मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्री संत दामाजी चरित्र २

श्री संत दामाजी चरित्र २

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


शोकाकुल होऊन संकटाचा भार देवावर घालीत असलेल्या आपल्या स्त्रीस पंत म्हणाले,

॥ पद ॥ (चाल-हटातटाने)
सर्व जगाचा भार असे की सुंदरि! प्रभुच्या शिरी ॥
तुझा कां जोजार त्याला तरी ॥
वाकेंल माझा हरि ओझ्याने आण मनीं हे तरी ॥
उभा तो बाप विटेच्यावरी ॥२१॥
याप्रमाणे पंतांनी स्त्रीचे समाधान केले. ज्यांनी आपल्या सच्छीलतेने राजा व प्रजा यांना संतुष्ट ठेवण्यात बिलकूल कसूर केली नाही, उलट, अधिकार प्राप्त झाला असतां, सत्तेचा अनाठायीं उपयोग करण्याची ज्यांना स्वप्नांतदेखील इच्छा झाली नाही, अशा पंतांना राजाचे शिपायी धरून नेतात, हे पाहून मंगळवेढयाचे सर्व लोक अत्यंत हळूहळू करूं लागले. त्यांस पाहून पंतांनी त्यांचा प्रेमाने निरोप घेताना विनंति केली की,

॥ पद ॥ (चाल-नागीण चपल)
येतों मी लोभ बहु ठेवा  । नच व्हावा, विसर केव्हां ॥ येतो ॥
प्रतिवारीच्या एकादशिसी । जाल जेव्हां पंढरिसी ।
नमन कथा तेव्हां ॥येतो०॥२२॥
पंतानीं घरदार सोडले व पंढरीचा रस्ता धरला.इकडे त्यांच्या स्त्रीने आपल्या मनाला आवरण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; पुन:पुन: असे वाटें की, ज्या पांडुरंगावर भार ठेवून आम्ही आयुष्य कंठतों, त्यालाच या वेळी आळवावयाचे नाहीं तर दुसर्‍या कुणाची कास धरावयाची? तिला वाटे

॥ ओवी ॥ (जात्यावरील)
माझा पंढरिचा हरी । कां येइना धावुन तरी? ॥
कशि झोंप तुला लागली । का हांक नच ऐकूं आली ॥
माझा संकटरवि तापला । तेणें सौख्य निधी शोपला ॥
कोण करील करूणा तरी । गणु म्हणे तुझ्याविण हरी! ॥२३॥

॥ पद ॥ (चाल-चंद्रकांत)
करूणा ऐसी ऐकूनि हरि तो खळखळ नीर ढाळी ॥
भक्तांचा जो संकटहर्ता विठ्ठल वनमाळी ॥
पुशी शेल्यानें दु:खाश्रूंते जननी जगताची ॥
विनवुनि बोले, “ प्रभुजी! चिंता लागली तरी कैची?
काहीं न वदतां, खळखळ रडतां तुम्ही कशासाठी ॥
सांगा मजला दासी मी कीं तुमची जगजेठी! ॥
दासगणू म्हणे सच्चिदधन प्रभु ऐसा गहिवरला ॥
देववे नतो प्रत्युत्तर कीं, कंठ भरूनि आला ॥२४॥
इकडे पंताची स्वारी पंढरीस येऊन पोचली.

॥ ओवी ॥
चंद्रभागेचे तिरी स्नान । ‘ हर हर गंगे’ म्हणून ।
पुंडलिकाचें दर्शन । घेऊन गेले राऊळा ॥२५॥
देवळांत जाताच पांडुरंगाचे पाय घट्ट धरून पंतांनी देवास म्ह्टले,

॥ पद ॥ ( हा काय तु)
येतो मी देवा! मजवरि आतां लोभ बहु ठेवा ॥
अनंत कोटी ब्रम्हांडाचा नायक तूं बरवा ॥
जय रामा! गुणधामा! सुखसद्मा! विश्रामा!
काहीहि होव! परि मज शेवटि निजपदिं दे ठावा ॥२६॥

॥ श्लोक ॥ भुजंगप्रयात)
करी काय हो तेघवां तो मुरारी । दिली टाकुनि भूषणें उंच सारी ॥
करी कांबळा कंठि तो कृष्ण दोरा । निघाला प्रभु बेदरासी झरारा ॥

॥ पद ॥ (चाल-गुरू दत्त दिगं)
॥ झाला महार शेषशायी ॥ प्रभु तो बेदरासी जाई ॥
मूर्ति सांवळी, घोंगडि काळीं, काळा दोरा कंठी ॥
काळीच काळी हातांत घेऊन खेचलीच लंगोटी ॥
पदिच्या वाहणा करकर वाजति, डोइस चिंधी विलसे ॥
बोलि बोलला बालेघाटी थेटचि महारासरिंसे ॥२८॥
अशा वेषांत राजदरबारांत जाऊन प्रभूची स्वारी राजापुढे उभी राहिली व मुजरा करून म्हणू लागली कीं,

॥ पद ॥ (छक्कड)
धनीसाहेब माझा तुम्ही जोहार घ्या । रुपये मोजुनशानी रसीद ।
इथं नाही कीं भक्तीचं पाणी । राहूं कुठवर तान्हेल्यावाणी ॥
करा जलदी आतां मला जायाचे दूर ॥
आला असेल भीमाबाईला पूर ॥ धनी०॥२९॥
हे भाषण ऐकून राजा एकसारखा त्याकडेच पहात रहिला;व

॥ पद ॥ (चालमूर्तिमंत भीति ॥
वजिरासी पुसतेस की तेघवां शहा ॥
‘मोहक हें रूप दिसे किति तरी पहा ॥ वजि. ॥
मज वाटे सतत यास जवळ ठेवणें ॥
सोडुनिया सकल काज पहात बैसणें” ॥ वजि०॥३०॥
राजाची इच्छा जाणून त्या महाराजाला ठेवून घेण्याच्या इच्छेने

॥ आर्या ॥ ( गीति)
पुसे वजिर त्या काळीं, तूं कोठिल, कोण, सांग कवणाचा? ॥
वजीराचा प्रश्न ऐकून देवाने म्ह्टलें,
प्रुभू म्हणे, ‘महार असे मी, चाकर त्या मायबाप पंताचा’॥३१॥
‘ अरे! येथें राजेसाहेबांचेजवळ नोकर राहतोस काय?’ असें वजिराने पुन: विचारलें, त्यावेळी देवानें उत्तर दिले कीं,

॥ पद ॥ (लावणी)
नग तुमची चाकरी मला बरा मी मंगळवेढयात ॥
धनी माबाप मला पंत ॥
मी होईन त्याचा कूतरा नग मला तुमची सरदारी ॥
पडुन राहीन त्याचे दारीं ॥
तो खरा एक जन्मला जगामधिं जननीच्या पोटा ॥
पंत माझा हो नसे गोटा ॥३२॥

॥ आर्या ॥ (गीति)
देव -
येथे मी नच राहे पंताविण कंठवे न हो मजसी ॥
जलकीटकें जलाविण राहूं न शकती क्षणैक तीं जैशी ॥३३॥
असें सडेतोड उत्तर देऊन ताबडतोब,

 ॥ आर्या ॥ (गीति)
प्रति शेरास रुपया दिधला काढून तैं रमारंगे ॥
सच्चिदधन-हरि-दर्शन घडतें पतितास साधुच्या संगे ॥३४॥
॥ दिंडी ॥
ढीग पडला बहुथोर रूपयांचा ॥ ऊर गेला दडपून सराफाचा ॥
म्हणे, ‘घेऊ मोजून कसें आतां? ॥ तुझी करणी अघटीत असे पंता’ ॥
शेवटी रूपयांची भरती झाली आहे, असें म्हणून वजिराने राजाच्या सहीची रसीद लिहून त्या महाराच्या- प्रभूच्या- हातांत दिली. मग काय?

॥ आर्या ॥ (गीति)
रसीद करीं पडतां ती, परमात्मा तो निघूनिया गेला ॥
तद्विरहे बेदरपति यवनाधिप भ्रांतच्चित की झाला ॥३६॥
रसीद देवानें दामाजींच्या गीतेत ठेवून दिली. नित्यनियमप्रमाणे पंतानीं
गितापाठ करण्याकरितां म्हणून ती उघडताच, त्यांत ती रसीद
दिसली. तिच्यावर बेदरच्या राजाचें शिक्कामोर्तब! धान्यागरे
लुटविलीं, त्यांची भरपूर किंमत पटल्याची ही रसीद तेव्हां हे रूपये
दिले तरी कुणी? दुसरा कोण असणार? अनन्याश्र्चिंतयंतो मां ये जना:
पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तांना योगक्षेम वहाम्यहम ॥ असें अर्जुनास
अभिवचन देणार्‍या परमात्म्याशिवाय दुसरा कोण असणार? मजकरिता
या प्रभुने इतके श्रम केले, असा विचार उत्पन्न होताच, पंताचें हृदय भरून आलें, कंठ सद्गदित झाला, अंगावर रोमांच उभे राहिले.पंत(देवास)

॥ पद ॥ (चाल-नरजन्मामधि)
या दासास्तव दीनदयाळा! । गोष्ट न केली बरी ॥
जन मज निंदिल नानापरी ॥
पतितोध्दारा! मेघ:श्याम! भक्तवत्सला हरी! ॥
पदिं का आलास या बेदरीं? ॥३७॥
पंत बेदरास येऊन पोचलें. दरबारात आणून शिपायांनी त्यांना राजापुढे उभे केले; पंतास पाहताक्षणीच-

॥ श्लोक (पृथ्वी) ॥
गळां पडुनि तेधवां खळखळा रडे भ्रूपती ॥
म्हणे,‘मजसि दाखवी त्वरित तो विठू निश्चितीं ॥
नको धन नको, नको सुख नको राज्य हें ॥
विठू मज न भेटतां मदिय प्राण जातील हे ॥३८॥
पंत राजास-

॥ श्लोक ॥ (शार्दूलविक्रिडित)
नोहे मानव तो न घेड मुळीं तो, तो या जगाचा धनी ॥
ज्याचें रूप अगम्य जें न कळले विदादिकांलागुनी ॥
ऐसा तो जगदीश विठ्ठ्ल तुझ्या बा! पूर्व पुण्याइनें ॥
गेहाच्याप्रति पातला गणु म्हणे त्वद्भाग्य नाहीं उणें ॥३९॥
तें काही मला समजत नाही. तो महार मला दाखव असें राजाने म्हणतांच पंतांनी म्हटले:

॥ दिंडी ॥
“ चला जाऊं दावीन पंढरीत । सांवळा तो घननीळ रमानाथ ॥
असें बोलुनि घेऊन शहा संगे । पंत आले, पंढरीत वेगें ॥४०॥
महाद्वारांत उभे राहून पंतांनी “ हाच तो विठू महार!”
असे देवाकडे बोट करून म्हटलें. पांडुरंगाच्या मूर्तिकडे पाहून राजा-

॥ साकी ॥
ये तो पथ्थर काला हमसे धेड विठू बतलाना ॥
उस बिन मेरी जान चली है, पंतजि! जलदी करना! ॥४१॥
राजाचा अत्याग्रह पाहून पंतानी देवाची करूणा भाकली व म्हटले,

॥ पद ॥ ( नृपममता)
हो महार पुन्हां घननिळा! हे कमलनयन गोपाळा!  ॥लौकरी ॥
उध्दार करीं भूपतिचा! हा मालक या दासाचा  ॥ श्रीहरी ॥
श्रीहरी! श्रेत्र पंढरी, वसविली खरी, भक्त ताराया ॥
गणुदास लागतो पाया ॥ विठ्ठला! ॥४२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 22, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP