मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
चरित्र १

श्रीमदाद्यशंकराचार्य - चरित्र १

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


( भाग पहिला )

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
वेदार्थरत्न जगतीं तुडवावयातें ।
चार्वाक, बुद्ध, जिन, तार्किक पातले ते ॥
वेदाविशीं भरमसाट पहा विधानां ।
त्यांनीं करून भ्रमिं पाडियलें जनांना ॥१॥

॥ पद ॥
मंदबुद्धिचे जन पडले । बळि, यास खरें ना कुणा कळे ॥
( चाल ) वैदिक घेउनि दर्भ समिधा, बुद्धभयानें घाबरले ।
निज आन्हिक तें करावयाला, गुहेंत जाउनिया बसले ॥
अर्चन, पूजन, हवन कसेंतरी, चोरुन मारुन उरकियलें ।
अन्नदान तें कवणालागीं, ये नच करितां, बहु भ्यालें ॥
बलवत्तर ती सत्ता मोठी, तिथें कुणाचें नच चाले ।
परमात्म्याविण आळा तियेला कुनी घालिना गणु बोले ॥२॥
मंदबुद्धिचे लोक जिकडे राजसत्ता असते तिकडेच जाऊं लागतात. कोणालाहि खरें काय आहे हें कळेनासें होतें.

॥ ओवी ॥
बुद्धबोधें संहितापठण । बंद झालें तेवीं यज्ञ ।
जनांचें तत्त्वज्ञान । नाशितें झालें चोहीकडे ॥३॥
नास्तिक म्हणाले,

॥ दिंडी ॥
बळी बोकड देऊन आपणाला । इच्छिसी तूं स्वर्गांत जावयाला
असें करिती का जगतीं कधीं ज्ञातें ? । रोग शरीरा औषध खाटल्याते ॥४॥

॥ पद ॥
चार्वाकें तलवार, आपुली । चार्वाकें तलवार ॥धृ०॥
चारुवाणीची धरुनी केला । कर्ममार्ग तो ठार ॥
विवाहपद्धति ग्रासियली कीं । कुचेष्टेनें अनिवार ॥
बापादेखत पुत्र ओठींचा । उतरि मिशाचा भार ॥
दासगणु म्हणे चहुंकडे झाला । अवघा एकंकार ॥५॥

॥ आर्या ॥
वैदिकसंस्कृतिचें तें यापरिचें दैन्य नयनिं पाहुनिया ।
स्वर्गीं नारद गेला विधिला तें अखिल वृत्त कळवाया ॥६॥
नारद म्हणाले,

॥ कटिबंध ॥
जे वेद तुम्हीं निर्मिले, तेच तुडविले गौतमें भले, पहा महीवरती ।
वैदिक शुची ब्राह्मणा कुणी ना पुसती ॥
फ़ाजील दया वाढली, सवड जाहली, अनितिला भली, म्हणुन वाढाया ।
लागले लोक ते जैन भराभर व्हाया ॥
( चाल ) नागवेधूत पंथानें चालती ।
जे तेच आपणा ज्ञानी म्हणविती ।
ना वर्म श्रुतीचें कोणी जाणती ।
ऐसेंच चालल्या पुढें, जगत हें बुडे, पहा रोकडें, अनितिमाझरीं ।
निजुं नको विधात्या, ऊठ श्रुतीला तारी ॥७।\
तें ऐकून ब्रह्मदेव म्हणाला,

॥ पद ॥
जें जें नारदा तूं कथिलें । बघ तें सारें मीं आयकिलें ॥
( चाल ) होउं नको मनिं सचिंत कांहीं, या चेष्टेचें लव उरलें ।
आयू आतां, अंधाराविण । तेज जगीं ना कधिंच खुलें ॥८॥
नारद म्हणाले ‘ असे वायदे सांगत बसूं नये इतकीच आपल्या चरणाजवळ नम्र विनंति आहे. ’ तें ऐकून ब्रह्मदेव म्हणाले,

॥ दिंडी ॥
नारदा, तूं जगतांत संत साचा । आला कनवळा तुजसि या जगाचा ।
हें न ओझें उचलेल मदिय हातें । कधीं ढेकुण का उचली पर्वतातें ॥९॥

॥ ओवी ॥
पूषा, आर्यमा, इंद्र, वरुण । ऐसे देव ये घेऊन ।
कैलासलोकाकारण । शिवा गार्‍हाणें सांगावया ॥१०॥

॥ आर्या ॥
मीही तिकडे जातो या दु:खाचा करील परिहार ।
नि:संशय शिव भोळा त्याविण कोणी समर्थ ना इतर ॥११॥
ठरल्याप्रमाणें सर्व देव कैलासलोकाला जमा झालें व अनन्यभावानें प्रभूची प्रार्थना करूं लागलें कीं -

॥ पद ॥ ( भीमपलास - त्रिताल )
तुजवीण कोण कैवारी ।
होय जगा, त्रिपुरारी, मदनारी ॥धृ०॥
( चाल ) संस्कृति पार बुडाली, वैदिक ।
भरमसाट हीं मतें निघालीं ।
विलयास नेई तीं सारीं ॥१२॥

॥ पद ॥ ( मंगलमय नाम तुझें )
जय जय हे पंचवदन पार्वतीवरा ॥धृ०॥
चारुवाक्, बुद्ध, जैन । तार्किक हे सांख्य जाण ।
हेच पहा दु:शासन । जाहले हरा ॥
द्रौपदि जी साच श्रुति । हे फ़िरले तिजवरती ।
नग्न करायास बघती । समय ना बरा ॥
नंदतनय द्रौपदिला । आपण साह्य व्हावें हिला ।
वैदिकांचि कींव तुला । येउं दे ईश्वरा ॥
देव सकल याचपरी । स्तविते झाले त्रिपुरारी ।
तेंच कवनिं गाय खरी । गणूचि या गिरा ॥१३॥

॥ पद ॥ ( रमला कुठें ग - )
अवतार झणीं घ्या आतां । तुम्हीच उमेच्या नाथा ॥धृ०॥
उदधीसी शुष्क करण्याला । पाहिजे अगस्ती आला ।
मारुती द्रोणशैलाला । वाहि सहज हाताच्या वरता ।
श्रुतिनिर्मित जें जें ज्ञान । तेणेंच होय कल्याण ।
त्याचेंच करा उद्धरण । ही विनति आमुची आतां ॥१४॥
शंकर म्हणाले,

॥ श्लोक ॥ ( पृथ्वी )
बरें, गमन जा करा तुम्हि स्वकीय स्थनाप्रती ।
न ये बुडवितां कुणा कधिंच वेद या भारतीं ॥
धरून अवतार मी हरिन सर्व पाखांड तें ।
हिर्‍यावरिल मृत्तिका टिकुन ना कदा राहते ॥१५॥

॥ पद ॥ ( कॉफ़ी - त्रिताल )
नासुन जी गेली असेल हो ।
ती सुधराया गोष्ट प्रथमतां ॥
युक्ति हीच केली, पाहिजे ॥ नासुन जी ॥
( चाल ) कर्ममार्ग तो श्रुतिसंस्कृतिचा ।
भक्कम पाया आहे प्रथमचा ।
तो सुधराया पुत्र आमुचा ।
गुह जाइल कीं, चिंता नुरली ॥१६॥

॥ पद ( पोरें न च थोर ) ॥
ईशानें जें कथिलें । देव ते मानियलें ।
शंकरासी नमुन गेले । निजस्थलाप्रती ॥
नारदासी हर्ष अती । येईल कधीं महिवरती ।
जन्म धरून विमलकीर्ति । कार्तिकेय तो ॥
एकविसशे आणि दहांत । जयमंगलग्राम सत्य ।
तैलंगण प्रांतिं तेथ । जन्म पावले ॥
कार्तिकेय शिवकुमार । तेजें दुजा वैश्वानर ।
दासगणु जोडुन कर । नमन करी तया ॥१७॥

॥ ओवी ॥
चंद्रगुनाचें उदरीं ॥ वैशाखीं पौर्णिमेस रविवारीं ।
जन्म पावला तारकारीं । रवी येतां माध्यान्हा ॥१८॥

॥आर्या ॥
मिदनापुरीं सुधन्वा इंद्रांशें जन्म पावतां झाला ।
होता जैनमती जरि, तरि न पडे तो मताभिमानाला ॥१९॥
इकडे कुमारिलभट्टानें सहा शास्त्रांचें अध्ययन करून श्रेनिकेतन नांवाच्या गुरुजवळ जैनशास्त्राचाहि अभ्यास केला व वादविवादाच्या बुद्धीनें तो मेदिनीपुरांत प्राप्त झाला.

॥ दिंडी ॥
जैनबुद्धाच्या शास्त्रिपंडितांशीं । तया मिदनापुरीं वाद करायासी ।
महावैदिक ते भट्टपाद आले । वाद करूनी उभयांस जिंकियेलें ॥२०॥

॥ लावणी ॥ ( आहे त्याचि भला )
दावण्या श्रुतिप्रामाण्य मारिली उडी ।
श्रेकुमारीलभट्टांनीं, पर्वतावरुन रोकडी ।
ना कुठेंच लागलें तया चेंडुच्यापरी ।
आल्हाद उतरते झाले, श्रुतिकृपे भूमिच्यावरी ॥
( चाल ) तयिं जना नवल वाटलें, जैण दचकलें, बहुत ते भ्याले ।
मनामाझारीं । सत्ताहि अशिच ईश्वरी ॥२१॥
जैन पंडित म्हणाले,

॥ श्लोक ( इंद्रवज्रा ) ॥
भूपा सुधन्व्या मनिं आण कांहीं । आश्चर्य तें यांत मुळींच नाहीं ।
कोल्हाटिणी यापरि मारितात । बाप्पा उड्या त्या बघ कीं हटांत ॥२२॥

॥ पद ॥ ( पटदीप - त्रिताल )
काढूं उद्यां साजिरी, तोड ती ।
कांहींतरी याजसाठीं खरी ॥ध्रु०॥
( चाल ) एक्या घटाठायीं, कोंडूनिया अही ।
तेंच पुसूं पाहीं, लोकां सभेठायीं ।
काय तरी वस्तु त्याभीतरीं ॥२३॥

॥ ओंवी ॥
मृत्तिकेच्या घटांत । ठेवूनिया फ़णी पीत ।
पूसूं लागला सभेंत । सचीव सौगताकारणें ॥२३॥

॥ दिंडी ॥
काय सांगा या वस्तू घागरींत । आणुनीया ठेविली आम्ही येथ ।
हें न साचें सांगतां तुम्हां आलें । तरी समजूं वैदिक विजयी झाले ॥२५॥
त्यावर जैन बुद्धांनीं ज्योतिषाच्या व रमलशास्त्राच्या सहाय्यानें सांगितलें कीं -

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
सतेज पिवळा फ़णी तुम्हि घटांत या ठेविला ।
जिनेश्वरकृपा खरी म्हणुन तो अम्हीं जाणिला ॥
अतां न जयपत्र दे मुळिंच वैदिकांना नृपा ।
श्रुतींत लव सार ना ग्रथित सर्व केल्या गपा ॥२६॥
प्रधानानें जैनांप्रमाणेंच कुमारिलभट्टांना या घागरींत काय आहे म्हणून विचारणा केली. त्यावर कुमारिलभट्ट म्हणाले, ‘ सुधन्व्या -

॥ पद ॥ ( दरबारी - त्रिताल )
नव्हे खचित फ़णि तो । अरे या घटांत बसला - ।
चार हाताचा शेषशाई । उघडुनिया बघ तो ॥ध्रु०॥
( चाल ) जैन बुद्ध ते वदोत कांहीं । सार तयामधें किमपी नाहीं ।
वैदिक वच तें करील पाहीं । सत्य जगीं प्रभु तो ॥२७॥

॥ दिंडी ॥
श्यामसुंदर गोजिरी मनोहर । मुर्ति हरिची दिसलिसे, ना विखार ।
म्हणुन झाला अवध्यांस मोद तेणें । तथागत ते बैसले दीनवाणे ॥२८॥
इतकें झाल्यावर त्या सभेंतच पुष्कळांनीं जैनबुद्धांची दीक्षा टाकून देऊन कुमारिलभट्टापासून वैदिकधर्माची दीक्षा घेतली.

N/A

References : N/A
Last Updated : August 13, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP