मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीज्ञानेश्वरमहाराजांचें चरित्र २

श्रीज्ञानेश्वरमहाराजांचें चरित्र २

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


( भाग दुसरा )

॥ श्लोक ( पथ्वी ) ॥
जयांनिं प्रवरा तिरीं निधिनिवास क्षेत्रांतरीं ।
सुबोध रचिला असे सुलभ ग्रंथ ज्ञानेश्वरी ॥
गितेवरति ग्रंथ यासम न प्राकृतीं दूसरा ।
असो नमन हेम तया विबुधश्रेष्ठ ज्ञानेश्वरा ॥१॥

॥ पद ॥ ( पोर नच थोर खचित )
शाम्त सकल प्रवरा तिर । उदयाचलिं ये दिनकर ।
कुक्कटरव मधुर मधुर । होऊं लागला ॥ध्रु०॥
मंद मंद वायु वहात । तम लपला कंदरींत ॥
पश्चिमेस तेजरहित, इंदु जाहला ॥शांत०॥२॥

॥ ओवी ॥
अशा त्या सुप्रभातीं । ज्ञानेश्वरांची बालमूर्ति ।
वृक्षातळीं बैसली होती । निजानंदी डोलत ॥३॥

॥ दिंडी ॥
नांव होतें सच्चिदानंद ज्याला । असा कुलकर्णी एक मरुन गेला ।
लोक आले घेऊन प्रेत त्याचें । दहन करण्याला नदीतटां साचें ॥४॥

॥ ओवी ॥
तै सच्चिदानंद जाया । आली सहगमन करावया ।
स्वकीयांचा मोह त्यजूनियां । पातिव्रत्य धर्मानें ॥५॥

॥ ओवी ॥ ( जात्यावरील )
करीं भरला हिरवा चुडा । जाळीदांडा डोक्यावरी ॥
भरला कुंकवाचा मळवट । ल्याली काजळ नेत्रांतरीं ॥६॥
त्या वेळीं तिची पांच वर्षांची मुलगी आपली आई नवें लुगडें नेसली आहे तें पाहून म्हणते -

॥ ओवी ॥ ( जात्यावरील )
तूं ल्यालिस लुगलें नवें । दे पलकल चोली मला ।
ने आपुल्या ग बलोबली । मी नाहीं सोलित तुला ॥७॥
असा त्या लहान मुलीचा हट्ट पाहून आई सांगते.

॥ पद ॥ ( पाळण्याप्रमाणें )
ही नाहिं मुली वेळ तुला नेण्याची । मम भेट समज शेवटची ।ध्रु०॥
( चाल ) रहा घरेंच आनंदानें । बंधुच्या सर्वें । प्रेमानें ।
असें म्हणुन स्वकिय हस्तनों । मिठि सोडविली कष्टानें कमरेची ॥
गणु बोले निजकन्येची ॥८॥

॥ आर्या ॥
मंत्राग्निची तयारी होऊन प्रेतास घातलें स्नान ।
तयिं त्या सन्निध आले ज्ञानेश्वर ज्ञानसिंधु भगवान ॥९॥
सती नमस्कार करून म्हणाली -

॥ श्लोक ( वसंत तिलका ) ॥
तूं कश्यपात्मज दुजा मज वाटतोस ।
लज्जीत हें करिल तेज तुझें रवीस ॥
पायां तुझ्या शरण मी गुरुराजराया ॥
धैर्यास दे पतिसवें सरणीं जळाया ॥१०॥

॥ पद ॥ ( हा काय तुमचा )
नांव सच्चिदानंद असोनी म्हणतां या मेला ।
खरा ऊस जो तो कां प्रसवे कधिं तरि लवणाला ॥
( चाल ) सूर्यानीं निज सदनीं, उजळोनी, प्रेमांनीं ॥
दीप ठेविले हेम कां वाटे खरें कुणा बोला ॥११॥
हें ज्ञानेश्वरांचें म्हणणें ऐकून लोक अपसांत बोलूं लागले कीं -

॥ पद ॥ ( नृप ममता रामा. )
एकदा मरुनि जो गेला । तो नाहिं मागुति उठला ॥ आज वरी ।
( चाल ) - अल्लड दिसत हें पोर, यास व्यवहार कळे न साचार ॥
होत उशीर; क्रियाकर्माला ।
माना न याचिया बोला ॥ विबुधहो ॥१२॥

॥ आर्या ॥
काय कसा कवणचा आहे अधिकार हें कळणार ।
चढल्या ऐरणि वरती सहजचि ये कळुनि तो हिरा गार ॥१३॥

॥ पद ॥ ( प्रकट झणीं माधवा ) ॥
महासाध्वी सती सावित्री आली घेऊन ।
आपुला पहा मृतपती यमापासून ॥
यासाठिं तुम्हि अवघ्यांनीं सवस्थ कीं रहावें ।
हा काय करित प्रेतास बसुनियां पहावें ॥१४॥
श्रीज्ञानेश्वर प्रेताजवळ आले व म्हणाले,

॥ आर्या ॥
ऊठ सच्चिदानंदा या टाकुन शीघ्र घोर निद्रेस ॥
वेदा करी न खोटें ठायीं नच संभवे तुझ्या नाश ॥१५॥
असें म्हणून प्रवरेचें पाणी हातांत घेतलें, आणि -

॥ दिंडी ॥
करुनि अभिमंत्रित उदक शिंपियेलें ।
तया प्रेतां तयिं तेंच सजिव झालें ॥
उठुनि बसला कुलकर्णी हर्ष लोकां ।
कुटिल बसले तयिं अधोवदन देखा ॥१६॥
कुळकर्णी उठून बसला हें पाहून कांहीं भाविक माणसें म्हणूं लागली -

॥ पद ॥ ( शारदे दास काम दे )
हें नव्हें मानवी पोर । केवढा थोर । आहे अधिकार । काय बघतां ॥
चला या ठेउं पदीं माथा हो ॥ या पुढें ॥
या पुढें, अमृत बापुडें, खचित फ़िकें पडें ॥ धन्य धन्य ॥
आहे या योगि देवमान्य हो ॥ कुणी तरी ॥
कुणी तरी, फ़िरुन भूवरी, आला श्रीहरी धरुनि वेष ॥
नमन त्या करी गणु दास हो सर्वदा ॥१७॥

॥ ओवी ॥
ज्ञानेश्वरातें पाहून । सच्चिदानंदें केलें नमन ॥
स्वामी कां हो परतून । उठविलें मजलागीं ॥१८॥

॥ लावणी ॥ ( सर्वांग सुबक सुंदरा )
कांतेचि तुम्ही प्रार्थना । आणुनिया मना । मजला सजीव केले जरी ॥
परी ना गोष्ट हि झाली बरी ॥
( चाल ) संसार नहें हा आहे दु:खाची खनी ॥
त्यामध्यें मला कां दिलें पुन्हां लोटुनी ॥
होईन कसा या मुक्त भवापासुनी ॥
देहास असे लागला । आज आपुला कर जो परिस दुजा भूवरी ॥
कां न तो कांचन मजला करी ॥१९॥
तें ऐकून श्रीज्ञानेश्वर हंसले व त्याकडे पहात स्वस्थ बसले. इतक्यांत -

॥ कटाव ॥
तैल बिंदु पाण्यामधिं पडतां । जसा पसरतो हां हां म्हणतां ।
तया परी ही अभिनव वार्ता । पौरवासियां प्रति श्रुत झाली ।
बहुत मंडळी धावूं लागली । शुद्धि कुणाला कांहीं न उरली ।
उघडि दुकानेम भर बाजारीं । वणिज निघाले ठेवुन सारीं ।
सैरावैरा धांवति नारी । वर्णन करणें त्याचे कुठवरी ।
शिशूऐवजी आठवें घेतलें । कडेस आपुल्या भान न उरले ।
डोळ्यांमाजीं कुंकु घातलें । त्याच्या स्थानीं काजळ गेलें ।
अर्धें लुगडें कुणी नेसल्या । तशाच पंथीं धावुं लागल्या ।
कुणी घातल्या उलट्या चोळ्या । कुणी कुनी शौचास निघाले ।
तांब्या ऐवजि कंदील धरले । छत्री घेउन चालु लागले ।
खालिं सोंवळें वर पागोटीं । अशी उडाली गडाबड मोठी ।
श्रीज्ञानेश्वर पाहाण्यासाठीं । झाली दाटी प्रवराकांठीं ।
लुटलुट पळती शास्त्री पंडित । तपकितीचे झुरके ओढित ।
वस्त्र जयाचें पंथा झाडित । ऐसे पोकळ ते कासोटे ।
अतूर झाले फ़ार मराठे । साळी माळी तेलि तांबोळी ।
धोबी वारिक भिल्ल रामोशी । धनगर सनगर जिनगर आले ।
ग्रामामाजीं कुणी न राहिले । अठरा वर्णहि सादर झाले ।
महार मांगहि त्यांत मिळाले । दास गणु म्हणे सत्पुरुषाची ॥
सत्ता ऐशी अगाध साची ॥ कोण बरोबरि करील तयाची ! ॥२०॥
अशा प्रकारें गांवांतून लोकांच्या झुंडीच्या झुंडी धांवत येऊं लागल्या.

॥ श्लोक ॥
ज्ञानेश्वराच्या वरती फ़ुलांचा ॥ वर्षाव झाल अगणीत साचा ।
तेथे गुलालें बहु मात केली । सारी नदी लालचि लाल झाली ॥२१॥
श्रीज्ञानेश्वरापुढें

॥ पद ॥ ( आहे त्याची मला )
नक्षत्रसंघ समुदाय भवतिं बैसला ।
ज्ञानेश तया माझारीं । रोहिणीरमण शोभला ॥
भजनास राहिले उभे । कितिक त्यापुढें ॥
पाण्यांत कुंकु घालून बायका घालिती सडे ॥
( चाल ) नौबती झडति दणदणा । टाळ खणखणा । झांज झणझणा ।
सनया सूर ॥ नादानें भरलें अंबर ॥२२॥
या प्रमाणें इकडे सर्व लोक आनंदांत होते, पण सच्चिदानंदबाबांच्या मुखावर उदासीनता दिसत होती. तें पाहून ज्ञानेश्वर म्हणाले, वेड्या -

॥ पद ॥ ( त्रिकाल कानडा )
जीवविलें जें आज मि तुजला । तें नच वेड्या भविं बुडण्याला ॥ध्रु०॥
गीता रचिली जी व्यासानें ॥ तिला कराया प्राकृत येणें ॥
झाले आहे मदीय येणें । तयार हो तूं ती लिहिण्याला ॥जीव० ॥२३॥
या लिहिण्यानें तुझा उद्धारच होणार आहे. चला आतां आपण प्रभूकडे जाऊं.

॥ झंपा ॥
( चाल ) आतां पुढें मोहिनीशाकडे ।
नमुन त्या सांकडे घालुं अपुले ॥ध्रु०॥
वरदपानी शिरीं त्यांनिं धरिल्यावरी ।
सहज झालें दुरीं कठिण सगळें ॥
शोधुं भगवद्गिता करिं न चिंता वृथा ।
पत्र घेई हातां हेंचि उरलें ।
वदुनि ऐशापरीं गेले ग्रामांतरीं ।
दास गणु त्या करी नमन पहिलें ॥२४॥

॥ दिंडी ॥
प्रभातीं जो समुदाय रडत आला । तोच माध्यान्हीं हंसत परत गेला ।
संतसंगे होणार काय नाहीं । ऋणी ज्याची सर्वदा विठाबाई ॥२५॥
गांवांत येऊन ज्ञानेश्वर व सच्चिदानंद असे मोहिनीराजाच्या दर्शनास गेले असतां देव म्हणाले,

॥ श्लोक ॥
बापा तूं स्वयमेव ब्रह्म तुजला अशक्य कांहीं नसे ।
आणाया निजठायिं गोडि इतरां कां ऊंस प्रार्थीतसे ॥
सूर्याला तम सांग काय भिववी वा विघ्न मोरेश्वरा
जा आतां करणें आरंभ लिहिण्या गीतेस ज्ञानेश्वरा ॥२६॥
विश्वेश्वरमहादेवाचे देवळांत भावार्थदीपिका लिहिण्यास आरंभ झाला.

॥ पद ॥ ( अरसिक किती हा )
महती ज्ञानेश्वरीची ॥ प्राकृतग्रंथीं अनुपम साची ॥ध्रु०॥
रत्नें शब्दाब्धीचीं ॥ वेचुन रचना केली जियेची ।
उपमा उपमा उपमेयाची ॥ गर्दी ज्याला गोडी सुधेची
आठवण करवित साची ॥ शुचिपण ज्याचें गोदावरीची
वाणी दासगणूची ॥ कुंठित झाली गति शब्दांची ॥ महती ॥२७॥

॥ आर्या ॥
अमृत अमर करी परि ज्ञानेश्वरी करित त्यावरी ताण ।
पावन करून सकलां ब्रह्मस्थितिमाजि डोलवी जाण ॥२८॥

॥ श्लोक ॥
वाराह विन्मुख सदा मलयानिलासीं ।
ना कावळे कधिंहि मानिति मानसासी ॥
निंदीत नित्य बसती घुबडें रवीला ।
ज्ञानेश्वरी न पटणार तशी खलाला ॥२९॥

॥ पद ॥ ( प्रगटला कीं तेथें तेव्हां )
सधळ पुण्य ज्याचें बुधहो, तोच हिला वाची ॥
कळुन येत किंमत हंसा - लागिं मानसाची ॥ढ्रु०॥
करुन यत्न मृग तो सेवी मलय मारुताला ॥
मुदित मनीं करविल साचें, रत्न पारख्याला ॥
भ्रमर तेच सेवन करिती, पुष्परागाला
ग्रंथ हा न कादंबरि हो, चित्तरंजनाची ॥सबळ ॥३०॥

॥ ओवी ॥
तेथून आले आळंदीस । श्रीज्ञानेशर पुण्यपुरुष ॥
दिपवाळीच्या सणास । काय घडलें तें ऐका ॥३१॥

॥ आर्या ॥
आज दिवाळी मुक्ते बंधू आम्ही तुझे तिघे येथ ॥
मांडे रुचिर करावे सेवन करूं त्या अम्ही अनंदांत ॥३२॥
हें ऐकून मुक्ताबाईला फ़ार आनंद झाला.

॥ दिंडी॥
करून मांड्याच्या सर्व तयारीला । गेलि मुक्ता खापर आणण्याला ॥
पथामाजीं भेटला विसू चाटी । द्वेष होता याविषयिं तया पोटीं ॥३३॥
विसोबा म्हणाला:-

॥ ओवी ॥ - ( जात्यावरील )
कुठे जातीस गे कारटे । अपशकून करुनी मला ॥
तुम्हि संन्याशाचीं मुलें । आहां लांछन अपुल्या कुळां ॥३४॥
हातांत रिकामें मडकें व तूं संन्याशाची पोरगी, चांगला शकून केलास !

॥ श्लोक ( स्रग्धरा ) ॥
काठी घालून क्रोधें करघृत तिचिया फ़ोडिलें खापराला ।
मुखें याएं न तूं की परत पुनरपी जान माझ्या अळीला ।
आल्य घेईन प्राणा - चिरडुन नरडें ! यांत संदेह नाहीं ।
मारावें पातक्याला अहिखल - कपट्या पाप ना यांत कांहीं ॥३५॥
मुक्ताबाई मोठ्या विनयानें म्हणाल्या,

॥ पद ॥ ( स्वार्थी जी प्रीति. )
बापा s s s s s, करिं न ऐशा ह्या अनितिला ॥ध्रु०॥
बंधू माझे सदनीं उपोषित, काय कथूं तुजला ॥बाप०॥
आज दिवाळी मांडे घालुं दे, भाजुन मज त्याला ॥बापा०॥
कर्ममार्गरत तूं महासज्जन । उचित न हें तुजला ॥बापा०॥
दासगणू म्हणे निवडुंगाला । कांटे न शेवतिला ॥बापा०॥३६॥

॥ पद ॥ ( हा हत दैवा. )
मी दुर्दैवी खचित जगतिं अवतरलें । हें आज कळुनिया चुकलें ॥ध्रु०॥
( चाल ) तो चाटि नव्हे स्वयमेव ।
अवतरलें मदिय दुर्दैव ॥ ना कुठें राहिला वाव ॥
जाया मज ऐसें जाहलें ॥ मी दुर्दैवी०॥३७॥

॥ आर्या ॥
मागोमाग तियेच्या आलासे लपत लपत तो चाटी ।
काय पुढें करिते ही बघण्याची आस लागली मोठी ॥३८॥
इकडे ज्ञानेश्वरमहाराज मुक्ताबाईस म्हणाले,

पद ॥ ( होई विजयी हा रंभे ) ॥
असें रुदन आतां करुं नकोस बाई ॥ध्रु०॥
येथें कमी काय । शोध करुनि पाह्य ॥
आतां तूं न मुळिंच जाय । त्या किं कुलाल गेहीं ॥असें०॥३९॥

॥ श्लोक ( चामर ) ॥
योगशास्त्र येत ऐस स्वस्थ चित्त येधवां ।
रांधणाचि ना जरूर सिद्ध पाठिचा तवा ॥
मी करून देत तूज आण पीठ लौकरी ।
भाज सर्व मांडियास शोक ना वृथा करी ॥४०॥

॥ दिंडी ॥
वन्हि जठरींचा प्रकट असे केला । मुखावटे चालल्या थोर ज्वाळा ॥
तव्यासम ती तापून पाठ गेली । बघुन चाटी घालीत मान खाली ॥४१॥
हें पाहून विसोबा चाटी फ़ारच थिजला व आपल्याशींच म्हणाला,

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
किती अधम मी हिरा असुन गार या मानिली ।
असून सुरभी तिला इतर धेनुशीम मोजिली ॥
असेम जगतिं एक हा पदनतास चिंतामणी ।
समर्थ बहु दैवतें परि कमीच कीं याहुनि ॥४२॥
इतक्यांत ज्ञानेश्वरमहाराज विसोबास पाहून म्हणाले,

॥ पद ॥
या, या, या, भीति अवधी टाकुन या ॥ध्रु०॥
उच्च नीच हा भाव त्यजावा । चिन्मय वस्तू एकचिया ॥
त्रिभुवनासी व्यापुनी उरली । कां हो भटकतां उगे वांया ॥या०॥
शत्रु - मित्र ही खोटि भावना । करून सज्जना कां घेशी ॥
मृगजळ डोहीं घेउन भोपळा । उगीच तराया कां जासी ? ॥या०॥४३॥
विसोबा चाटी ज्ञानेश्वर महाराजांस शरण गेला व झालेल्या अपराधाची क्षमा मागूं लागला.
॥ आर्या ॥
कृपाकटाक्षें पाहतां झाला चाटी क्षणामधें ज्ञानी ।
लोहा परीस मिळतां लोहचि बैसे सुवर्ण होउनी ॥४४॥
आतां इकडे तापीच्या कांठीं असलेल्या चांगदेवास या ज्ञानेश्वराच्या गोष्टी ऐकून फ़ार आश्चर्य वाटलें व असा अधिकारी पुरुष प्रत्यक्ष डोळ्यांनीं व्हावा असा विचार करून -

॥ पद ॥
सावध शहाणा योगी पुराणा, संत चांगया ॥ध्रु०॥
( चाल ) सत्त्व पहावया । येत बसुनियां ॥
वाघाचे वरती वासुकी, हातीं, भीति ना जया ॥सावध०४५॥
अशा प्रकारें चांगदेव ज्ञानेश्वरास भेटण्यास निघालेले पाहून त्यांची शिष्यमंडळी हात जोडून म्हणाली कीं, महाराज !

॥ पद ( लावणी ) ॥
अधिकारि नसे त्रिभुवनी तुम्हांसारिखा ।
असें असुनि उगे कां जातां, भेटण्या तया बालका ॥ध्रु०॥
गंगेनें काय कूपाचा आदर ठेवणें ।
मृगपती केसरीनें कां, कोल्ह्यास देव मानणें ॥
( चाल ) बोलणें जगीं टोणगा । खरें ना बघा । आहे हा उग्गा ।
हाट खोट्याचा । गणु म्हणे बुवाबाजिचा ॥४६॥
अशा प्रकारचें भाषण ऐकून चांगदेव अहंकारवश झाला; पण चित्ताची रुखरुख कमी होईना म्हणून ज्ञानेश्वरास पत्र लिहिण्याचें ठरविलें व एक कागद घेऊन बसला.

॥ श्लोक ॥
लेखूं चिरंजिव जरी लिखितीं तयाला ॥
त्यानें सभेंत अणुनी पशु बोलवीला ।
तीर्थस्वरूप लिहितां नच ये तयासी ॥
चौदा शतें उलटलीं मम या वयासी ॥४७॥

॥ दिंडी ॥
बघु आतां चातुर्य काय त्याचें । सिधोपंताच्या तरी नातवाचें ।
असें म्हणुनी कोराच पाठवीला । एक कागद घालून लखोट्याला ॥४८॥
चांगदेवानें शिष्यास श्रीज्ञानेश्वरांची नीट चौकशी करण्यास सांगितलें,

॥ पद ॥ ( दिसली पुनरपि गुप्त )
कोणां भजती कोठें राहाती, उदर कशावर ते भरती ॥
शेती अथवा देणें घेणें, वा किमयेला ते करिती ॥ध्रु०॥
अथवा बांधुन मठमठि ग्रामीं, शिष्य शिष्यणी भोंदीती ॥
दासगणू म्हणे शोध करावा, प्रत्येकानें याच रितीं ॥४९॥

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
चौदा शतें जगुनियां जगतीतलाला ।
कोराच कागद कसा तरि पाठविला ॥
या या कथा कुशल तें झणिं चांगयाचें ।
तापीतटस्थ तुमच्या मजला गुरूचें ॥५०॥
निवृत्तिनाथ म्हणाले, ज्ञानेश्वरा, यांत कांहीं वावगें झालें नाहीं.

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
तपा करुनि तापिच्या तटिं निवास केला जरी ।
अजून बघ राहिला करकरीत कोरा परी ॥
महंतिमधिं गर्क तो मुळिच ब्रह्म जाणेचिना ।
कृपा करुन त्या लिही सकल जाणिवेच्या खुणा ॥५१॥

॥ दिंडी ॥
पुस्ति लिहिण्या कोराच वर्ख लागे ।
आलें माझ्या हें घडून मनाजोगें ॥
तत्त्वमसिची काढून पुस्ति दावा ।
तसा कागद हा संग्रहास ठेवा ॥५२॥
अशी आज्ञा होतांच श्रीज्ञानेश्वर महाराजांनीं तो कागद घेतला.

॥ पद ॥ ( वसंत बघुनि मेन० )
लिहिली पासष्टी त्याला । गुर्वाज्ञेनें तत्वमसीचा बोध असे केला ॥ध्रु०॥
नको या भुलुं सिद्धाईला । या सटवीनें आजवरी तव घात असे केला ॥
( चाल ) जगणें हा नच पुरुषार्थ ॥ विचारें आण तूं ध्यानांत ॥
म्हणुनी लिहिलें तुला लिखित ।
सेविल्या या अध्यात्माला ॥
दासगणु म्हणे जन्म नराचा, सहज सफ़ल झाला ॥५३॥

॥ आर्या ॥
वाचिलि पासष्टी परि होईना बोध चांगदेवाला ।
प्रत्यक्ष भेटण्याचा सत्वर त्यांनीं विचार ठरवीला ॥५४॥
याप्रमाणें भेट घेण्याचा विचार ठरवून चांगदेव निघाले.

॥ कटिबंध ॥
केलासे वाहन केसरी, वासुकी करीं, भृकुटिभीतरीं  रक्तशिंदूर ।
मोकळ्या जटा सोडिल्या पाटिच्या वर ॥
सर्वांग असें माखिलें, विभुतिनें भलें, गंध लाविलें कपाळावर ।
भासते जणूं प्राचीस इंदुची कोर ॥
( चाल ) सर्पाचा कटीं करगोटा वळवळे ।
हलतात कर्णिं । नागाचीं कुंडलें ।
अगणीत शिष्य सांगाती चालले ।
किति वानुं तेथिला थाट, गर्दि आटोकाट, मिळेना वाट ।
पथानें कवणा । कसीबसी मिळाली दासगणूच्या कवना ॥५५॥
याप्रमाणें थाटानें चांगदेव आळंदीस जाण्याकरितां निघाले.

॥ पद ॥ ( भजन )
जय जय चांगदेव महाराज । जयजय योगिराज महाराज ॥ध्रु०॥
शेर सर्प ये चुव्वे बनगये । सिद्धनके शिरताज ।
प्रभूकंठके ताईत बिलकून पुरण करे दिनकाज ॥जय०॥
ढोलक डिमरी डमरु बजत है, तर्‍होतर्‍होंके बाज ।
दासगणू कहे मिलो चरणसे, वहि राखेंगे । लाज ॥ जयजय०॥५६॥

॥ आर्या ॥
चवदा हजार होते सांगते शिष्य चांगदेवाचे ।
अस्सल जागा पटेना कौतुक होई जगांत नकलेचें ॥५७॥
चांगदेवाचे कांहीं शिष्य गांवांत ज्ञानेश्वराकडे आले व म्हणाले,

॥ श्लोक ( इंद्रवज्रा ) ॥
कांहीं तयारी तुमची दिसेना । सन्निध आले गुरुराज जाणा ।
वाघावरी बैसुनियां लिलेनें ॥ आणा तया जाउनि आदारानें ॥५८॥
त्या वेळीं -

॥ ओवी ॥
निवृत्ती ज्ञानेश सोपान । मुक्ता ऐसे चौघे जण ।
करावया मुखमार्जन । बैसले होते भिंतीवरी ॥५९॥
ज्ञानेश्वर म्हणाले,

॥ पद ॥
चल बाइ पळत तूं हे भिंती । हे भिंती तूं त्वरित गती ॥ध्रु०॥
( चाल ) वाघ तयानें दिनवत केला । मीहि सचेतन ॥
करिन जडाला । या पडक्याशा भिंताडाला ।
दासगणु । त्या गावो गीतीं ॥ चल बाइ० ॥६०॥
कारण असें झाल्याखेरीज चांगदेवाच्या ठिकाणीं वाढलेल्या अभिमानाचा नाश होणार नाहीं.

॥ श्लोक ( मालिनी ) ॥
चपल हय जसा तो त्यापरी भिंत चाले ।
कवतुक बघण्या तें देव व्योमीं मिळाले ।
पवन वरुण वन्ही इंद्र धाता महेश ॥
सुरगुरु शशि तैसा आर्यमा नी धनेश ॥६१॥

॥ श्लोक ॥
या चांगदेव करि वंदन चौकडीसी ।
आतां कृतार्थ करणें । मज पुण्यराशी ।
सिद्धाइला दिली रजा आजपासुनीयां ॥
लोटा न या पदनतां परतें बुडाया ॥६२॥

 पद - ( दीनदयाळा. )
हेंच मिळविलें काय चांगया, आचरुन तप दुर्धर ।
काढिलास कीं मूषक हा तूं कोरुनिया डोंगर ॥
तत्त्वमसीचा विचार करणें हें सारुनीयां दूर ।
दगडहि बनतो देव गणु म्हणे, शिरिं धारिल्या शेंदुर ॥हेंच०॥६३॥

॥ पद ॥ ( हो प्रगट झणीं. )
निवृत्तिनाथ आज्ञेनें विशद त्या केली ।
पासष्टि चांगदेवास आळंदिंत वाहिली ।
जाहल्या भेट सूर्याचि टिके कोठून ।
अंधार होत स्वयमेव प्रकाशचि पूर्ण ॥
साक्षात् ब्रह्म परमेश परात्परमूर्ति ।
गणू दास म्हणे ज्ञानेश एक या जगतीं ॥६४॥

॥ पद ॥ ( प्रार्थना )
( त्याजि भक्तासाठीं लाज० )
जय सच्चिद्घन सुखधाम । अविनाश पदाप्रती न्यावें ।
तव माया दुर्धर साची । उपजवी प्रीति खोट्याची ।
जाणीव झांकि सत्याची । मन विषय सुखाकडे धांवे ।
मी शिव असून जिव झालों । या मृगजलडोहिं बुडालों ।
तुजवांचुन वायां गेलों । गणु म्हणे कितिक सांगावें ॥जय०॥६५॥

N/A

References : N/A
Last Updated : August 13, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP