भजन - ६६
हरिभक्त लाडका हरिचा, ना दुजा कुणी ।
त्या मुक्त कराया येई, वैकुंठ सोडुनी ॥धृ॥
प्रल्हाद रक्षिला प्रभुने, वधुनि कश्यपू ।
दे मोक्ष गजेंद्रालागी, हटवुनी रिपु ।
पुरवीर चीर द्रौपदीला, रूप घेउनी ॥१॥
धरि लाज पांडवांचीहि रक्षिले तया ।
ध्रुव बाळ भक्ति करिता, त्या देत आश्रया ।
तुकड्या म्हणे हरी ध्या हो ! भक्ति करूनी ॥२॥
भजन - ६७
आवडली भक्ति आम्हा, हरिचीया पायिची ।
त्याविण ना सुख वाटे, या देहा अन्यची ॥धृ॥
तुटकीशी झोपडी ही गमते महालापरी ।
जव नांदे भक्ति-भावे, माझा तो श्रीहरी ॥१॥
कुंपण आणि बोरिबारी, गमतो हा बागची ।
तुळशीची दाट झाडी, शोभा ही स्वर्गिची ॥२॥
अम्हि हरिचे म्हणविताना, बहुमाना पावतो ।
ऎश्वर्य फोल सारे, त्याविण ते समजतो ॥३॥
जरि न मिळे अन्न खाया, ल्यायासी चिंधुडी ।
तुकड्याची रंगि रंगो, हरि-भक्ति चौघडी ॥४॥
भजन - ६८
मंजुळ हा नाद आला, हरिचीया बंसिचा ।
मनि गमले शोध घ्याया, आला तो आमुचा ॥धृ॥
त्या कळते सर्वभावे, अंतरिच्या ह्या खुणा ।
लपवोनी काय चाले, भानूच्या भानुना ॥१॥
तो दिसतो हा उभा या नेत्रांचे आतुनी ।
नाचतसे पाहुनीया, नामाची मोहनी ॥२॥
घन कांती फाकलीसे, निल अंगीचा झगा ।
मुकुटाचे तेज शोभे, किरणांना या बघा ॥३॥
अति जवळी येउनीया, हासतसे श्रीहरी ।
तुकड्याचा भाव प्रेमे, उसळी घे श्रीहरी ॥४॥
भजन - ६९
गुरु-बोधावाचुनीया, पथ नाही भुक्तिचा ।
बोधाने सुलभ होई, पथ प्रभुच्या भक्तिचा ॥धृ॥
विण भक्ती ज्ञान नोहे, प्रभुचीया सृष्टीचे ।
विण ज्ञाने व्यर्थ होते, कळणे हे व्यष्टीचे ॥१॥
जरि कळले देह-धर्मे, कळणेची ते नव्हे ।
जरि वळले एकपोटा, वळणेची हे नव्हे ॥२॥
म्हणुनीया संत गाती, गुरु-भक्ती सर्वदा ।
तुकड्याची हाक तेची, गुरु शोधावा सुदा ॥३॥
भजन - ७०
सुख दिसले डोळियाने, सांगो मी त्या खुणा ।
मज वाटे सुख नाही, हरी-भक्तीच्या विना ॥धृ॥
जरि द्रव्या साचवीले, परि चिंता पावते ।
भीतीने पाठि-पोटी, नच शांती लाभते ॥१॥
जरि घरचे भाग्य लाभे, स्त्री-सुखही मोहके ।
तरि मृत्यूच्या भयाने, दुःख होते दाहके ॥२॥
जरि स्त्री-धन दोन्हि लाभे, सौख्याच्या वाटणी ।
परि पुत्र ना तयासी, झुरती त्यावाचुनी ॥३॥
जगतीची वैभवे ही, लंगडी बा ! नाशती ।
तुकड्याची हाक घ्या ही, प्रभु-स्मरणी द्या मती ॥४॥