मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|

संत तुकडोजी महाराज - भजन ९१ ते ९५

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन - ९१

धरी निर्धार गुरु वचनी, भय हरेल या संसाराचे ॥धृ॥

ज्ञानामृत अंजन त्या नेत्री, नाशे पडळचि मोहाचे ।

षडविकार अंतरिचे नासुनि, प्रेम मिळे परमार्थाचे ॥१॥

गुरु-वचनी विश्वास धरूनी, किति तरले, तरती जगती ।

देव-ऋषी गुरुच्याचि प्रसादे, भव तरले निर्भयि साचे ॥२॥

तुकड्यादास म्हणे गुरुज्ञाने, प्रभुचे रुप हृदयीच मिळे ।

जळेल तम-अज्ञान मतीचे, मन रंगी हरिच्या नाचे ॥३॥

भजन - ९२

झणि आला हा घनश्याम, गमे हा भास जिवा ॥धृ॥

झुणु झुणु वाजति भूवरी पर्णे, कोकिळ गाती हर्षभराने ।

मयुर नाचती अति प्रेमाने, मन घेइल हे विश्राम । गमे हा० ॥१॥

नीलवर्ण आकाशी उठला, वाटे हरि गरुडावरि आला ।

झू-झू ध्वनि कर्णी आदळला, वाटली बंसिची तान । गमे हा० ॥२॥

किरण मंद पिंगटसे उठले, मंद मंद वायू हा चाले ।

झिलमिल पाणी सुरू जाहले, झाले इंद्रिय एकतान । गमे हा० ॥३॥

गर्व तरूवर हलती सगळे, ऎकति पशु काननिचे चाळे ।

तुकड्यादास म्हणे गोपाळे, उरि भेटतसे बेफाम । गमे हा० ॥४॥

भजन - ९३

मना वाटे, हरी ध्यावा कि गुरुचे पाय वंदावे ? ।

कोण ते श्रेष्ठ जाणोनी, शरण आधी कुणा जावे ? ॥धृ॥

प्रभू हा बोलिला शास्त्री, 'शरण जा माझिया भक्ता' ।

देव आणि भक्त हे दोघे द्वैत हे केवि मानावे ? ॥१॥

भिन्न मानू नये त्यांना, जये प्रभु दाविला सत्ते ।

धन्यता संतसेवेची, किती उपकार वानावे ? ॥२॥

देव मानी तया भक्ता, भक्त देवा सदा ध्याती ।

कळेना गुह्य हे त्यांचे, कुणा सरसावुनी घ्यावे ? ॥३॥

निभविली आस तुकड्याची, गुरूने देव दावोनी ।

तया मी श्रेष्ठ मानावे, मने हे घेतले भावे ॥४॥

भजन - ९४

प्रपंचहि का असा व्हावा ? जिथे हरिचे नसे नाम ।

कृपाळू श्रीहरीने हो ! दिले नरकायि शुभ काम ॥धृ॥

मनाची धाव ती सगळी विषय-भोगतची लोळे ।

कुठे करतील तप भोळे ? नसे एका मुखी 'राम' ॥१॥

मनी घरदार हे खळे, म्हणे 'कोठे गडी सगळे ?' ।

सदा धन-संपत्ती लोळे, पहाया वाढला नेम ॥२॥

'मला हे द्या, मला हे द्या, मला द्या सर्व घरदार ।

बुडविले यातची थोर, कशाचा तो पुढे श्याम ? ॥३॥

प्रपंच लावुनी आस, स्व-घरचा सोडला ध्यास ।

म्हणे तुकड्या तया नाश, कधी ना भेटतो राम ॥४॥

भजन - ९५

चला हो ! पंढरी जाऊ, जिवाच्या जिवलगा पाहू ।

भीवरे स्नान करुनीया, संत-पद-धूळ शिरि लावू ॥धृ॥

बोधरुप तुळशिच्या माळी, श्रवण-मणि चंदनहि भाळी ।

करू मननाचिया चिपळी, निजध्यासे हरी गाऊ ॥१॥

आत्मरुप-देव बघताना, हरे मन-भावना नाना ।

प्रकाशे ज्ञानदिप सदना, सोहळा डोळिया दावू ॥२॥

विठू सर्वत्र घनदाट, पंढरी विश्विची पेठ ।

दुजा नाहीच वैकुंठ, सदा येथेचि दृढ राहू ॥३॥

न मरणे, जन्मणे आम्हा, न भेदाभेदही कामा ।

म्हणे तुकड्या घनश्यामा-पदांबुजि शीर हे वाहू ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP