मदन आणि मदनिका
केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.
दिंडी
मदन आणि मदनिका प्रिया माझी
चुंबनाचे कारणें सोंगठ्यांहीं
खेळण्याला बैसलीं तधीं गाजी
मदन जाऊं लागला हार पाहीं ! ॥१॥
श्लोक
भाला आणि धनुष्य आणि शर ते त्यानें पणीं लाविले,
तैसे दोनहि चक्रवाक अपुले, सारे तिनें जिंकिले;
स्वोष्ठींच्या मग विद्रमासि मुकला; खालीं तयें टाकिला
गल्लींचाहि गुलाब नंतर भला, तोहि तिनें जिंकिला ! ॥२॥
तेव्हां हनूवरिल वर्तुळ त्या खळीला,
भाळावरील मग त्या स्पटिकप्रभेला,
लावी यथाक्रम अनंग पुनः पणास,
जिंकूनि घे मदनिका सहसा तयांस ! ॥३॥
वेडा होउनि, लावुनी स्वनयनें दोन्ही तदा खेळला,
नेलीं तींहि तिनें, अनंग उठला होवोनियां आंधळा !
हा ! हा ! हे मदना ! तुझी जर हिनें केली दशा हे अशी
व्हायाची न कळे हिशीं तर अतां माझी अवस्था कशी ! ॥४॥
२ मार्च, १८८८.
N/A
References : N/A
Last Updated : March 15, 2017
TOP