मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
सृष्टी आणि कवि

सृष्टी आणि कवि

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


( वसंततिलका )

मी एकला फिरतसे बहुवार रानीं,
यालागुनी न समजा मजला अडाणी;
आराधुती विपिनदैवत मी तिथूनी
त्याचीं प्रसादवचनें मनुजास आणीं.

पाहून निर्झर, उरीं कर वेंगुनीयां
मी ठाकतों, परि न मंद म्हणा जना जा.
प्रत्येक मेघ वरता फिरतां नभांत
एकेक शब्द लिहितों मम पुस्तकांत !

‘ पुष्पें वनांत कसलीं खुडितो फिरोन ?’
उद्योगमग्न जन हो ! मज हें म्हणा न.
नक्षत्रसें सुम मदीय करांतलें तें
सत्क्लृप्तिपूरित असें सदनास येतें !

पुष्पामधें प्रकट होय न जें जराही
सृष्टींत एकहि रहस्य असे न कांहीं;
ज्याचा ध्वनी न उमटे खगकूजितांत
नाहीं निगूढ इतिहास असा जगांत !

शेतामधूनि सदनाप्रत पीक एक
नेतात पुष्ट बलिवर्द तुझें सुरेख,
तूझी जमीन दुसरें मज पीक देते
काव्यांत सांठवुनि ठेवितसें पहा तें !

२०-४-९५

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP