मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीज्ञानेश्वरमहाराजांचें चरित्र १

श्रीज्ञानेश्वरमहाराजांचें चरित्र १

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


( भाग पहिला )

॥ आर्या ॥
गोदातटास झाले जगदुद्धारार्थ संत अवतीर्ण ।
संन्याशाचे उदरीं निवृत्ति ज्ञानदेव सोपान ॥१॥
हीं प्रति ईश्वरचे अंश असलेली जगद्विख्यात चारीं भावंडें महाराष्ट्रांत श्रीगोदावरीच्याकांठीं पैठण्याचे पूर्वेंस चार कोसांवर असलेल्या आपेगांवीं जन्मास आलीं. ह्या आपेगांवीं गोदावरींत ब्रह्मपुराणांत सांगितलेलें ब्रह्मतीर्थ नांवाचें तीर्थ आहे. या गांवीं वाजसनीय शाखेंत विठ्ठलपंत नांवाचा एक कुळकर्ण्याचा मुलगा होता. हा साधारण विरक्त असल्यामुळें तीर्थाटन करीत फ़िरत असे. एक वेळेस हा मुलगा फ़िरत फ़िरत आळंदीस आला. तेथील सिद्धोपंतांनीं आपली एकुलती एक रुक्मिणी नांवाची मुलगी ईश्वराचे आज्ञेनें विठ्ठलपंतास दिली. याच विठ्ठलपंतांनीं काशीस जाऊन संन्यास घेतला; व पुन्हां गुरूंच्या आज्ञेनें गृहस्थाश्रम स्वीकारला. त्यानंतर त्या विठठलचैतन्यास रुक्मिणीपासून हीं चार मुलें झालीं. या मुलांचा जन्म कोणी म्हनतात आळंदीस आपल्या आजोळीं झाला; श्रीसंत मुक्ताबाईंनीं आपल्या अभंगांत एके ठिकाणीं ज्ञानेश्वरास उद्देशून असें म्हतलें आहे कीं, ‘ ज्ञानेश्वरा, आपण हल्ली पैठणांत आलो आहों; तेव्हां येथून अगदीं जवळ असलेल्या आपल्या जन्मभूमीच्या दर्शनास जाऊन येऊं. ’ यावरून या चारी भावंडांचा जन्म आपेगावीं झाला असला पाहिजे.
विठठलचैतन्यास आश्रमत्याग घडल्यामुळें आपेगांवच्या लोकांनीं त्यांचेवर बहिष्कार घातला. ब्राह्मण समाजांत त्यांची अप्रतिष्ठा झाली. कोणीहि ब्राह्मण त्यांना सहानुभूति दाखवीना. म्हणून विठठलचैतन्य आपल्या मुलाबाळांसह आपली सासुरवाडी जी आळंदी तेथें येऊन राहिले. त्यावेळीं -

॥ ओवी ॥
आठ वर्षांचे निवृत्तिनाथ । ज्ञानेश सोपान सहा सात ।
मुक्ता धाकुटी अवघ्यांत । होती पांच वर्षांची ॥२॥

॥ पद ॥ ( पोरांसह थोर किती० )
पोरें नच थोर खचित । श्रीत्र्यंबक जेष्ठनाथ । अवतरला
श्रीअनंत । ज्ञानदेव तो ॥ ब्रह्मा सोपाननाथ । मुळमाया
भगिनी येथ । मुक्ता गणुदास म्हणत । ब्रह्मचित्कला ॥३॥

॥ ओवी ॥
वयपरत्वें खेळण्यासी । जाती गांवींच्या मुलांसी ।
परी पारख अंधासी । कोठून हिर्‍याची होईल ॥४॥
निवृत्तिनाथांनीं मोठ्या कळकळीनें मुलांना सांगावें कीं; बाळांनो ! या व्यवहारी खेळण्यांत अर्थ नाहीं.


॥ पद ॥
खेळुं पोरा रे चाल पोरा । अपरोक्ष ज्ञानभंवरा ॥ध्रु०॥
( चाल ) याला वैराग्याची आरी । जाळी भक्तिची साजिरी ।
भावें फ़ेकूं हा गरगरा । खेळुं पोरा० ॥
या भवर्‍याचा रंग । आहे अक्षय अभंग ।
भविं बुडविल तुज ना जरा ॥ खेळुं पोरा० ॥
याला गुच्चाची ना भीति । नादें कळेल आत्मज्योती ।
रंगण ब्रह्मांडाचे करा ॥ खेळुं पोरा० ॥
गणु म्हणे ऐसा भंवरा । पाहिला मी साईकरा ।
पहा शिरडींत जाऊन नरा ॥ खेळुं पोरा० ॥५॥

॥ पद ॥ ( शस्त्र मी पुन्हा समरीं )
नको नको आम्हा हा खेळ । उगा न घालवी आमुचा वेळ ॥
( चाल ) विटि दांडू । खेळुं चेंडू । आम्हासी, नको भांडूं ।
करुं आम्ही निराळा मेळ ॥ नको नको० ॥६॥

॥ दिंडी ॥
मुलांसंगे खेळतां पथामाजीं
राहति पोरें ना यास कदा राजी ॥
नका येऊं आम्हांत खेळण्याला ।
तुम्ही लांछन जणुं काहाणि जोंधळ्याला ॥७॥

॥ पद ॥ (छक्कड )
निवर्‍याग्यान्याची संगत नाहीं बरी । अहो नाहीं बरी ।
होईल रिकामा रे जाच घरीं ॥ निवर्‍याग्यान्या ॥ध्रु०॥
( चाल ) यांना जात गोत मुळिं नाहीं ।
आले संन्याशाच्या पोटिं पाही ।
तुळशिमाजीं भांगोराच कांहीं ॥
करा वायला निवडुंग हा रे तिनधारी ॥८॥
मुक्ताबाई आईस सांगें -

॥ ओवी ॥ ( जात्यावरील गीत )
आई घेती न खेलायाला । पोलें आपुल्या या गांविचीं ।
कुणी दाखवती वांकुल्या । पोलें म्हणती संन्याशाचीं ॥९॥
॥ आर्या ॥
ऐकुनि बोल तियेचे मनिं विव्हळ होय रुक्मिणी माता ।
ज्ञातीबाह्य आम्हांसी केलेंसी काय पंढरीनाथा ! ॥१०॥
तिनें आपल्या पतीजवळ हा पाढा वाचावा व म्हणावें कीं, कसंहि करा, पण आपल्यावर लोकांनीं जो बहिष्कार घातला आहे तो दूर करण्याची तजवीज करा. नाहींतर मुलांच्या मुंजी होण्याला पंचाईत पडेल.
सरतेशेवटीं ब्रह्मवृंदाच्या सभेपुढें पदर पसरून विठ्ठलपंतांनीं प्रार्थना केली.

॥ पद ॥ ( मालकंस - त्रिवट )
जोडोनियां कर करित मी याञ्चा । क्षमा करावी ममापराधा ॥धृ०॥
शास्त्रविहित विधि नच आचरलों । तेंणें जगतीं निंद्याचि ठरलों ।
स्वजातियांच्या मधुनी उठलों । मार्ग दाविणें सुखदनि साधा ॥ जोडुनियां० ॥११॥

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
धरामर तुम्ही तुम्हां मदिय प्रार्थना ही असे ।
द्विजत्व शिशुलागैं द्या गणुं नका वृथा शूद्रसे ॥
नयेच अधिकार तो श्रुति पढावया त्याविणें ।
कृपा करुनि येतुली मजसि भीक हो घालणें ॥१२॥
हें ऐकून ब्राह्मणांनीं विठ्ठलचैतन्याला सांगितलें कीं,

॥ आर्या ॥
पतिताहुनि परतां तूं हो सरता कृष्णवदन नच दावी ।
लोहा सुवर्ण करण्या इच्छिसि तूं गोष्ट ही कशी व्हावी ? ॥१३॥

