भजन - १५१
पावो सदा यशाला, हा आर्य-धर्म माझा ।
वदवो प्रभू अम्हाला, 'हा आर्य-धर्म माझा' ॥धृ॥
सुत वायुचा प्रगटता, भानूसि छाव घाली ।
भूषवी अमीत भूला, हा आर्य-धर्म माझा ॥१॥
श्रीकृष्ण देवकीचा, कंसास ठार मारी ।
दावी रणात लीला, हा आर्य-धर्म माझा ॥२॥
श्रीराम दशरथाचा, सुखवी वनी ऋषींना।
करि ठार रावणाला, हा आर्य-धर्म माझा ॥३॥
शिवराय क्षत्रियाचा, करि नाश दुर्जनांचा ।
कर्कश दिसे रणाला, हा आर्य-धर्म माझा ॥४॥
ऋषि रामदास झाले, शुक नामदेव आले ।
बहु बोधवी जनाला, हा आर्य-धर्म झाला ॥५॥
गुरु ज्ञानराज माझे, महाराष्ट्र-संत गाजे ।
प्रभु-मार्ग दे जनाला, हा आर्य-धर्म माझा ॥६॥
बाणोनी त्याग अंगी, निज राजमार्ग सांगी ।
विसरे कधी न त्याला, हा आर्य-धर्म माझा ॥७॥
या आदि-अंत नाही, हा सर्व काळ राही ।
श्रृतिसंमती निमाला, हा आर्य-धर्म माझा ॥८॥
नांदो सदा सुखाने, जयमाळ घालुनीया ।
भगवे निशानवाला, हा आर्य-धर्म माझा ॥९॥
सेवेस चित्त लागो, तुकड्याहि आस वाही ।
पुरवो प्रभू ! प्रणाला, हा आर्य-धर्म माझा ॥१०॥
भजन - १५२
सत्संगि चित्त लावी, विसरू नको नरा रे ! ।
व्यसनास त्यागुनीया, सत्संग साध जा रे ! ॥धृ॥
कोणि न येति साथी, जग सर्व हे फुकाचे ।
गुरु-संत मार्ग दावी, घे बोध निर्मळा रे ! ॥१॥
सुत-दार चालतीचे, पडतीस येति मागे ।
कवडी न देति कोणी, मग रामची सखा रे ! ॥२॥
हा देह नष्ट वेड्या ! टाकोनि जाय जीवा ।
मग सांग काय नेशी ? अपुल्यासवे गड्या रे ! ॥३॥
तुकड्या म्हणे समज हे, गुरुच्या कृपाप्रसादे ।
हो साक्षि या जगाचा, तरि मुक्त होशि बा रे ! ॥४॥
भजन - १५३
शिव भूपतीस माझा, सांगा निरोप जा जा ॥धृ॥
महाराष्ट्र धैर्यशाली, करवा पुन्हा विशाली ।
तुमची प्रथा बुडाली, या या पुन्हा समाजा ॥१॥
तरवार ती भवानी, नेली दुजे लुटोनी ।
अडवावया न कोणी, धावोनि घ्या तिला जा ॥२॥
भगवे निशाण तुमचे, जाते कि काय गमते ।
बघवे न ते अम्हाते, ताटस्थ त्यासि राजा ॥३॥
विरवृत्ति नष्ट झाली, भेकाड वृत्ति आली ।
क्षत्रियता निमाली, अति बोलकाचि वाजा ॥४॥
तुकड्या म्हणे हि वाणी, कैलास भेदवोनी ।
जागोनि शूलपाणी, धाडो तुम्हास काजा ॥५॥
भजन - १५४
प्रभुची सखा जगाचा, मग अन्य कोणि नाही ।
तारील तोच आम्हा, भव-सिंधुच्या प्रवाही ॥धृ॥
प्रल्हाद बाळ कष्टी, हरिनाम नित्य घेता ।
प्रभु धावुनि तयासी, उचलोनि हाति घेई ॥१॥
ध्रुव हट्ट हा धरूनी, करि काननी तपस्या ।
प्रभु भेट दे तयासी, देतात ग्रंथ ग्वाही ॥२॥
अति दुःख द्रौपदीसी, त्या कौरवी सभेसी ।
हरि वस्त्र देइ लाखो, पुरवीत याचना ही ॥३॥
तुकड्या म्हणे गड्या रे ! विसरू नका तयाला ।
ध्याता तया पदासी, प्रभु सौख्य दे सदाही ॥४॥
भजन - १५५
मन हे चकोर अमुचे, तू चंद्र भाविकाचा ॥धृ॥
तव बोध वृत्तिला हो, मन हे तुलाच पाहो ।
मुख नाम-गुण गावो, हा प्रेम या जिवाचा ॥१॥
नच लालसा कुणाची, राज्यादिका धनाची ।
एक आस दर्शनाची, हा नेम या मनाचा ॥२॥
नेत्री तुला पहावे, पाहतेपणी रहावे ।
तुकड्याची हाक घ्या ही, हा भाव अंतरीचा ॥३॥