मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|

संत तुकडोजी महाराज - भजन १२६ ते १३०

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन - १२६

भारता ! बलवान व्हाया, वाचवी जिव गायिचे ॥धृ॥

लोभ हा सोडी वृथा, का मांस विकसी तू तिचे ? ।

चाटुनी नख-पाउला, सुख पावशी का दूरचे ? ॥१॥

भारताचे पुज्य जे, अवतार कृष्णादीक हे ।

सांगती का हे तुम्हा ? 'घ्या प्राण अपुल्या आईचे' ॥२॥

याद ही ठेवा मनी, या भारताच्या बंधुनो ! ।

पुण्य हे फळले अम्हा, त्या अजवरी निज मायिचे ॥३॥

दास तुकड्या सांगतो, विसरू नका हो गायिला ।

घ्या दूध, निर्भय होउनी, मिळवा अमरपद स्थायिचे ॥४॥

भजन - १२७

भारती रहवासियांनो ! वाचवा जिव गायिचा ॥धृ॥

सांगतो इतिहास ऎसा, भारताच्या ग्रंथिचा ।

'बहुमोल आम्हा गाय हे, जणु प्राणची मम आईचा' ॥१॥

देश हा कृषि-उद्यमाचा, भोवताली वेष्टिला ।

धान्य बहु पिकती फळे, हा भाग त्या गो-मायिचा ॥२॥

कष्ट साहुनि देतसे, दहि-दूध-लोणी ही जशी ।

पुत्र देउनि आपुला, वाहवीतसे भर शेतिचा ॥३॥

दास तुकड्या सांगतो, शोधोनि पाहावे बुध्दिने ।

जीव का वधता तिचा ? हा घात निश्चयि आमुचा ॥४॥

भजन - १२८

चला हो ! चला पंढरीला ।

विठ्ठल राजा वाट पाहतो, जिवा तारण्याला ॥धृ॥

कुणीही भाविक जरि गेला ।

शांतवि त्याच्या जिवा, देउनी अमर धाम त्याला ॥१॥

सुखावे सगुण रूप बनला ।

उभा विटॆवरि, कटावरी कर, बघतो दासाला ॥२॥

भीवरेतिरी वास केला ।

भक्त-जनांच्या-भक्ति-सुखाने, तिथेच स्थिर झाला ॥३॥

पुंडलिक-सेवा बघण्याला ।

आला तै पासुनी हरी हा, मूळ गाव भुलला ॥४॥

रंगला भाविक-भजनाला ।

ज्ञानोबाचे सुरस काव्य हे, आवडले त्याला ॥५॥

पाहुनि भक्ती गहिवरला ।

नामासंगे हरी कीर्तनी, देवपणा भुलला ॥६॥

नाचतो थै-थै रंगाला ।

संत तुकाचे प्रेम पाहुनी, राखी शेतीला ॥७॥

जनीच्या वेचत शेणीला ।

गोरोबाची घडवित मडकी, अती हर्ष त्याला ॥८॥

किती सांगू हरिची लीला ?

भक्त-काम-कल्पद्रुम भक्तासाठी महार झाला ॥९॥

खजाना नेइ बेदरीला।

दासासाठी त्या यवनाच्या जात सलामीला ॥१०॥

प्रीय हा एकनाथ त्याला ।

घेउनिया रुप तया घरी वाहतो कावडीला ॥११॥

भक्त चोखोबा प्रिय झाला ।

ओढू लागे ढोर तयासी, नाहि जात याला ॥१२॥

असा हा ठेवा भक्ताला ।

न सांगताची करितो कामे, ठावुक सकलाला ॥१३॥

जवळ हा आहे पंढरीला ।

उठा उठा रे ! चला पहाया या आषाढीला ॥१४॥

मेळ संतांचा बहु जमला ।

धो-धो वाद्ये कर्ण-तुतारी, सैन्यभार आला ॥१५॥

जणू या मृत्यू-लोकाला ।

तुकड्यादास म्हणे वैकुंठचि, ठाव खरा गमला ॥१६॥

भजन - १२९

करा रे ! कृष्ण गडी अपुला ।

मिटे न मैत्री जन्म-जन्मि ही, देह जरी गळला ॥धृ॥

फुकाचे नाम जपा त्याचे ।

धन-संपत्तिस वाण न राहे, लक्ष्मि घरी नाचे ॥१॥

लावता चित्त तया पायी ।

अखंड अमृत-झरा जिवाला पावे लवलाही ॥२॥

धरिता ध्यान सगुण त्याचे ।

विश्व ब्रह्म हे कृष्णचि जिकडे तिकडे जगि भासे ॥३॥

देह अर्पिता तया चरणी ।

वैकुंठाचे राज्य मिळे, करिती जन मनधरणी ॥४॥

जरासे देता अति भेटे ।

तुकड्यादास म्हणे कानी घ्या, लक्षि धरा नेटे ॥५॥

भजन - १३०

पुनित हा देह करू आपुला ।

बहु कष्टाने बहु पुण्याने प्राप्त अहो ! झाला ॥धृ॥

खोविता देहाची वेळा ।

कोटी धन वेचता मिळेना दुरावोनि काळा ॥१॥

अमोलिक देहाची संधी ।

हरि नामाने पुनित करू या, लागू प्रभु-छंदी ॥२॥

चला रे ! चला उठा वेगे ।

संत-महंतहि अनुभवि गेले, जाऊ त्या मार्गे ॥३॥

म्हणे तुकड्या या भक्तीने ।

संत तुकोबा साधुनि गेला देवाच्या धामे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP