मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीनरहरी सोनार चरित्र १

श्रीनरहरी सोनार चरित्र १

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ आर्या ॥
भीमरथीचे कांठीं पंढरि वैकुंठ होय साचार ।
तेथें नरहरि नामें गेला होऊन भक्त सोनार ॥१॥

॥ दिंडी ॥
असें बेलाचें झाड सदनद्वारीं । कंठिं घाली रुंद्राक्षं भस्मधारी ॥
सदा ‘ हर हर ’ हें वदे तदिय वाचा । पडूं न दे वारा इतर देवतेचा ॥२॥

॥ ओवी ॥
एक भिक्षुक एके दिनीं । त्या नरहरी भक्तालागुनी ।
बोलता झाला ऐसी वाणी । ती ऐका विबुध हो ॥३॥

॥ अभंग ॥
मांगाहूनी मांग अससी तूं सोनारा । तुझा अम्हा वारा । लागूं नये ॥
आज हरिदिनी एकादशीव्रत । खाशी आनंदांत । तांबूल तूं ॥
पंढरीचा मूढा असुनी निवासी । द्वेष विठ्ठलासी कां रे तुझा ॥
सूकरासी काय गुर्‍हाळाची गोडी । चिंतामणी फ़ोडी माकड तें ॥४॥
यावर नरहरीनें उत्तर दिलें, भटजीबुवा !

॥ पद ॥
ही नसे क्षेत्र पंढरि । असे शिवपुरी । भिमेच्या तिरीं ।म्हणुन मी वसतों ॥
हंसा न रुचें सहवास थिल्लराचा तो ॥
येथील देव पशुपति, दक्षिणामूर्ति, ज्याला म्हणति । मल्लिकार्जुन ।
जो पंचवदन परमेश पार्वतीरमण ॥
( चाल ) जो असे देव देवांचा द्विजवरा
ॐकारस्वरूप हें त्याचें मनिं धरा
आदरें भजन शंभूचें तुम्हि करा
शंकरावीण ते देव, आवघे वाव, त्यंवरी भाव । मुळिं व ठेवावा ॥
गणु म्हणे त्यजुन कस्तुरी चिखल कां घ्यावा ॥५॥
आतां व्रताविषयीं म्हणाल तर एकादशी हें मुळीं व्रतच नव्हे.

॥ अभंग ॥
व्रतां - माजी व्रतें तीन मोक्षदायी ।
इतर तीं ठायीं । लंघनाच्या ॥
शिवरात्र प्रदोष आणि सोमवार ।
राजराजेश्वर । व्रतांचें हें ॥
शुद्ध शांत दांता लागीं भस्म भावें ।
पाप्यांनीं लावावें । कोळशाला ॥
चार्वाकाचें लेणें । तें हें गोपीचंदन ।
विठ्ठलसुवासीन । त्यास लावी ॥६॥
अशी विठ्ठलाची व पंढरीक्षेत्राची निंदा ऐकून ब्राह्मण संतापला व त्यानें शंकराच्या निंदेस आरंभ केला.

॥ पद ( लावणीची ) ॥
आहे तुझा देव ओंगळ, जोगडा पार्वतीपती ॥
जो सर्व पशूंचा राजा पशुपती ज्यास बोलती ॥
( चाल ) सर्पाचा करगुटा कटीं, वसन लंगुटी, असे मनगटी ॥
कडें लोहाचें, तसें व्यसन अती भांगेचें ॥
मतिमंद निव्वळ बैलोबा, फ़िरे बसून बैलावरी ।
वाजवी शंख वदनानें, अहोरात्र शिमगा करी ॥
( चाल ) कातडें पांघरावया, वृद्धपण वया, भंवति थयथया ।
भुतें नाचतीं, गणूदास नमी त्याप्रती ॥७॥
अशी शंकराची निंदा ऐकून नरहरी म्हणाला -

॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
वेषें ओंगळ नीळकंठ भगवान्, नाहीं कृतीनें परी ।
मध्यें गोड गरे विपूल फ़णसा आहेत कांटे वरी ॥
तेवीं शंकर जो शिवप्रद जगा ना त्या म्हणे जोगडा ।
निंदूनी जिलबीप्रती निजमुखें वाखाणितोसी वडा ॥८॥
ब्राह्मण त्यावर उलट म्हणाला:

॥ पद ॥
आश्चर्य यांत तें काय, बेडूक चिखल चाहतो
त्यजुनिया भ्रमर पंकाला, मकरंदिं हेत ठेवितो
( चाल ) ना हर्म्य पटे साजिरा, गर्दभा जरा, उकिरडा बरा
त्यासि वाटतो, आवडिनें मनुज उमगतो ॥९॥

॥ आर्या ॥
भंगड रागिट राक्षस बेअकली भक्त सर्व शंभूचे ।
घारी तरस गिधाडें यांविण करि कोन प्रेम सडक्याचें ॥१०॥
नरहरी ब्राह्मणास म्हणतो:-

॥ पद ( मित्रा मम जन्म ) ॥
अंगिं उगें ज्याच्या कीं तोच पाहतो ।
धुंडाळुनि परक्याचें छिद्र सांगतो ॥
पारिजात मदनबाण बकुल मोगरा ।
कोर्‍हांटीं कल्हारा निंदिति न जरा ।
उलट त्यासि मिसळुनिया करिति आदरा ।
सुष्ट दुष्ट ज्याचा तो कृतिनें उमगतो ॥११॥
असा संवाद बराच वेळ होऊन ब्राह्मण निघून गेला.
अशी भविक व चतुर माणसें उपासनेचा व्यर्थ अभिमान पाहून द्वेषाला बळी पडतात असें पाहून देवाला फ़ार वाईट वाटलें. नरहरीसारख्या निष्काम व सोज्वल भक्तानेंहि अशा द्वेषास बळी पडावें. तो द्वेषाहीन होऊन खरा भक्त केव्हां होईल याची देवास चिंता पडली. ते रुक्मिणीदेवीस म्हणाले :-

॥ ओवी ॥
शैववैष्णवांचें करण्या ऐक्य । पंढरी क्षेत्र निर्मिलें देख ।
परी नरहरी बालक । ये न रुक्मिणीमंदिरा ॥१२॥

॥ पद ( नृपममता ) ॥
काशींत उभ्याचा काटा । गिरिवरी आडव्या फ़ाटा ॥ रुक्मिणी ।
हे असे फ़ंद माजले, म्हणुनि निर्मिलें, क्षेत्र हें भलें,
भिमेच्या कांठीं । सर्वांची करण्या भेटी ॥ भीमके ॥१३॥
श्रीरुक्मिणीमाता म्हणाली :- देवा,

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
सोनार तो मुळिंच पारख त्या जगाची ।
कांपे तया पुढति धातुहि कांचनाची ॥
प्रत्यक्ष द्याल अनुभाव तयास जेव्हां ।
वंदील तो समपदांप्रति साच तेव्हां ॥१४॥

॥ ओवी ॥
सोनार शिंपी कुळकर्णी । मारवाडी अप्पा, कोकणी ।
हे चाणाक्ष धूर्त धोरणी । शब्दजाला न फ़सणारे ॥१५॥
या प्रकरणीं प्रत्यक्ष भगवान् शंकरांनाच भेटावें असा विचार करून श्रीपांडुरंग रुक्मिणीदेवासह निघाले.

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
नारायणास बघतां जगदीश्वरानें ।
आलिंगिलें पसरुनी कर आदरानें ॥
प्रेमें धरी कर तसाच उभा रमेचा ।
नंदी करी अदर त्या विनतासुताचा ॥१६॥
देव श्रीशंकरास बोलले, भगवान्,

॥ पद ॥
कठिण जेवढें जगांत तितुकें आपण घेतियलें ।
म्हणुनि अवांतर देवा विश्वहि सुखदायक झालें ॥
हालाहला, आणि व्याला, वेताळा, त्रिशुलाला, ग्रहण करोनि विहार करण्या स्मशान देखियलें ॥१७॥

॥ आर्या ॥
वक्रगती गंगाशिरिं वन्ही तृतियाक्षिं अंकिं कोपशिखा
म्हणुनी भक्त नरहरी परिवारापरि कठिण केला कां ॥१८॥
देवानें आपणांस कोपशिखा म्हणून म्हणतांच पार्वती संतापून म्हणाली,

॥ पद ॥
कोपशिखा मी नसे माधवा ! तुझीच परि जाया
कळून चुकलें स्त्रैण पक्का तूंच एक जगिं या
कांतेच्या भयामुळें
दुर्गण कीं ते सगळे
तिच्या दावण्या बडिजावातें ठेविसि झाकुनिया ॥१९॥

॥ श्लोक ॥ ( शार्दूलविक्रीडित )
खार्‍याची भुलगी मुळींच तिजला तूं मानतोसी बरी ।
नांवाला तव अंगना परि सदा नांदे पराच्या घरीं ॥
मोठी चंचल मानि ती तिजपरि मी रे नसे माधवा ।
जोगी, रागिट, वृद्ध, निर्गुण, जरी मी ना त्यजी मद्धवा ॥२०॥
पार्वतीचें भाषण ऐकून लक्ष्मी तात्काल म्हणाली : -

॥ पद ॥
बडिजाव रिकामा नको कथुस पार्वती
दुर्गूण जगांतिल सारे तव ठायिं सदा नांदती ॥
मद्यपी, मनांतुन द्यूत आवडें तुला
नवर्‍याचें हिरावून सारें नागवा वनीं धाडिला ॥
राग सदैव नाकावरी, मानि तूं मुळीं
मानार्थ पित्याच्या गेहीं कुंडांत उडी घातली ॥
पाहून तुला निर्जरें नाकें मुरडिलीं
निरूपाय जाहला तेव्हां जरठास माळ घातलीं ॥
गणुदास म्हणे यापरी रमा बोलतां
अनिवार हसूं लोटलें हरिहरांप्रती तत्त्वतां ॥२१॥
त्यांचें भांडण थांबविण्याकरिता शंकर मध्येंच म्हणाले,

॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
दोघी एक तुम्ही विनोद करुनी कां गे उग्या भांडतां ।
भांडाया जगतास येथुन पुढें वा हा धडा घालितां ॥
थोरांच्या परि वर्तनास बघती प्रेमें करोनी जन ।
यासाठीं विबुधे जपून असणें त्यागूनिया दुर्गुण ॥२२॥
श्री विष्णु म्हणाले :

॥ पद ( झंपा ) ॥
हरा ! धन्यधन्या गिरा आपुली ही
प्रेम प्रीती कुठें उरलि नाहीं ॥
विष्णुभक्ता मधीं शैव ये ना कधीं
निर्मि द्वेषास धी एकमेकीं ॥
तेणें झालें असें सौख्य कोणा नसें
लोक झाले पिसें मृत्युलोकीं
धर्म नुरला खरा भाव तेविं लोकी ॥
फ़ार सांगूं किति नरहरीची मती
अजुन द्वैताप्रती त्यजत नाहीं ॥२३॥

॥ आर्या ॥
शंकर -
नरहरि तूं वळवावा तव अंगीं ती कला पुरी आहे
तूं मी एक तयाच्या आण प्रचीतीस तत्त्व लवलाहे ॥२४॥

॥ ओवी ॥
शंकरासी वंदून । रुक्मिणीसह नारायण
आला राउळीं परतून । चित्त विचारीं गुंतलें ॥२५॥

॥ पद ( तूं टाक चिरून ) ॥
देव नारदास :
नारदा करूं तरि काय ? सांग सदुपाय ॥
शंभुचा भक्त नरहरी । आमुचा द्वेष करी नितपाह्य ॥ध्रु०॥
तो खर्‍या भक्तिच्या वाटें
लागून कधीं मज भेटे
हें पडलें संकट मोठें
अनिवार बहुत दु:साह्य । सांग सदुपाय ॥२६॥

॥ ओवी ॥
तो मंदिरीं आल्यास । मी आणि महेश
एकरूप हें तयास दावीन कीम नि:संशय ॥२७॥

॥ आर्या ॥
नारद देवास :
भक्त नरहरीसाठीं इतुकें कां हो रमेश कळवळला ?
मागें दशाननाच्या वेळीं हा कळवळा कुठें गेला ? ॥२८॥

॥ पद ॥
देव नारदास
वाण धनाची नित्य राहते महाराष्ट्रीं घरघरीं
म्हणून ये त्यांचि दया अंतरीं ॥
त्या दुबळ्याच्या रक्षणास मी द्वारावतिहूनि अलों
भिमेच्या कांठि उभा राहिलों ॥
( चाल ) या देशिं नुरावा द्वेष जातिजातिचा ।
महाराष्ट्र हृदय हा मध्य भरतभूमिचा ।
हो सदैव येथें उदय खर्‍या भक्तिचा ।
सर्व मतांसी संमत ऐसी भक्ति येथली खरी ।
गणु म्हणे अद्वेष्टी पंढरी ॥२९॥
नरहरी मंदिरांत आणण्याचा प्रयत्न करितो असें सांगून नारद -

॥ ओवी ॥
संन्याशाच्या वेषानीं । द्वारकेस गेले नारदमुनी
तेथे एक्या सहूलागुनी । कय बोलले तें ऐका ॥३०॥

॥ दिंडी ॥
देव येथें ना पंढरीस नेले । पुंडलीकें विटेवरी उभे केलें ॥
मर्जि असल्या करि नवस विठ्ठलाला ।
रसेच्छा ज्या तो सेवितो उसाला ॥३१॥
तें साहूस मानवलें. तो म्हणाला -

॥ ओवी ॥
एक लक्षाचा रत्नजडित । करगोटा मी करीन सत्य ।
जरी देईल पंढरीनाथ । पुत्र सद्गुणी मजलागीं ॥३२॥

॥ दिंडी ॥
पुत्र झाला साहूस गूणराशी । नवस फ़ेडाया आला पंढरीसी ॥
तृषित गेल्या गंगेस पाणि प्याया । ये न कधिंहि विन्मूख तेथुनीया ॥३३॥
तो साडू कसा होता,

॥ पद ॥
भिकबाळि कानिं फ़ाकडी, गळ्यांतुन लडि, हातिं सलकडीं;
पगडि डोक्याला
लाजवी जयाचें पोट सहज डेर्‍याला
वातूळ अवघें शरिर चालें गंभीर द्याया आधार दोन्ही बाजूंला
चाकर उभे सावरति सदा साहूला
अंगरखा अंगिं पायघोळ मखमली ।
अत्तरें सुवासिक अंगा लाविलीं ।
कंबर पहा शेल्यानें बांधली ॥
भालास गंध केशरी, चढावावरी, कलावतु खरी, भरलि नखर्‍याची
गणु म्हणे अशी ही खूण लक्ष्मिपुत्राची ॥३४॥

साहू लोकांस,
सोनार अम्हांसी दावा । करगुटा करीं बरवा । विबुध हो
दागिना येथल्या येथ, हरीप्रीत्यर्थ, ठिक्कसा सत्य करविणें आहे
आणीलें रत्न सोनें हें पहा तुम्ही ॥३५॥

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP