मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीरोहिदास चरित्र १

श्रीरोहिदास चरित्र १

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ आर्या ॥
जडजीव उद्धराया आले भूवरि धरूनि अवतार ।
कंठमणी श्रीहरिचे हीन कुळीं रोहिदास चांभार ॥१॥

॥ दिंडी ॥
जन्म झालासे चर्मकारवंशीं । ज्ञान पहातां लाजवी वसिष्ठासी ॥
शांति ज्याची आणि उणें सागराला । धाम वैराग्या सदय नांदण्याला ॥२॥

॥ ओवी ॥
रोहिदासाचा नित्य नेम । सांग पूजी पुरुषोत्तम ।
करूनि उपकर्णीं उत्तमोत्तम । अवघीं त्या चामड्याचीं ॥३॥

॥ आर्या ॥
एके दिवशीं आला जोशी पंचांग सांगण्यासाठीं ।
करीं नसेचे बेलें अंगावर शार जीर्ण जरिकांठी ॥४॥

॥ अभंग ॥
अरे गाढवाच्या धसा । भलभलतें करिसी कसा ? ॥
कातड्याच्या ताम्हणांत । न्हाणितोसी कमालाकांत ॥
हीन जाति तूं चांभार । तुला नोहे हा अधिकार ॥
गणु म्हणे ती अंबारी । काय शोभे हेल्यावरी ॥५॥

॥ ओवी ॥
ऐसें ऐकतां द्विजोत्तर । रोहिदास बोले जोडुनि कर ॥
दृष्टी आपुली एकवार । फ़ेंका या जगाकडे ॥६॥

॥ साकी ॥
चाम बिगर तो नजर न आवे एकही वस्तु जगमो ।
अविनाश, शुद्ध, सद्वस्तु बैठी ये चमडेके तनमो ॥
इस्का ख्याल करो । अभिमानें ना नाहक मरो ॥७॥

॥ लावणी ॥
हत्तीहि असे चर्माचा । चर्माचा भूप त्यावरी ॥
नौबत तीही चर्माची । चर्माच्या उंटावरी ॥
( चाल ) जो पुढें पळे हलकारा, तोहि साजिरा, चामाचा खरा ॥
पणव आणि भेरी । चर्मेंच बनविली खरी ॥ ॥
चर्मानें तुझ्या देहाला । तरि कुठें सांग सोडिलें ॥
हें दृश्य विश्व बघ सारें । चर्मेंच आकारा आलें ॥
( चाल ) चर्माच्या शुद्धीचे साठीं, चामसंपुटीं, प्रभू कीरिटी ॥
ठेउन पूजिला । गणुदास स्तवी त्याजला ॥८॥
हें त्याचें भाषण ऐकून जोशीबुवास फ़ार राग आला आणि तो त्यास म्हणतो.

॥ श्लोक ॥
नको कथुंस गाढवा । मजसि व्यर्थ वेदांत हा ।
तुम्हीच जगतीतला बुडविलें सुकर्मा पहा ॥
स्वकर्म आपुलें तुवां त्यजुनि सर्व चांभारड्या ।
विबूधसम झोंकिसी बसुनी ज्ञान - बाता बड्या ॥९॥

॥ आर्या ॥
जो का ब्राह्मन त्यानें पहावा वेदांत योग्य ना इतरां ।
तूं शूद्राहुन परता अससी रे रोहिदास चांभारा ॥१०॥
तें ऐकून रोहिदास म्हणतात,

॥ ओवी ॥
मी शूद्रांत शूद्रतर । परी ब्राह्मण जो का होतो नर ॥
तो कशानें हें एकवार । सांगा मज या बटकुरातें ॥११॥
तें ऐकून जोशीबुवा म्हणाले,

॥ दिंडी ॥
ब्रह्म जाणे ब्राह्मण तोचि जाणीं । असें मागें बोलिली व्यासवाणी ॥
तुम्हालागीं अधिकार नसे त्याचा । मर्कटासी ना लाभ मौक्तिकाचा ॥
हें ऐकून रोहिदास म्हणाले -

॥ अभंग ॥
ब्रह्मवस्तु काय मजसी सांगावी ।
मनासी आणावी विनंती ही ॥
चंदनाचा वास भुजंगानें घ्यावा ।
इतरें कां लावावा पदर नाकीं ॥
गोदा, भागीरथी, नर्मदा, कावेरी ।
हीना का अव्हेरी जगामध्यें ॥
चारी वर्णांचे ते गुरू हो आपण ।
सांगा ब्रह्मखूण मजलागीं ॥१३॥
हें ऐकून जोशीबुवा फ़ारच रागवले व त्यास म्हणतात -

॥ पद ॥ ( कधिं तिला )
ब्राह्मणाविणें इतरां । मी नच सांगें ब्रह्म खरा ॥
( चाल ) जोड्यासी, तूं शिविसी, अभक्ष्या भक्षिसी,
करूं नको वृथा नखरा ॥१४॥
रोहिदास म्हणाले, “ ठिक आहे. ब्राह्मण झाल्याखेरीज तुम्ही ब्रह्मोपदेश करीत नाहीं हें समजलें. तेव्हां मग -

॥ लावणी ॥
ब्राह्मन व्हावयासाठीं काय तें लागे ।
मज सांगुन वेगें, नेउनि सोड जागे ॥
जे ठायीं निजांगें, ब्रह्मवस्तु ती रंगे ॥१५॥
तें ऐकून जोशीबुवा म्हणाले, “ तुला एवढें कळत नाहीं ? ”

॥ अभंग ॥
गळां पाहिजे जानवें । नांव भटजी हें असावें ॥
धेनु - खुराएवढी शेंडी । अंगीं धाबळीची बंडी ॥
करीं बेलें तपकीरीचें । जवळ पुडकें पंचांगाचें ॥
भालीं भस्म वरि चंदन । ऐशी ब्राह्मणाची खूण ॥१६॥

॥ लावणी ॥
जानवें करुनि वादीचें । तात्काळ गळां घातिलें ॥
घेऊन चुलीची राख । भालास भस्म फ़ांशिलें ॥
काढून गंध काष्टाचें । ढलढळित वरि लाविलें ॥
फ़डक्यांत बांधुनी जोडे । पंचांग - पुडकें बनविलें ॥
( चाल ) मज “ रोहिदास भट ” म्हणा ।
ब्रह्मनिरुपणा, आतां ब्रह्मणा ।
पाहिजे केलें । गणु म्हणे आयु चाललें ॥१७॥
तें पाहून जोशीबुवाची तळची आग मस्तकाला गेली आणि ते मोठ्या रागानें म्हणाले -

॥ आर्या ॥
वा रे वा सोंगड्या ? मी का ताबुद असें मशिदीचा ।
म्हणुनी मोहरम् भट तू होउन आलास मजपुढें साचा ॥

॥ कटिबंध ॥
कावळा लाउनी आला, पिसारा भला, जरी मयुराचा ।
ना लाभ तया होणार तदिय नृत्याचा ॥
अंगास साबण लाविलें, जलीं न्हाणिलें ।
स्वच्छ जरि केलें, म्हणुन अश्वाची ।
येईल सरी का सांग गाढवा साची ॥
( चाल ) कातडी जाड अंगाची सर्वही ॥
कुळकुळित असे तो काळा वर्णही ॥
क्रीडेंत असे चिखलाच्या सम्यही ॥
म्हणुनि कां तया हलगटा, अरे हलकटा,
झुली नी घंटा, साच बांधिती ।
हीनास नसे थोराची योग्यता कधिं ती ॥१९॥
तें ऐकून रोहिदास सखेदाश्चर्य मुद्रेनें म्हणतात -

॥ अभंग ॥
अळी होउनी भिंगोरी । फ़िरुं लागे गगनोदरीं ॥
कस्तुरीच्या संगें माती । सहज पावे मोलाप्रती ॥
तैसें तुम्ही हो द्विजवरा । मजलागीं विप्र करा ॥
गणु म्हणे रोहिदास । करी विनंति विप्रास ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 18, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP