मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
सतारीचे बोल

सतारीचे बोल

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


( वृत्त-पादाकुलक )

काळोखाची रजनी होती,
ह्रदयीं भरल्या होत्या खंती;
अंधारांतचि गडलें सारें
लक्ष्य, न लक्षी वरचे तारे;

विमनस्कपणें स्वपदें उचलित,
रस्त्यांतुनि मी होतों हिंडत;
एका खिडकींतुनि सूर तदा
पडले---दिड दा, दिड दा, दिड दा !

जह ह्रदयीं जग जड हें याचा;
प्रत्यय होता प्रगटत साचा;
जड तें खोटें हें मात्र कसें
तें न कळें; मज जडलेंच पिसें

काय करावे, कोठें जावें,
नुमजे मजला कीं विष खावें !
मग मज कैसे रुचतील वदा
ध्वनि ते-दिड दा, दिड दा, दिड दा !

सोंसाटयाचें वादळ येतें,
तरि तें तेव्हां मज मानवते;
भुतें भोंवतीं जरि आरडतीं;
तरि तीं खचितच मज आवडतीं;

कारण आंतिल विष्ण्ण वृत्ति
बाह्म भैरवीं धरिते प्रीति;
सहज कसे तिज करणार फिदा
रव ते--दिड दा, दिड दा, दिड दा !

ऐकुनि ते मज जो त्वष चढे,
त्यासरशीं त्या गवाक्षाकडे
मूठ वळुनि मीं हात हिसकिला;
पुटपुटलोंही अपशब्दांला;

म्हटलें---” आटप, आटप मूर्खा !
सतार फोडुनि टाकिसी न कां !
पिरपिर कसली खूशालचंदा,
करिसी---दिड दा, दिड दा, दिड दा !”

सरलों पुढता चार पावलें;
तों मज न कळें काय जाहलें;
रुष्ट जरी मी सतारीवरी
गतिमम वळली तरी माघारी;

ध्वनिजालीं त्या जणूं गुंतलों
असा स्ववशता विसरुनि बसलों ---
एका ओटयावरी स्थिर तदा
ऐकत---दिड दा, दिड दा, दिड दा !

तेथ कोंपरें अंकीं टेंकुति
करांजलीला मस्तक देउनि
बसलों; इतक्यामाजी करुणा ---
रसपूर्ण गतो माझ्या श्रवणां

आकर्षुनि घे; ह्रदय निवालें,
तन्मय झालें, द्रवलें; आलें ---
लोचनांतुनी तोय कितिकदां
ऐकत असतां---दिड दा, दिड दा !

स्कन्धीं माझ्या हात ठेवुनी
आश्वासी मज गमलें कोणी
म्हणे---” खेद कां इतुका करिसी ?
जिवास कां बा असा त्राससी ?

धीर धरीं रे ! --- धीरा पोटीं
असतो मोठीं फळें गोमटीं !
ऐक, मनींच्या हरितील गदा
ध्वनि हे---दिड दा, दिड दा, दिड दा ! ”

आशाप्रेरक निघूं लागले
सूर तधीं मीं डोळे पुशिले;
वरती मग मीं नजर फिरविलीं,
नक्षत्रें तों अगणित दिसलीं;

अस्तित्वाची त्यांच्या नव्हती
हा वेळवरी दादच मज ती !
“ तम अल्प---द्युनि बहु ” या शब्दां
वदती रव ते---दिड दा, दिड दा !

वाद्यांतुनि त्या निघती नंतर
उदात्ततेचे पोषक सुस्वर;
तो मज गमले विभूति माझी
स्फुरत पसरली विश्वामाजी;

दिक्कालांसहि अतीत झालीं;
उगमीं विलयीं अनन्त उरलों;
विसरुनि गेलों अखिलां भेदां
ऐकत असतां दिड दा, दिड दा !

प्रेमरसाचें गोड बोल ते
वाद्य लागतां बोलायातें,
भुललों देखुनि सकलहि सुन्दर;
सुरांगना तों नाचति भूवर;

स्वर्ग धरेला चुम्बायाला
खालीं लवला---मजला गमला
अशा वितरिती अत्यानंदा
ध्वनि ते---दिड दा, दिड दा, दिड दा !

शान्त वाजली गती शेवटीं,
शान्त धरित्री, शान्त निशा ती,
शान्तच वारे, शान्त तारे,
शान्तच ह्र्दयीं झालें सारें !

असा सुखें मी सदना आलों,
शान्तींत अहा ! झोपीं गेलों;
बोल बोललो परी कितिकदां
स्वप्नीं---दिड दा, दिड दा, दिड दा !

२० मार्च १९००

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP