मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|

संत तुकडोजी महाराज - भजन १६१ ते १६५

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन - १६१

हरिनाम हे फुकाचे, जप मानवा ! तु वाचे ।

तुटतील बंध सारे, भव-पाश या जिवाचे ॥धृ॥

मन लावुनी विचारी, धरि एकनिष्ठ तारी ।

निष्काम गा मुरारी, अति हर्षे देव नाचे ॥१॥

नच जाइ पुण्यधामा, बस रे ! करीत कामा ।

कामात लक्ष रामा-वरि, ठेव अंतरीचे ॥२॥

सोडूनि कल्पना ही, निंदा-स्तुती जगाची ।

रंगोनि एकभावे, सुख घे हरी-पदाचे ॥३॥

तुकड्या म्हणे हि वेळा, साधूनि घे फुकाची ।

अनमोल जन्म जाता, मग मार त्या यमाचे ॥४॥

भजन - १६२

सुख येइ घरा, अति कष्ट करा कष्टाविण शांति न होइ नरा ॥धृ॥

कष्टचि करता संत निमाले, तरले या भवदुःखपुरा ॥१॥

कष्टे राज्यहि पावे सुगमे, आळस हा अति दुर करा ॥२॥

कष्टे धर्म, कर्म, व्रत होते, कष्टचि नेई आत्म-पुरा ॥३॥

तुकड्यादास म्हणे, ज्या कष्टी, नारायण हो तेचि वरा ॥४॥

भजन - १६३

चल ऊठ अता, चल ऊठ अता, बघ भानु करी उपदेश मुला ! ॥धृ॥

तापुनि कष्टि करी देहाला, द्यायासी सुख जनतेला ॥१॥

कष्टचि हे सुख देति मनाला, ज्या कष्टे जन-लाभ भला ॥२॥

लाज घेउनी का बसलासी ? जाशिल शेवटि दुःखि खुला ॥३॥

तुकड्यादास म्हणे गुज समजी, करि सेवा जगव्यापि खुला ॥४॥

भजन - १६४

कुणि शत्रु कुणाचा नाहि गड्या ! कुणि मित्र कुणाचा नाहि गड्या ! ॥धृ॥

सर्व असे हे अपुल्या हाती, अपुली कर्मे ग्वाहि गड्या ! ॥१॥

आपण दुसर्‍या दुसरे आपणा, वागु तसे जग राहि गड्या ! ॥२॥

आपण लोभी जगही फसवे, ठगा-ठगाची डाइ गड्या ! ॥३॥

तुकड्यादास म्हणे निर्मळ हो, जग हे ईश्वर पाहि गड्या ! ॥४॥

भजन - १६५

अति व्याकुळ हे मन, शांति नसे, करु काय कसे ? न सुचे हरि रे ॥धृ॥

जप-तप नाना करुनी, श्रमलो, चंचल मन हे नावरि रे ! ॥१॥

तिर्थी धोंडापाणी पुजिले, पक्ष्यासम फेरे करि रे ! ॥२॥

दान-पुण्य योगहि ते केले, वाढे अभिमानचि उरि रे ! ॥३॥

तुकड्यादास म्हणे ज्ञानाविण, सुख नसे दुसरे तरि रे ! ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP