मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|

संत तुकडोजी महाराज - भजन १९६ ते २००

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन - १९६

जगचालक जगदीशा ! ऎकी करुणा-वाणि परेशा ! ॥धृ॥

विश्व तुझी रचना ही सारी, सुंदर सकल गुणेशा ! ।

अलंकारकृति नवी विलसते, भिन्न जीवाची ईशा ! ॥ ऎकी ०॥१॥

मोहविते नयनाला निर्मळ, सुरस सरस ही नीशा ।

तेजवितो जगताला भानू, जिववी जीव हमेशा ॥ ऎकी ०॥२॥

निसर्ग करितो कार्य सुशोभित, ज्या त्या देश-विदेशा ।

सकल कला ही तुझिया सत्ते, चालतसे सर्वेशा ! ॥ ऎकी ०॥३॥

तुकड्यादास म्हणे हा निश्चय, गति पुराणि नरेशा ! ।

ऎसे असता भारत-भूची, का सोडियली आशा ? ॥ ऎकी ०॥४॥

भजन - १९७

ओरडुनी सांगावे ? देवा ! काय तुम्हा नच ठावे ? ॥धृ॥

तारुण्याचे कठिण प्रसंगी, मन चोहिकडे धावे ।

जप-तप-साधन काय करी हे ? चित्त भ्रमे बहिरावे ॥ देवा ! ॥१॥

संत-समागम पुराण-पोथी, जरी ऎकण्या जावे ।

निद्रा डाकिण बळेच निजवी, हृदया बोध न पावे ॥ देवा ! ॥२॥

तुकड्यादास म्हणे अम्हि ऎसे, साथि कुणाला घ्यावे ?

तुझ्या कृपेविण सर्व शीण हा, वदलो सत्य स्वभावे ॥ देवा ! ॥३॥

भजन - १९८

पावन करि यदुराया ! दीना येइ अता ताराया ॥धृ॥

कठिण संकटे भारतभूवर, किति सांगावे सदया ! ।

माप होइन गणती करिता, तूच जाणता सखया ! ॥ दीना ०॥१॥

जिकडे तिकडे अधर्म झाला, कलि आला बुडवाया ।

नीति नेम तो कोणि न जाणे, भ्रष्ट जनांची काया ॥ दीना ०॥२॥

जिवा जिवाशी द्रोह मोह अति, मरती स्वार्थ कराया ? ।

आपण बुडुनी दुसर्‍या बुडवी, पापाचरणी वाया ॥ दीना ०॥३॥

तुकड्यादास म्हणे तुजवाचुनि, कोण उध्दरिल काया ।

आवर हा प्रभु ! तुझा तमाशा, अती कठिण तव माया ॥ दीना ० ॥४॥

भजन - १९९

अवघड घाट भवाचा, चढता होतो थाट जिवाचा ॥धृ॥

कर्म-नदीची धार उफाळे, लाटसमूह मनाचा ।

कामक्रोध-मद-मत्सर मासे, करिती नाश तनाचा ॥ चढता ॥१॥

विषय-भोवरा गरगर फिरवी, धाक न ठेवि कुणाचा ।

जरा भटकता आडमार्गि कुणि, सररर ओढति खाचा ॥ चढता ॥२॥

तुकड्यादास म्हणे तो तरला, होइल भक्त गुरुचा ।

नाहि तरी चौर्‍यांशी भ्रमणे, घात करी नेमाचा ॥ चढता ॥३॥

भजन - २००

काय कुणाचे नेशी ? अंती तूच गती भोगियशी ॥धृ॥

सांगति संत गोड उपदेशा, दूर तया टाळियशी ।

अनुभव आल्या वेळ नुरे मग, जाशिल कोणापाशी ? ॥ अंती ०॥१॥

संसाराचे वीष गोड हे, वाटे क्षणि अपुल्यासी ।

हताश होशिल या भोगाने, दुःखरूप मग होशी ॥ अंती ०॥२॥

स्त्री-पुत्रादिक पाहति मौजा, लावि सगाई खासी ।

लीन इंद्रिये होतिल जेव्हा, पळतिल दूर घरासी ॥ अंती ०॥३॥

साध साध रे ! काहि तरी, ही वेळ काय खोवियशी ? ।

तुकड्यादास म्हणे प्रभुराया, घे धरुनी हृदयाशी ॥ अंती ०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP