वसंत तिलका
याची पदे धरिति देव शिरोललामी । स्वाराज्यता मिरवितो गजराजगामी ॥
तो वज्रपाणि बहुलोचन कांति भारी । हा पाहिजे तरि वरी नळ रूप-धारी ॥२४१॥
साहील कोण सजणे बहु तेज याचे । मध्यस्थरूप धरितो हरिचे यमाचे ।
स्नेहा धरी अधिक होय तमास वारी । हा पाहिजे तरि वरी नळ रूप-धारी ॥२४२॥
वसंत तिलका
'संपूर्ण ते समज यास्तव दक्षिणाशा । पाप्यास दंड भरितो करितो विनाशा ॥
देही जयास मिरवे घन-कांति सारी । हा पाहिजे तरि वरी नळ रूप-धारी ॥२४३॥
आधार हाच सजणे बहु जीवनाचा । रक्षी दया करुनि मान ऋषीश्वरांचा ॥
या दास फार म्हणती बहु सौख्यकारी । हा पाहिजे तरि वरी नळ रूपधारी ॥२४४॥
होतील नंदन विलास जयास तो हा । आहे धनंजयहि, धर्महि जाणतो हा ॥
रत्नाकरी तुज विराजविता विहारी । हा पाहिजे तरि वरी नळ रूपधारी ॥२४५॥
स्वागता
शारदेस मग राजसुता हे । शारदेंदुवदना वदताहे ।
शेवटील नळ हा मज बाई । मानला बहु मनी सुखदाई ॥२४६॥
वोव्या
तेव्हा दमयंती सुंदरी । इंद्रादिका नमस्कारी ॥
तयां बोले या उत्तरी । अमृतापरी मधुर ॥२४७॥
माझा भीम जैसा पिता । तैसे तुम्ही जी तत्त्वता ।
करा कन्यादान आता । नळनाथाचे करी ॥२४८॥
द्रुतविलंबित
सुर समस्त इच्या वरनिश्चये । सुरस मस्त ! असे वदले स्वये ।
"नळवरास वरूनि सुखी असे । तुज नको जन कोण म्हणे असे?" ॥२४९॥
वसंत तिलका
मायेचना सुख मनी, कमनीय बाला । मायेसही विसरली; न पुसेच बा-ला ।
दूर्वादली कलितबंध-मधूक-माला । तीणे अलंकृत करी नळ-कंठनाला ॥२५०॥