भजन - १५६
नर-जन्म खोवुनीया, मग पावशी अपाया ॥धृ॥
स्वातंत्र्य यात पावे, कर्तव्य साधण्याला ।
जाताचि वेळ वाया, मग काळ ये धराया ॥१॥
साथी न कोणि येई, जिव जातसे दुखाने ।
चौर्यांशि भोगताना, बहु कष्टि होत काया ॥२॥
अति गर्भवास जीवा, ना शांतिचा सुगावा ।
घेता नये विसावा, अन्यत्र जन्मुनीया ॥३॥
तुकड्या म्हणे गड्या रे ! समजोनि पाय टाकी ।
'करशील तेचि भरशी', ही याद ठेवुनीया ॥४॥
भजन - १५७
राहता नये जगी या, भोळीव दाखवोनी ! ॥धृ॥
अति क्रूर षड् विकारे, जिव घाबरे थरारे ।
संसार हा बिकटची, वाटे तरे न कोणी ॥१॥
जनलोक त्रास देती, नच संत-संग साधे ।
व्यसनात रमविण्याला, बहु संगि ये दुरूनी ॥२॥
वैराग्य अंगि येता, पळती दुरी उरीचे ।
खाती लुटोनि सगळे, अति प्रेम दाखवोनी ॥३॥
तुकड्या म्हणे रहावे, जग लावुनि जगी या ।
आसक्ति तोडुनिया, सत्कर्म हे करोनी ॥४॥
भजन - १५८
सुख-दुःख भोग सारे, चुकती न हे कुणाला ।
हो संत देव साधू , राजा किंवा प्रजेला ॥धृ॥
केले तसे भरावे, मनि शांत होत जावे ।
प्रभु-नाम गात जावे, समजावुनी मनाला ॥१॥
एक वेळ तूप-मांडा, एक वेळ भूस-कोंडा ।
देऊनि राहि पिंडा, जो भोग दैवि आला ॥२॥
कधि शाल-जोडि अंगी, कधि भूषणेहि जंगी ।
कधि अंग डोकि नंगी, सांगो तरी कुणाला ? ॥३॥
तुकड्या म्हणे 'करावे, तैसेचि हे भरावे' ।
प्रभुला समर्पुनीया, सेवु सुखे तयाला ॥४॥
भजन - १५९
गंगे ! तुझ्या तिराला, मन हे निवांत राही ॥धृ॥
किति शांत धार वाहे ? पाणी अथाह राहे ।
पापी जलात न्हाये, घे सौख्य तो सदाही ॥१॥
वाद्ये अनंत वाजे, किति चौघडे नगारे ।
बहु भक्त येति भोळे, शोभा अगम्य पाही ॥२॥
पितरास स्वर्गि न्याया, जणुं नाव तू तयांची ।
देवोनि अस्थिका ही, जन ठेवतात ग्वाही ॥३॥
योगी-मुनी तिराशी, धरुनी बसे समाधी ।
तुकड्या म्हणे तुझ्या या, तिरि मोक्षची सदाही ॥४॥
भजन - १६०
योगी करी समाधी, रंगोनि अंतरंगी ॥धृ॥
साधोनि कुंभकाला, ब्रह्मांड-शोध घेती ।
राहती निवांत तेथे, त्रिकुटी सदा निसंगी ॥१॥
षड्चक्र-भेद पावे, तनु-अंतरंगि जाता ।
जिव हा सदा सुखावे, स्वरुपी तया अभंगी ॥२॥
मन उन्मनी स्थिरावे, भ्रम-भेद हा विरोनी ।
अमृत-कुंड पावे, अति गोड-गोड गुंगी ॥३॥
अति स्वर्गतुल्य शोभा, पावे तनूत योगी ।
तुकड्या म्हणे बघा हे, मग जन्ममरण भंगी ॥४॥