भजन - ८६
मन चौर्यांशी फिरवीते हे । मन मोक्ष-सुखाला नेते हे ॥धृ॥
ऎक गड्या ! मन पवित्र कर हे, संतसमागम करुनीया ।
नाहि तरी जाशिल वाया, मन विषय-चिंतना देते हे ॥१॥
सद्ग्रंथांचे पठन करी, अभ्यास करी मन स्थिरण्याला ।
चिंतावा मुरलीवाला, मन अनन्यभक्ती घेते हे ॥२॥
तुकड्यादास म्हणे ही वेळा, मिळते काय पुन्हा बापा ! ।
चुकवी चौर्यांशी खेपा, मन जे करशी ते देते हे ॥३॥
भजन - ८७
श्रीगुरुराज धरि हृदयी, भय हरेल या संसाराचे ॥धृ॥
भ्रम-बाजारी जीव धडपडे, काहि कळेना मार्ग तया ।
सत्-संगतिचा लाभ मिळे जव, होइ ज्ञान उध्दाराचे ॥१॥
कठिण प्रसंगचि ओढवती तव, वाढत चिंतारोग सदा ।
ज्ञान होय जव श्रीगुरु-बोधे, पाश जळति कुविचारांचे ॥२॥
अन्य नसे कुणि मार्ग जगी या, मोक्षपदाला जायासी ।
सत्संगतिने कळते, वळते, पट उघडति हरि-द्वाराचे ॥३॥
तुकड्यादास म्हणे निर्भय हो, जाउनिया गुरु-चरणाशी ।
ओळख 'मी तो कोण, कोठचा ?', मार्ग कळति सुविचारांचे ॥४॥
भजन - ८८
श्रीहरि-ध्यान धरि हृदयी, जा जिवा ! सुखद हा मार्ग तुला ॥धृ॥
सांगति संत-महंत सदा हे, शास्त्र-पुराण-श्रृती-वचने ।
'नामजपाविण शांति न लाभे. धर धावुनिया पदयुगुला' ॥१॥
योगयागविधि कठिण तपस्या, साधति काय कुणास अता ? ।
चंचल मन हे फिरतचि राहे, भृंग जसा घे मोद फुला ॥२॥
तुकड्यादास म्हणे हो पावन, नामस्मरण करुनि भावे ।
वेळ पुन्हा ही न मिळे ऎसी, साधुनि घे हा जन्म भला ॥३॥
भजन - ८९
हरिगुण गात राहि मना ! जा चुकेल भव-संकट सारे ॥धृ॥
विषय सेविता कोण निवाला ? सांग तरी जगतात असा ।
राव, रंक जग सोडुनि गेले, कीर्ति न ती तिळमात्र उरे ॥१॥
भक्ति 'सुखाविण शांति न पावे', अनुभव गाती संत असे ।
जा सद्गुरुला पूस गड्या ! मग मन बोधे जागीच मुरे ॥२॥
तुकड्यादास म्हणे सावध हो, शोध करी हृदयी अपुल्या ।
नरजन्माची दुर्लभ वेळा, दवडु नको विषयी बा रे ! ॥३॥
भजन - ९०
स्मर हरिनाम मनि मनुजा ! याविणा न गति कवणासि मिळे ॥धृ॥
दुर्लभ हा नरदेह सुखास्तव, अवचित तुज दिधला देवे ।
नश्वर सुख घेता गमाविशि मग, यमदंडा पाठीच फळे ॥१॥
सार्थक घे करुनी नरदेही, वेळ पुन्हा ऎसी नाही ।
चाख गुरूबोधामृत हृदयी, सुख तुझे तुजलाचि कळे ॥२॥
तुकड्यादास म्हणे समजी गुज ! वर्म कळुनि घे गुरु-वचने ।
वाग तयासी जगति गड्या ! मग देव सखा होऊनि वळे ॥३॥