॥ पद ॥ ( झंपा )
महा नीच तूं पातकी पापराशी । बाट तूं लाविला निजकुलासी ॥धृ०॥
त्वदिय पापाप्रती दंड गवसे न तो ।शोधितां धर्मसिंधू श्रुतीसी ॥
धरुनि पोरें करीं म्हणसि मुंजी करा । मंत्र गायत्रि तो द्यावयासी ॥ महा नीच० ॥
गणति अश्वत्थ का पार जरि बांधिला । काननींच्या मुढा हेकळासी ॥
धुवुनि गंगोदकें म्हणसि तेजी करा । पंकिंच्या लोळत्या सूकरासी ॥ महा नीच तूं० ॥१४॥

॥ ओवी ॥
ऐसें बोलतां धरामर । विठ्ठल जाहला निरुत्तर ।
बैसोनियां चिंतातुर । नयनीं अश्रु ढाळितसे ॥१५॥
विठ्ठलपंतांना फ़ार वाईट वाटलें, ते म्हणाले हे देवा पंढरीनाथा -

॥ दिंडी ॥
मुलें माझीं अनाथ झालिं चारी ।
तुला लज्जा बा ! मदिय रावणारी ॥
कांहिं होवो चिंता न करि मि आतां ।
निघुनि जातों काशीस जगन्नाथा ॥१‍६॥

॥ ओवी ॥
विठ्ठलपंत रुक्मिणी । मुलांचा मोह सोडुनी ।
उत्तर दिशा लक्षुनी । पंथ क्रमिते जाहले ॥१७॥
त्या वेळीं लहानग्या मुक्ताबाईनें तोंड गोरेंमोरें करून आपल्या आईचा पदर धरला व ती म्हणूं लागली -

॥ ओवी ॥
आई ! धलीन् पदला तुझ्या । नतो थोलुन जाऊं मशीं ॥
माझ्या निवलुत्ती दादाला । कोण घालिल जेवायासी ॥
डोले चोलित ज्ञानेश्वर । मागे वलून पाही जला ॥
माझ्या सोपान भाऊच्या । पाठिवलून फ़िलवी कला ॥१८॥
माउलीचा कंठ दाटून आला. पण पुन्हां आलेला मायेचा उमाळा आवरून ती म्हणते,

॥ पद ॥ ( आज आक्रुर हा० )
नको ओढूं तूं व्यर्थ पदर मम आजी । द्या सोडुनि आशा माझी ॥धृ०॥
आजपासुनियां जनक जननि निवृत्ती । दिधलें मि तुम्हां त्या हातीं ॥
( चाल ) पति जिकडे तिकडे कांता । धांवते सिंधुकडे सरिता ॥
त्यजि प्रभा कदापि न सविता । रहा म्हणुनि मुलांनों राजी ॥ नको० ॥१९॥

॥ लावणी ॥
गेली मायपिता तीं अनाथ झालीं मुलें ।
पाहती न तयांना गांविं कुणी चांगलें ॥धृ०॥
ना भीक मिळे पोटास पोटभरि कदा ।
आला काळ तया विन्मुख साहाति आपदा ॥
( चाल ) निवृत्तिनाथ पाहून लहान भावंडां होई वेडा ॥
काननातुल्य वाटतो राहता वाडा ॥ ओढि गाडा ॥
म्हणे ‘ चला इथुनि बाळांनों ’ ! आळंदी सोडा ॥ हरि जोडा ॥
परदेशीं क्रमूं आयुष्य, दैव आपुलें ! ॥
त्याचें तोचि वदवि गणुदास केवळ बाहुलें ॥ गेली माया ॥२०॥

अशा तर्‍हेच्या त्या मुलांच्या हालअपेष्टा पाहून एका ब्राह्मणाला दया आली व त्यानें निवृत्तिनाथाला सांगितलें कीं, बाबा ! -

॥ दिंडी ॥
तटीं गोदेच्या पैठणास जावें । शुचीपत्रा घेऊन तुम्ही यावें ॥
तरिच मुंजी धर्मार्थ आम्ही लावूं । तुजसि निवृत्ति ज्ञातिमधें घेऊं ॥२१॥

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
कृतार्थ जगतीं तुवां बहुत भक्त केलें खरें ।
अम्ही पतित आगळे परि करीं धरिं आदरें ॥
अव्हेर करिसी हरि ! तरि त्वदीय ब्रीदाप्रती ।
कलंक जगिं लागला समज साच हे श्रीपती ! ॥
याप्रमाणें परमेश्वराचें नामस्मरण व चिंतन करून घरास शेवटचा नमस्कार केला. निवृत्तीनाथांनीं आळंदी सोडली व सर्व पैठणास जाण्याकरितां निघाले.

॥ ओवी ॥
पूर्वाभिमुख होऊन । करिते झाले चौघे गमन ।
निवृत्ति ज्ञानदेव सोपान । मुक्ता भगिनी तयांची ॥२३॥
चौघेहि पैठणास आले.

॥ पद ॥ ( बल ज्याचें )
नमुं तुजला ईश्वरीं ! । कलिमलनाशक तव जीवन हें ।
म्हणुनि धरित तुज सतत सदाशिव, गोदे । निज शिरीं ॥ध्रु०॥
जयजय गंगे ! शिव मन रंगें । भागिरथी भो ! प्रतापतुंगे ।
विमल यशद तशि सुखद न कोणी, सरिता ती दुसरी ॥नमुं० ॥२४॥
अशा प्रकारची प्रार्थना करून ही चारहि भावंडें गोदावरीच्या प्रवाहापाशीं आलीं, आणि तीर्थाचें वंदन करून स्तवन करितीं झालीं कीं -

॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
त्यागोनी शिव तांडवा जननि गे ! श्रीगौतमाच्या स्तवा ।
माना देउनि पातलीस वरदे ! तूं त्र्यंबकेशोद्भवा ॥
वृद्धा सर्व शुची मुनींद्र म्हणती ‘ उद्नीथ तूं भूवरी ’ ।
पावावें गणु तें झणीं शुभकरीं हे माय गोदावरी ! ॥२५॥

॥ लावणी ॥
जमवुन द्विजवर, वैदिक थोर थोर, शास्त्रि चतुर आणविले ।
जोडुन द्वयकर, करुनियां आदर, नम्रवचन बोलले ॥
तुम्हिं आहां ईश्वर, न्याय करा झडकर ! म्हणुनि आमंत्रण दिलें ।
खग हंसापरि, पय आणि हें वारी, करा त्वरित वेगळें ॥२६॥
अशी निवृत्तिनाथाची सविनय प्रार्थना ऐकून ब्रह्मवृंदाच्या सभेंत ज्याला लोकांनीं मुख्य स्थान दिलें होतें तो म्हणाला कीं -

॥ आर्या ॥ ( गीति )
तुम्ही कोण कुणाचे कोठुन आलांत काय हो हेत ।
हे सांगा बाळांनों ! नांवें अपुली तशीं अम्हां त्वरित ॥२७॥
निवृत्तिनाथ म्हणाले,

॥ दिंडी ॥
अपेगावीं ती अमुचि वतनदारी ! अम्ही स्वामीची अहोंत मुलें चारी ॥
पिता अमुचा चैतन्य नाम ज्याचें । जन्म उदरीं घेतला रुक्मिणीचे ॥२८॥
आतां आमचीं नावें ऐका:

॥ आर्या ॥ ( गीति )
निवृत्ति नाम माझें ममानुजा ज्ञानदेव हो म्हणती ।
सोपान तृतिय बंधू भगिनी ही धाकुटी पहा मुक्ती ॥२९॥
ब्राह्मण म्हणाले - हे मुलांनो, हें आम्ही ऐकलें; पण -

॥ ओवी ॥
यासी न अमुचें प्रयोजन । शाखा कुल करा कथन ।
काय हेतु धरून । आलां गौतमीतटातें ॥३०॥
हें ऐकून निवृत्तिनाथ म्हणाले, ‘ महाराज, आमची कुलकथा मोठी चमत्कारीक व गुंतागुंतीची आहे; पण ती अशास्त्र वर्णसंकर करणारी नाहीं. थोडी परंपरागत चालत आलेल्या रूढीला धक्का देणारी आहे.

॥ पद ॥ ( तूं टाक चिरुनि )
पडूं नका वृथा मोहांत । अम्हां नच जात ॥
अविनाश शुद्ध चैतन्य तदिय अम्हि अंश अहों साक्षात् ॥ध्रु०॥
दिनराज रवी गगनीं तो । प्रतिबिंबित घटिं जलिं दिसतो ।
म्हणुनि कां निराळा होतो । वेदोपनिषद् सिद्धांत, हाच हरि एक असें जगतांत ॥ पडुं नका० ॥३१॥
पण हा तात्विक वेदान्त त्या शाब्दिक विद्वतेचा अहंकार वाढलेल्या शास्त्रीपंडितांना पटला नाहीं.

॥ श्लोक - ( शिखरिणी ) ॥
अम्हां वेदांताचे विदित असती भाग सगळे ।
कथा त्या वीरांच्या कथिति न परि शूर दुबळे ॥
तसें रे वाचाळा ! अनुभव विणें ज्ञान न कथी ।
प्रसूतीच्या दु:खा वरिवरि जशी वांझ वदती ॥३२॥

॥ पद - ( कामदा ) ॥
ज्ञानदेव तो जोडुनी करा । करित विनवणी निज सहोदरा ॥
या द्विजांस मी देत उत्तरा । स्वस्थ तोंवरी तुम्हि वसा जसा ॥३३॥
निवृत्तिनाथ म्हणाले. ‘ ठीक आहे, तूं एकदां प्रयत्न करून पहा. ’ अशी आज्ञा होतांच ज्ञानेश्वर हात जोडून ब्रह्मवृंदास म्हणाले, महाराज -

॥ पद - ( नृप ममता रामा० ) ॥
आब्रह्मस्तंभपर्यंत । जगिं भरला । रुक्मिणीकांत ॥ पहा तुम्ही ॥ध्रु०॥
त्यावीण रिता जगतांत । नच ठाव एकही सत्य ॥ पहा तुम्ही ॥
श्रीकांत, जगाचा तात, दिनाचा नाथ, तोचि पर सत्य - भिमतटवाला ॥
माया न उमगुं दे त्याला ॥ पहा तुम्ही ॥ आब्रह्म० ॥३४॥
इतक्यांत एक कोळी आपल्या रेड्यावर पखाल घालून गंगेवर पाण्याला चालला होता. त्या रेड्याचें नांवहि ‘ ग्यान्या ’ असें होतें, हें पुष्कळ ब्राह्मणांना माहीत होतें; व तोच आला आहे असें पाहून ब्राह्मण म्हणाले,

॥ श्लोक ( चामर ) ॥
घेउनि पखाल पृष्टिं ज्ञानदेअ हा आला ।
महिषपुत्र मत्त म्हणुनि नाकिं त्यास टोंचिला ॥
चार पाय त्यास, हा द्विपाद येथ बैसला ।
तो मुका नि बोलका दोहोंत फ़रक येतुला ॥३५॥
जीवात्मा जर सगळ्यांचा एक आहे तर त्याचें प्रत्यंतर पाहण्यासाठीं त्या रेड्याला दोन छड्या मारा, आणि त्या माराचे बळ या दोन पायांच्या ज्ञानदेवानें आपल्या अंगावर उमटलेले दाखवावेत ! म्हणजे वादच मिटला !

॥ ओवी ॥
त्या रेड्यास करितां ताडन । त्याचे वळ उमटले पूर्ण ॥
ज्ञानेश्वराचे अंगीं जाण । पाहून मुक्ता विहल झाली ॥३६॥

॥ दिंडी ॥
नका मालूं त्या तुम्ही टोणग्याला । ज्ञानदेवाला त्लास बहुत झाला ॥
पाथ फ़ुतली आंतून लक्त आलें । आम्हीं तुमचें अपलाध काय केले ? ॥३७॥

॥ आर्या ॥
आलें प्रत्यंतर हें, जीवात्मा एक साच सर्वांचा ।
कल्पांतिं न अम्हि बोलूं, भूदेवा हो असत्यशी वाचा ॥३८॥
तें ऐकून ब्राह्मण म्हणाले, हे शहाण्यापोरा, या घडलेल्या गोष्टीवरून या वादाचा निकाल नाहीं. ही काकतालीय न्यायाप्रमाणें गोष्ट झाली समज.

॥ पद ॥ ( अरसिक किती हा० )
बोलिव या महिपाला । मग मानूं आम्ही सत्य तुम्हांला ॥धृ०॥
वदण्या वेदांताला । कवडि न लागे जगतिं कुणाला ॥बोलिव॥३९॥
असें म्हणत ब्राह्मणांनीं रेडा आणून पुढें उभा केला. त्यास पाहून ज्ञानेश्वर म्हणतात,

॥ आर्या ( गीति ) ॥
सर्व बंधनें तोडून पाठीवरचीं पखाल ती काढा ।
तो न कुणा हुंदाडी ये ठायीं त्यास मोकळा सोडा ॥४०॥

॥ अभंग ॥
महिष येउनी सामोरी । शिर ठेवीं पायावरी ॥
केल्या प्रदक्षिणा तीन । खाली घालोनिया मान ॥
व्योमीं दाटलें सुरवर । पहाया मौज ही साचार ॥
वानितात ज्ञानेश्वरा । ज्ञान - नभींच्या दिनकरा ॥४१॥

॥ श्लोक ( चमर ) ॥
चित्स्वरूप सर्व शक्ति सर्वमान्य ईश्वरा ।
पूर्ण ब्रह्म चिद्विलास भो विभो ! दिगंबरा ॥
निर्विकल्प आद्य पीठ तूंच एक नेटका ।
हें असेंच सत्य म्हणुन महिष होय बोलका ॥४२॥

॥ श्लोक ( भुजंगप्रयात ) ॥
वदे वेद ऋग्वेद तो ज्ञानदेवा । पुढें तो यजु साम तैसाच गावा ॥
करावा स्वरोच्चार बा स्पष्टतेनी । श्रुती ऐकतां थक्क व्हावें द्विजांनीं ॥४३॥
नंतर ब्राह्मणांस म्हणाले ‘ महाराज ! आतां याच्या मुखावाटें वेदाक्षरें येतील तेव्हां -

॥ ओवी ॥
आणा पुस्तकें आपुलीं । शुद्धाशुद्ध पाहण्या भलीं ॥
ऐशीं ज्ञानदेवें आज्ञा केली । तें ठायीं द्विजवरा ॥४४॥

॥ लावणी ॥
अष्टाष्टकीं चौसष्टी वदला, महिष तया पैठणीं ।
उदात्त अनुदात्तहि स्वर दिधले, स्पष्ट पदे दावुनी ॥
कृष्ण शुक्ल या द्वयांगासह, वेद यजू बोलला ।
गंधर्वासी येईल लज्जा साम असा गाईला ॥
अथर्वणानें मातचि केली, द्विज थिजले निजमनीं ।
दिवौकसांनीं गौरव केला, तुळशि फ़ुलें उधळुनी ॥४५॥

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
शिक्षा निरुक्त मग ब्राह्मण पंचिकेसी ।
तो बोलला महिष पैठणिं त्या सभेसी ॥
क्षेत्रस्थ विप्र अवघे गलिताभिमानी ।
झाले, आले शरण जोडुनि शीघ्रपाणी ॥४६॥
मोठमोठाले शास्त्रीपंडित ज्ञानेश्वरापुढें नम्र झाले.

