मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
कान्होपात्रा आख्यान ३

कान्होपात्रा आख्यान ३

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


बेदरचे शिपाई, ठाणेदारयांसह आई पंढरीस आली आणि म्हणाली,
 
॥आर्या ॥
आठवलेले तुज कोठुन, हे वेडे चार कारटे ऐसे ।
पक्वान्ने पूरित आलेले ताट लोटिसी कैसे ॥४१॥
तेव्हा हे सर्वजण आपल्याला बेदरला घेऊन जाणार असे कान्होपात्रेस वाटलें.
ती आईस म्हणते,

॥श्लोक (वसंततिलका) ॥
नेऊ नकोस जननी मज बेदराला ।
मी अर्पिला मदिय देहचि विठ्ठलाला ॥
सत्ता तयावरि असे अवघी हरीची ॥
आतां तुझी न उरली अथवा कुणाची ॥४२॥
कान्होपात्रा स्वसंतोषाने येत नाही असे पाहून शामा ठाणेदारास म्हणते,

॥पद ॥
बांधुन मुसक्या या टवळीच्या बळेंच घेऊन चला इसी ।
मला कारटी ज्ञान सांगते जन्मुन माझ्या पोटासी ॥
(चाल) पाहुं द्या हिचा दगड तो कसा । रक्षितो हिला देऊन भरवसा ॥
धोंडे गोटे रक्षण करिती जरि मनुजाचें अवनीसी ॥
तरी नृपा नच कारण पडतें पदरि ठिवाया सैन्यासी ॥४३॥
ते सर्व ऐकून कान्होपात्रा आईस म्हणते,

॥आर्या ॥
नेशिल जरी बळें तूं तरि मी अपुला त्यजीन कीं प्राण ।
यांत न पडेल अंतर, श्रीहरिची साच वाहते आण ॥४४॥
ठाणेदार तें ऐकून । शामासी करी हळूच भाषण ॥
नको कोपवूं तिजलागून । ये समयी वृथा गे ॥४५॥
आपल्यावर तर हा राग होऊं नये व कान्होपात्रा तर बादशहास मिळावी असे दोन्ही हेतू साध्य होण्यासाठी ठाणेदाराने मोठ्या युक्तीने बादशाहास पत्र लिहिले.

॥पद ॥ ( नृपममता)
शशिवदना चारूगात्रा । बहुमानी कान्होपात्रा ॥ भूपति ॥
जरि बळेच धरूनी तिजला । धाडून देऊ विदराला ॥ भूपती ॥
(चाल) ती म्हणे मला यापरी, नृपाची जरी,
असेल मजवरी, खरोखर प्रीत । तरि येइल धावंत येथे ॥४६॥
असे पत्र लिहून त्याच पत्रांत विनंती केली की,

 ॥गज्जल ॥
तषरीफ लाइये हुजूर कान्होके लिये ।
अपनेहि साथ यहांसे उस्को लेके जाइये ।
देखती है रहा वो आषक हुजूर आनेकी ।
करना ये खता माफ यही है अर्जी बंदेकी ॥४७॥
पत्र पोहोंचताच बादशहा ताबडतोब पंढरपुरास निघाला.

॥श्लोक ॥(वसंततिलका) ॥
मानापमान जगतीं न गणी मदांध ।
वा जो असे युवतिच्या करपाशिं बध्द ॥
लज्जा मुळीं नुपजते जशि मागत्याला ।
ना राग लाज उरली तशि त्या नृपाला ॥४८॥
बादशहा पंढरपुरास आला आणि कान्होपात्रेस पाहून म्हणाला,

॥गज्जल ॥
दिलजानि मेरे कान्हो, मुझे तूहि है खूदा ॥
दिल लगाई तुझपर मेराम मै बनूंगा गुलाम तेरा ॥
चलिये विदरकू मत कर देरा ॥
मैं बिलकूल हो चुका दिवाना ।
चलिये अबी आय मेरे बीवी ॥४९॥

॥श्लोक (शार्दुलविक्रीडित) ॥
आला तो नृप दांडगा बघुनिया की जेथ कान्हो उभी ।
झांकावे जलदें जसें सुवकशा त्या चांदणीला नभी ॥
ग्रीवा ती करि ठेंगणी नृपति तो प्रेमें तियेला वदे ।
रंभोरू बघ पंचवाणचि तुझ्यासाठी मला ताप दे ॥५०॥
हे बादशहाचें भाषण ऐकून कान्होपात्रा बादशहास म्हणते,

॥आर्या ॥
पंचवदन करि आपुला, जरि नृपते पंचबाण छळि तुजसी ॥
अभिलाषावें का वद, बापाने आपुल्याच कन्येसी ॥५१॥
तेवढया म्हणण्याचा काहींच परिणाम झालेला नाही. हे पाहून कान्होपात्रा मोठया नम्रतेने बादशहास म्हणते,

