नाहीं ज्यापरि डोंगळा
केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.
श्लोक
नाहीं ज्यापरि डोंगळा कधिंहि तो गेला झणी साखरे,
नाहीं ज्यापरि चालला कधिंहि तो माजार्र साईकडे,
नाहीं कृष्ण कधींहि ज्यापरि सखे गेला दह्यांडीप्रत,
तैसा येइन मी समुत्सुक गडे तुझ्याकडे चालत ! ॥१॥
भिक्षूनें निजदक्षिणा नच कधीं स्वीकारिली जेंवि कीं,
तप्तानें नच ज्यापरी धरियली गंगाजळी हस्तकीं,
हंसानें बिसिनी जशी न धरिली चंचूपुटीं आदरें,
तैशी घेईन मी तुला निजकरीं तारे ! त्वरेनें बरें ! ॥२॥
जैशी ती मलयानिलें न वनिका केव्हांहि आलिंगिली,
नाहीं ज्यापरि परती कधिंहि ती धाराधरें वेष्टिली,
जैशी इन्द्रधनुष्करें उडुपथें मेघालि नाश्लेषिली,
आलिंगीन तशी तुला दृढ उरीं गे मुंजुले ! चांगुली. ॥३॥
मद्यासक्त नरें जशी नच कधीं कान्ते ! कुपी झोंकिली,
भृंगानें अथवा जशी कमलिनी नाहीं कधीं चोखिली,
राहूनेंहि न सेविली सखि सुधाधारा जशी सत्वर,
तैशी सेविन गोड ओष्ठवटिका तूझी गडे ! सुन्दर. ॥४॥
९ एप्रिल, १८८७.
N/A
References : N/A
Last Updated : March 15, 2017
TOP