मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|

संत तुकडोजी महाराज - भजन ११६ ते १२०

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन - ११६

फोल ते संत आम्हासी, वागण्यावीण जे ज्ञानी ।

मुखे करि ब्रह्म-चर्चेला, पळे इंद्रीय अडरानी ॥धृ॥

'तयाविधि-नेम-ना' म्हणती, जरी चालोत ते कुरिती ।

शक्य हे होईना संता- 'कधी करतील मनमानी' ॥१॥

तयांना कर्म ना उरले, तरी ते जगति का उरले ? ।

भोगण्या भोग देहाचा, होतसे पाप का कळुनी ? ॥२॥

जगाच्या पाप-पुण्याची, जरी ना कल्पना त्यांना ।

खाति आणि राहती कैसे, चटुरे माल खावोनी ? ॥३॥

बुडविला धर्मची त्यांनी, भोंदुना वाव देवोनी ।

संत ना राहती ऎसे, सारिही ढोंगमय करणी ॥४॥

संत ते मानतो आम्ही, राहती संगती तैसे ।

तो तुकड्यादास सांगतसे, न इतरा ठाव द्या कोणी ॥५॥

भजन -११७

उभा का मंदिरी रामा ! पहा बाहेर येवोनी ।

गर्जती भक्त तव दारी, जरा तरि ऎक बा ! कर्णी ॥धृ॥

दुष्ट संहारण्याकरिता, तुझा अवतार तो होता ।

अता का जानकीनाथा ! दिसेना भूवरी कोणी ? ॥१॥

कितीतरि त्रास भक्तांना, कुणाला हाल बघवेना ।

मिळेना अन्न पोटाला, किती मरती दुखे प्राणी ॥२॥

ऊठ घे चाप धर हाती, असुर मर्दावयासाठी ।

राख बा ! लाज भक्तांची, न तुजविण दान दे कोणी ॥३॥

सांग हनुमंत ताताला, कि 'वर दे आपुल्या भक्ता ।

पाहशी अंत किती आता ? धरी तुकड्या सदा चरणी ॥४॥

भजन - ११८

निरशुनी बघ जरा देवा ! गती अमुच्या समाजाची ।

भारता भीक दे काही, बिघडली रीत रक्ताची ॥धृ॥

कुणाचा मान ना उरला, विषयरस धुंदसा भरला ।

कुणी दाता नसे उरला, हाव बहु धाव स्वार्थाची ॥१॥

प्रेम निष्कामि ना कोठे, भक्तिचे ये तनू काटे ।

जाति पापाचिया वाटे, ढसळली चाल लोकांची ॥२॥

साधुचे कोणि ना ऎकी, भोंदुपण वाढले लोकी ।

उसळली वृत्ती असुरांची, भाविकासी बहू जाची ॥३॥

म्हणे तुकड्या कली आला, निशाणी टेकला झाला ।

संति आधीच गौरविला, तशी झाली खुशी यांची ॥४॥

भजन - ११९

सुदिन हा संत-सेवेचा, सुभाग्ये लाभला आम्हा ।

मिळाली दर्शने काशी, निमाली वृत्तिची सीमा ॥धृ॥

सदा फुलबाग बोधाचा, दिसे फुलला मुखावाटे ।

रंगले ज्ञान-वन सारे, पसरला भृंगमय प्रेमा ॥१॥

निसर्गे शांतिची ज्योती, सदा झळके तया दारी ।

शिपायी कडक वैराग्ये, अखंडित साधिती कामा ॥२॥

स्तुती-निंदा उभ्या भिंती, दिसे बाहेरच्या मार्गी ।

घासती बोचती अंगा, जावया साधुच्या धामा ॥३॥

लीन तुकड्या तया पायी, दर्शने भ्रांतिही जाई ।

जन्म-मृत्यू नसे काही, विसरती भेद-भय नेमा ॥४॥

भजन - १२०

उठा रे आर्य पुत्रांनो ! चला सांगू प्रभुपाशी ।

प्रभु का कोपला ऎसा ? जरा ना सौख्य आम्हासी ॥धृ॥

उडाली भूमिची सीमा, पिकेना तिळभरी शेती ।

खर्च ही ना निघे काही, राहती लोक उपवासी ॥१॥

सदाचा त्रास हा देहा, गुलामी सान थाराला ।

नृपाचा धाक बहु मोठा, गांजितो फार जनतेसी ॥२॥

विषारी चित्त जनतेचे, पसरले वैर-वन सारे ।

निघाले वक्ष पापांचे, फळांच्या वाढल्या राशी ॥३॥

गुप्त हे जाहले साधू, भोंदुचा भार बहु झाला ।

नीतिशास्त्री-पुराणांची, फजिती वाढली खाशी ॥४॥

जगाला सौख्य तरि द्यावे, नाहि तरि मृत्यु अर्पावे ।

हाल हे नावरे आता, भारताची गती कैसी ? ॥५॥

म्हणे तुकड्या चला गाऊ, आपुली खास ही दैना ।

'सखा तो तारि भक्तासी', पुराणे गर्जती ऎसी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP