दमयंती स्वयंवर - पृष्ठ ११

रघुनाथ पंडित यांच्या काव्यात इतके माधुर्य व इतका रस आहे की, ते आरंभापासून शेवटापर्यंत वाचल्यावाचून मनाची तृप्ति होत नाही व एकदा वाचले म्हणजे पुनः वाचावेसे वाटते.


वसंततिलका

काही उडोनि गगनी मग नीट येतो । नाहींच दूर, न समीप, तसा बसे तो ॥

पाहे सुधाकर-मुखी कलहंसराया । लाहे मनोरथ तयास पुन्हा धराया ॥१०१॥

सवाई

'हंस धरीन म्हणोनि मनोरथ हा मज होय विनोद तुम्हांला ।

याल हंसाल पिटालहि ताल पुन्हा उडवाल तया विहगाला ।

जा परताच तुम्ही नलगेत,' असे वदुनी नृपराजसुता ते ।

राहविलाच सखीजन, आपण मात्र तयास धरू मग जाते ॥१०२॥

वसंततिलका

रागेजली अरुणकांति विराजवीते । हे येकली सुतनु चंद्रकला जसी ते ॥

गेली हळूच कलहंस समीप केला । काही पुढे फटकला अवलोकिजेला ॥१०३॥

आणीकही पद न वाजत मंद चाले । जे चालता पदर सांवरिला न हाले ॥

हेही करी निजकरी खग सांपडेसी । तोही हळूहळूच होय पलीकडेसा ॥१०४॥

मालिनी

मद-गज-गमनेने मागुती चाल केली । विनततनुलता हे तत्समीपास गेली ॥

पुनरपि फटके हा फारसा दुर नाही । जवळि कवळिजेसा भासला हंस काही ॥१०५॥

पद

हंस धराया लागली हे भागली ॥धृ०॥

मृदुल तनू कोमेजली घामेजली ॥१॥

चाली करूनि न सावलीत विसावली ॥२॥

स्तविली रघुपति पंडिते कृति-मंडिते ॥३॥१०६॥

वसंततिलका

हंसे तसी चतुरसंमत युक्ति केली । ते चाळवीत सुतनू बहु दूर नेली ॥

छाया तियेसि दुसरी, तिसरी वनाळी । जे सोवळी युवतितुल्य दिसे निराळी ॥१०७॥

प्रमाणिका

तया वनांत येकली । विलासिनी विलोकिली ॥

मदे भरोनि बोल तो । तियेस हंस बोलतो ॥१०८॥

दण्डी

'भूमिभागी फिरणार तू, तुला मी । कसा सापडेन सांग गगनगामी? ॥

बाळ, बाळे! जरि होय चंद्रकामी । हस्त त्याचा लागेल काय सोमी? ॥१०९॥

कसे नांदे तारुण्य तुझ्या देही । बाल्य तेणे गेलेच नसे काही ॥

उगवतांही सहस्त्रभानु पाही । काय नलिनीसंकोच जात नाही? ॥११०॥

'असो, सापडतो तुझ्या करामाजी । पुन्हा सुटका करितेस काय माझी? ॥

कसा पातेजू बाळबुद्धि तुझी? । स्त्रीस्वभावे बहु आणशील बाजी ॥१११॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP