दमयंती स्वयंवर - पृष्ठ १५

रघुनाथ पंडित यांच्या काव्यात इतके माधुर्य व इतका रस आहे की, ते आरंभापासून शेवटापर्यंत वाचल्यावाचून मनाची तृप्ति होत नाही व एकदा वाचले म्हणजे पुनः वाचावेसे वाटते.


दण्डी

जनकतनयेसी पवनतनयसा तो । वदुनि वेगी उड्डाण नभी घेतो ॥

नळापासी वृत्तांत निवेदी तो । स्वधामाते पावोनि सुखी होतो ॥१४१॥

असो, आल्या इजजवळि सख्या ऐशा । बोलती त्या मग तीस सकळ कैशा ॥

'हंस धरुनी परिपूर्ण तुझी आशा? । काय गेला तो उडुनि गगनदेशा? ॥१४२॥

मालिनी

धरुनि कर सखीने सौधशाळेत नेली ।

खगवचनमधूने जे महा मोहिजेली ॥

नळविरहभराने पोळते गुप्तरूपे ।

नवल कनकसी ते गौरही तप्तरूपे ॥१४३॥

वसंततिलका

होणार जो वर तदीय वियोग हाही । सांगावयासहि न ये लपवावयाही ॥

या सांगवी मदन, लाज न सांगवी ते । हे या दुईत सिनले मन रागविते ॥१४४॥

पद

विरहिण ते सिणते सिण ते जाणेल कवण तियेचे ॥धृ०॥

मुकुरी निजमुख न विलोकी । राकेन्दुभयास्तव ललिता ॥ न करी मृदु भाषण तेही । शुककोकिळकलरवचकिता ॥ कुसुमायुध-सभयमना हे । कुसुमाचा वास न साहे ॥ असमान मनोगत खेद जियेचे ॥१॥

अपह्रत-रतिरूपा जाली । यास्तव ते सापराधा ॥ तरि सुमशर तिजला कैसी । न करील बाणबाधा ॥ मधु तो कां इजला सळितो । विधु का तापास मिसळतो ॥ मधुराधरबिंबा हे बहु जाचे ॥२॥

रघुनाथ वदे जे नोहे । चिंतेस्तव नतवदना हे ॥ राहे जो ह्रदयी धरिला निज रमण तयाला पाहे ॥ केला मतिपंजर रावा । खेळाया तोच विसावा ॥ जाले सिण हाच हरील यियेचे ॥३॥

शिखरिणी

न रंजे कारंजे निरखुनि, फणीने फणफणी ।

मुदेने मोदेना नळगुणगणि जे गुणगुणी ॥

न बैसे जे सेजेवरि न परिसे जे शुकगिरा ।

न नाहे, माना हे न धरि ललना हेतु दुसरा ॥१४६॥

वसंततिलका

लज्जावती युवति हे वडिलांसि धाके । झांकीतसे विरहपावक तो न झांके ।

जो पंजरी लपविला वसनांतराळी । तो झांकिला गगनदीप तरी झळाळी ॥१४७॥

तीचे मनी नळ-मनोभव वीर होते । होता तयांस कथले जथले अहो ते ॥

तेणेच ते दुखविली सुतनू निजेली । मुर्च्छावती निज-जनी अवलोकिजेली ॥१४८॥

मालिनी

गजबज बहु जाली माय धांवोनि आली ।

धरुनि ह्रदयदेशी तीजला शेज केली ॥

करिति विजणवारे त्या सख्या वेगळाल्या ।

वडिलवडिल दाया जाणत्याही मिळाल्या ॥१४९॥

गीति

ते शीतलोपचारी जागी जाली हळूच मग बोले ।

औषध नलगे मजला,' परिसुनि जननी 'बरे'म्हणुनि डोले ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP