मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीजालंदरनाथ चरित्र १

श्रीजालंदरनाथ चरित्र १

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


( भाग पहिला )

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
संतान - बीज बुधहो ! कुरु - पांडवांचें ।
राजा ब्रहद्रव असें जगिं नाम ज्याचें ॥
त्यानें सशास्त्र निज पट्टणिं यज्ञ केला ।
कुंडीं तिथें सुयशसा शिशु त्या उदेला ॥१॥

॥ दिंडी ॥
नाम जालंदर त्यास ठेवियेलें ।
नाथपंथीं आचार्य पुढें झाले ॥
विपुल बल तें अंगांत असुन पाहीं ।
दंभचेष्टेचें नांव मुळिंच नाहीं ॥२॥

॥ ओवी ॥
शंकरें जो जाळिला मदन । तैं त्याचें सुंदरपण ॥
राहिलें समरस होऊन । वैश्वानराचिये ठायीं ॥३॥

॥ लावणी ॥ ( भ्यावेंस काय )
तेथिंच्या मदनसौंदर्या । घेऊन बाळ तो आला ॥
जन्मास तया कुंडीं हो । दैदीप्यमान पूतळा॥
( चाल ) ज्वालेंत पोर प्रगटले । ऋत्विज ते भ्याले । पळूं लागले ॥
बहुत दूरदूर । धरवे न कुणासी धीर ॥४॥

॥ आर्या ॥
राजा ब्रह्मद्रवानें कर पसरुनि तो कुमार  उचलीला ।
नेउन निज भार्येच्या पयपूरीतशा स्तनास लावियला ॥५॥

॥ दिंडी ॥
अला पुढतीं तारुण्य अवस्थेंत ।
मुली आल्या सांगून अतोनात ॥
परि न संमति तो देइ विवाहाला ।
हंस जो तो का सेवि थिल्लराला ? ॥६॥

॥ श्लोक ( मंदाक्रांता ) ॥
गेला गेला निघुन पुढतीं बाळ तो काननाला ।
शैलश्रृंगीं भटकत फ़िरे सेवुनी कंदमूला ॥
स्नेही त्याचे विपिनिं बनले केसरी - व्याघ्र - रीस ।
वानूं त्या मी कुठवर आतां नाथ जालंदरास ॥८॥

॥ लावणी ( भला जन्म ) ॥
प्रखर एकदां वन्हि पेटला बुधहो ! त्या काननीं ।
पळाले वनचर वन सोडुनी ॥
धुरानेम अंबर कोंदाटलें ॥
( चाल ) कडकडा ध्वनी जणु शेवटचा काढिती ॥
ते वृक्षराज निज देह महिस सांडिती ॥
परि नसे कुमारा भय त्याचें तिळरती ॥
अखेर वन्ही प्रगट जाहला निज पाडस पाहुनी ।
ढाळी आनंदाश्रु लोचनीं ॥८॥

॥ श्लोक ( पथ्वी ) ॥
त्रिपाद द्वय शीर्ष ज्या असति चार शिंगें वरी ।
जिभा नि कर मोजितां गणति होय सातां खरी ॥
कलत्र विलसे स्वधा तनु सतेज हेमापरी ।
विचित्र पुतळा असा बघुन नाथ शंका धरी ॥९॥

॥ पद ॥ ( वामना बघुनिया मना )
हा असा, मनुज तरि कसा, मला भरंवसा, मुळिं न येत ।
असावा देव, यक्ष, भूत हो ॥ कुणितरी ॥
कुणितरी, म्हणुनि यापरी, पळे दुरिं दुरिं, मागें बघत ।
जसा मृग व्याघ्रभयें पळत हो ॥ चहुंकडे ॥
चहुंकडे, बाळ भाबडें, आले बुडबुडे, मुखीं फ़ार ॥
गेले श्वासानेम सुकुन अधर हो ॥ शेवटीं ॥
शेवटीं, करुन खटपटी, धरुन हनुवटी, वन्हि वदला ।
असा कां भिशी सांग मजला रे ॥ हे मुला ॥
हे मुला, नेतों चल तुला निर्भय स्थला, जेथ ईश ।
नमन त्या करी गणूदास हो ॥ सर्वदा ॥१०॥

॥ आर्या ॥
हिमालयासी नेउन दत्त शिवा तो कुमार भेटविला ।
त्याकरिं विद्या शिकवुनि योग्यांचा तो मुकुतमणि केला ॥११॥

॥ श्लोक ( मालिनी ) ॥
हिमनगनृपद्वारीं झुंडि त्या वारणाच्या ।
क्रिडत मुदित चित्तें अंकिं गंगा ज्यासी ।
धवल चिर हिमाचें भूषवी फ़ार ज्यासी ।
श्वशुर नणपती तो शोभला शंकरासी ॥१२॥

॥ पद ॥ ( हा काय तुमचा )
असह्य शर ते सहन कराया जगता मदनाचे ।
पहा कन्येच्या अमिलाषानें वीर्य ब्रह्मयाचें ॥
( चाल ) गजकर्णीं, कीं पडलें, हिमालयीं, साच भलें ।
तेंच वीर्य मग कारण झालेम जन्मा थोरांचें ॥१३॥

॥ पद ॥ ( प्रतिकूल )
वीर्य असेंच गमतीचें कीं देव - दानवांचें ।
विधिस उमा पाहतां झाले वालखिल्य साचे ॥
दक्ष मनू वैवस्वतही याच रितीं झाला ।
नाहिं मुळिंच कारण पडलें स्त्रीचें कार्तिकाला ॥
याचपरीं द्रोणाचार्या द्रोणीं जन्म झाला ।
नृपतिला न बाधे बंधन कधिंच कायद्याचें ॥१४॥

॥ आर्या ॥
प्रबुद्ध नारायण तो आयति ही सोय बघुन संचरला ।
जणुं का पिपीलिकाकृत मातीच्या वारुळीं अही शिरला ॥१५॥
शंकर जालंदास म्हणाले,

॥ श्लोक ( स्रग्धरा ) ॥
काढी नारायणू हा गजवर - श्रवणीं लोपलेला प्रबुद्ध ।
नाथा जालंदरा रे, त्वरित अधिं करी अस्त्र प्रेरून बद्ध ॥
हें केल्यावांचुनी ती कधिं नच सुटका होय नारायणाची ।
ऐसें जालंदरासी सुरवर शिव तो हात जोडून यांची ॥१६॥

॥ सवाल ॥
आवो आवो बेटा, जलदीसे आवो बाहर छोडके हाथी ।
कवसे रहा मै देखत तेरी नहिं तोरि हथियोंकी जाती ।
अदमी अहे तो विषयोंके खातर नहिं आया दुनियामें भाई ।
दासगणु कहे कह गये ऐसा नाथ जालंदर सांई ॥१७॥

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
कर्णामधून करिच्या सुकुमार आला ।
‘ आदेश ’ बोलुन मुखें पदिं लीन झाला ॥
झालेम असे जनन ज्या गणकर्णिं साचें ।
ठेवीयलें म्हणुन कानिफ़ नांव त्याचें ॥१८॥

॥ ओवी ॥
एक संजीवनीविण । सर्व विद्या केल्या दान ॥
नाथ कानिफ़ालागुन । जालंदरानें हिमालयीं ॥

॥ लावणी ॥ ( भ्यावेंस काय )
इतुक्याच अल्पविद्येनें । कानिफ़ा सिद्ध जाहला ॥
ओहोळास माळरानींच्या । श्रावणीं पूर जणुं आला ॥
( चाल ) असंख्य शिष्य भोंवतीं, ढोल वाजती, किनार्‍या गर्जती ॥
भाव दीपाला । येरवी अभाविंच भला ॥२०॥

॥ पद ॥ मित्रा मम )
दाड सडक रुळति जटा पाठिच्यावरीं ।
अंगिं धाल विभुति असे किनरी ती करीं ॥धृ०॥
( चाल ) वैराग्यें जणुं पिनाकी तेजें भास्कर ।
अतुल शक्ति अंगीं वसे प्रति रमावर ॥
शांतिधाम जालंदर ज्ञानसागर ॥
तृणभारा आणुन उदरभरण निज करी ॥२१॥
इकडे जालंदरनाथहि हिमालयाला सोडून जगदुद्धार करण्याच्या हेतूनें परिभ्रमण करूं लागले.

॥ श्लोक ( सवाई ) ॥
अधर शिरावर मोळि मनोहर राहि निरंतर पथ क्रमितां ।
वल्कलधर गुरु जालंदर मुखिं जपत हरीचा गुणगाथा ॥
वैभवपूरित नगर सुशोभित गजबजले पथ, भीड अती ॥
दृष्टि अधर न बघेच मुळीं वर लोक करोतहि ढंग किती ॥
सद्गुरु हा प्रति कल्पतरू नच पोटभरू खल पापमती ।
त्या सद्गुरुला दासगणू करि अर्पण अपुली काव्यकृति ॥२२॥

जगत् जगत् ये खाली पुकारा मत कर मनुज दिवाने ।
सब घटपटमो नाथ भरा है, रीते न रहे कुछ खाने ॥
माया कोल्हाटन करत तमासा सुखदु:ख - ढोल बजाके ।
हरदम तुजकू ओही पिलाती घडिघडीं मृगजल - घुटके ॥
ब्रह्म सनातन तूंहि मेरे प्यारे ! कहना ये बेदस्मृतिका ।
दासगनू कहे बाबा जालंदर सूरज ज्ञाननभीका ॥२३॥

॥ ओवी ॥
त्रिलोचनाची अंगना । मैनावती सुलक्षण ॥
तया हेलापट्टणीं जाणा । माय गोपीचंदाची ॥२४॥

॥ दिंडी ॥
राजवैभव तें विपुल भोगण्यासी।
पुढें तिष्ठत सेवेस दासदासी ।
परी मैनावती सतत उदासीन ॥
म्हणे मजला दावील हरी कोण ? ॥२५॥

॥ आर्या ॥
हरिचरण - प्राप्तीस्तव येति न कामा मुळींच धनमान ।
एकचि उपाय त्याला धरणें जाऊन साधूचें चरण ॥२६॥
मासाहेबमहाराजांना साधूची आवश्यकता आहे हें कळल्यवरून त्या हेलपट्टणामध्यें एकच गर्दी उडून गेली. एक दिवस एक दासी म्हणाली, “ मासाहेब ! आज एक फ़ार चांगले महाराज आले आहेत. ”

॥ लावणी ( हटातटानें ) ॥
साधु एक अति उत्तम आला या हेलापट्टणा ।
तयाच्या किति करुं मी वर्णना ॥
ताडपत्रीं ते ग्रंथ विपुलसे मखमलिचीं वेष्टनें ।
मृगाजिन बसावयाकारणें ॥
( चाल ) तुळतुळित रेशमापरी शिरावर जटा ॥
रुद्राक्ष विराजे पौचिवजा मनगटा ॥
विभुतिचा ढळढळित भालिं सुगंधित पटा ॥
जणुं बगळ्याचा पंख जानवें पट्टीचा शाहाणा ।
ठेविती जन पुढतीं दक्षणा ॥२७॥

॥ आर्या ॥
ओठ उगे नच बसती वरखालीं आपुली करी मान ।
पौर - भटें त्या भीती वदनीं भाषा सदैव गीर्वाण ॥२८॥

॥ गज्जल ॥ ( स्वामी जंगम )
साधू ऐसा मै न चहाती, ओ भटोंका बादशहा है ॥
पढेला ओ बडा तोता, हरि उनके पास नहीं है ॥२९॥
दोनतीन दिवसांनीं दुसरी दासी सांगूं लागली

॥ पद ॥ ( येतों मी लोभ )
महाराज आले गांवासी । एक दिवशीं मंदिरासी ॥
( चाल ) अर्थ पुराणीं बहुविध करिती,
श्रोते मयुरासम कीं डुलती । गौरवून त्यासी ॥
कर्म - भक्ति - ज्ञानाचें विवरण ।
करुनी करिती परपथ - खंडण ॥ स्थ्ल न मंडणासी ॥३०॥
तें ऐकून मैनावती म्हणाली, “ हां  ! समजलें - ”

॥ गज्जल ॥ ( स्वामी जंगम )
ओ न साधू मौलवी है, ना उसीसे काम मेरा ।
मानधनकू मिलाते ओ, हरी उनका नहीं प्यारा  ॥३२॥
एक दासी म्हणाली कीं, “ बाईसाहेब ! आज महाराज फ़ारच चांगले आले आहेत. ”

॥ दिंडी ॥
उठा आतां पट्टणीं साधु एक ।
पातलासे साधुत्व अलौकीक ॥
समिप गांवाच्या वसत स्मशानासी ।
निव्वळ नंगा, ना वसन नेसण्यासी ॥३२॥
इतके ऐकल्यावर मैनावतीनें आपल्या कानांवर हात ठेवले व म्हणाली,

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
त्याचें नको मुळिंच घेउंस नांव बाई ।
नंग्यामुखें सदुपदेश मिळेल कांई ? ॥
दुर्वर्तनी खचित तो गमतें असावा ।
मद्यांतुनी कुठन पीयुषलाभ व्हावा ॥३३॥
त्यावर दासी म्हणाली, “ मासाहेब ! आतां मोठी पंचायत झाली ! आपणच श्रीशुक्राचार्यांची नेहमीं गोष्ट सांगता ना ? ते तर नेहमीं नागवेच फ़िरत होते ! ” तें ऐकून मैनावती म्हणाली, “ वेडे ! नुसता नागवा फ़िरतो म्हणून तो शुक्राचार्य होऊं शकत नाहीं. ”

॥ पद ॥ ( हें नव्हें मानवी पोर )
शुकमुनी, निबिड काननीं, रमे निशिदिनीं हा तो बसला ।
समिप गांवाच्या साधु कसला । गे भोंवतीं ॥
भोंवतीं स्त्रिया त्या अती, म्हणुन मजप्रती, सांगतेस ।
अणिक त्यालागिं साधु म्हणतेस । भोंदु तो ॥
भोंदु तो, जगा ठकवितो, सत्य लपवितो, करुन ढंगा ।
ठेवितो उपाधीस संगा । गे यावरून ॥
यावरून, विचारा करुन, नीतिपथ धरुन, असा जगतीं ।
गणूची हीच तुम्हां विनंती हो ॥ सर्वदा ॥३४॥
एक दिवस दोनतीन दासी मासाहेबमहाराजांकडे आल्या आणि त्यांना म्हणाल्या कीं,

॥ पद ॥ ( गोकुळीं बहु लीला )
अभिनव संतांचा मेळा । कंठीं तुळशीच्या माळा ।
गोपिचंदन भालासी । पताका फ़डकती स्कंधासी ।
 ( चाल ) पालखीमधें पादुका, कपाळीं बुका, एकसारखा ।
असे तो पोषाखचि ढवला । खणाखण वाजविती टाळा ॥
( चाल ) रात्रीस होत निरूपण, भजनकीर्तन, सुटत पारण ।
जयीं तो रवि ये उदयाला । गणु म्हणे चला नमुं त्याला ॥३५॥
हें ऐकल्यावर मैनावती दासीला म्हणाली,

॥ गज्जल ॥ ( मूळबंध तुज )
वो संतनके भोई बिचारे संत नहीं है ख्याल करो ।
खाना देके आगे बढा देव, उस्से जादा कुछ न करो ॥३६॥
हें ऐकल्यावर दासी म्हणाल्या, “ मासाहेब ! -

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
यांतून एकहि तुम्हाम्स कसा पटेना ।
साधू वदा मग तुम्ही म्हणणार कोणा ?
सामर्थ्य अंगिं असुनी नच दंभ दावी ।
त्याचीच साधुत सखे ! गणती करावी ॥३७॥

॥ पद ॥ ( धन्य धन्य हा दिन )
तोच म्हणावा जगिं संत ।
वस्तिंत राहून लोकाचारा । त्यचि न धरी परि हेत ॥ध्रु०॥
( चाल ) हेवा देवा नच कवणाचा ।
जो अवघ्याही मित्र जगाचा ॥
लाग न जवळीं ज्या षड्रिपूंचा । अतुल अंगिं सामर्थ्य ।
न्यायनीतिला नच दे फ़ाटा ॥
निज महतीचा अतिशय काटा ।
सद्धर्माच्या चालवी वाटा । उभा पुढें भगवंत ॥
जवळिं उपाधी नाहिं कशाची ।
आयू परहित करण्या वेंची ॥
सत्यामाजिं न भीड कुणाची । हाच जयाचा पंथ ॥
दासगणू म्हणे ऐशा संता ॥
शरण गेलिया मोक्ष ये हाता ।
त्रिताप पळतिल हां हां म्हणतां । उगे न पडाअ फ़ंदांत ॥३८॥
एक दिवस श्रीजांलंदरनाथांची स्वारी मैनावतीच्या महालाखालून चालली होती, त्यावेळीं -

॥ पद ॥ ( नृपममता )
नृपमाता मैनावती । उभि राहून प्रासादासी ।
बोलली किं निज दासीला । अवलोकीं या साधूसी ॥
( चाल ) हा साधु पोटभरु नोहे । तृणभार अधर शिरीं राहे ।
सामर्थ्य असुन ऐसें हें । फ़िरे भटकत देशोदेशीं ॥
गजबजुनी पथ जरि गेले । मन त्याचें किमपि न चळलें ।
नासाग्रदृष्टि ती धरिली । नयनाचें न पातें हालें ॥
( चाल ) तपतेज अंगीं माईना । देहींच विदेही बघ ना ।
हा सर्व साधुंचा राणा । नि:संशय तारिल मजसी ॥३९॥

॥ आर्या ॥
दिनचर्या बघ याची मागें मागें फ़िरून गुप्तपणें ।
भार्‍याचें काय करी, वसत कुठें, काय खातसें खाणें ॥४०॥
त्याप्रमाणें दासी मागोमाग गेली व सर्व प्रकारें शोध करून मैनावतीस सांगूं लागली कीं,

॥ पद ॥ ( इच्छिसी जरी )
अति कुश्चल जागेवरतिं आसन तें त्याचें ।
येत ना कधीं मानवा तिथें जाण्याचें ॥
धेनूस बघुनिया सोडून दे तृणभारा ।
राहून मागतो करतल भिक्षा द्वारां ॥
( चाल ) राहत्या स्थलीं घाणीचें नांव ना ॥
ती भानामति वा त्याचें बळ म्हणा ॥
यांतील उमज मज बाई होईना ॥
तो असुन उकिरडा नंदनवन इंद्राचें ।
गणु म्हणे किती या वानुं बला संताचें ॥४१॥

॥ श्लोक ॥ ( वसंत तिलक )
ऐकूनिया वचन हें नृपमाय धाली ।
पर्यंक तो त्यजुनि खालतिं शीघ्र आली ॥
जानूंस टेकुन तिनें कर जोडुनिया ।
केला प्रणाम सुमनें गुरुराजराया ॥४२॥

॥ दिंडी ॥
रजनि वाटे तमरूप असें ल्याली ।
शहरिं अवध्या त्या सामसूम झाली ॥
अशा वेळीं ती सुयश राजमाता ।
निघालीसे भेटण्या गुरूनाथा ॥४३॥
मैनावतीनें पुढें कांहीं फ़ळें ठेवून श्रीजालंदराच्या पायांवर डोके ठेवलें. त्या स्पर्शासरसे नाथ खडबडून उठून बसले; व अशा रात्रीं एक स्त्री येथें येऊन आपल्या पायां पडत आहे तें पाहून त्यांना फ़ार संताप आला व ते रागानें म्हणाले -

॥ पद ॥ ( शिवदर्शन )
तूं कौन किसीकी बोल ॥ध्रु०॥
निशा - समयमें क्यौ यहा आयी ।
घुंगटका पटा खोल ॥
( चाल ) तोरे चलनसे तूं व्यभिचारन ।
विषयदरीकी भयप्रद नागन ।
अनिति - अटविकी वा बडि वाघन ॥
तुज न नीतिका मोल ॥४५॥
यावर मैनावतीनें न रागावतां शांतपणानें ऐकून उत्तर केलें कीं,

॥ श्लोक ॥ ( शार्दूल विक्रीडित )
आहें मी कशि कोण हें सकल कीं तुम्ही मनीं जाणतां ।
ऐसें आसुन दासिला गुरुवरा, कां दोष हे लावितां ? ॥
आलें रात्रिस एवढाच घडला मंतू करें या खरा ।
आल्यानें अपराध होय कधिं का कन्या पित्याचे घरा ? ॥४६॥
हें ऐकून श्रीजालंदरनाथांनीं क्रोधाचें अवसान आणून बोलण्याला आरंभ केला.

॥ झंपा ॥
निकल जाव ! बदमाष लवंडी, यहांसे ।
औरतोंसे नहीं काम हमसे ॥ध्रु०॥
जिन कृतीमें नहीं ओहि पढते सबक ।
नीतिका हरघडीं अपने मूसे ॥
जहां न पानी बहे वहांहि मृगजल रहे ।
जानता ये भि मै अच्छी  तर्‍होंसे ॥४७॥
असें म्हटल्यावर मैनावती म्हणते,

॥ लावणी ॥
मी काय जगाच्या बाहेर म्हणुनी मजला दुर लोटितां ।
चिन्मयवस्तू जगांत भरली म्हणुन आपण सांगतां ॥
भय वाताचें पादपास कीं, मुळिंच नभाला नसे ।
चालिरितीची, व्यवहाराची जरुर साधका असे ॥४८॥

॥ ओवी ॥
मैनावती महाचतुर । नाथास केलें निरुत्तर ॥
पुढें तिचा पहण्या धीर । नाथ धोंडे फ़ेंकिती ॥४९॥

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
आलें जरी मरण तें मज या ठिकाणीं ।
मानीन धन्य परि ना परतें इथूनी ॥
माता मुलास भिववी परि तें न दूर ।
होई तसें करिन मी समजा अखेर ॥५०॥
त्यावर श्रीजालंदरनाथ म्हणाले,

॥ सवाल ॥
तेरे - हमारेमें बहुत फ़रक है, भयि तूं तो राजाकी माता ।
पेटके खातर बस्तीमें आके घरघर भीक मै मंगता ॥
राजा इंदरका ऐरावर कहां, बमनोका त्ट्टू जरासा ।
दासगनू कहे, कहां रहा गन्ना, कहां रहा एरंड - धमासा ॥५१॥
तें ऐकून मैनावती म्हणाली,

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
छे छे ! नसे मुळिंच या म्हणण्यांत सार ।
भिक्षापती शिव परी नमितो कुबेर ॥
भासे परीस बहु क्षुल्लक एक धोंडा ।
भांगर तोच करि कीं परि लोहदंडा ॥५२॥

॥ ओवी ॥
पहाण्या तिचा सद्भाव । कौतुक केलें अभिनव ॥
झोपीं गेला योगीराव । शिर ठेवून अंकीं तिच्या ॥५३॥

॥ दिंडी ॥
एक होउन उत्पन्न भ्रमर तेथें ।
छिद्र अंका लागला पाडण्यातें ॥
परि किमपी ती अंक हालवीना ।
अशुद्धाचा चालला पाट जाणा ॥५४॥

॥ श्लोक ॥
छिद्र पडलें आरपार । तयीं जागे झाले जालंदर ॥
मैनावतीचें पाहुन न रुधिर । मनीं संतोष पावले ॥५५॥

॥ श्लोक ॥ ( मालिनी )
अजर अमर काया मीं तुझी साच केली ।
वदुन विभुत ऐसें लाविली अंकिं भालीं ॥
वरद कर शिरीं तो ठेवितां नाथ तीचे ।
सुरवर नभिं गाती भाग्य मैनावतीचें ॥५६॥

॥ गज्जल ॥
नजर क्या आवे अब कहो बच्ची । देखके अपने आखोंसे ॥
मैनावती कहे कह नही जाता । अब कुछ मेरेकु मूसे ॥
जहा देखूं वहा आपही भरे हो । दुनिया नजर नही आती ॥
मैभी जुदी नही वहीस्वरूपसे । गनु कहे गयि सब भ्रान्ति ॥५७॥

N/A

References : N/A
Last Updated : August 13, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP