मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|

संत तुकडोजी महाराज - भजन १२१ ते १२५

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन - १२१

हिंदभुच्या लेकरांनो, स्वस्थ का बसता असे ? ।

भारताचे ग्रहण हे, नेत्री तुम्हा बघवे कसे ॥धृ॥

मार्ग काढा उन्नतीचा, या पुढे सरसावुनी ।

भेद-भावा सोडुनी, घ्या प्रेम-ऎक्याचे पिसे ॥१॥

जीर्ण ज्या चाली-रिती, डोळे मिटवुनी ना करा ।

वेळ ही पाहोनिया, कर्तव्य शोधा सायसे ॥२॥

आचरा सुविचार-वृत्ती, अनुभवाला घेउनी ।

अंध-श्रध्दा सोडुनी, व्यवहार साधा धाडसे ॥३॥

राहु द्या सत्प्रेम चित्ती, श्रीहरीसी गावया ।

नांदु द्या विजयी ध्वजा, द्या प्राण समरी वीरसे ॥४॥

दास तुकड्या सांगतो, काढा घरातुनी आळसा ।

काव्य बनवा आपुले, स्वातंत्र्य जे लाभे तसे ॥५॥

भजन - १२२

हिंदभूच्या भाविकांनो ! आत्मबल मिळवा अता ।

भ्याड वृत्ती सोडुनी, हृदयी धरा बुध्दीमत्ता ॥धृ॥

हात जोडुनी का असे हो ! 'धर्म धर्म' चि बोलता ? ।

बोलणे हे सोडुनी, दावा स्वधर्माची सत्ता ॥१॥

अंतःकरणे मोकलोनी, एक व्हा एकी करा ।

संप्रदाय नि पंथ हे, विसरूनी घ्या कर्तव्यता ॥२॥

देव सर्वांचा सखा, आम्ही तयाची लेकरे ।

भेद मग का कोरडा ? जाळा जशी जळते चिता ॥३॥

दिव्य ज्योती चमकु द्या, भानू जसा रविमंडळी ।

अर्जुनासम वीर व्हा, हा वेळ ना दवडा रिता ॥४॥

दास तुकड्या सांगतो, ही वेळ जाता आळसे ।

रूढि ग्रासिल आपुली, जाईल ही स्वातंत्र्यता ॥५॥

भजन - १२३

वाहते किति सौम्य तू, तुज शांतता कोणी दिली ? ।

द्रोह ना तव अंतरी, गंभीर वृत्ती शोभली ॥धृ॥

कोटियांचे पाप वाहता, शीण ना तुजसी जरा ।

मुक्त करिशी पूर्वजाते, स्वर्गिची जणु माउली ॥१॥

शुध्द किति तव प्रेम गंगे ! ना कुणासी मागशी ।

जगविशी हे विश्व सारे, सोडुनी झरणे खुली ॥२॥

भाग्य किति तरी थोर त्यांचे, जे तुझ्या तटि राहती ।

ईश्वराच्या पूजना, जणु तूच त्यांची वाटुली ॥३॥

निर्मिली वेली-जुळे, तट साजिरा करवूनिया ।

शालु हा जणु नेसुनी, प्रिय भक्त पाहण्या चालली ॥४॥

दास तुकड्या चिंतितो, तुज भेटण्यासी एकदा ।

उघडुनी पट भेट दे गे ! धन्यता मज लाधली ॥५॥

भजन - १२४

भाविकाच्या भक्तिचा, नच पंथ कोणी पाहिला ।

प्रेम हा निरपेक्ष त्याचा, सर्वदेशी राहिला ॥धृ॥

विश्वव्यापी देव त्याचा , बाहिरी अणि अंतरी ।

पूजना हे कार्य त्याचे, देह त्यासचि वाहिला ॥१॥

सर्व पंथही होत त्याचे, शुध्द जे राहती जगी ।

ना दुजा कधि भाव त्याचा, 'मी भला, माझा भला' ॥२॥

रंजल्यासी गांजल्यासी, 'आपुले' म्हणवूनिया ।

कष्टतो सुख द्यावया, करि प्राण खर्चहि आपुला ॥३॥

अखिल जग हे मंदिरासम, मानुनी सेवा करी ।

तुकड्या म्हणे तो धन्य साधू, जो जगी या गाइला ॥४॥

भजन - १२५

विश्वव्यापी प्रेम शिकण्या, न्याल का मजला कुणी ? ।

दाखवा तरि ठाव तो, बहु आवडे माझ्या मनी ॥धृ॥

कोणि ना परका दिसो, मज तीनलोकी पाहता ।

द्रोहता ही नष्ट हो, वर द्याल का मजला कुणी ? ॥१॥

जो दिसे तो आपुलाची, पाहता अणि राहता ।

भेद हा जाई लया, स्थळ दाखवा ऎसे गुणी ॥२॥

धर्म कोणीही असो, वा देश कोणीही असो ।

शुध्द प्रेमा एक होवो, हो धनी या निर्धनी ॥३॥

दास तुकड्या सांगतो, मज त्याविणा नच चैनही ।

भेटवा या पामरा, जिव बावरा झाला मनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP