मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीनामदेव महाराजांचें चरित्र ७

श्रीनामदेव महाराजांचें चरित्र ७

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


( तिसरा भाग )

॥ श्लोक ( पृथ्वीवृत्त ) ॥
महापुनित पंढरि विमल चंद्रभागातिरीं ॥
जिथें जघनिं ठेउनि कर विटे उभा श्रीहरी ॥
असे सतत राहिला पदनतांस तारावया ॥
म्हणून परमादरें नमित त्या पदां नामया ॥
देव म्हणाले,

॥ दिंडी ॥
जरी वाजवि मी कीर्तनांत मागें । उभा राहुनिया टाळ तुझ्या संगे ॥
परि न कांहीं पुरुषार्थ यांत झाला । सगुण भक्तीचा खेळ मात्र केला ॥२॥

॥ पद ( पद घुंगरु. ) ॥
जा गुरुसि शरण झणिं आतां रे ॥ जा गुरुसी० ।
सद्गुरुवांचुनि समर्थ कोणी । नाहीं सारण्या द्वैता रे ॥जा०॥
सूर्यप्रभेच्या वांचुनि जैसें ॥ नये जगासी पाहतां रे ॥जा०॥
गुरुकृपेचा चक्षु न ज्यातें ॥ तो अंधळ्याहुन परता रे ॥जा०॥
तुजला नाम्या ! मुळीं नच कळली । माझि कशी व्यापकता रे जा० ॥
गणु म्हणे जाहला खिन्न मनामधीं ॥ भक्त हरी हें वदतां ॥ रे ॥जा०॥३॥

॥ श्लोक ॥
गोरा तुला सकल संत सभेंत झाला ।
कच्चा असें ठरवितां, उमजे मनाला ॥
ज्याच्या मना मुळिं न लाज अशा वचाची ।
तो मूर्तिमंत प्रतिमा जगि मूढतेची ॥४॥
नामदेव म्हणाले,

॥ ठुंबरी ( पंजाबी भैरवी ) ॥
भक्तिपरी सुख नाहीं । देवां, भक्तिपरी सुख नाहीं ॥
अध्यात्मामधें सर्व कल्पना । अनुभव ये नच कांहीं ॥देवा०॥
शाब्दिक लाडू सेवित बसल्या । तृप्ति कदापि न होई ॥देवा०॥
दासगणु म्हणे सतत असावी । पायिं तुझ्या मम डोई ॥देवा०॥

॥ दिंडी ॥
दूध साखर अति निकट ठेविल्याही । खीर त्याचि होणार कदा नाहीं ! ॥
तींच दोन्हि मिसळून जाति जेव्हां । समज त्याची होणार खीर तेव्हां ॥६॥

॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
हीं दोन्हीं करि एक तोच समजे, उद्धारिता सद्गुरु ॥
हे माझे बघ बोल साच असती, शंका नको रे धरूं ॥
दे बा ! टाकुन भक्तिबाल्य अवघें शोभे न हे कीं अतां ॥
दाढी आणि मिशा अल्या नर कधीं होईल कां रांगता ? ॥७॥
नामदेव म्हणाले,

॥ लावणी ( ना छळिलें हरिश्चंद्रास ) ॥
आदिनाथें कुणापासून तरी घेतला ॥
उपदेश तरुन जायासी येवढें सांग कीं मला ॥
जमदग्नि अगस्ति भृगु वसिष्ठांदिकां ॥
अध्यात्म लाभले कैसें गुरुविण रमानायका ! ॥
( चाल ) तव कृपा नाहिं जोंवरी ॥ आहेत तोंवरी ॥ साधनें सारीं ॥
योग्य सेवाया ॥ गणु म्हणे तरुन जावया ॥८॥

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
असेल करणें गुरू तरि तुम्हींच व्हा हो मला ॥
उगीच दुसर्‍याकडे करि न बोट हे विठ्ठला ! ॥
जलार्थ तटिं बैसला तृषित त्यास गोदावरी ॥
कुपा शरण जावया कथिल काय देवा ! तरी ? ॥९॥

॥ आर्या ॥
दुधाळ धेनू अपुल्या वत्सालागीं कदापि ना लावी ॥
नेउनि स्तनिं दुसरीच्या ती अपुलेंचि दुधाळपण टिकवी ॥१०॥

॥ दिंडी ॥
नाम पुसतां मी म्हणें जगन्नाथ । आणि भाड्याच्या राहि आगरांत ! ॥
म्हणुन त्याचें तें सहज नाम खोटें । बुद्धिमंतांना सांगतांहि वाटे ॥११॥

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
नाहीं निरर्थक तसे तव नाम देवा, ॥
आहे असा भरंवसा मज वासुदेवा ! ॥
सर्वाद्य तूं सकलशक्ति तुझ्याच ठायां ॥
जाणून हे विनटला गणु दास पायां ॥१२॥

॥ पद ( पोर नच थोर ) ॥
हें म्हणणें नच तात्त्विक ॥ सकल असे व्याव्हारिक ॥
द्वैतभान जेथ देख ॥ तेथ हें वसे ॥ध्रु०॥
मी तूं ही भावनाच ॥ करिर जगीं सतत नाच ॥
होत तिचा बहुत जाच ॥ या जिवांप्रती ॥१३॥

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
संपादिल्यावरि तुवां गुरुच्या कृपेला ॥
ना ह्या अशा मग कधीं वदसी वचाला ॥
तूं पुष्प सौरभ असें म्हणतोस दोन ॥
शब्दें अभेद मुळचे बघ ते असून ॥१४॥

॥ लावणी ( भूपाळीची ) ॥
यासाठीं जा शरण अनन्यें, शीघ्र विसोबाप्रती ॥
तोचि तुझ्या या छेदिल द्वैता, अणविल ब्रह्मस्थिती ॥ध्रु०॥
ती स्थिति आल्या होइल अवघें, त्रिभुवन हे पंढरी ॥
जिकडे पाहाशिल तिकडे तुजला गणु म्हणे, भेटेल हरी !॥१५॥

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
अशा हरिवचाप्रती परिसुनी स्वचित्तांतरीं ॥
विषाद बहु पावला वदन मुग्धतेला वरी ॥
अधोवदन बैसला सहज नामया श्रीपुढें ॥
हळूंच प्रभुला बघे करुनि नेत्र ते वांकडे ! ॥१६॥
अशी त्याची केविलवाणी स्थिती पाहून देव म्हणाले,

॥ दिंडी ॥
नको नाम्या ! दु:खीत असा होऊं ॥ जाय ओंढ्याला येथ नको राहूं ॥
त्यजी कन्या कष्टेंच माहेरासी ॥ तीच भोगी सौख्यास सासर्‍यासी ॥१७॥

॥ कटिबंध ( लावणी ) ॥
सोडून क्षेत्रपंढरी, देव नरहरी, सिनेच्या तिरीं, तिथुन मग जावें ॥
बारशीमधें भगवंतपदा वंदावें ॥
त्यापुढें क्षेत्र मनोहर, अंबिकापूर, जेथ उद्धार जयत्पालाचा ॥
जाहला धरावा मार्ग पुढें परळीचा ॥
त्यापुढें सकल तीर्थाचि, माय जी साचि, प्रीय शंभूचि, गौतमी गंगा ॥
ज्या गांविं असे नामया जनीची जागा ॥
( चाल ) परभणी गांव बाजूला रहातसे ॥
औंढ्याचा मार्ग पहाडांतुन जातसे ॥
जे ठायिं झाडि सागाची बहु असे ॥
तें मुळिं दारुकावन, जेथ भगवान, पार्वतीरमण, अनंदें रमला ॥
गणुदास म्हणे शितिकंठ पिनाकी भोळा ॥१८॥

॥ पद ॥
( घर जानें दे. )
नमन करुनि त्या हरिपदकमला । नामदेव औंढ्यास निघाला ॥
तो प्राकारीं निजले गुरुवर । निजपद ठेवुनि शाळुंकेवर ॥
भजन मुखानें करि वरचेंवर । भेद कुंठें ज्या किमपि न उरला ॥न०॥१९॥
नामदेव म्हणाले,

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
शुद्धींत ना दिसतसा मजला तुम्ही हो ॥
ठेवीयले पद कुठें अपुले पहा हो ॥
जोड्यास तेल दिधले मृदु तो कराया ॥
तें लागलें प्रभुवरा वरती गळाया ॥२०॥

॥ श्लोक ॥ ( वसंततिलका )
वेडा पिसा गुरु असा मजला हरीनें ॥
योजीयला तरि कसा अपुल्या मनानें ? ॥
सर्वज्ञ तों सकल ज्या कळतें अधींच ॥
येथें परी दिसतसे विपरीत साच ! ॥२१॥

॥ साकी ॥
जीवन्मुक्त योगेश्वर तुमच्या गांविं विसोबा असतां ॥
कां हे ऐसें वेडेंवांकडे आचरण मंदिरीं करितां ? ॥
ही कां औंढ्याची ॥ पद्धत शिवपूजेची ! ॥२२॥
हें ऐकून विसोबा म्हणाले,

॥ पद ॥
शुद्धि अथवा बेशुद्धि हे कशास म्हणती तरी
या विश्वामधिं फ़ोड करूनिया सांग मला लौकरी ।
तूं जें करिसी तेच करी मी शोधूनि बघ अंतरीं
अभेद कैसा हे पहाण्या तूं आलासना इथवरी ।
पद मज माझे जड बहु झाले ते तूं अपुल्या करीं
धरुनि ठिवावें, दासगणु म्हणे, अन्य ठिकाणावरी ॥२३॥

॥ पद ( ना छळिलें हरिश्चंद्रास ) ॥
बोलून असें त्याप्रती स्वस्थ राहिला ॥
गुरुराज विसोबा तेव्हां नामया मनीं दचकला ! ॥
म्हणे हाच विसोबा दिसे द्वैतवारिता ॥
बघुं अशा अविधिकृत्यानें, तें ब्रह्म केवि ये हाता ॥
उचलून तयाचे पाय आपुल्या करीं ॥
लागला ठिवाया नामा, गणु म्हणे जमीनीवरी ॥२४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP