दमयंती स्वयंवर - पृष्ठ १

रघुनाथ पंडित यांच्या काव्यात इतके माधुर्य व इतका रस आहे की, ते आरंभापासून शेवटापर्यंत वाचल्यावाचून मनाची तृप्ति होत नाही व एकदा वाचले म्हणजे पुनः वाचावेसे वाटते.


श्रीगणेशाय नमः ॥

शार्दूलविक्रीडित

पुण्यश्लोकनृपावळीत पहिला होवोनि जो राहिला ।

जो राजा असता समस्त महिला, विश्रांति शेषाहिला ॥

व्यासोक्ते अवगाहिला बुधगणी नाना गायिला ।

जो नामे नळ तत्कथौघ लिहिला तो पाहिजे पाहिला ॥१॥

गीती

इंद्रादिक वर असता कसी नलसतीच होय दमयंती ।

सुंदर सकळ वधूंते कसी न लसतीच होय दमयंती ॥२॥

दण्डी

कथा बोलू हे मधुअसुधाधारा । होय शृंगार करुणरसा थारा ॥

निषधराजा नळनामधेय होता । वीरसेनाचा तनय महाहोता ॥३॥

चौगुणीने जरि पूर्ण शीतबानू । नळा ऐसा तरि कलानिधी मानू ।

प्रतापाचा जो न मालवे भानू । तयासमान कोण? तया वानू ॥४॥

वसंततिलका

चंद्रासि लागति कळा उपराग येतो । गंगेसि भंग बहु पाणउतार होतो ।

जे होय चूर्ण तरि मौक्तिक ते कशाला? । नाही समान नळराजमहायशाला ॥५॥

शा०वि०

वाजीचे मन जाणता सकळही राजी शिपायी जया ।

याजी होउनि जो द्विजांसी म्हणतो 'या जी धने घ्यावया' ॥

त्याजी धनदापरी सुकृत जे त्या जीव ऐसे गणी ।

गाजी तो नळभूप हूप धरुनी गा जी गुणांच्या गणी ॥६॥

दण्डी

लोकबंधू जो होय रवीऐसा । कुवलयाचा जो सुखद चंद्र जैसा ॥

सांग नाही जो कुसुम-चाप तैसा । निषधरायासी तुल्यरूप कैसा? ॥७॥

गीति

नाडिज्ञान जया जे सरोगबंधू चतुष्पद गणावे ।

सुत ते जी तुरग्चे नळसम सुंदर कदापि न म्हणावे ॥८॥

शिखरिणी

कदा नेणो वोढी शरधिंतुनि काढी शर कदा ।

कदा धन्वी जोडी वरिवरिहि सोई तरि कदा ॥

विपक्षाच्या वक्षावरि विवर-लक्षास्तव रणी ।

कळे राजेंद्राची त्वरित शरसंधानकरणी ॥९॥

वसंततिलका

धाले धनी पुढिल याचक या नळाचे । येता फिरोनि समुदाय पथीं तयांचे ॥

मागावयास जन मागिल देखिजेले । येहींच ते सकळ पूरितकाम केले ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP