म्हटलें - “ ही र्‍हासाची
रजनी केव्हां जाइल विरूनि साची ? -
स्वतंत्रतेची पहांट ती येईल,
उत्कर्षाचा दिन केव्हां सुचवील ? - ” ॥८॥
“ या डोळ्यांनीं पहांट ती बघण्याचें
असेल काहो नशिबीं दुर्दैव्यांचे ?
किंवा तीतें आणायाचे कांहीं
यत्न आमुच्या होतिल काय करांहीं ? ” ॥९॥
असो. यापरी आम्हीं प्रश्न अनंत
केले, होउनि कष्टी, परस्परांत;
‘ इच्छा धरितां मार्ग मिळे आपणांला ’
या वचनें मग धीर दिला चित्ताला ॥१०॥
कोठें असशिल आतां मित्रा माझे ? -
करीत असशिल काय काय तीं काजें ? -
देशासाठीं शरीर झिजवायाला
स्फूर्ती आणित असशिल का कोणाला ? ॥११॥
तुझी बघुनि ही मित्रा खोली बंद,
विरहाग्नीनें भाजे चेतःकंद,
पुनरपि आपण येथें भेटूं, ऐशी
आशा होई जलधारा मग त्यासी. ॥१२॥
श्लोक
झाल्या नंतर अस्त तो, कमल तें पाहूनियां लागलें,
‘ उद्यां मित्र करील तो निजकरें येऊनि याला खुलें, ’
ऐसें बोंलुनि ज्यापरी भ्रमर तो जातो श्रमानें दुरी,
जातो, बोलुनि या स्थलासहि तसें, मित्रा ! अतां मी घरीं. ॥१३॥
मे, १८८७.

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP