मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
चरित्र ३

श्रीमदाद्यशंकराचार्य - चरित्र ३

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


( भाग तिसरा )

॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
अत्री, कौशिक, अंगिरा, भृगु, कपी, शांडिल्य, पाराशर ।
जमदग्नी, मुनि, गर्ग्य, देवल तसा आरुंधतीचा वर ॥
वैशंपायन, यास्क, गाधिज मुनी, व्यासादि सारे ऋषी ।
आचार्यांप्रति भेटण्यासहि आले मुद्दाम होतां निशी ॥१॥
नमस्कार करून ते म्हणूं लागले कीं,

॥ पद ॥ ( आनंदि आनंद तो )
आलात जयाचे साठीं । तें कार्य करा जगजेठी ॥धृ०॥
आयुमर्यादा मुळींच सोळा, त्यांतुन आज नऊ सरली ।
उरली आतां सात शिवा ही, गोष्ट आणा मनिं वहिली ॥
कैलासाहुनी काय कालटी, प्रीय झालि आपणांला ? ।
म्हणुन तियेचा मोह सुटेना, उचित न हें आत्याला॥
बुद्ध, जैन, चार्वाक, सांख्य ते श्रुतिनिर्मित पंथाला ।
नामशेष ते करण्या बसले । कठिण समय बहु आला ॥
वेदोद्धारासाठीं आपणां जें जें कांहीं करणें ।
असेल तें तें शीघ्र करावें, उचित न ऐसे बसणें ॥२॥
हें ऐकून श्रीशंकराचार्य म्हणाले,

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
बरें, गमन जा करा, अतुरता न ऐशी बरी।
न ये श्रुतिजपंथ हा बुडवितां कुणा भूवरीं ॥
जसे उदय - अस्त हे रविस प्रत्यहीं पातती ।
तशीच स्थिति ही पहा, सुखि करीन मी भारती ॥३॥

॥ दिंडी ॥
आर्य - अंबेने बघुन ऋषिगणाला । नमुन त्यासी या रितीं प्रश्न केला ।
आयु आहे पुत्रास किती माझ्या ? । प्रपंचाचा उचलील कधीं बोजा ॥४॥
वैशंपायन म्हणाले,

॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
अंबे ! तूं बहु भाग्यवान तुझिया आलोए कुशीं ईश्वर ।
हे नाहीं करणार या महितलीं संसार ध्यानीं धर ॥
संन्यासाश्रम घेउनी अशुभशीं नास्तीक जीं जीं मतें ।
खंदायाप्रति हे आले, करूं नको यांचें वृथा लग्न ते ॥५॥

॥ दिंडी ॥
असें बोलुनिया ऋषी निघुन गेले । वचें त्यांच्या जननिला दु:ख झालें ॥
तिची समजूत घालितां आचार्यासी । पुरें झालें किती करूं वर्णनासी ॥६॥

॥ आर्या ॥
श्रीमत् जगद्गुरुंनीं आपुलें तें कार्य साधुनी घ्याया ।
निर्माण मगर केला निज मायेनें नदीचिया ठाया ॥७॥
आर्यांबा, दोन चार गडी, भाले वगैरे सामान घेऊन नदीवर आली. त्या नक्राला पाहून आर्यांबेनें मोठ्यानें हंबरडा फ़ोडला. आई आलेली पाहून आचार्य म्हणाले, ‘ आई ! असा शोक करूं नकोस. अजून मला नक्रानें नेलें नाहीं. ’

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
आई मगर हा म्हणे तुजसि वांचणें भूवरीं ।
असेल तरि हो यती मुळिं प्रपंच तो ना करी ॥
श्रुतीविषयीं काधल्या भरमसाट ज्या कल्पना ।
समूळ विलयास ने करुन त्याचिया खंडणा ॥८॥
तें ऐकून आई म्हणाली, ‘ शंकरा ! -

॥ ओवी ॥ ( जात्यावरील )
सांग मगरासी राजसा । तूं सोडित असल्या मशीं ।
मुळीं विलंब ना लाविता । बघ घेइन संन्यासासी ॥९॥

॥ दिंडी ॥
आचार्यांच्या सोडूनिया पदासी । नक्र आला जननीस वंदण्यासी ।
भव्य त्याच्या देहास विलोकीलें । लोक अवघे मानसीं चकित झाले ॥१०॥

॥ आर्या ॥
यापरि करुन युक्ती मातेच्या सम्मतीस मेळवीलें ।
कालटी सोडुन घ्याया संन्यासा नर्मदातटीं आले ॥११॥
अशा तर्‍हेनें अमोल युक्ति करून आचार्यांनी संन्यास घेण्याबद्दल मातोश्रीची संमति मिळविली व कालटी सोडून निघाले. नर्मदेच्या कांठीं असलेल्या ॐकारमांधाता नांवाच्या सुप्रसिद्ध क्षेत्रीं येते झाले. नर्मदेचें स्नान करून श्रीओंकारेश्वराच्या मंदिरांत आचार्यांची बालमूर्ती आली असतांना, गंभीर ध्वनि झाल कीं,

॥ लावणी ॥ ( तूं चारु तनू )
शेषांश गुरुगोविंदपाद शंकरा ।
येथेंच तुझा कीं आहे, काननीं नर्मदातिरा ॥
त्याचिया पदा जाऊन शरण होय ती ।
अद्वैतमता स्थापावें, करण्यास सुखी भारती ॥
करि भाष्य व्याससोत्रास भ्रमा निरसणें ।
अज्ञानजन्य तीं सारीं, मतमतांरें खंडणें ॥
ॐकार प्रभु बोलला मंदिरीं असें ।
कवनिं तें गणूदासानें, कथियलें जसेंच्या तसें ॥१२॥
नवीन श्लोक रचून आचार्यांनीं श्रीओंकारेश्वराला नमस्कार केला आणि आपल्या गुरूच्या शोधार्थ नर्मदेच्या कांठीं असलेल्या अरण्यांत येते झालें. त्यांचा तपास करतां करतां लहानशा टेकडीच्या ठिकाणीं गोविंदगुरूची गुहा सांपडली. गुहेंत प्रवेश केला तों महाराजांची मूर्ति पद्मासन घालून आसनावर स्थानस्थ बसली आहे. असें पाहून श्रीशंकराचार्यांनीं आदरानें साष्टांग नमस्कार केला.
॥ लावणी ॥ ( भला जन्म हा )
लक्ष्मणाचा वेष घेउनी साह्य राघवाप्रती ।
केलें तुम्ही असे मागुतीं ॥
जगन्नाथ जैं कृष्ण होउनी अवतरला भूवर ।
तैं तुम्ही झालां कीं हलधर ॥
( चाल ) तुम्हीच मागुती पतंजली होऊन ।
दाविलें जगासी योगशास्त्र आचरून ।
आलांत अतां गोविंदपाद होऊन ।
ब्रह्म ब्रह्म जें शास्त्रें म्हणती तेंच तुम्ही गुरुवरा ।
अतां ना मजसी दूरी धरा ॥१३॥
तें ऐकून गोविंदपाद म्हणाले,

॥ दिंडी ॥
असें वदणारा कोण तूं आहेस ? । कशासाठीं आलास या स्थलास ?
वृत्त अपुलें सांगून सर्व कांहीं । मला देईं, लपविणें बरें नाहीं ॥१४॥
तें ऐकून आचार्य म्हणाले,

स्वामिन्नहं न पृथिवी न जलं न तेजो ।
न स्पर्शनो न गगनं न च तद्गुणा वा ॥
नापींद्रियाण्यपि तु विद्धि ततोsवशिष्टो ।
य: केवलोsस्ति परम: स शिवोsहमस्मि ॥

॥ श्लोक ॥ ( शार्दूलविक्रीडित )
ना पृथ्वी जल तेज मी पवन वा आकाश वा इंद्रियें ।
हें शब्दें कळतें विचार करतां तें प्रत्ययाला न ये ॥
आहे त्याहुनि अन्य मी जगिं कसा याचाच येवो खरा ।
स्वामी प्रत्यय तो मला, जवळिं हो या लेकरासी करा ॥१५॥

॥ पद ॥ ( कोण जगीं करणार )
दिक्षा त्या दिधली, गुरुवरें ॥धृ०॥
कर्म भक्ति सांगून प्रथमता । आत्मखूण कथिली ॥
आपपर तैशी जगद्भावना । विलयातें नेली ॥
शिरिं कर धरितां ब्रह्मवस्तु ती । चहूंकडे दिसली ॥
दासगणु म्हणे असा गुरू ज्या । तोच भाग्यशाली ॥१६॥
श्रीशंकराचार्यास गोविंदपादानीं संन्याशाची दीक्षा दिली हें जेव्हां ओंकारेश्वराच्या क्षेत्रस्थांना कळलें तेव्हां त्यांना गोविंदपादाचा फ़ार संताप आला. ते म्हणूं लागले कीं,

॥ लावणी ॥ ( आहे त्याचि मला )
बैसला दरिंत थेरडा केस पिकवुनी ।
व्यवहार कळेना याला, मग ब्रह्म तरी कोठुनी ? ॥
पाहुन लहानसें पोर त्यास दीधला ।
संन्यास इथें मूर्खानें, हें काय उचित याजला ? ॥
करिं दंड, भगवीं लक्तरें, नरोळे जरी ।
केल्यास टाळक्याचें का, शिरिं ब्रह्म तयाभीतरीं ॥
गणुदास म्हणे या रितीं नर्मदातिरा ।
लागले लोक बोलाया, नच विचार करितां पुरा ॥१७॥
अशा प्रकारची वयोवृद्ध विद्वान् लोकांकडून आपल्या गुरूची टवाळी होऊं लागली. तें पाहून आचार्य त्यांना म्हणाले; ‘ हें विद्वज्जनहो ! असल्या प्रकारची अशुभ भाषा महान् अधिकारी असलेल्या पुरुषाविषयीं वापरूं नका. गोविंदपादांनीं मला होऊन संन्यास दिला नाहीं. मी माझ्या देशाहून संन्यास घेण्यासाठीं त्यांच्याकडे आलों व संन्यास घेतला. तो ब्रह्म जाणण्यासाठींच. नुसतें टाळक्याचें नरोळे करून पुड्या खात फ़िरण्यासाठीं मीं संन्यास घेतला नाही. “ अहं ब्रह्मास्मि ” या श्र्तिवाक्याचा अनुभव घेण्यासाठी संन्यास घेतला आहे व ब्रह्म काय हें जाणणें व ब्रह्म होऊन बसणें हेंच नरजन्माचें अंतिम साध्य आहे.

॥ पद ॥ ( रजनिनाथ हा )
ब्रह्म जाणिल्या ब्रह्मचि होतो ।
प्रति ईश्वर तो होउन राहतो ॥धृ०॥
( चाल  ) मग तयाला अशक्य कांहीं ।
त्रिभूवनीं या उरलें नाहीं ।
होत साध्य तें या नरदेहीं ।
खेळ मुलाचा किमपि न हा तो ॥१८॥
आचार्यांचें सांगणें पुष्कळ लोकांना पटलें नाहीं. याला कांहीं दिवस झाल्यावर एक दिवस भयंकर वादळ झालें.

॥ लावणी ॥ ( हा स्वामी )
सजलशा कृष्णा जलदांनिं नभा व्यापिलें ।
निमिषांत पाणवार्‍यानें तें अंबर कोंदाटलें ॥
कडकडाट ध्वनी करुनिया विजा तळपती ।
कांठिंचे वृक्ष वार्‍यानें भूमीस अंग सांडिती ॥
रेवेस भयंकर असा पूर तो आला ।
गणु म्हणे वैश्य गंगेनें उदधिचा वेष घेतला ॥१९॥

॥ पद ॥ ( मांड - त्रिताल )
पळती पळती जन सारे ।
तो बघून नदीचा पूर त्वरें ॥धृ०॥
लहान अर्भकें कडेस दिसतीं । धरलीं जाणतीं मुलें करें ॥
बसली जागा नच उठवेना । असे गलितसे म्हातारे ॥
ठायिंचे बैसुनी आक्रोशाला । करुं लागले एकसरें ॥२०॥
लोक आचार्यांना म्हणाले,

॥ आर्या ॥
ब्रह्म जाणल्यावरती अघटित घटना तयास ये करितां ।
ऐसें तूं म्हणसी ना ? दाव तयाची प्रचीत मग आतां ! ॥२१॥
तें ऐकून शंकराचार्य म्हणाले, ‘ ब्रह्मवेत्त्या पुरुषाला पूर नाहींसा करणें हें कांहीं अशक्य नाहीं; कारण पूर, नर्मदा आणि तो एकच आहे. तेव्हां तुम्ही असें पळूं नका. मीं आतांच नर्मदेचा पूर नाहींसा करतों. असें म्हणून नर्मदेस हात जोडले व म्हणतात कीं,

॥ श्लोक ॥ ( चामर )
बैस या कमंडलूंत आपल्या जलासवें ।
मारितेस कांठिंच्या मुलांस काय तूं बये ? ॥
शांत हो त्वरीत, एवढ्या वचास मान दे ।
मंगले ! सुनिर्मले ! प्रसीद देवि नर्मदे ॥२२॥
श्रीशंकराचार्यांनीं प्रार्थना करतांक्षणींच नर्मदेचा पूर नाहींसा झाला. तें पाहून लोकांना अतिशय नवल वाटलें.

॥ दिंडी ॥
शांत झालेल्या बघुन नर्मदेसी । मुदित झाले निजमनीं पौरवासी ।
बालसंन्यासी पुरुष असामान्य । ब्रह्मविद्या ही खचित धन्य धन्य ॥२३॥
पुढें श्रीशंकराचार्य गुरूंची आज्ञा घेऊन श्रीक्षेत्र वाराणसी येथें आले.

॥ पद ॥ ( पोरें नच थोर )
उच्च क्षेत्र भारतासी । बुध म्हणती ज्यास काशी ।
नीलकंठ व्योमकेशी । जेथ वसतसे ॥धृ०॥
जान्हविचें रम्य तीर । येती ना यमकिंकर ।
जेथ कधिंच न्याया नर । शास्त्र वदतसे ॥
तेथ आले शंकर गुरू । जे नव्हते पोटभरू ।
प्रत्यक्षचि कल्पतरू । दासगणू म्हणे ॥२४॥

॥ दिंडी ॥
प्रभातींच्या स्नानास जान्हवीसी । जात असतां आचार्य पुण्यराशी ।
पथामाजीं चांडाल एक आला । चार होते ज्या श्वान संगतीला ॥२५॥

॥ लावणी ॥ ( आहे त्याचि मला )
येतसे तनूला घाण वर्ण सांवळा ।
नेसला एक लंगोटी, फ़ाटका स्कंधिं कांबळा ॥
ना वस्त्र दुजें त्यावीण, मांस भाकरी ।
होति हो करामधें डाव्या, पायांत वहाण साजिरी ॥२६॥
( चाल ) खेटून जाऊं लागला स्वामिसी भला, म्हणुन त्याजला ।
जरा हो दूरी । आचार्य वदले यापरी ॥
तें ऐकून चांडालरूपी परमेश्वर हंसलें आणी म्हणाले,

॥ छक्कड ॥
खरें तत्त्व नाहीं कळलें तुला ।
वृथा कावेचा हा नाश केला ॥ खरें तत्त्व ॥ध्रु०॥
( चाल ) ब्रह्म आत्मा तो एकचि सत्य ।
नीरवयची संगरहीत ।
आनंदरूप नि आहे अनंत ।
लिहिलें असे उपनिषदाला ॥ वृथा कावेचा हा ॥
( चाल ) काशिपुरीमाजीं व्याख्यान याचें ।
रोज करितोसी आपुल्या वाचें ।
चाळे तुझे हे बुवाबाजीचे ।
आहे पुरे आज कळलें मला । वृथा कावेचा हा ॥२७॥

॥ श्लोक ॥
अद्वितीयमनवद्यमसङ्गसत्यबोधसुस्वरूपमखण्डम् ॥
आमनन्ति शतशो निगमात्मातत्र भेदकलना तव चित्रम् ॥

॥ श्लोक ॥ ( इंद्रवज्रा )
तूं ‘ दूर हो ’ जें वदलास येथें । आत्म्याविशीं वा तनुच्याविशीं तें ।
आत्म्याचिया ठायीं न भेद बारे । एक्याच तत्वापुन हीं शरीरें ॥२८॥

॥ श्लोक ॥ ( कामदा )
म्हणुनि ‘ दूर हो ’ शब्द साजिरे । लक्षुनी कुणा बोललास रे ? ॥
सांग एवढें फ़ोडुनी मशीं । आपणासी तूं ज्ञानि म्हणविसी ॥२९॥

॥ श्लोक ॥

गच्छ दूरमिति देहमुताहो । देहिनं परिजिहीर्षसि विद्वन् ॥
भिद्यतेsन्नमयतोsन्नमयं किं । साक्षिनश्च यतिपुङ्गव साक्षी ॥३०॥
हें ऐकून श्रीशंकराचार्य म्हणाले,

॥ श्लोक ( इंद्रवज्रा ) ॥
सत्यमेव भवता यदिदानीं । प्रत्यवादि तनुभृत्प्रवरैतत् ॥
अन्त्यजोsयमिति संप्रति बुद्धिं । संत्यजामि वचसाsत्मैदस्ते ॥३१॥

॥ पद ॥ ( नृपममता )
अति सत्य वचन चांडाळा । तूं वदलासी ये वेळा ॥ साच कीं ॥
जें होतें माझें चुकलें । तें येऊन तूं सुधरीलें ॥ साच कीं ॥
( चाल ) जाहले तुझे उपकार, मजवरी फ़ार, इथुनि साचार ।
दृष्टि ठेवीन । अभेद सर्वदा जाण ॥ साच कीं ॥३२॥

॥ पद ( गोदावरिच्या पासूनी ) ॥
हीन अमंगळ चांडाळाच्या घेउनिया वेषा ।
आलासी तूं मदिय चुकीला दावाया ईशा ॥
या वेषातें त्यजून द्यावें दर्शन जगदीशा ।
तरीच होइल मोद मनातें पुरवा ही आशा ॥ ॥३३॥

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
येथूनिया कधिं न मानिन भेद कोठें ।
सद्वस्तुवांचुन दुजे जगिं या न भेटे ॥
हा शूद्र, हा द्विज, यति, अशि भावना ती ।
होऊं न देइन कधी मम जाण चित्तीं ॥३४॥

॥ पद ॥ ( हो प्रगट झणीं )
जाहला गुप्र चांडाळ प्रगटला तेथ ।
दशभूज पंचवदनाचा पार्वतीकांत ॥धृ०॥
मस्तकीं जटा शशिकोर त्यावरी गंगा ।
भूषवी सुवासित विभुति प्रभुच्या अंगा ॥
रुद्राक्ष कंठिं मनगटीं डिमडिमा वाजे ।
डमरु ते करामधें शूल प्रभूच्या साजें ॥
रुळतसे शिवाच्या हृदयिं माळ पुष्पाची ।
गोविली मधुनिया जिला दळें बेलाचीं ॥
चंदनी खडावा पायिं असा शिव भोळा ।
पाहूनी घालि गणुदास मिठी चरणाला ॥३५॥
तें पाहून आचार्य म्हणाले, ‘ भगवान !

॥ पद ॥ ( गोदावरिच्या पासूनि )
देहदृष्टिनें पहातां मी तो दास तुझा देवा ।
जीवदृष्टिनें विचार करुं तरि अंश तुझा बरवा ॥
आत्मदृष्टिनें विचार करितां याचा चित्तांत ।
तूंच मी हें कळून येतें उरतें नच दैत ॥३६॥

॥ पद ॥ ( नव्हे खचित फ़णि तो )
गहिंवरला प्रभु तो । अशा या वचनास परिसुनी ।
दिलें आलिंगन चारि हातानें । शिरिं धरिला कर तो ॥ध्रु०॥
( चल ) वरदपाणि तो धरूनी वदला । जो कुणि सेविल अद्वैताला ।
अक्षयसुख तें मिळून त्याला । मोक्ष पहा मिळतो ॥३७॥

॥ पद ॥ ( प्रगटला कीं तेथें )
कठीण व्याससूत्रालागीं तूंच करीं लेणें ।
सुलभ असें गीर्वाणीं त्या परम आदरनें ॥धृ०॥
( चाल ) श्रुतिस मान्य अद्वैतचि जें विमल सौखदायी ।
तें तूं तत्त्व स्थापन करणें अखिल जगाठायीं ।
तेंच आलासी तूं करण्या याच मनुजदेही ।
म्हणून वेळ कधिम नच अपुला फ़ुकट घालविणें ॥३८॥
हें ऐकून श्रीशंकराचार्यांनीं चरणावर मस्तक ठेविलें व म्हणाले,

॥ आर्या ॥
मानुनि आज्ञा अपुली भाष्यासी मी लिहीन लवलाहें ।
परि तें सरस कराया रस भरणें आपल्याकडे आहे ॥३९॥

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
हा मानुनी वरप्रसाद आरंभ केला ।
भाष्याप्रती विमलशा सरितातटाला ॥
छांदोग्य, मुंडक, भृगु, कठ, ईश, केन ।
मांडुक्य, प्रश्न, बुधहो ! आणखी अरण्य ॥४०॥

॥ दिंडी ॥
श्रुतीसूत्राचा अर्थ विशद केला । पंथ जगतीं अद्वैत स्थापियेला ॥
बादरायण व्यासास मोद तेणें । अती झाल, वदवे न तो वचानें ॥३९॥

N/A

References : N/A
Last Updated : August 13, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP