मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|

संत तुकडोजी महाराज - भजन ४१ ते ४५

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन - ४१

पाहतात तरी का कोणी ? तुझि दैना केविलवाणी । गायिगे ! ॥धृ॥

गेला तव रक्षक आता, श्रीकृष्ण जगाचा त्राता । गायिगे ! ॥

श्री दत्त गुप्त ते झाले, मज वाटे तुजवर रुसले । गायिगे ! ॥

(अंतरा)

शिव हरे, लाविले पुरे, नेत्र साजिरे,

बैसले ध्यानी, तुझि हाक घेइना कोणी । गायिगे ! ॥१॥

उरले हे हिंदूधर्मी, कृषिप्रधान देशी कर्मी । गायिगे ! ॥

त्यांचिया बुध्दिची गाणी, सांगतो ऎक गार्‍हाणी । गायिगे ! ॥

अति स्वार्थ तयांना झाला, धर्माचा आदर गेला । गायिगे ! ॥

(अंतरा)

सुर्मती, तुला काढती, बाजारी किती,

विकती हौसेनी, कटि खोचति रुपये नाणी । गायिगे ! ॥२॥

नच जरुर तुझी लोकाला, वाटते असेची मजला । गायिगे ! ॥

मग दूध कशाला देशी ? पुत्रासम सेवा करिशी । गायिगे ! ॥

किती गोड तुझा हा पान्हा, पाजशी दुष्ट लोकांना । गायिगे ! ॥

(अंतरा)

किति प्रेम, तुझे हे नेम, अंतरी क्षेम,

क्रोध ना आणी, नच उदार तुजसा कोणी । गायिगे ! ॥३॥

किति सुंदर गोर्‍हे देशी, जुंपण्या अम्हा शेतीसी । गायिगे ! ॥

नच काहि मनी आणोनी, पुरविशी दही-दुध-लोणी । गायिगे ! ॥

दुष्टांना आणि सुष्टांना, अपुल्यांना अणि परक्यांना । गायिगे ! ॥

(अंतरा)

ही कीव. घेति जरि देवम चुके तव भेव,

प्रार्थितो चरणी, तुकड्या हा करुणा-वाणी । गायिगे ! ॥४॥

भजन - ४२

बघु नको अशी डोळ्यांनी, अग गायी ! केविलवाणी । मजकडे ॥

वाटते दुःख अति भारी, नेताति तुला हे वैरी हाकुनी ।

द्रव्याचा अपव्यय करुनी, पापांच्या राशी भरुनी । नेति हे ॥

(अंतरा)

ना दया, जरासी मया, तया पापिया,

उपजली ध्यानी, ठेवती सुरी तव मानी । गायिगे ! ॥१॥

जा सांग सुखे देवासी, "हिंदुची बुध्दि का ऎसी । घातली ? ॥

मी दूध देतसे यांना, तरि विकती माझ्या प्राणा" । सांग हे ॥

"वत्सास जुंपती शेती, अणि माझी ऎशि फजीती" । सांगहे ॥

(अंतरा)

"अति उंच, हिंदुचा धर्म, परी हे कर्म,

सोडुनी वर्म, पळति अडरानी ।

नुरला मम त्राता कोणी" । सांग हे ॥२॥

"गोपाळ कशाचे हिंदू, गो-काळाचा त्या छंदू । लागला ॥

मौजेने विकती मजला, अति स्वार्थ तयांना झाला । आवडी ॥

मज तोडतील जे काळी, मी देइन शाप उमाळी । हिंदुना" ॥

(अंतरा)

'घ्या चला, विका आईला, रिकामी तिला,

म्हणोनी कोणी, आवडेल का ही गाणी । आमुची ? ॥३॥

मज क्रूर समज तू आता, तरि काय करू मी माता ! सांग हे ॥

नच द्रव्य आमुच्या पाशी, घेतो तरि जोरच यासी । पाहिजे ॥

मनि तळमळ अतिशय वाटे, तव काळ कसा गे ! कंठे ? दुःख हे ॥

(अंतरा)

करु काय, नाहि उपाय कष्टतो माय !

सांगतो कानी, तुकड्याची ऎका कोणी विनवणी ॥४॥

भजन - ४३

किति गोड तुझी गुणनाथा, वाटते मधुर भगवंता ! अंतरी ॥धृ॥

जे भजति तुला जिवभावे, ते पुन्हा जन्मि ना याचे करिशि तू ॥

काय हे मीच सांगावे ? श्रुति-शास्त्र पुराणा ठावे । सर्व हे ॥

प्रत्यक्ष पाहता यावे, मग प्रमाण कैचे द्यावे । त्याजला ? ॥

(अंतरा)

जे धीर, करिति मन स्थिर, देउनी शीर ।

रंगती गाता, रंगती गाता ।

ठेविशी वरद त्या माथा । श्रीहरी ! ॥१॥

जे तुझी समजुनी झाले, ते कळिकाळा ना भ्याले । सर्वथा ॥

सुखदुःख तयावरि आले, हसुनिया सहन ते केले । सर्वही ॥

गिरिपरी विघ्न कोसळले, तिळमात्र न मनि हळहळले ! भक्त ते ॥

(अंतरा)

द्रौपदी, न भ्याली कधी, सभेच्या मधी ।

वस्त्र ओढिता, वस्त्र ओढिता ।

धांवला घेउनी हाता । अंबरे ॥२॥

प्रल्हाद भक्त देवाचा, ऎकिला चौघडा त्याच्या । कीर्तिचा ॥

केला बहु छळ देहाचा, परि सोडि न जप नामाचा । तिळभरी ॥

विष-अग्नि-व्याघ्र सर्पाचा, करविला कडे लोटाचा । यत्नही ॥

(अंतरा)

किति प्रेम ? 'न सोडी नाम, जाउ द्या प्राण' ।

तारिशि त्या हसता हसता । धावुनी ॥३॥

सम स्थान भक्त वैर्‍यासी, ही उदारता कोणासी । गवसली ? ॥

यशोदेसि ती पुतनेसी, भक्तासी ती कंसासी । दाविशी ॥

घेऊनि माग वेळेसी, भक्तांच्या वचना देशी । पुरवुनी ॥

(अंतरा)

ती कणी, गोड मानुनी, पिशी धावुनी ।

विदुरा-हाता, विदुरा-हाता ।

निर्मळ प्रेमाचा दाता । तू हरी ! ॥४॥

पांडवा साह्य देउनी, फिरशी तु रानो-रानी । त्यासवे ॥

किति दासाची तुज प्रीती, खाजविशी घोडे हाती । आपुल्या ॥

बहु दीन सुदामा भक्त, बसवी कांचन-महालात । आवडी ॥

(अंतरा)

अम्हि दीन, तुझ्या पदि लीन, गाउ तव गुण ।

लक्ष्मीकांता ! लक्ष्मीकांता ! ।

तुकड्यासी घे पदि आता । उचलुनी ॥५॥

भजन - ४४

वाढवू नका हो वृत्ती, 'मी कर्ता' अथवा 'भोक्ता' ॥धृ॥

सर्व हे कार्य देवाचे, सर्वस्वी त्याची सत्ता ।

मी केले काहिच नोहे सर्व हा हरी करवीता ।

(अंतरा)

हा अनुभव सकळा ठायी ।

येतसे पदोपदि पाही ।

जीव हा आमुचा ग्वाही ।

मग व्यर्थ कशाची चिंता, वाहता आपुल्या माथा ? ॥१॥

आलिया प्रसंगे व्हावे, सावधान कार्यासाठी ।

भिउ नये कुणा तिळमात्र, इच्छितो हेचि जगजेठी ।

नीति-न्याय-बुध्दी अपुली, लावावी कार्यासाठी ।

(अंतरा)

अन्याय न पहावा डोळा ।

गमवूच नये ती वेळा ।

फिरु नये भिऊनी काळा ।

हेचि ज्ञान देते गीता, अणि धर्मही सांगे चित्ता ॥२॥

जव अधर्म झाला लोकी, कोणी न कुणाला मानी ।

साधु संत छळले गेले, अन्याय नसोनी कोणी ।

कंसाच्या सत्तेखाली, पापांच्या झाल्या गोणी ।

(अंतरा)

ना धर्म राहिला लोकी ।

साधूजन पडले धाकी ।

राक्षसी वृत्तिच्या हाकी ।

गडबडली सारी जनता, नच उरला वाटे त्राता ॥३॥

ऎकताच प्रभुने वार्ता, दुःख हे न बघवे त्यासी ।

भक्तांचा छळ पहावेना, ब्रीदाची लाज तयासी ।

ना चैन पडे क्षण एक, गडबडले वैकुंठासी ।

(अंतरा)

गरुडास सोडुनी आले ।

वैकुंठ दुरावुनि ठेले ।

देह-भाव विसरुनि गेले ।

देवकिच्या उदरा येता, जाहला जगाचा त्राता ॥४॥

लीलेने गोपाळासी, पुरविले प्रेम देवाने ।

प्रेमाची करुनी मोहनी, पाडिली गोपिंना त्याने ।

होते जे कइ अवतारी, फेडाया आला उसणे ।

(अंतरा)

मर्दुनी असुर प्राण्यांना ।

भुलविला गर्वमय बाणा ।

शिर उचलूच ना दे कोणा ।

दाखवी मालकी त्राता, आमुची या जगती सत्ता ॥५॥

मानवी बुध्दिला धरुनी, खेळता समाजो खेळा ।

शिकविले राजकारण ते, जिव-भावे त्या पांचाळा ।

रणक्षेत्र पुन्हा गाजविले, उठवोनी अग्नि-ज्वाला ।

(अंतरा)

श्रीकृष्णाच्या भक्तांनो ! ।

भरती हिंदुवीरांने ! ।

संतांनो नी लोकांनो ! ।

तुकड्याची ऎका वार्ता, का प्रसंग सोडुनि पळता ? ॥६॥

भजन - ४५

श्रीहरी भेटवा कोणी, त्या बसविन हृदयस्थानी ॥धृ॥

त्या पहाया नेत्र भुकेने, कर्ण हे तीक्ष्ण किति झाले ।

जिव जरा उरी ना मानी, त्या बसविन हृदयस्थानी ॥१॥

ह्या सुंदर वृक्षाखाली, मी पाहिन तो वनमाळी ।

सांगेन जिवाचि कहाणी, त्या बसविन हृदयस्थानी ॥२॥

ह्या झुळझुळ ओढ्याकाठी, मज दिसेल तो जगजेठी ।

धावुनि मी केविलवाणी, त्या बसविन हृदयस्थानी ॥३॥

ह्या सुरम्य गुंजातळुनी, मी गाइन हरिला गाणी ।

तुकड्या म्हणे पूजिन ध्यानी, त्या बसविन हृदयस्थानी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP