मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
हरण १

वत्सला - हरण १

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ आर्या ॥
पुण्यश्लोक युधिष्ठिर, निजबंधूंसहित काननीं असतां ।
दुर्योधन - पुत्रासी हलधर अर्पावया बघे दुहिता ॥१॥

॥ ओवी ॥
इकडे हस्तिनापुराहुनी । द्वारकेस आला शकुनी ।
बलराम - रेवती वळवुनी । वत्सलेसी मागावया ॥२॥
शकुनीमामा वत्सलेची मागणी घालण्याच्या उद्देशानें म्हणाले,

॥ साकी ॥
सार्वभौम त्या कौरवपतिला तूंच शोभसी व्याही ।
म्हणुनि हलधरा ! शीघ्र वत्सला लक्ष्मणाप्रती देई ।
विचार कृष्णाचा । यांत न घेई तूं साचा ॥३॥

॥ दिंडी ॥
असे साथी तव अनुज पांडवांचा ।
कपटपटु तो करि सदा द्वेष साचा ॥
सुभद्रेच्या वेळींहि विघ्न केलें ।
तुझें मोठेपण समुळ लया नेलें ॥४॥
बलरामाला तें पटलें आणि लगेच “ मी आपली मुलगी जी वत्सला ती तुमच्या म्हणण्याप्रमाणें लक्ष्मणाला दिली. हा घ्या वाङनिश्चयाचा नारळ, ”

॥ ओवी ॥
तिथी - निश्चय करून । येतां शकुनी परतून ।
मध्यंतरीं रुक्मिणीरमण । भेटता झाला मामातें ॥५॥
कृष्ण हंसून म्हणाला,

॥ श्लोक - वसंत तिलक ॥
हस्तामधें दिसत नारळ काय मामा ! ।
कामा नये खचित तो धरिला रिकामा ॥
वाटे तदीय जननीच तुम्हांस भेटी ।
देईल हस्त धरुनी सकलां चव्हाटीं ॥६॥
शकुनी म्हणाला, “ कृष्णा ! उगीच बैस. मी तुझ्याशीं बोलत नाहीं. आमचा संबंध बलरामाशीं आहे. ” असें म्हणून मोठ्या तोर्‍यानें हस्तिनापुराला निघून गेला व सर्व हकीकत दुर्योधनाला निवेदन केली.

॥ कटिबंध ॥
कौरवां हर्ष जाहला, ‘ व्याहि लाभला ’, म्हणति ‘ बलराम ’ ।
“ शकुनिनें खचित हें योग्य जुळविलें काम ॥
धाकुटा पांडवां करीं, धरी श्रीहरी, आपणां मोठा ।
कोठून यशाला पडेल आता तोटा ? ” ॥
( चाल ) यापरी मनींचे मांडे भक्षिती ।
खिजविण्या पंडुपुत्रांना पाहती ।
लग्नास व्याहि, पडाव्याहि, बाहती ।
वगळुनी सुभद्रा सती, विदुर सन्मती, पत्रिका लिहिल्या ।
गणुदास म्हणे त्या कुठें हरीला रुचल्या ? ॥७॥

॥ ओवी ॥
भीष्म म्हणे सुयोधना । हाच का तंव मोठेपणा ।
वगळूनियां पार्थागना । वर्‍हाड सिद्ध केलेंस ? ॥८॥
भीष्माच्या आज्ञेनें दुर्योधनानें चिठ्ठी लिहिली. सुभदेला खिजविण्याच्या इच्छेनें ती चिठ्ठी घेऊन मुद्दाम इंद्रप्रस्थाला तिच्याकडे गेला. शकुनी म्हणाला,

॥ लावणी ॥ ( भला जन्म हा )
ऐक सुभद्रे ! लक्ष्मनाप्रती बलरामें दीधली ।
वत्सला अभिनव कन्या भली ॥
आतां विसरे निज नात्याला तुम्हां भिकार्‍यांप्रती ।
कोठुन मानिल तो श्रीपती ॥
( चाल ) बैसून दासिबटकीच्या गाडिंत ।
लग्नास चाल, ना होई दु:खित ॥
वाटाल्या बरोबर घेई निजसुत ।
चार दिवस सुग्रास, तशिच ती साडी, चोळी भली ।
मिळुनियां भेटेल गे ! माउली ॥९॥
असें म्हणून शकुनी निघून गेला. सुभद्रेनें ती पत्रिका हातांत घेऊन वाचून पहिली. भीष्माचार्यांची पत्रिकेवर सही पाहिली आणि मग द्वारकेकडे तोंड करून भक्तियुक्त अंत:करणानेम परमेश्वरास म्हणूं लागली कीं, “ हे कृष्णा ! -

॥ पद ॥ ( नृपममता )
निजवचना विसरसि कैसा । या समयीं यादवराया ! । माधवा ॥
मी भगिनि तुझ्या पाठींची । करुं नकोस पातळ माया । माधवा
वत्सला भाग सिंहाचा । त्या टपला कोल्हा खाया । माधवा ॥
मेहुना तुझा वनवासी । हें कां ना मनिं तव सदया ! ॥ माधवा ॥
( चाल ) शकुनिनें तुझ्या भगिनीला ।
खिजवावें काय गोपाला ? ।
हा डाग तुझ्या ब्रीदाला ।
मळवी ना निजयश वायां । या समयीं यादवराया ॥ माधवा ॥१०॥
असें म्हणून सुभद्रा रडूं लागली. इतक्यांत अभिमन्यु आला. आई रडते आहे आहे असें पाहून तो म्हणतो -

॥ श्लोक ( इंद्रवज्रा ) ॥
वीरांगना तूं असुनी अशा या । शोकास कां गे ! करित्येस वायां ? ।
कोणीं दिलें दु:ख तुझ्या मनासी । तें सांग, त्या मारिन निश्चयेंसी ॥११
हें ऐकून सुभद्रा म्हणते,

॥ लावणी ( राणि ती हरिश्चंद्राची ) ॥
कन्यका तुझ्या मामाची । वत्सला परमसुंदरा ।
जी दिली होति कृष्णानें । तुजलागिं पार्थकुमरा ! ॥
( चाल ) तें वजन ।विसरला हरि, तुझी नोवरी, लक्ष्मण वरी ।
पत्रिका आल्या । वडिलांस मान्य जाहल्या ॥
गंगेचे पुत्र मामाजी । नरपुंगव कौरव - कुलीं ।
त्यांनाहि गोष्ट बघ बाळा । सर्वस्विं मान्य जाहली ॥
( चाल ) कृष्णानें कापिली मान, बनुनि बेमान, भगिनिची जाण ।
कुठें नच थारा । गुण म्हणे विचार करा ॥१२॥
तें ऐकून अभिमन्यु म्हणाला,

॥ आर्या ॥
कोणीकडुनि तरी ती होते ना वत्सला तुझी सून ? ॥
मग हा शोक वृथा कां ? मानी चित्ताप्रती समाधान ॥१३॥
आई ! यांत मला रडण्यासारखें कांहींच कारण दिसत नाहीं. सख्खी नाहीं पण चुलत सून ती तुझी होणारच आहे. ” तें ऐकून सुभद्रा रागावून म्हणते,

॥ श्लोक वसंत तिलक ॥
मेलास ना उपजतांच कसा करंट्या ! ।
कोदंड हें त्यजुनि वेंच वनीं तुराट्या ॥
तूं आपणा विजय - नंदन ना म्हणावें ।
षंढा ! पुन्हां नच मला मुख दाखवावें ॥१४॥
त्यावर अभिमन्यु उसळून म्हणतो,

॥ पद ॥ ( झंपा )
आई ! वीर हा पुत्र त्या पार्थजीचा ।
नंद - सुनूप्रती मीच भाचा ॥धृ०॥
समरिं दंडूनिया कौरवाला पहा ।
आणिन गे वत्सला सत्य वाचा ।
आणिन गे वत्सला सत्य वाचा ॥
पन्नगाला कुठें विहगपति भीत का ? ।
पाड सिंहाप्रती नच गजाचा ॥१५॥
असें म्हणून दोघेहि विदुराकडे गेले. सुभद्रा म्हणाली, “ मामंजी ! तुमचा रथ आम्हांस मिळेल काय ? मला माझ्या मुलासह द्वारकेला जावयाचे आहे. ” विदुरांनीं पुढचें भाकीत जाणून सांगितलें कीं, “ ठीक आहे. खुशाल रथ घेऊन जा. पण माझ्या रथाला सारथी नाहीं. ” सुभद्रा म्हणाली, “ मामंजी ! त्याची काळजी करूं नका. माझ्या भावाचा सारथ्य करतां करतां जन्म गेला आहे. त्याच्या बहिणीला का रथ हांकतां येणार नाहीं ? ”

॥ आर्या ॥
आरूढोनि रथावर सौभद्रासह सती सुभद्रा ती ।
द्वारावतीस निधाली आठवुनि तो नंदतनय निज चित्तीं ॥१६॥

॥ ओवी ॥
इकडे कौरवांचें कटक । निघालें द्वारावतीस देख ।
असंख्य राजे मांडलीक । पातले होते लग्नाला ॥१७॥

॥ कटाव ॥
कौरव - चमु सागराकर ती । कोट्यावधि ते सजविले हत्ती ।
रत्नखचित अंबार्‍या वरती । गज - मस्तकिं ते महात शोभती ॥
तीक्ष्ण अंकुश ज्यांच्या हातीं । गज - कंठीं मालिका मनोहर ।
रंगवुनि केल्या सोंडा सुंदर । चारीं पायीं सुवर्ण तोडर ।
किनखापाच्या झुली मनोहर । घण घण घण घण घंटा वाजति ।
नौबति उंटावरति दणाणति । रणभेरीचे आवाज होती ।
वायरोषिता करिति तनाना । आघाडीस तें निशाण जाणा ।
असा चालला कौरवराणा । रथी, अतिरथी, महरथ्यांना ।
बसावयासी रथ ते नाना । मध्यभागिं गांगेय रथावर ।
हजार छत्रें झुलतीं ज्यावर । मागें पुढतीं चौरीचामर ।
जसा उडुगणीं दिसे निशाकर । गुरु द्रोण, धृतराष्ट्र, सुयोधन ।
कृपाचार्य, द्रोणी, दु:शासन । सौमदत्ति नि भास्करनंदन ।
शकुनीमामा, विदुर सुलक्षण । पार्श्वभागिं तो लक्ष्मणाचा ।
श्रृंगारित रथ नवरमुलाचा । भोंवतिं मेळा करवल्यांचा ।
अंबार्‍यांतुनि जनानखाना । दिल्या पालख्या ऋषीगणांना ।
मेणे असती उपस्त्रियांना । बंदीजन ते भाट गर्जती ।
रंगित काठ्या ज्यांच्या हातीं । घोडेश्वार घोड्यांवरती ।
पायदळाला मुळीं न गणती । दासी, बटकी गाड्यांमधुनी ।
आले आचारी त्यांतच बसुनी । मागुनि झ्यां झ्यां करित निघाला ।
तट्टावरूनी भिक्षुकमेळा । गोमाशांचा थवा बैसला ।
वेदमूर्तिच्या करमणुकीला । पुढें चिमी नी बाळ्या बसला ।
हजार ठिगळें तीं पडशीला । नासिकप्रांत रंगुनि गेला ।
तपकिरीचा सुकाळ झाला । शिंका करिती ‘ जय ’ शब्दाला ।
तेणें शेंबुड रुसुनि निघाला । हृदयावरती जाउनि बसला ।
बंडीवरती चमकूं लागला । कोठें काळा, कोठें पिवळा ।
लाहिपिठाचे फ़क्के मारिती । चिमी बाळ्याला गुळपापडि ती ।
दत्तंभट्ट, शामभट्ट, गोपाळभट्ट । कृष्णंभट्ट, बाळंभट्ट, रामभट्ट ।
पुंडलिकभट्ट, नागेशभट्ट, धोंडभट्ट, । पुराणीक बापू हळदेकर ।
चतुर तान्होबा कडि अवघ्यावर । दीक्षितांची गनति कोठवर ।
अशापरीचें बर्‍हाड निघालें । चार योजनें क्षेत्र व्यापिलें ।
पाहिलें न परी असें ऐकिलें । म्हणुन गणूनें वर्णन केलें ॥१८॥
याशिवाय मांडलीक कोणकोण होते याचें वर्णन खालील कटावांत आहे:

॥ कटाव ॥
आघाडीस ती कौरव सेना । पिछाडीस ते मांडलीक जाणा ।
आमंत्रण होतें सर्वांना । अंग, वंग नी द्रविड, द्राविल ।
आंध्र, अवंती, केरल, कोसल । मद्र, भोज पार्शिका, नि मैथिल ।
मत्स्य, मलय, बंगाल नि कुंतल । लाट, मरुत, माळवा नि सिंहल
चोल, दशार्णव, गुर्जर, काश्मिर । गौड, जलंदर, कलिंग, बार्बर ।
कान्यकुब्ज, कांबोज, कामरुप । कोकण, किरात, केकय, करहट ।
महाराष्ट्र नी मागध, वराट । सिंधू, कंकण, पाण्यभोज, मळ ।
शूरसेन, सौराष्ट्र, विदेही । पांचल, पानथ, निपाळ तेही ।
अनर्त, ऋषिकादि, विदर्भहि । ऐशापरि ते भूप मिळाले ।
लक्ष्मणाच्या लग्ना आले । अंगिं कुणाच्या भरजरि शेले ।
कैकांनीं ते मुगुट घातले । साधे मंदिल कुणीं बांधिले ।
पंचहत्यारें ज्या त्यापाशीं । बाण भाते ठेवुनि रथासी ।
हात घातिला कोदंडासी । वीरासन घालून बैसले ।
कलगितुर्‍याचें तेज फ़ांकलें । कंठीं कंठे चमकुं लागले ।
बंदुक तोफ़ा नी जेजाला । भाल्यांचा तो सुकाळ झाला ।
तरवारींना पूर आला । गगनभागिं जो उडे धुराळा ।
तोच तयाचा जणुं ध्वज सजला । अशी तयारी त्या लग्नाची ।
वर्णन करितां दासगणूची । मति ती झाली कुंठित साची ॥१९॥
याप्रमाणें कौरवांचें वर्‍हाड निघालें असतां, इकडे,

॥ ओवी ॥
निज पुत्रासी घेऊन । आडामार्गें करी गमन ।
सुभद्रा ती सुलक्षण । भगिनी द्वारकाधीशाची ॥२०॥
हा आडमार्ग घटोत्कचाच्या जंगलांतून असल्यानें त्या जंगलाच्या रक्षणासाठीं मोठमोठे राक्षस होते.

N/A

References : N/A
Last Updated : August 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP