मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीमत्स्येंद्रनाथ चरित्र १

श्रीमत्स्येंद्रनाथ चरित्र १

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ आर्या ॥
कवि नारायण आले महिवरि मत्स्योदरांत जन्मला ।
मत्स्येंद्रनाथ नामें परिस बुधहो ! तदीय चरिताला ॥१॥

॥ दिंडी ॥
सप्तश्रृंगीं अंबिकाप्रसादानें ।
केलि साबरि निर्माण मच्छेंद्रानें ॥
किती वानूं त्या प्रभाव साबरीचा ।
होय सोनें कीं पहाड - प्रस्तराचा ॥२॥

॥ ओवी ॥
योगविद्या संजीवनी । अवगत नाथालागुनी ।
अध्यात्मविद्येचा मुगुटमणी । बैसला मत्स्येंद्र होवोनिया ॥३॥

॥ दिंडी ॥
सर्व विद्या शिकवून गोरखास ।
नाथ आले कीं श्रृंग - मुरूडास ॥
असें अवधें तें राज्य कीं स्त्रियांचें ।
तिथें आल्यावर पुरुष कधि न वांचे ॥४॥

॥ कटिबंध ॥
तेथचि असे स्वामिनी, कीं मैनाकिनी, जात पद्मिनी, अभिनव । बाला ।
श्रृंगाररूप मेघाचि विराजे चपला ॥
परि तिथें पुरुष ना कुणी, सकल कामिनी, अशा त्या स्थानिं । नाथ ते आले ।
करितात काय हनुमंत भिडेला पडले ।
( चाल ) सेविती विषय - भोगाला वरिवरी ।
ज्यामुळें जाहली निंदा जगभरी ।
सावध परी बहु होते अंतरीं ।
श्रृंगाररूप चिखलांत, मछिंदरनाथ, हिरा साक्षात, लोपुनी गेला ।
परिणाम भिडेचा बरा कधिं न जगिं झाला ॥५॥

॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
जेथें भीड तिथेंच स्वार्थ समजा आहेच कांहींतरी ।
द्याया दूध धन्यास ना फ़ळतसे धेनू कधीं भूवरी ॥
जोगी, रागिट, तापसी, विरूपसा शंभू वरायाप्रती ।
देवांनीं भिड घालुनी करविली राजी सती पार्वती ॥६॥

लावणी ॥ ( भला जन्म ) ॥
तेज हिर्‍याचें लोपुन जातें चिखलाच्या संगतीं ।
किंवा गणिकेमाजीं यती ॥
कोकिल कागावलींत बसतां हीनत्वा पावतो ।
भिल्लीणी - लोभें शिव नाचतो ॥
( चाल ) यापरी मच्छेंद्राप्रती तिथें जाहलें ॥
वैराग्य अंगिचें न ये प्रत्यया भलें ।
ना कृतिंत मुळीं शब्दांत ज्ञान राहिलें ।
त्यागी, जोगी असून जडली भोगावरती प्रिती ।
गणु म्हणे कठिण अशी संगती ॥७॥

॥ दिंडी ॥
मछिंद्राच्यापासून एक झाला ।
पुत्र राणीतें मीननाथ ज्याला ॥
नांव होतें हो, प्रीय उभयतांसी ।
भ्रमर जैसा लोलूप परागासी ॥८॥
मत्स्येंद्रनाथांचा थाट काय विचारतां ?

॥ पद ॥ ( खेटरें काय मारिसी )
कौपीन दिली टाकून, बसले नेसून, वस्त्र भारी ।
पितांबर पीत लाल जरतारी । हो कंठांत ॥
कंठांत माळ मोत्याचि, तशी सोन्याचिं, कुंडलें साचिं, ।
कानिं रुळती । नसें अंगास मुळिंच विभुती ॥ हो चंदनी ॥
चंदनी उटी देहास, मुक्त पाठीस, सोडले केंस, भालभागा ।
दीधली कस्तुरीस जागा । कीं सलकडें ॥
सलकडें रुळे मनगटीं, तशी अंगुठी, विराजे बोटिं, गोफ़ कंठा ।
गणु म्हणे वानुं किती थाटा । हो त्याचिया ॥९॥

