मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीसंत सेना न्हावी चरित्र ३

श्रीसंत सेना न्हावी चरित्र ३

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ पद ॥ ( लावणीची )
भूपती करें एखादा, अपराध जाहला जरी ॥
वांझट करूं नये त्याचें केव्हांहि दहांभीतरीं ॥
( चाल ) अपमान तो न व्यक्तिचा । राजसत्तेचा । होइल कीं साचा
निषेध केल्यास । जाईल काम चिरडीस ॥४१॥

॥ पद ॥ ( लावणीची )
नृपतीच्या कधीं दोषाला । सूज्ञानें गौरवूं नये ॥
लांगूलचालनाला हो । त्यापुढें कधिं करूं नये ।
( चाल ) झांकितां भूप - दोषांस । हानि अवघ्यांस । सुखाचा नाश ॥
होइल समजावें ॥ अग्निला भडकूं देऊं नये ॥४२॥

॥ श्लोक ॥
ना भूप दोषां कधिं गौरवावें । दोषी असेंही नच त्या म्हणावें ॥
नाजूक मोठीं स्थिति भूपतीची । ठोका घणें ना कधिं कांच साची ॥

॥ पद ॥ ( कटिबंध )
भूपती बघुन एकांतीं । बुधें त्या प्रती । दोष दावावें ॥
अंगिचे तयाच्या परि न दहांत बोलावें ॥
उपदंश रोग शरिरास, जाहल्या त्यास कधिं न लपवावें ।
वा त्याजुनि धोतरा पथें कधिं न हिंडावें ॥
मळुं नये कधीं केशर, किं उघड्यावर, पाहिजे घर, प्रसूतीसाठीं ।
गृहछिद्र कुणी कळवि का दौंडिनें हाटीं ॥
( चाल ) तनु रयत प्राण तो जाणा भूपती ।
रुधिर हें हक्क रयतेचे निश्चिति ।
जाहल्या हानि रुधिरास । घात दोघांस । होईल कीं खास मनीं आणावें ॥
बघुनिया मागेंपुढें म्हणत गणू चालावें ॥४४॥

॥ ओवी ॥
असो श्रोते तयाकालीं । ऐशीं नानामतें निघालीं ॥
कोणी राजाज्ञा गौरविली । कोणी केला निषेध ॥४५॥

॥ श्लोक ॥
मग ती मंडळी आधीं सेना न्हाव्याकडे गेली व त्यास म्हणाली,
सेना ऊठ पुजा पुरे करि अतां भूपास तोषावया ।
सारासार विचार नित्य करणें लोकांत चालावाया ॥
हें ना तूं जरि मानशी सदन तें पेटेल बापा तुझें ।
कोपाग्नी भडको कितीहि परि तो बा लीनतेनें विझे ॥४६॥

॥ दिंडी ॥
यावर सेना म्हणाला,
असा मम करें अपराध काय झाला । म्हणुन भूपतिनें सक्त हुकुम केला ॥
काय रायासी तुष्टविण्या सांगा । अव्हेरूं या भगवान पांडुरंगा ॥४७॥

॥ अभंग ॥
विठ्ठलाच्या पुजेहून । अधिक कांही मज ना आन ॥
भूप घेवो माझा प्राण । अथवा टाको घर जाळुन ।
हेच एवढें त्याच्या हातीं । मगर पाण्यामध्यें ओढिती ॥
गणु म्हणे ऐहिक सुखा । प्रिय मानी तो संत कां ॥४८॥

॥ ओवी ॥
लोकांचा निरुपाय झाला । सेना न टाकी पूजनाला ॥
मर्कटाच्या चेष्टेला । काय भिईल पंचानन ॥४९॥
 
॥ पद ॥ ( लावणीची )
धरुनियां मूर्ति पोटासी । ढसढसा रडूं लागला ॥
आले राजदूत जाळाया । हें सदन सख्या विठ्ठला ! ॥
करूं कसें आतां मी हरी । कुठें ठेवुं तरी । सांग लौकरी ।
तुला घननीळा । मजमुळें त्रास जाहला ॥५०॥

॥ अभंग ॥
आण माझा तो वस्तरा । पोट चिरुनी शार्ङगधरा ।
देतो ठेवुन निर्भय स्थानीं । तैशी लपवी तूं रुक्मिणी ॥
शरीर अवघें हें मातिचें । लावूं कारणीं परमार्थाचें ।
कांता म्हणे धरा धीर । अजुन पेटलें ना घर ॥५१॥

॥ ओवी ॥
इतुक्यामध्यें सेनाची । समाधी लागली पूर्ण साची ॥
शुद्धी न उरली देहाची । तया भक्तवराते ॥५२॥

॥ आर्या ॥
आतां इकडे बुधहो, भीमातटवासी ईश कंसारी ।
बनला सेना नापिक, हरिभक्ताचा खराच कैवारी ॥५३॥

॥ श्लोक ॥
मुनी जटि तपी तया बसुन चिंतती काननीं ॥
जयाहुन जगत्रयीं मुळिंच श्रेष्ठ नाहीं कुणी ॥
परात्पर हरी असा त्यजुन सर्व मोठेपणा ।
हजाम बनला स्वयें, गणु करी तया वंदना ॥५४॥
सेनारूपी देव बादशहास म्हणला,

॥ पद ॥ असावरी ( जाई परतोनी )
अपराध करें घडला । मुळिं न अपराध करें घडला ॥ध्रु०॥
ऐसें असतां सक्त हुकुम कां । मज दीनाविषयींच तुझा सुटला ॥मु०॥
सुखद छत्र तूं असुनी आमुचें । कां मग करिशी हनन शिशुचें ॥मु०॥
उल्लंघूनी तत्त्व नीतिचें । रक्षि शहारे थोरपणा आपुला ॥मु०॥५५॥

॥ पद ॥ ( लावणीची )
थोरवी आपुली थोरांनीं । पाहिजे किं सांभाळली ॥
कां कुठें सागरानें त्या । निजपुरें घरें पाडिलीं ॥
रवि कोश प्रखर तेजाचा । परि नाहीं वनें जाळिलीं ॥
भूमीनें भयें भाराच्या । कधिं काय पिकें टाकिली ॥
( चाल ) सत्ता ती सर्वतोपरी । आहे तव करीं । कथूं कुठवरी ॥
दिनाचा वाली । हो निजरयतेस माऊली ॥५६॥

॥ साकी ॥
असें झाल्यावर, बादशहा त्यास म्हणाला,
अभिमानोके बाल बढेथें मेरे सिरके उप्पर ।
ओ सब सेना तुने निकाले क्या करूं तेरी खातर ॥
ये मुझे कह देना । खुदा पछानो कहे सेना ॥५७॥

॥ श्लोक ॥
वाटीमध्यें दिसत रूप तयीं शहातें ।
जें लाजवीत बुधहो शफ़रीध्वजातें
त्यातें बघून नृपती मनिं थक्क झाला ॥
तैलामध्यें पुरुष कोठुन हा उदेला ॥५८॥

॥ श्लोक ॥
तनू परम गोमटी कटिस पीत पीतांबर ।
चतुर्भुज गळ्यामध्यें रुळति मौक्तिकाचे सर ॥
सुरम्य किरिटावरी मयुरपिच्छ तीं शोभती ।
बघूनी पदपद्म तें भ्रमरभक्त वेडावती ॥५९॥

॥ पद ॥ ( लावणीची )
टकमकां भूपती पाहे । वर खालति वरच्यावरी ॥
घटकेंत दिसे तो सेना ॥ घतकेंत सखा श्रीहरी ॥
( चाल ) त्यायोगें भांबावला । दंग जाहला । उचलि वाटिला ।
अतुरता भारी । गणुदास वर्णना करी ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 18, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP