भजन - ३६
चल ऊठ हरी ! तव झोप द्वाड ही आम्हा ! करु ना दे कामाधामा ॥धृ॥
तू निजला रे ! नीजरूप घेवोनी, टेकती असूर निशानी ।
कुणि कोणाला ना पुसती अभिमानी. निती सोडलि ज्यांनी त्यांनी ।
ऋषि गोंधळले मठी मंदिरी रानी. त्रासले कामदेवानी ।
(अंतरा)
मातामरि सुटल्या गावा ।
खंडोबा भैरवबाबा ।
काँलरा प्लेग वाघावा ।
उघड रे हरी ! नेत्र जरा घनश्यामा ! करु ना दे कामा धामा ॥१॥
बघ लोकांची दैना ही अति भारी, अन्नान्नि मरति नरनारी।
दुःखद विघ्ने कोसळताती सारी, जनता ही जर्जर भारी ।
बहु चोरांची दाटी, डाके-मारी, नाटके तमाशे द्वारी ।
(अंतरा)
पेटती अग्निच्या ज्वाला ।
धरणिकंप होतो भू-ला ।
अति पूर नदी-नाल्याला ।
पहा पहा जरा मधुसुदन विश्रामा ! करु ना दे कामा धामा ॥२॥
तव गोधन रे ! असुरांनी कापाचे, तुज नेत्रि कसे हे बघवे ? ।
तव भारतभू पारतंत्र्य गाठावे, शोभते कसे हे बरवे ? ।
(अंतरा)
निंदक भक्ता छळताती ।
कोणि ना कुणाला पुसती ।
ऋतु काळवेळ ना बघती ।
ना सोसवते दुःख सख्या घनश्यामा ! करु ना दे कामा धामा ॥३॥
करि पावन रे ! जीव दशे हे पडले, पाहण्या तुला जे अडले ।
रुप दाखिव रे ! ध्यान जयांचे नडले, तव प्रेम अंतरी जडले ।
योगींद्र मुनी सनकादिक हे आले, दर्शनार्थ उत्सुक झाले ।
(अंतरा)
चल ऊठ येइ सामोरी ।
मिटवि या तमाची थोरी ।
सुखवि ह्या भक्त नरनारी ।
दे तुकड्याला तव पद-पंकज-प्रेमा, करु ना दे कामा धामा ॥४॥
भजन - ३७
असुरासी मानवबाणा, पुरवील आस ही कोणा ! वाटते ? ॥
ज्या दया-मया मुळि काही, उपजली जराशी नाही । क्षणभरी ॥
इतिहास मागचा ऎसा, वाचुनी पहा थोडासा । बंधुनो ! ॥
(अंतरा)
जे दुष्ट, मनाचे भ्रष्ट , राहती स्पष्ट ।
दया ना त्यांना, दया ना त्यांना ।
सोडतील कैचे प्राणा, आपुल्या ? ॥१॥
मानवी बुध्दिचे पाश, होतील क्षणि तरि नाश । खात्रिने ॥
होईल त्रास थोडासा, परि दयार्द्रता गुण साचा । मानवी ॥
क्रोधे जरि मनि जळजळला, तरि सारासारे वळला । शूर तो ॥
(अंतरा)
परि क्रूर, न होई दूर, त्रास दे फार ।
गांजिती नाना, गांजिती नाना ।
पाहती लवविण्या माना, आमुच्या ॥२॥
भस्मासुर जव बल दावी, तव युक्ति प्रभुस शोधावी । लागली ॥
घाबरले शंकर भोळे, पळती त्या रानोमाळे । पाहुनी ॥
मदमत्त हत्तिसम झाला, मरणास्तव बुध्दि त्याला । फावली ॥
(अंतरा)
विष्णुनी, वेष घेउनी, बनुनी मोहिनी ।
गर्वि असुरांना, गर्वि असुरांना ।
जाळिले त्याचि हातांना, लावुनी ॥३॥
हा आजवरीचा खेळ, मग मिळेल कैचा मेळ । आमुचा ? ॥
यासाठी एकचि आहे, सुचतो मज तो सदुपाय । अंतरी ॥
दैवि-शक्ति प्रगट करावी, अभ्यासे हृदयी ल्यावी । आपुल्या ॥
(अंतरा)
मग राम, पुरवि हे काम, देइ आराम ।
भक्त लोकांना, भक्त लोकांना ।
मानवा मिळे जिवदाना, निश्चये ॥४॥
धर्माची इभ्रत जावी, मंदिरे स्मशाने व्हावी । पाहता ॥
अबलासि क्रूर भेटावे, सति-सेव दुजाकरि जावे । पाहता ॥
गाइचे रक्त वघळावे, नेत्रांनी आम्हि बघावे । पाहता ॥
(अंतरा)
हे कसे, शोभते असे ? दुःख मरणसे ।
दया हो प्राणा, दया हो प्राणा ।
का दया तुम्हा यावी ना, बंधुनो ! ॥५॥
या उठा उठा सगळेची, आळवा प्रभू-हृदयासी । गर्जुनी ॥
तो सखा आमुचा आहे, संकष्टी भक्ता राहे । रक्षुनी ॥
'धावुनी ये' ब्रिद हे त्याचे. पाहिजे आर्त जीवांचे । सर्वही ॥
(अंतरा)
मग चक्र, धरी करि शक्र, चिरोनी नक्र ।
पाडि असुरांना, पाडि असुरांना ।
हा त्या देवाचा बाणा, सर्वथा ॥६॥
चाहुल द्या लागू कानी, सांगू त्या प्रभुसि कहाणी । आपुली ॥
अपराधाविण मनुजांना, मारणे शास्त्र हे कोणा । सांगते ? ॥
'आपुले हक्क मिळवावे, न्याये' हे कथिले देवे । अजवरी ॥
(अंतरा)
मग पाश, कसा आम्हास, बनवितो दास ।
प्रभु असताना, प्रभु असताना ?
तुकड्याची वार्ता कानी, घ्या जरा ॥७॥
भजन - ३८
भारत-तरुणांच्या कानी, ऎकवा हाक जोरानी । बंधुनो ! ॥धृ॥
सांगा मम कहाणी त्यांना, चुकवा देशाची दैना । आमुच्या ॥
सोपले तुम्हावर त्यांनी, शिव छत्रपति राजांनी । शेवटी ॥
(अंतरा)
या उठा निर्भये दटा, भूमि चोर्हाटा ।
धरा गाठोनि, धरा गाठोनी ।
धरि राहु नका रे ! कोणी बंधुनो ! ॥१॥
रक्त हे देशभक्तीचे, उसळवा वीर-शक्तीचे । आपुल्या ॥
घ्या करा संघ निर्माण, धर्माकरिता द्या प्राण । अर्पुनी ॥
ज्वानीच्या कर्तव्याला, द्या ज्योत चेतवा ज्वाला । धावुनी ॥
(अंतरा)
फडकवा, रंग भगवा, करोनी नवा ।
दिवा लावोनि, दिवा लावोनी ।
या या रे ! पुढती कोणी, तरुण हो ! ॥२॥
'दीनावर हल्ला करणे, हे पाप घोर' थोराने । वर्णिले ॥
'दुष्टासी दंडण देणे, हे पुण्यमयाचे लेणे' । वर्णिले ॥
हे ज्ञान सांगते गीता, मग का ऎसे रे ! भीता ? तरुण हो ! ॥
(अंतरा)
घ्या मनी, उठा जागुनी, प्रभू तो धनी ।
जिवी चिंतोनि, जिवी चिंतोनी ।
तुकड्याची वार्ता कानी । घ्या जरा ॥३॥
भजन - ३९
व्हा पवित्र अपुल्या देही,
याविण मार्ग कुणि नाही । शांतिचा ॥धृ॥
आचरा तसेची लोकी, होउनी मनी निःशंके । सर्वही ॥
स्वच्छता घराची ठेवा, शेजार तसाची करवा । आपुला ॥
कैचणे उकिरडे काढा, मळ होइल हृदयी गाढा । त्यासवे ॥
जा दिशेस दुर गावाच्या, ना बसा जवळ कोणाच्या । खंडरी ॥
(अंतरा)
आपुल्या परीच लोक हे, समजणूक हे,
धरुनि रहा हि, धरुनि रहा ही ॥ याविणा० ॥१॥
पावित्र्य आचरे अंगी, तो भक्त म्हणा सत् संगी। रंगला ॥
तो थोर म्हणा वृत्तीचा, पावित्र्याचि आश्रम ज्याचा । वर्तनी ॥
स्वच्छ खादि अंगी घाली, हाताने कष्टुनि केली । जाणुनी ॥
गायिसी मनोभावाने, पाळितो स्वतः अंगाने । लक्षुनी ॥
(अंतरा)
घरि सडा, पडे धडधडा, बनुनि निर्भिडा,
झाडि मार्गाहि झाडि मार्गाहि,
मज गमे मिळत स्वर्गाही, त्यागुणे ॥२॥
पावित्र्य रूप देवाचे, पावित्र्य अंग दासाचे । सर्वया ॥
तुळसी-वृंदावन दारी, भरि रांगोळी जरदारी । चमजती ॥
घर आजुबाजुनी साफ, ना जरा काटि आणि कुंप । सडविले ॥
अरुणोदय होण्यापूर्वी. कामे आटोपी सर्वी । आपुली ॥
(अंतरा)
धन्य तो, घरधनी भला, दिसतसे मला,
मनी ममताहि, मनी ममताहि,
ज्या मत्सर तिळही नाही, अंतरी ॥३॥
बघताच पहाटे कोणी, आटपली स्नाने ज्यांनी । आपुली ॥
गीतापाठासी बसला, घालितो नमन सूर्याला । दंडसे ॥
धरि पुत्र-पौत्र सर्वांना, शिकवीत आपुला बाणा । बोधुनी ॥
अहो ! करा आचरा ऎसे, तरी भक्त बना देवाचे । निश्चये ॥
(अंतरा)
ना तरी, बोलणे परी, न घरी आचरी,
थोर तो नाहि, थोर तो नाही,
ज्या शुध्द भावना काही, ना वसे ॥४॥
तुकड्याची ऎका वार्ता, हा प्रसंग कानी पडता । आचरा ॥
आचरा नि दुसर्या सांगा, सकळ गावि ऎसे वागा । बापहो ! ॥
तरि वाट मिळे शांतीची, खुंटेल रीत भ्रांतीची यामुळे ॥
घ्या कर्म आपुले हाता, व्हा तयार गावाकरिता । आपुल्या ॥
(अंतरा)
सांगुनी, सतत वर्तुनी, प्रेम देउनी,
बना हो ! ग्वाहि, बना हो ! ग्वाही,
तरि देव सुखाला देई, आमुच्या ॥५॥
भजन - ४०
हा खेळ प्रभूच्या घरचा, मिटवाया हात कुणाचा । ये पुढे ? ॥धृ॥
ही निसर्ग बागहि त्याची, तोडाया छाति कुणाची । ये पुढे ? ॥
मोलाविण अग्नि-पाणी, देतो या लोकी कोणी । ये पुढे ? ॥
(अंतरा)
हा नसे, नसे परि दिसे, भास व्यर्थसे,
खेळ मायेचा, जाणता कोणहो याचा ? ये पुढे ॥१॥
स्तंभावीण रचना केली, गवसली बुध्दिची खोली । कोणत्या ? ।
पाण्यावर रचले भूला, साधते काय मनुजाला । कोणत्या ? ॥
रवि-चंद्र-तारका अधर, जडविता आलि का कोर । कोणत्या ? ॥
(अंतरा)
सागरा, ऊत ये पुरा, ऊर्मिसी झरा ।
वाहतो कैचा ? पाहणारा 'साक्षी' याचा । ये पुढे ॥२॥
कोण या-मुळाशी आहे ? हे बघता खाली हाय । जाणते ॥
हा जड-चैतन्य विवाद, जाणती योगि संवाद । जाणते ॥
'एकाच शक्तिची वेली, गुंफलि' ही जाणे बोली । जाणते ॥
(अंतरा)
तो हरी, निराळा दुरी, दिसेना वरी ।
परी सर्वांचा, भेद हा जाणता त्याचा । ये पुढे ॥३॥
एकाच जिवाने केली, परि भिन्न-भिन्नता झाली । लोकि या ॥
कुणि सूर-असूर बनावे, कुणि खावे, कोणि द्यावे । लोकि या ॥
कुणि सुखी दुःखि कुणि भोगी, कुणि राहति जन्मी रोगी । लोकि या ॥
(अंतरा)
ह्या खुणा, जाणि तो म्हणा, खरा शाहणा ।
पुत्र सद्गुरुचा, तुकड्यास प्रेम हा त्याचा । ये पुढे ॥४॥