॥ पद ( हा काय तुमचा० ) ॥
तुम्हि अहां खरोखर अंश प्रभूचे सांप्रत ये अवनीं ।
नांवें जैशीं तैशिच करणी अवलोकिली नयनीं ॥धृ०॥
आतां तें तुम्हातें, देण्यातें, कीं येथें ॥
प्रायश्चित्त न समर्थ उरला, आमुच्या मधिं कोणी ॥ तुम्हिहि अहां ॥४७॥
सर्व पंडितांनीं शुद्धिपत्र दिलें कीं -

॥ आर्या ॥
शिव - निवृत्ति विष्णू ज्ञानेश्वर ब्रह्मदेव - सोपान ।
मुक्ता - माया साची जगदुद्धारार्थ झालि अवतीर्ण  ॥४८॥

॥ श्लोक ( वसंततिलक ) ॥
रे सोंवळें शुचि महीवर सर्वकाळ ।
हे ज्ञानवृद्ध न म्हणा कधिं यांस बाळ ॥
यदूदर्शनें दहन होतिल पापराशी ॥
मानूं नका मनुज या बुध चौकडीसी ॥४९॥

॥ ओवी ॥
ऐसे शुचिपत्र देउनी । संत लाविले वाटेस त्यांनीं ॥
लौकिक जाहला पैठणीं । ज्ञानेश्वराचे कृतीचा ॥५०॥
ज्ञानेश्वर मोहिनीराजाच्या दर्शनास जाऊन त्यांनीं प्रभूची अनन्य भावें पार्थना केली.

॥ पद ॥ ( भला जगाये हरीरे )
मुकुंद मुरारी । रामा । तनु श्याम शोभे सारी ॥ मुकुंद ॥धृ०॥
वैजयंति कंठिं माळ । कमलनयन भव्य भाल । शंख चक्र गदाधारी ॥मु०॥
चरणिं ठाच देइं सतत मोहिनीरूप तूं अनंत । पापताप दैन्य वारी ॥मु०॥५१॥

॥ पद ॥ ( भला जन्म हा० )
निर्विकल्या निरंजना तूं ! आदिपीठा श्रीहरी । वससि या नित प्रवरेच्या तिरी ॥
सर्वांतरीं तूं जागृत असुनी, माया ही ठकविते । आम्हांला भलतेंच भासविते ॥
‘ नेती नेती ’ वेदहि वदले, तुजलागीं वानितां । तेथें मग आमुचि कितिक बा कथा ! ॥
स्वस्वरूपाची ओळख होवो, मी तूं ही भावना । गणु म्हणे विलया ने नारायणा ! ॥५२॥
निवृत्ति ज्ञानदेवांची प्रार्थना झाल्यावर मुक्ताबाई देवास पाहून म्हणाली,

॥ ओवी ॥ ( जात्यावरील )
तूं नाली होउन विभो जसें थकवीलें लाहुला ॥
तसें थकवी न आम्हां कधीं ॥ आम्हि ओळखिलें बा तुला ॥५३॥

॥ श्लोक ( मंदाकांता ) ॥
ऐकोनियां डुलत भगवान् तेधवां त्या स्तुतीला ।
 कंठीं अर्पी अति अतुरतें हार तो वेगळाला ॥
प्रत्येकासी अनिभृत अशा लांबवोनी कराला ॥
देई प्रेमें विबुध हरि तो गाढ आलिंगनाला ॥५४॥
अशा प्रकारें प्रत्येकाला एक एक फ़ुलांचा हार अनुक्रमें घालून ज्ञानेश्वराच्या पाठीवरून हात फ़िरविला, आणि आज्ञा केली कीं,


॥ अभंग ॥
जगाच्या कल्याणा करी गीतेवरी । टीका ती साजिरी मराठींत ।
‘ भावार्थ - दीपिका ’ तिचें नांव ठेवीं । सुलभ असावी समजावया ॥
देउनी दृष्टांत अर्थाचा विचार । करावा साचार ज्ञानेश्वरा ।
रचना असावी सोपी नी सरळ । काठिण्य गाबाल दूर ठेवी ॥५५॥
यासाठींच तूं जन्माला आला आहेस हें ध्यानांत ठेव !
असें झाल्यावर प्रत्येकानें देवाला नमस्कार केला. ज्ञानेश्वराशिवाय सर्व मंडळी आळंदीकडे रवाना झाली.

N/A

References : N/A
Last Updated : August 13, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP