मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीहनुमानसेवा १

श्रीहनुमानसेवा १

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ श्लोक - पृथ्वी ॥
रमारमण राम जो रघुपती अयोध्यापुरीं ।
बरोबर असे जया जनकजा सिता सुंदरी ॥
अला वधुनि रावणा, पदनतांस तारावया
समर्थ नच वेदही यश तदीय वानावया ॥१॥

॥ दिंडी ॥
अले सुग्रीव, नळ, नीळ अंगदादि ।
श्रेष्ठ वानर तैशीच रीस - मांदी ॥
अयोध्येला पाहून एकमेकां ।
झाले वदते यापरी तेथ देखा ॥२॥

॥ कटिबंध ॥
ही पुरी, बघुन अंतरीं, मोद ना होत ।
ना पहाड, कडे, टेकड्या फ़िराया येथ ॥
ना थोर तरुवर, कुंज साचार, मुळीं करमेना ।
गुपचूप बसावें लागे काय ही दैना ॥
मिळतीं न खावया फ़ळें, कंद तशिं मुळें, लाडु जिलबीचा ।
आग्रह होत हा काळ खचित मरणाचा ॥
यासाठिं पुसुनि राघवा, आपल्या गांवा, चला कीं जाऊं ।
गणु म्हणे अरण्यामाजिं सुखानें राहूं ॥३॥

॥ श्लोक - पृथ्वी ॥
स्वदेश जननीपरी प्रिय गमे जिवाकारणें ।
दरीच उळुका पटे सुरपुरीस आणी उणें ॥
विरुप शिव तो जरी परि गजास्य अंकावरीं ।
वसे मुदित मानसें सुरुपसा त्यजोनी हरी ॥४॥
सगळीं वानरें एक दिवस विचारूं लागलीं कीं,

॥ आर्या ॥
येतां का हनुमंता ! अपुल्या त्या मायभूमिला परत ।
किंवा श्रीरामाची सेवा करणार राहुनी येथ ? ॥५॥
तें ऐकून मारुती म्हणाला -

॥ श्लोक - वसंत - तिलक ॥
पादारविंद असु हे मज राघवाचे ।
व्हावें कसें मग वदा त्यजणें तयाचे ॥
मी मीन हे मजसि सागर रामपाय ।
मी कीं चकोर शशि हा रघुराजराय ॥६॥
रामाला हें कळलें, मारुतीच्या निष्ठेबद्दल आनंद वाटला व त्यांनीं आपल्या उपयोगी पडलेल्या या वानरमंडळींचा मोठा सत्कार करून त्यांना निरोप द्यावा असें ठरविलें. रामचंद्र प्रधानादिकांस व इतर प्रजाजनांना आपल्या साहाय्यकर्त्यांची संक्षेपानें माहिती सांगतांना म्हणतात -

॥ लावणी ॥ ( भला जन्म )
शिणला माझा अंगद सेतू बांधुन निधिच्यावरी ।
तरविल्या यानें शिळा सागरी ॥
नळनीळांनीं दगड वाहिले मत्प्रेमास्तव शिरीं ।
उरली जोड न ज्या भूवरीं ॥
( चाल ) हा जांबुवंत अवघ्यांत धूर्त शाहणा ।
येईल बृहस्पति साच यापुढें उणा ।
या रीस वानरे मर्कट कुणि ना म्हणा ।
हा सुग्रिव सम्राट तयांचा, यांच्या मदतीवरी ।
जिंकिली लंका रावणपुरी ॥७॥
ते आतां परत जात आहेत. तेव्हां त्यांचा सत्कार करणें उचित होय !

॥ ओवी ॥
अवघ्यांप्रती आहेर झाले । वानर सर्व आनंदले ।
रामचरणां वंदून गेले । किष्किंधेला निजदेशीं ॥८॥

॥ श्लोक - वसंत तिलक ॥
नासाग्र दृष्टि करुनी करसंपुटाला ।
जोडून अंजनिकुमार तसाच ठेला ॥
वाणी अखंड रतली रघुराजनामीं ।
सेवेविणें न दवडी घटिका रिकामी ॥९॥
त्याला कांहींच बक्षीस दिलें नाहीं. तें पाहून सीता म्हणते -

॥ पद ॥ ( धपाधपा मारि )
हे नाथ ! पाहिला काय पुढें हा कोण ।
ज्या तुम्हि निजप्राण, असा हनुमान ।
ठेविला कसा बक्षिस दिल्यावांचून ॥१०॥
तें ऐकून प्रभु रामचंद्र म्हणतात -

॥ पद ॥ ( व्यर्थ गोविलें, ताल - दादरा )
त्यास द्यावया कांहिंही नसे । या जगत्त्रयीं करूं तरी कसें ? ॥
( चाल ) तूंच देइ, त्यास कांहीं, लवलाही, याच ठायीं ।
मुदित मानसें ग ! योग्य हें दिसे ॥११॥
सीता मारुतीस म्हणाली,

॥ श्लोक - वसंत तिलक ॥
केलें चिरंजिव तुला जगतांत रामें ।
ना पारितोषिक दिलें, ठिवलें रिकामें ॥
त्याची उणीव भरुनी बघ काढित्यें मी ।
हा हार घे तुजसि देत बहूत नामी ॥१२॥

॥ पद ॥ ( नृपममता )
कंठांत घालुनी हार । तोषला कपी मनीं फ़ार । तेधवां ॥
( चाल ) जनकजा जानकी सती, नमुन मारुती, पादपावरति ।
जाउनी बसला । गणु म्हणे शोधि हाराला । अतुरतें ॥१३॥

॥ झंपा ॥
नसे या मण्यामजि तो राम माझा ।
असा काचेचा हार हा काय काजा ? ॥
वारीविणें झरा, मद्यप्याची गिरा ।
धारेवांचुनि सुरा, व्यर्थ समजा ॥
एक रामाविणे सर्व कांहीं सुनें ।
दासगणु हा म्हणे हेंच उमजा ॥१४॥
तो हार तोडून त्याचा एकेक मणी दाढेखालीं घालून फ़ोडावा अशा प्रकारें त्यानें सर्व हाराची वाट लावली !

॥ श्लोक - द्रुतविलंब ॥
कडकड मणि वानर फ़ोडुनी ।
तदिय दे शकलें भिरकावुनी ॥
बघुनि ही कृति, त्या वदली सिता ।
तुजसि मी दिधला नग हा वृथा ॥१५॥

॥ पद ॥ ( सोहनी - त्रिवट )
सुकरा न रसाची गोडी । तो आनंदें पुरिषचि चिवडी ॥धृ० ॥
( चाल ) रत्नहार हा बहु मोलाचा । तुज घालाया दिधला साचा ।
कळलें खंदक तूं अकलेचा । मणि हा माकडा ! फ़ोडी ॥ सुकरा० ॥१६॥

मारुतीनें उत्तर दिलें,

॥ लावणी ॥ ( तव नाम असे )
अमोल एक जगतांत राम रघुपति ।
हें काय समजलें नाहीं, तुज असून तदिय संगती ॥
मौक्तीक, पोळें, भांगार, हिरे, माणकें ।
रघुराजपदपद्माच्या पुढति हें सकल कीं फ़िकें ॥
फ़ोडून पाहिला मणी राम गवसेना ।
यासाठिं दिला फ़ेकून, हा काय जाहला गुन्हा ? ॥
( चाल ) पहाण्यास परिक्षा मला, हार हा दिला, करुनिया लिला ।
तुम्ही कीं वाटे । गणु गाय कवनिं गोमटें ॥१७॥

॥ पद ॥ ( रजनिनाथ )
केलिस अपुल्यावरून माझी ।
खचित परिक्षा जननी ! आजी ॥ध्रु०॥
( चाल )  नानाविध नग ब्रह्मस्थानीं ।
आधिंच मानिलें असति स्त्रियांनीं ।
त्यांतिल एका मज देऊनी ।
बघितलेंस का करण्या राजी ॥ केलिस० ॥१८॥

॥ पद ॥ ( विभव नसावें मुळिं तें. कॉफ़ी - त्रिवट )
धन्य उमा शंभूची । खचित राखिली बुज तत्त्वाची ॥ध्रु०॥
( चाल ) स्मशान रहाया वल्कल ल्याला ।
बाळी, बुगडी, नच घालाया ।
पूर्ण प्रेम तें पतिच्या ठायां ।
भूषण चिरी कुंकवाची । जी का जननी दासगणूची ॥धन्य०॥१९॥
“ खरोखर जगांत जर कोणी पतिव्रता सती असेल तर ती भगवान् श्रीशंकराची उमाच ! ”

॥ श्लोक ॥ ( भु. प्र. )
अधिदेवता संपदेची मुळीं तूं । तुझा छानछोकीवरी सर्व हेतू ॥
असे राहिला राम हा ब्रह्मचारी । जगीं दोन वेळां; मनातें विचारी ॥२०॥
यावर सीतामाई रामाला म्हणतात -

॥ दिंडी ॥
पहा नाथा हा अंजनीचा सूत ॥
कसा घालुन पाहून वदे येथ ॥
तुम्ही भोळा गणितसां यास फ़ार ।
हा किं छिद्रें काढण्यामधें शूर ॥२१॥
सीता मारुतीला म्हणते -

॥ श्लोक - वसंत तिलक ॥

झाले तुला श्रम बहू करि जा विरामा ।
येती बहूत डुकल्या रघुराज रामा ।
प्रेमामुळें तुजसि जा म्हणवे न त्यांसी ।
तूं तो व्यव्हार बहु उत्तम जाणतोसी ॥२२॥
त्यावर मारुती म्हणाला -

॥ श्लोक - स्रग्धरा ॥
माते, जातां न येई रघुपति निजल्या पाय दावील कोण ? ।
कां कीं त्या पादपद्मीं मुळिं नच तव कीं हक्क माझाच पूर्ण
यासाठीं तूंच जावें झडकर जननी ! रात्र ती फ़ार झाली ।
आहे हेमंतर घेई म्हणुनिच कथितो पांघरायास शाली ॥२३॥
सीता म्हणाली,

॥ लावणी ॥ ( भला जन्म हा )
तूं आपणातें साधु म्हणविसी हनुमंता ! भूवरीं ।
म्हणूनि ही नाहिं कृती तव बरी ॥
पुत्रधर्म तूं जाणतोस ना ? मग मातेला दुरी ।
प्रभुच्या चरणापुन ना करी ॥
( चाल ) सेवा ती करूं दे आज पदाची मला ।
लाधेल तयानें पुण्य बहुतसें तुला ।
हा मदिय हेतु तूं पूर्ण करावा भला।
श्रीचरणाच्या सन्निध मूढा, बुध आणुन सोडिती ।
गणु म्हणे उलट तुझी का कृती ? ॥२४॥
तें ऐकून मारुती म्हणाला -
 
॥ पद ॥ ( मित्रा मम )
फ़ार बरें एक तुजसि पाय मी दिला ।
दुसरा तो मजसाठीं राहुं दे भला ॥धृ०॥
( चाल ) रामचरणसेवा ती उभयतां करूं ।
तूं ,माझी जननी मी साच लेंकरूं ।
हेंच हट्ट धरुनि मशीं दुरि नको करूं ।
यापरि तो चतुर कपी तिजसि बोलला ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : August 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP