भजन - १४१
नटला हरि सुंदर विश्व कसा, मन मोहुनि ने बघता जिव हे ॥धृ॥
कुणि पंख सुरम्य दिसे म्हणुनी, मज दावित काननि या नटुनी ।
कुणि गोड स्वरे रव काढुनिया, मन रंगविती क्षण या ध्वनिनी ॥१॥
कुणि क्रूर मुखाते फाडुनिया, मनज दाखविती भय काननि या ।
कुणि दीन गरीब अम्ही म्हणुनी, पळती 'भ्या भ्या' हे वदुनीया ॥२॥
कुणि रम्य तुरंब फाकुनिया, वन साजविती मन लाजविती ।
कुणि सुंदर रंग सुगंध भरे, फुलवोनि फुले मजसी दिसती ॥३॥
अति सुंदर बाग दिसे असली, हरि ! जाण तुवा रचली सजली ।
तुकड्याची मती-गति कुंठुनिया, पहाता पाहणेपणिही बसली ॥४॥
भजन - १४२
रमले मन पंढरीराज पदी, न सुटेचि अता हा मोह जिवा ॥धृ॥
किती निर्मल कोमल पाउल रे, पाहताचि तनूचि सुध भुलते ।
डुलते जणु रूप विटे खुलते, फुलते फलते उरि रंग नवा ॥१॥
कटि साजे पितांबर सुंदरसा, जरदार जसा कनकासरिसा ।
शोभे जणु कौस्तुभ चंद्र जसा, फुलला उरि मंजरि-हार नवा ॥२॥
मकरकृति कुंडल हालतसे, शिरि रत्नमुकुट वरि मोर-पिसे ।
बघताचि विटेवर ध्यान असे, मन सोडुनि दे बहिरंग हवा ॥३॥
जणु सगुणरुपे परब्रह्मचि हे, पहायास सदा जिव ये अणि ये ।
तुकड्या म्हणे वाटे सोडु नये, तमनाशक हा किति गोड दिवा ॥४॥
भजन - १४३
गुरुराज कृपाकर ठेवुनिया, अजि ! चारितसे निजज्ञान-फळे ॥धृ॥
सत्वगुणी करवूनि भुमी, श्रध्दा-बिज पेरितसे मधुनी ।
सत्संग-जलाने ओलवुनी, तो बोध-तरूवर लावि बळे ॥१॥
शांति-दया अति कोमलसे, फुटती तरुसी त्या पल्लव हे ।
शाखा अष्टादिक भाव जया, संलग्न अती रमताति जुळे ॥२॥
भक्ति-फुलांचा भार बहू बहरावरि चित्त रमे भ्रमरू ।
आनंद मृदु पवनी डुलतो, सुख देत सदा तरु प्रेमबळे ॥३॥
ज्ञान-फळे अति गोड रुचे, रस सेवु मुखाविण त्या तरुचे ।
तुकड्या म्हणे घ्या रे ! ज्यास रुचे, या या पुढती, व्हा मुक्त बळे ॥४॥
भजन - १४४
चला पंढरी, पंढरी पहायासी । विटेवर उभा हृषिकेशी ॥धृ॥
कटेवरि कर, कर ठेवूनिया, वाट पाहतो म्हणतो 'या या' ।
दया ये तया, सर्व जिवाची या, कष्टतो भक्तांच्या कार्या ॥१॥
दासि जनीच्या, गोवरिया वेची, शेती राखतो सावताची ।
रसिद नेउनी, बेदरि दामाजीची, मडकी घडवित गोराची ॥२॥
सोडि वैकुंठ, वैकुंठ मूळपीठ, धरिली मृत्युलोकि वाट ।
भीवरे तिरी, बसवुनीया पेठ, उघडले दुकान चौहाट ॥३॥
खरेदी केली, पुंडलीके सारी, घेतला विकतचि गिरिधारी ।
भक्तिभावाने, काय त्याचि थोरी, आपण तरुनि दुजा तारी ॥४॥
अती आनंद, आनंद वर्णवेना, भक्त नाचति मिळुनि नाना ।
टाळ-तंबुरे, मृदंग-ध्वनि ताना, मारती रंगुनिया ध्याना ॥५॥
दास तुकड्याची मति कुंठित झाली, पाहता विठ्ठल वनमाळी ।
बघा एकदा, येउनिया जन्मा, करा सार्थक रे ! गा नामा ॥६॥
भजन - १४५
येउ दे दया, दया माय गंगे ! दाटला कंठ चंद्रभागे ॥धृ॥
नसे अधिकार, तव गुण गायासी, कितिक मम अंत सखे ! पाहशी ?
जन्म लाधला, लाधला असे पापी, दूर झालो गे ! तव, तापी ! ॥१॥
झरा प्रेमाचा, प्रपंच-ध्वनि रतला, गुंग आसक्तपणी सुतला ।
दृष्टि सामोरी, सामोरी करि माते ! घेइ दासासी निज हाते ॥२॥
कुणावर घालू, ओझे शरिराचे ?, कोण भागिदार दैवाचे ? ।
प्रसवली कशी, उदरी आम्हाते ? घेइ गे ! पदरी मज माते ! ॥३॥
दृष्टि फिरवूनी, जाळि कटाक्षासी, चाखवी निज-आनंदासी ।
दास तुकड्या हा, जगपाशे श्रमला, संग निःसंग भवी गमला ॥४॥