॥ आर्या ॥
संपन्न भूप असल्या गायक, नट, नर्तका मिळे मान ।
गंधर्व - अप्सरेचा गौरव करि इंद्र, इतर कोणी न ॥१०॥

॥ पद ॥ ( मित्रा मम )
राजेपण खचित खचित अनितिची खनी ।
बल त्याचें द्रव्य, शक्ति हेंच कीं जनीं ॥ध्रु०॥
राजनीति - ठायीं नसे किमपि सत्यता ।
स्वरूप तिचें साच जणूं वारयोषिता ॥
सज्जनही पडति भ्रमीं तिजसि पाहतां ।
म्हणुनी संत राहति दूर याजपासुनी ॥११॥

॥ श्लोक ( इंद्रवज्रा ) ॥
आली कलिंगा करण्यास गाना ।
मैनाकिनीच्या सदनास जाणा ॥
घेवोनिया ते निज साथिदार ।
आला घडूनी तयिं हा प्रकार ॥१२॥

॥ ओवी ॥
मच्छेंद्र - शिष्य गोरखानें । केली विनवणी तुजकारणें ॥
एवढी भिक्षा मज घालणें । ‘ नाहीं ’ न म्हणतां कलिंगे ! तूं ॥१३॥

॥ सवाल ॥
नाथ मच्छिंदर, योगीके इंदर सद्गुरूराज हमारे ।
मैनाकिनीके महलोमें लीला करनेके खातर ठैरे ॥
धन्य धन्य श्रीनाथ - चरन, वो केवल गोदावरी है ।
उस चरनोंके दर्शन - खातर यहां मेरा आना हुवा है ।
तेरेकू व्हांका आया बुलाना हमसेबि लेकर चलना ।
है मय्या मुझकू मालुम अच्छा तबला वो मृदंग बजाना ।
एक्का, धुमाली, झंपा, दिपचंदी, दादरा, तिरविट, चौताला ।
परनोके पीछे परन लगाके मय्या बजावुंगा तबला ॥१४॥
हें गोरखाचें बोलणें ऐकून कलिंगा म्हणते,

॥ श्लोक ॥ ( वसन्ततिलक )
येऊं नका मजसवें तुम्हि त्या स्थलासी ।
कां कीं प्रवेश नच तेथ मिळे नरासी ॥
जे जे कुणी आजारी नर तेथ आले ।
ते ते पहा सकल मृत्युपथास गेले ॥१५॥
हें ऐकून गोरखनाथ म्हणाले,

॥ दिंडी ॥
नको त्याची तूं धरुंस मुळीं भीति ।
योगयोगांगें सकल मला येती ॥
सद्गुरूच्या त्या चरणप्रतापांनीं ।
वधिन मी त्या प्रत्यक्ष यमा जाणीं ॥१६॥
कलिंगा हंसली व म्हणाली,

॥ पद ॥ ( जाके मथुरा )
नच जोग्यानें कधीं वदावें खोटें या जगतीं ।
व्यर्थ मजपुढें तव सद्गुरुची दावुं नको महती ॥
नाथ मछिंदर ठाउक अम्हां विषया भोगितसे ।
डोंबारिण ती मैनाकिनी बघ, माकड नाथ असे ॥१७॥
त्यावर गोरख म्हणाला,

॥ पद ॥ ( मेघाच्या भेदुनिया )
कोल्हाच्या पंक्तीसी बैसुनिया जरि केली लिला ।
सिंहानें म्हणुनी का लेखिसी तूं वंचक त्याजला ॥
( चाल ) ईश पशुपती, नरकपाल घे ।
म्हणुनी का हर वेडे ! भिक्षुक जाहला ॥१८॥

॥ पद ॥
वेष हीन परि तो प्याला शिव हलाहला ।
मान मिळे न दुर्गूणासी सद्गुणाविना ॥
( चाल ) दिसे कलंक शशिचे ठायीं । परि तो त्यास बाधक नाहीं ।
तेज विपुल त्याचे ठायीं आण हें मना ॥१९॥

॥ श्लोक ( पथ्वी ) ॥
विधीहरिहराहुनी असति श्रेष्ठ मत्स्येंद्र ते ।
समर्थ नच वेदही यश तदीय गायास ते ॥
उणी सुरभि त्यापुढें सुरतरू नि चिंतामणी ।
सजीव करिती मृता जपुन नाथ संजीवनी ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : August 13, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP