जरी तूं ह्या येथें असतिस
केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.
श्लोक
जरी तूं ह्या येथें असतिस सखे सौख्यद मला,
तुझ्या येथें वा मी जरिहि असतों लोलुप तुला,
तरी खासें झालें कितिक मजला सांग असतें ? -
दुरावूं, अन्योन्यां कवळुनि, दिलें आम्हिं नसतें. ॥१॥
त्वरेनें त्या क्रीडा मग उजळित्या या रजनितें,
- सरेना जी खेपा करित असतां मी इथतिथें,
- तुला वा मच्चित्रें क्षण दिसवुनी लाजवुनियां,
पुन्हां तीं झांकोनी, छल तव करी जी समयिं या. ॥२॥
‘ प्रिये ’ ‘ कांते ’ हीं मीं मधुर अभिधानें मग किती
श्रुतिद्वारें चित्तीं तव दवडिलीं जाण असतीं !
न वा ऐसें. - तीं मीं लिहुनि निजदन्तीं त्वदधरीं,
तुवा तीं वाचाया मुकुर धरितों मी तव करीं ! ॥३॥
‘ प्रिये ’ ‘ कांते ’ ऐशा मधुर अभिवानांस अधुना
लिहावें मीं पत्रावर लकडिनें या अहह ! ना ?
परी तींही आतां अतिअतर सुटोनी थरथर
पुरीं हाताच्यानें नच करवती ते हरहर ! ॥४॥
पुरीं हाताच्यानें नच करवती ती प्रिय जरी,
न वा डोळ्यांच्यांनीं क्षण बघवती तेंवि अपुरीं;
पुसाया तीं इच्छीं परि कर धजेना म्हणुनियां
कराया सांगें तें स्वनयनजलाला रडुनियां ! ॥५॥
१८८६.
N/A
References : N/A
Last Updated : March 15, 2017
TOP