॥कटिबंध ॥
तूं नृपा अम्हा भगवान, बापही जाण, । आमची मान तुझीया हातीं ।
आम्हि रिया लेकरें तुझी शिकव वा निती ॥
आमुचा कराया न्याय पंढरीराय । तुला नृपराध नेमिता झाला ।
त्या त्वांच काय शिकवावि अनिती पोरीला ॥
सन्मार्गी आपुली रत, करिल जो रयत, । तोच नृपनाथ शोभतो महिला ।
नृपवरा, गूणगंभिरा । कृपासागरा, अम्हां रयतेचें ।
आहेस विमलसें सुखद छ्त्र की साचें ॥५२॥
बादशहाने कान्होपात्रेचे म्हणणे मुळीच ऐकले नाही तेव्हा कान्होपात्रेने एक युक्ती योजिली;

॥ओवी ॥
तें नायके जयीं नृपती । तयीं कान्होपात्रा योजी युक्ती ॥
बरें येतें तुजसंगती । दर्शन घेऊन देवाचे ॥५३॥
अली भ्रूपासी पुसूनि राउळांत । राहुन देवास जोडि हात ।
“ तुझे गेले कां सच्च जगन्नाथा । पंढरीशा विठ्ठला सांग आतां ” ॥५४॥
देवाचे दर्शन घेऊन कान्होपात्रा भक्तिपूर्वक अंत:करणाने परमेश्वरास म्हणते,

॥पद ॥ ( राग- मांड, जोगी; ताल-दीपचंद्री)
मेरी सुनिये सुनिये सुनिये आरज नंदलाला ।
मोरम्रुगुट पीतांबराला ॥
क्यों भये पत्थर तुम गिरिधारी । छांड दया जगपाला ॥
द्रौपदीजीसे जाकर प्रभुजी । साडीपर साडी पिन्हाया ।
नक्रोंके मूंसे शामसुंदरजी । गनु कहे हाथी छुडाया ॥५५॥सुनि०॥
कान्होपात्रा अनन्यभावाने वरचेवर प्रार्थना करू लागली,

॥श्लोक (शार्दुलविक्रीडित) ॥
नेतां भ्रूप मला तुला कमिपणा येईल रे श्रीहरी
कोल्हानें लुटिल्या स्वभाग न पवे माना जगी. केसरी
भ्रूतांनी धरिल्या मृगांक खशिरीं खटांगपाणी हरा
येई की लघुता, मनीं उमज हें राहीरमरेच्या वरा ॥५६॥
कान्होपात्रेने आणखी प्रार्थना केली की, देवा,

॥अभंग ॥
देवा दामाजीच्या साठीं । घातियेली त्वां लंगोटी ॥
हीनजाती चोखा महार । त्याचें सारविले घर ॥
शुभा वेंची जनाबाई । त्या तूं वाहिल्यास डोई ॥
तेव्हां तुझा मोठेपणा । कोठें गेला नारायणा ॥
आतां बौध्द का झालासी । मायबापा माझेविशी ॥
कान्हो पायाची बटीक । नको हौउ देवा ठक ॥५७॥
॥पद ॥
अंत नको तूं पाहुस माझा कर वेगें तातडी ।
दुर्वास येतां द्रौपदिसाठीं कशि घातली त्वां उडी ॥
काय आचरिली भक्ती तुझी मी, अजवरि विठु बेगडी ।
म्हणुनी धरिलास पंढरिनाथा, मजविशीं मनिं का अढी ॥
मोल न घेतां सांवत्याची, शेतांत बांधिली जुडी ।
मोठेपण तें त्युजुनि वाहिल्या, खांद्यावर कावडी ॥
डोळे नको तूं झांकुं मुकुंदा, आहे कठिण हे घडी ।
गणु म्हणे आला शहा बिदराहुन, या भिवरेच्या थडी ॥५८॥
याप्रमाणे कान्होपात्रानें करुणा भाकतांच,

॥श्लोक (मालिनी) ॥
विमल यश जयाचेम वेद वाखाणितात ।
सुरवर पदपद्मा आदरें वंदितात ॥
जटितपियतिलागीं नित्य ज्याचीच आस ।
प्रगट तिजपुढे तो जाहला श्रीनिवास ॥५९॥
पांडुरंग प्रगट होऊन कान्होपात्रेस म्हणाले,

॥पद ॥
नको नको लव धरूंस भीती । काय करिल तो बंधु दे नृपती ॥
मत्पदिं निष्ठा सबळ जयाची । त्यास संकटे पाहुन पळती ॥
श्व्वान कसें गे धरितिल वेडे । गजछाव्याला या महिवरतीं ॥नको०॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 22, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP